हेन्री डेव्हिड थोरो यांच्या ‘वॉल्डन’ किंवा ‘लाइफ इन द वूड्स’ या गाजलेल्या ग्रंथाचा ‘वॉल्डनकाठी विचार-विहार’ हा अनुवाद दुर्गा भागवत यांनी १९६५ साली केला होता. कालानुरूप काही बदलांसह या ग्रंथाची दुसरी आवृत्ती नुकतीच मॅजेस्टिक प्रकाशनातर्फेप्रसिद्ध झाली आहे. नव्या आवृत्तीच्या संपादक मीना वैशंपायन यांच्या प्रस्तावनेतील काही अंश..

‘मी रानात राहायला गेलो तो अशासाठी की जीवन हेतुपुरस्सर जगावे, जीवनाच्या मूलभूत तथ्यांना सामोरे जावे, जे इतरांना शिकवायचे ते आपल्या स्वत:ला शिकता येते की नाही ते पाहावे, आणि मरतेवेळी आपण जगलोच नाही, हे उमगू नये म्हणून. जे जीवन नव्हे ते जगण्याची मात्र मुळीच इच्छा नव्हती. जिणे किती प्रिय, किती किमती आहे.. मला अगदी खोल, गहन-गंभीर जीवन जगायचे होते.’

अमेरिकेतील एका लेखकाने- तेही पूर्णपणे मुक्त मानल्या गेलेल्या लेखकाने केलेले हे विधान लाखो लोकांना स्वत:च्या अंकित करते, आपले चाहते बनवते, त्यांच्यावर जादू करते, हा गमतीशीर विरोधाभास वाटावा. पण हा असा अभिजात उद्गार अशा कलात्मकतेने व्यक्त केला गेला, की त्याव्यतिरिक्त, त्यात जे सांगितले नाही ते काही अस्तित्वातच नाही असे वाटावे, किंवा जीवनाच्या अत्यावश्यक तथ्यांपासून दूर नेणारे वाटावे. पुन्हा या विधानाच्या भाषेचा पोत आणि त्यात अनुस्यूत असणारा विचार यात लवमात्र फरक वाटू नये. त्या लेखकाची हीच तर इच्छा होती. कधी तर असेही वाटते, की त्याने केलेल्या युक्तिवादापेक्षा त्याने ग्रंथात केलेली कलात्मक मांडणी आपल्याला अधिक आकर्षक वाटते आहे.

हा लेखक होता हेन्री डेव्हिड थोरो. एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध आणि अभिजात अमेरिकन लेखक म्हणून थोरोची गणना आज दीड-दोनशे वर्षांनंतरही केली जाते. त्याच्या ‘वॉल्डन’ या ग्रंथामुळे आणि त्याच्या दैनिकी (जर्नल्स)मधील लेखनामुळे तो जगातला एक अभिजात लेखक ठरला. असे म्हणतात, की अमेरिकेतल्या पहिल्या आठ श्रेष्ठ ग्रंथांपैकी एक म्हणजे ‘वॉल्डन’ होय. लाखो लोकांवर ज्याच्या विचारांचा व जीवनशैलीचा प्रभाव पडला, तो हा लेखक हेन्री थोरो कसा होता, त्याचा जीवनक्रम कसा होता, आपल्या केवळ पंचेचाळीस वर्षांच्या आयुष्यात त्याने एवढे मौलिक आणि विपुल लेखन कसे केले, हे पाहू जाता काही विलक्षण तथ्ये हाती येतात.

दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या विदुषीला वयाच्या पंधराव्या वर्षांपासून थोरोची वाचनसोबत असावी असे वाटू लागले होते आणि त्यांना ती सोबत आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सोडावीशी वाटली नाही. दुर्गाबाईंनी थोरोच्या ‘वॉल्डन’ या पुस्तकाचा अनुवाद केला तो ‘वॉल्डनकाठी विचार-विहार’ या शीर्षकाने ‘मॅजेस्टिक बुक स्टॉल’ प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला होता. त्याबरोबरच त्याच्या ‘Civil Disobedience, Walking’ यांसारख्या गाजलेल्या निबंधांचे व काही पत्रांचे अनुवाद दुर्गाबाईंनी केले, ते ‘चिंतनिका’ या शीर्षकाच्या पुस्तकात समाविष्ट आहेत. शिवाय त्यांनी ऑगस्ट डल्रेथ या लेखकाने लिहिलेल्या थोरोच्या चरित्राचाही (‘काँकॉर्डचा क्रांतिकारक’ या शीर्षकाने प्रसिद्ध असलेला) अनुवाद केला. यावरून त्यांच्यावर असणारा  थोरोचा प्रभाव लक्षात येतो. ‘वॉल्डन’ या पुस्तकाच्या आरंभी दुर्गाबाईंनी लिहिलेले थोरोविषयीचे प्रस्तावनारूपी छोटेसे टिपण जरी वाचले तरी त्यांचा थोरोबद्दलचा आदरही आपल्याला जाणवत राहतो.

दुर्गाबाईंनी साठेक वर्षांपूर्वी केलेला ‘वॉल्डनकाठी विचार-विहार’ हा अनुवाद पूर्वी वाचलेला होता. आता त्या पुस्तकाच्या द्वितीयावृत्तीचे संपादन करताना मी थोरोबद्दल अधिक वाचत गेले. थोरोचे उल्लेख जेव्हा जेव्हा केले जातात, तेव्हा तेव्हा काही बाबी नेहमीच अधोरेखित होतात. थोरो आणि निसर्ग, थोरो आणि वॉल्डनचे तळे, थोरो आणि क्रांती, थोरो आणि कविता, थोरो आणि विजनवास, थोरोचे विपुल लेखन, सविनय कायदेभंगाबद्दलचे त्याचे विचार, महात्मा गांधी, मार्टनि ल्यूथर किंग, टॉलस्टॉय, मास्रेल प्रूस्त यांसारख्या जागतिक नेत्यांवरील व साहित्यिकांवरील थोरोचा प्रभाव, आणि रोजच्या जगण्यासंबंधी त्याने केलेले विविध प्रयोग! या आणि अशा आणखी इतरही गोष्टी ऐकताना, वाचताना या माणसाबद्दलचे माझे कुतूहल वाढत गेले. मुख्य म्हणजे लोकांचे तथाकथित मनोरंजन करणारे असे काहीही त्याने लिहिलेले नसून, आजही लोक आवडीने त्याचे लेखन वाचतात. दीडशे वर्षांनंतरही ते वाचावेसे का वाटते याविषयी मला जाणून घ्यावेसे आणि त्याविषयी वाचकांशी संवाद साधावा असेही वाटले.

एखादा अभिजात लेखक आपण एकदा वाचतो तेव्हा त्याच्या लेखनातील कितीतरी गोष्टी आपल्या नजरेतून निसटतात. तो लेखक आपल्याला पूर्णपणे समजला असे भासले तरी ते खरे नसते. पुन्हा पुन्हा त्याचे लेखन वाचले तर नवीन काही कळत जाते, हा आपला अनुभव! मीही असेच अनुभवले. ‘वॉल्डन’चे लोकांना एवढे आकर्षण अजूनही का, हे समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. ‘वॉल्डन’ दोन-तीन वेळा वाचले तरी प्रत्येक वेळी वेगळे काही लक्षात आल्यासारखे वाटले.

जडणघडण

शालेय शिक्षण संपल्यावर थोरोने हार्वर्डला जायची तयारी केली. आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने, मधूनमधून सुट्टी घेत, शिकवण्यांच्या माध्यमातून अर्थार्जन करत त्याने पदवी मिळवली. या काळात ग्रीक, फ्रेंच, लॅटिन या भाषा शिकून, त्यांतील अभिजात वाङ्मयाच्या अध्ययनाने त्याने आपल्या शिक्षणाला व्यापक वाचनाची जोड दिली. जोडीला बासरीवादन शिकून घेतले. बासरीची साथ त्याला शेवटपर्यंत होती. वॉल्डनमध्ये असताना तळ्याकाठी बासरी वाजवत निसर्गात रममाण होणे हा त्याचा प्रिय छंद व विसावा होता.

इ. स. १८३७  साली हार्वर्डची पदवी मिळाल्यावर अर्थार्जन करण्यासाठी त्याने शिक्षणक्षेत्रात प्रवेश केला. तिथे आपल्या मनातील शिक्षणाविषयीच्या अस्पष्ट  कल्पना प्रत्यक्षात आणण्याची त्याची इच्छा त्याने सुरुवातीलाच व्यक्त केली होती. तो काळ अमेरिकेतील मोठय़ा प्रमाणावरील आर्थिक मंदीचा असूनही त्याच्या चांगल्या पदवीमुळे त्याला काँकॉर्डच्या शाळेत नोकरी लगेच मिळाली. तत्कालीन पद्धतीनुसार आपण विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा करणार नाही, त्याऐवजी त्यांना नैतिक पाठ देऊ असे त्याने जाहीर केले. ‘छडी लागे छमछम..’ असे विचार असणाऱ्या व्यवस्थापनाला ते पटले नाही. त्याच्यावर तशी शिक्षा करण्याचा दबाव येऊ लागला. शेवटी तो दबाव अस होऊन एक दिवस त्याने सहा विद्यार्थ्यांना मदानावर नेऊन छडीने झोडपले आणि लगेच आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.

या घटनेमुळे गावात त्याच्यावर ‘विक्षिप्त’, ‘चक्रम’ असे शिक्के बसले आणि ते शेवटपर्यंत कायम राहिले. त्या प्रसंगानंतर त्याची वृत्ती किती अपारंपरिक आहे याचाही अनुभव लोकांना आला. तो बंडखोर ठरला, काहीसा चेष्टेचाही विषय झाला. कारण त्याच्याबद्दल बोलताना सारे गावकरी उपरोधाने म्हणत, ‘सगळ्या गावात वेळ असलेला एकच  माणूस आहे आणि तो म्हणजे हेन्री थोरो!’ त्याला ‘रिकामटेकडा’ म्हणून हिणवताना लोक थकत नसत. वरील प्रसंगाने त्याच्या मनात एक बाब स्पष्ट झाली, की आपल्याला नोकरी करणे, त्यासाठी कोणत्याही संस्थेला बांधून घेणे आणि आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी करणे जमणारे नाही. पुढील संपूर्ण आयुष्यात त्याने खूप कष्ट केले तरी पूर्ण वेळाची नोकरी केली नाही.

थोरोने एक प्रयोग म्हणून घरातून बाहेर पडत एकटय़ाने रानात राहायला जायचे ठरवले.  मनमुराद भटकंती, पूर्ण स्वातंत्र्याचा उपभोग, चरितार्थाचे सर्व ठरीव मार्ग, रूढ चाकोरी सोडून देत केवळ निसर्गनिरीक्षण, ऋतुचक्राचे अवलोकन, चिंतन, मनन आणि लेखन हाच आपला व्यवसाय असे हेतू मनाशी ठेवत त्याने वॉल्डनकाठी आपले घर थाटले.

लेखनाचा श्रीगणेशा

वॉल्डनमध्ये त्याने एवढे दिवस काय केले, कोणता व्यवसाय केला, त्याला एकटेपणा वाटला का, तो तिथे कसा राहिला, याचे कुतूहल त्याच्या गावातील काँकॉर्डमधील गावकऱ्यांना वाटत  होते. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आपण आपल्या या रहिवासाचे वर्णन ‘वॉल्डन’ या ग्रंथात केले, असे त्याने नोंदवले. हे वर्णन म्हणजे रूढार्थाने त्या विशिष्ट काळातील आत्मपर आठवणी नाहीत, कोणतेही प्रवासवर्णन नाही, अथवा एखाद्या निसर्गशास्त्रज्ञाचा अहवालही नाही. त्यात त्याने क्वचित तत्त्वज्ञानपर, तर कधी राजकीय बाबींवर आधारित टिपण्या केल्या आहेत. तसेच आजूबाजूच्या परिसराची, तेथे दिसणाऱ्या, भेटणाऱ्या माणसांची, शेतकऱ्यांची, वा कधी प्राण्यांचीही शब्दचित्रे आहेत. कधी त्या तळ्यात मोसम बदलला की पाण्याची होणारी आंदोलने, त्या तळ्याच्या  खोलीबद्दलची वैज्ञानिक माहिती, वातावरणातले चढउतार अशांची वर्णने येतात. महत्त्वाचे म्हणजे एकोणिसाव्या शतकातील अमेरिकेबद्दलची त्याची निरीक्षणे आहेत. ओघानेच समाज, धर्म, परंपरा, समाजाचा- पर्यायाने देशाचा विकास, शिक्षणपद्धती, बदलता काळ या सगळ्यांविषयी त्याने आपली मते मांडली आहेत.

हे लेखन म्हणजे थोरोसारख्या एका स्वतंत्रप्रज्ञ, आत्मनिष्ठ तरुणाचा झालेला मानसिक प्रवास आहे. यात वर्णिलेल्या विषयांना त्या काळाची, त्या- त्या वेळेची पार्श्वभूमी आहे, तरीही ते कालातीत आहेत. अशा वर्णनांनी युक्त असे हे पुस्तक आजच्या काळातही लोकांना आवर्जून वाचावेसे का वाटते? कारण वाचकांना ते आपल्याशी जोडलेले आहे असे वाटते. वाचक त्यात गुंतत जातात. दीडशे वर्षांमध्ये काळ इतका पुढे गेलाय, की थोरोने वर्णिलेल्या गोष्टींची संभावना लोकांनी खरे म्हणजे कालबा ठरवून, टाकाऊ, फालतू म्हणून कशी केली नाही, असा विचार मनात येतो. साऱ्या समाजाची नैतिक, सांस्कृतिक, सामाजिक घडण जणू काही मुळापासूनच बदलून गेली आहे असा आपला आजचा अनुभव!

रानातले जीवनानुभव

मला असे जाणवते, की थोरोने ‘वॉल्डन’मध्ये जे जे मांडले आहे, ते ते स्वानुभवातून आलेले आहे. त्याने नुसतेच ‘लोकां सांगे..’ असे लिहिलेले नाही, किंवा कोणताही आव आणत आपला शहाणपणा दाखवण्याच्या हेतूने काही लिहिलेले नाही. तो कसलाही उपदेश करत नाही. तर त्याला जे सांगावेसे वाटते ते त्याने आपल्या कृतीतूनही दाखवून दिलेले आहे. हे असे राहणे, करणे, असे जगणे नुसतेच शक्य आहे असे नाही तर ते विलक्षण आनंददायी आहे असे त्याने म्हटले आहे. मुळात लोकांना काही शिकवण्यासाठी, कशाचा प्रचार करायसाठी तो रानात गेलाच नव्हता. त्याला लेखन हे आपले जीवितकार्य वाटत होते आणि त्यासाठी निसर्गसान्निध्य हवे होते. ते मिळवण्यासाठी तो रानात गेला होता.

श्रद्धेबाबत थोरोने वेगळाच विचार मांडला आहे. निसर्गाला प्रतिसाद देत देत जगायला हवे. तेथील नैसर्गिक चमत्कार, अद्भुत गोष्टी न्याहाळल्यात तर तुम्ही त्या निसर्गावर आपोआपच श्रद्धा ठेवत श्रद्धावान व्हाल. ही श्रद्धा अंधश्रद्धा नाही. तुमच्यासमोर घडणारे निसर्गाविष्कार तुम्हाला सतत तुमच्या आयुष्याची जाण देत राहतात. मानव हा स्वत:ला अति सामर्थ्यवान समजतो; पण वस्तुत: तोही चराचर व्यापून राहणाऱ्या निसर्गाचा एक छोटासा भाग आहे. तऱ्हेतऱ्हेचे पक्षी, प्राणी, सारे सजीव, समुद्र, नद्या, पर्वत हे जसे निसर्गाचे घटक आहेत, तसाच मानव हाही एक घटक आहे. या विश्वात क्षुद्र किडामुंगीपासून तर वनराजापर्यंत आणि छोटय़ाशा ओहोळापासून तर महासागरापर्यंतच्या अनेक घटकांप्रमाणेच मानव हा निसर्गाधीन असा एक अंश आहे.

वॉल्डनमध्ये राहून त्याने हे सारे अनुभवले. त्याची कुटी वॉल्डनच्या तळ्याकाठीच होती. हे सारे आदिम काळापासूनचे आहे आणि आपण त्याच्यापासून दूर गेलो तर आपण आपले आयुष्य दु:खी करून घेऊ अशी त्याची ठाम धारणा होती. तो मुळी वर्तमान-भविष्यावर अवलंबून नाहीच. त्याच्या मते विश्वाचा भूतकाळ हाच काय तो मानवतेचा शिल्पकार! माणसाने कालौघात केलेली आपली तथाकथित प्रगती, विकास हा निसर्गापासून आपल्याला खूप दूर नेतोय आणि त्यात माणसाचे आयुष्य वाया जातेय असे त्याचे म्हणणे आहे.

थोरो आणि दुर्गाबाई भागवत

दुर्गाबाईंच्या वाचनात वयाच्या पंधराव्या वर्षीच थोरोचे ‘वॉल्डन’ आले. त्याचे अनुभव बाईंना रोचक वाटले. पुढच्या तीन-चार वर्षांतच बाई गांधीजींच्या आंदोलनात सहभागी झाल्या. त्यासाठी त्यांनी एक वर्ष शिक्षणही सोडले. गांधीजींच्या अिहसात्मक आंदोलनाचे बीज थोरोच्या लेखनात आहे हे त्यांच्या वाचनात आले होते. त्याचे विचार, मते यांनी बाई भारावल्यासारख्या झाल्या असाव्यात. पुढे बाईंना जीवघेण्या आजाराने ग्रासले आणि त्यांच्या जीवनाची दिशाच बदलली. त्यांना काहीसा एकाकीपणा आला. त्या म्हणतात, ‘..एकाकीपणाने ग्रासलेल्या या जीवनात आनंद निर्माण करता येतो हे अनुभवाने शिकले. हा अनुभव निसर्गाच्या जाणिवेचा होता. त्याचे सर्वगामी रूप आणि हरघडी बदलणारे भाव किती रमणीय आणि अंतसुख निर्माण करणारे असतात. निसर्गाच्या परम सौंदर्याचे, औदार्याचे आणि अलिप्ततेचे भान माझ्या मनात प्रज्वलित करणारी एक विक्षिप्त लेखक-वल्ली आपल्या अद्भुत निसर्गपाठासह माझ्या जीवनात शिरली. तो अद्भुत जादूगार म्हणजे हेन्री डेव्हिड थोरो आणि त्याची जादूची कांडी म्हणजे ‘वॉल्डन’! हा-हा म्हणता मी निसर्गाची पूजक झाले. निसर्गाला सर्वस्व मानू लागले आणि थोरोशी कायमचे नाते जोडले.’

दोघांच्या आयुष्यातल्या काही गोष्टींमध्ये आणि लेखनविषयांमध्ये, विचारांमध्ये अनेकदा साम्य दिसते. दोघांचेही आयुष्यभर खूप कष्ट करणे, स्वच्छंद (स्वैर नव्हे!) जीवनाची ओढ असणे, कुणाचीही बांधिलकी नकोशी वाटणे, साधेपणा अंगीकारणे, भरपूर वाचन करणे आणि चिंतनशील वृत्ती ही स्वभाववैशिष्टय़ेही चटकन् लक्षात येतात. दुर्गाबाईंच्या चित्रमय, नादमय भाषेबद्दल आपण अनेकदा वाचलेले आहे, अनुभवलेले आहे. त्यांचीही शैली अननुकरणीय. त्यांच्या लेखनात लोककथा, लोकसाहित्य, प्राचीन साहित्य यांचे संदर्भ विपुल. दोघांनाही निसर्गामधील जे जे नवल दिसते, ते ते टिपण्याची आवड आणि त्याचा आपल्या जीवनाशी असणारा संबंध जाणण्याची उत्सुकता! थोरोची शब्दयोजना अतिशय नेमकी. वॉल्डनच्या एकूण १८ प्रकरणांची शीर्षके देताना त्याने केवळ ३९ शब्दांचा वापर केला आहे. पुन्हा ती सारी शीर्षके अर्थपूर्ण आहेत. बाईंच्या शैलीचे ‘अल्पाक्षररमणीयत्व’ ‘ऋतुचक्र’च्या आणि इतरही लेखांच्या शीर्षकांवरून लक्षात येतेच. दोघांच्या लेखनाला व्यासंगाबरोबरच चिंतनशीलतेची जोड असल्याने त्यांच्या छोटय़ा वाक्यांतूनही मोठा आशय, जीवनसत्ये प्रतीत होतात. ‘वॉल्डन’चा अनुवाद करताना बाई म्हणतात, तसे थोरोची शैली ही अनुवादास कठीण असली तरी अनेक ठिकाणी बाईंनी त्या, त्या मूळ शब्दाची अर्थच्छटा जाणून घेत योग्य शब्दांचा वापर केला आहे. शिवाय कितीतरी शब्द बोलीभाषेतील किंवा ग्रामीण लोकांच्या वापरात असणारे वापरलेले आहेत.