ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण नायक यांना नुकताच ‘वसंत सोमण पुरस्कार’ जाहीर झाला असून तो त्यांना १५ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये प्रदान करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने नायक यांच्या कार्यावर त्यांच्या स्नेह्य़ाने टाकलेला दृष्टिक्षेप..
काम घेतले करताना कधी
गप्पा ठोकित बसू नये
कुठून केव्हा कशास असले
सवाल कोणी पुसू नये  
–  कुसुमाग्रज
माणसांवर मनापासून प्रेम करणाऱ्या रामकृष्ण नायक ऊर्फ रामकृष्णकाका नावाच्या माणसाच्या काचेसारख्या पारदर्शी जीवनाचा हा मूलमंत्र. म्हणूनच वयाच्या पंचाऐशींव्या वर्षीसुद्धा हा गृहस्थ दिवस-रात्रीची तमा न बाळगता आणि आपल्या ढासळणाऱ्या प्रकृतीची चिंता न करता मिळेल तितक्या लोकांना एकत्र करून आपण आखून घेतलेल्या व्रती रस्त्यावर निमूटपणे पण दमदार पद्धतीने गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ वाटचाल करत आहे.
वास्तविक आयुष्याच्या या वळणावर बहुतेक लोक शारीरिक व मानसिक निवृत्ती पत्करतात. आपल्याकडून यापुढे काही काम होणार नाही असे स्वतच ठरवतात किंवा यापूर्वी खूप काम केल्यामुळे आता जरा विश्रांती घ्यावी असे म्हणून दिवसाचे चोवीस तास निष्काम फुकट घालवण्यात धन्यता मानतात. परंतु आयुष्याच्या या मुक्कामावरसुद्धा दिवस-रात्र कसे कमी पडतात आणि शरीराने साथ दिली नाही तरी मानसिक बळावर किती कार्य करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा संवेदनशील मानव – रामकृष्ण नायक. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते अशी एक इंग्रजी म्हण आहे. परंतु या अविवाहित पुरुषाच्या मागे मात्र एक विचारांची धारा आहे. आपल्या गोतावळ्यामधील अनेक क्षेत्रांतील नामवंताच्या गप्पांमधून हे विचार पक्के झालेले आहेत. कविकुलगुरू कुसुमाग्रज, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. वसंत कानेटकर, मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य अशी या मित्रमंडळींची काही नावे वाचली तरी आदराने आपली मान खाली झुकते.
अपार भूमी निराशयाची
      तटस्थ वरती स्तब्ध निळाई
धुक्यात अंधुक लपेटलेली
      क्षितिजावरती दिसे सराई
कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या या ओळी वाचूनच पाव शतकापूर्वी रामकृष्णकाका इथे आले की, काय असा विचार मनात आल्याशिवाय राहात नाही. ‘धि गोवा िहदू असोशिएशन’ या संस्थेचा कलाविभाग त्यांनी इतरांच्या साहाय्याने स्थापन केला. स्पध्रेत भाग घेऊन पारितोषिकांची खैरात झाल्यानंतर कलाविभागाला व्यावसायिक रूप दिले. मराठी रंगभूमीवर अनेक नवे प्रयोग सादर केलेल्या नाटकांमधून केले. आजही स्मरणात राहावी अशा दर्जेदार नाटकांची निर्मिती केली. नाइटची पद्धत बदलून कलाकारांना मासिक मानधन देण्याची एक नवीन प्रथा सुरू केली. यामुळेच आपण वसईला घर घेऊ शकलो असे मा. दत्ताराम अनेक वेळा सांगत असत. कलाकार, तंत्रज्ञ, कंत्राटदार या सर्वानाच एक शिस्त लावण्यात हा कलाविभाग अग्रेसर होता.
या कलाविभागाची धुरा सांभाळण्यासाठी पुढची पिढी मनापासून तयार होत नव्हती. त्यांच्या मागे लागून, त्यांच्यात उत्साह निर्माण करून नवीन नाटक निवडणे, कलाकार निश्चित करणे, तालमी व्यवस्थित होतात की, नाही हे बघणे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे प्रयोग लावणे हे सर्व करण्यासाठी लागणारी शक्ती दिवसेंदिवस अपुरी पडणार आहे याची जाणीव त्यांना क्षणोक्षणी होत असावी. कलाविभाग बंद करण्याच्या अतिशय क्लेशदायक निर्णयापर्यंत संस्था पोचली. या निराशेच्या पाश्र्वभूमीवर, मुंबईत ‘धि गोवा िहदू असोसिएशन’ या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक आणि सांस्कृतिक ‘मळा’वर काम करणारा हा स्वयंसेवक, अचानक ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी करावे यासाठी अस्वस्थ होतो आणि गोवा हे आपले कार्यक्षेत्र निवडावे असे आपल्या संस्थेमधील सहकाऱ्यांना पटवून देतो याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना इथे सराईचे अंधुक दर्शन झाले होते. बांदोडे या गावातील एक डोंगरवजा उजाड जमीन या कामासाठी निवडली. ज्यांनी त्यावेळी ही जागा बघितली त्या सर्वानी त्यांना जवळ जवळ मूर्खातच काढले होते. परंतु बाबा आमटेंनी माळरानावर फुलवलेली बाग ही त्यांची प्रेरणा होती. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी आदिवासींच्या जंगलात केलेले कार्य हा त्यांचा विश्वास होता. त्या बळावरच त्यांनी या काटेरी जमिनीवर पहिले पाऊल टाकले ते अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा या निर्धारानेच. आज स्नेहमंदिर ही वास्तू पाहिली, की हा निर्धार किती योग्य होता याची प्रचीती येते. आपल्या व आपल्या सहकाऱ्यांवर अदम्य विश्वास ठेवला की, शिल्प कसे साकारू शकते त्याचे हे उत्कृष्ट उदाहरण.
माझा आणि रामकृष्णकाकांचा परिचय जेमतेम पंधरा वर्षांचा आणि तोही कुसुमाग्रजांच्या कवितेमुळेच झालेला. त्याचे रूपांतर त्यांनी ओळखीमध्ये केव्हा केले हे मला कळलेच नाही. आता ती सलगी झाली आहे. वाटते हा परिचय माझ्या ऐन उमेदीत व माझ्या जडणघडणीच्या वयात झाला असता तर आयुष्य सत्कारणी कसे लावावे याबद्दलची धडपड फार लवकर सुरू करता आली असती. पण भूतकाळाचा वापर कुढण्यासाठी न करता शिकण्यासारखे शोधण्यासाठी करावा हे मी त्यांच्याकडूनच शिकतो आहे.
खरे तर रामकृष्णकाकांच्या कार्याची होणारी प्रगती व उन्नती पाहून सर्वाधिक आनंद होणार असलेली तीनही माणसे आज दुर्दैवाने काळाच्या पडद्याआड गेली आहेत. ती म्हणजे त्यांच्या सुखदुखातले भागीदार, त्यांचे अतिशय जिवलग मित्र आणि वेळप्रसंगी त्यांना खडसावण्याचा अधिकार असलेले अवधूत गुडे, प्रभाकर आंगले आणि दामू केंकरे. परंतु याशिवाय त्यांच्या परिचयाचे अगणित लोक आहेत आणि ओळखीचे असंख्य आहेत. स्न्ोहमंदिरला देणगी दिलेल्या प्रत्येक दात्याला प्रत्यक्ष भेटून त्याला आदरपूर्वक दोन्ही हात जोडून कमरेत वाकून नम्रतेने नमस्कार करण्याचा त्यांचा अट्टहास असतो. अंतरामुळे जेथे हे शक्य नसते तेथे त्यांचे याच भावनेने ओथंबलेले पत्र जाते. आपल्या संस्थेकरता उदार मनाने देणगी देणाऱ्याची किंमत त्यांनी त्याच्या देणगीच्या मूल्यावर कधीही केली नाही, तर नेहमीच त्याच्या मनातील सहृदय भावनेला त्यांनी प्रणाम केला. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या देणगीदारांच्या समोर नम्रतेने हात जोडून, डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या स्थितीत उभ्या राहिलेल्या रामकृष्णकाकांना पाहणे हे परमभाग्य मला अनेकदा मिळाले अहे. आपल्या संस्थेला मदत करणाऱ्यांप्रती काय भावना असावी लागते त्याचे हे मूíतमंत उदाहरण होय. म्हणूनच की काय स्नेहमंदिरच्या दात्यांच्या नामावलीसाठी िभती कमी पडू लागल्या आहेत.
स्नेहमंदिरची वास्तू पूर्ण होऊन तिथे ज्येष्ठ नागरिक सुखाने वास्तव्य करू लागल्यावर वास्तविक ते काम संपल्यात जमा होते. परंतु बदलणाऱ्या काळाबरोबर समाजातील दुर्बल आणि दुर्लक्षित घटकांच्या बदलणाऱ्या समस्या त्यांना दिसू लागल्या होत्या. यामध्ये आसपासच्या परिसरातील अर्धशिक्षित व अशिक्षित मुलांचे प्रमाण ही प्रमुख समस्या होती. यातूनच दत्तक योजना साकारली आणि त्यासाठी निधी गोळा करणे सुरू झाले. पाच ते दहा मुलांना दत्तक घेऊन सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आज ऐंशीच्यावर मुलांना या योजनेचा फायदा मिळत आहे. ही योजना मार्गी लागून स्थिरावल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून परिसरातील दुलíक्षत व मागास घटकांसाठी आरोग्य योजना सुरू झाली. गावातील अंतर्गत भागात ग्रामपंचायतींच्या सहकार्याने चालवलेल्या या योजनेमुळे अनेक कुटुंबे व्याधीमुक्त होण्यास मदत झालेली आहे. या सर्व योजनांचे वैशिष्टय़ म्हणजे या आरंभशूर योजना नाहीत. अनेक सेवाभावी व स्वयंसेवी संघटना अशा योजना सुरू करतात, पण त्या केवळ अध्यक्षीय कारकिर्दीपुरत्याच वर्षभर टिकतात. या उलट स्नेहमंदिरमार्फत सुरू केलेल्या योजना या दीर्घकालीन चालण्यासाठीच सुरू केलेल्या आहेत. त्या प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र निधी आहे. एका योजनेच्या निधीच्या पशांचा वापर दुसऱ्या योजनेसाठी शक्य तो होऊ नये, यावर कटाक्षाने नजर ठेवली जाते. ही स्वतच्या अंगातील आíथक शिस्त आपल्या सहकाऱ्यांमध्ये रुजवण्याच्या कामात रामकृष्णकाका यशस्वी ठरलेले आहेत.
उगवणारा आजचा सूर्य
   कालचा सूर्य मारतो आहे
उद्या उगवणारा सूर्य
   आज मला तारतो आहे.
आज काल उद्याचे मी
   नसते नाते विणतो आहे
आकाशावर आशयमहाल
   बांधण्यासाठी शिणतो आहे
निसर्गातून असणे आले
   निसर्गातच सरणे आहे
रित्या पात्रात चतन्याच्या
   ठिणग्या तोवर भरणे आहे.
कुसुमाग्रजांनी या कवितेत म्हटल्याप्रमाणे चतन्याची रिती पात्रे शोधून काढून त्यात ठिणग्या भरण्याचे सामाजिक कार्य अविश्रांतपणे व अव्याहतपणे ते दिवसरात्र करत आहेत.
रामकृष्णकाका म्हणजे संकल्पना आणि आयोजन यांचा मेळ कसा घालावा अणि ते कसे असावे याचा आदर्श नमुनाच. ज्यांनी स्नेहमंदिरचा झालेला रौप्यमहोत्सवी सोहळा अनुभवला आहे किंवा अलिकडेच मुंबईत साजरा झालेला तिसावा वर्धापनदिन पाहिला आहे त्यांना याचा प्रत्यय आल्यावाचून राहणार नाही. आयोजनामध्ये राहू शकणाऱ्या त्रुटी आणि येऊ शकणारे संभाव्य धोके यांचा आधीच विचार करून त्यावरील उपाययोजना कशी तयार करावी हे सर्व कार्यकर्त्यांनी अनुभवलेले आहे.
नायक मी खलनायकही मी
सूत्रधार मी मीच विदूषक
विविध भूमिका करिता करिता
मीपण आता कुठले शिल्लक !  
वास्तविक कविवर्य कुसुमाग्रजांच्या या चार ओळी लिहिल्या तरी रामकृष्णकाकांचे खरेखुरे शब्दचित्र तयार होते. त्यांच्या कामाची व्याप्ती ही केवळ त्यांच्या दोन संस्थांपुरती मर्यादित नाही. ज्याला ज्याला जेव्हा जेव्हा जी जी गरज लागेल, त्यासाठी वाटेल ती मदत करण्याची त्यांची तयारी असते. पण त्यासाठी त्यांच्या कसोटीवर खरे उतरावे लागते. माणसे पारखून घेण्याचे त्यांचे कसब वाखाणण्यासारखे आहे, तसेच कोणाला काय काम कितपत झेपेल याचा त्यांचा अंदाज बरेच वेळा बिनचूक ठरतो.
‘ज्यांच्या पायावर मस्तक ठेवावे असे पाय ज्या समाजात नाहीत तो समाज दुर्दैवी! पण असे पाय असून मस्तक ठेवत नाही तो समाज करंटा’ असे एक वाक्य ‘नटसम्राट’ या नाटकात वि. वा. शिरवाडकरांनी लिहिले आहे. आज समाजाचे करंटेपण याव्यतिरिक्त इतर अनेक कारणांनी सिद्ध झालेले आपल्याला दिसते. मूकपणाने सहन केली जाणारी राजकीय दिवाळखोरी, तटस्थ व त्रयस्थ वृत्तीने सामाजिक अधपात बघण्याची लोकांना लागलेली सवय, स्वतच्या स्वार्थासाठी धार्मिक तेढ वाढवणारे भ्रष्ट नेते आणि त्यांनाच पुन: पुन्हा निवडून आपलेच भवितव्य अंधकारात ढकलणारे स्वतला सुजाण समजणारे नागरिक हा आता सततचा सामाजिक कोडगेपणा झाला आहे. म्हणूनच कुसुमाग्रजांच्या आणखी एका कवितेची आठवण होते-
वडिलधाऱ्या या पायांना, शताधिकांचे हात स्पर्शती,
खंत एक की उरला नाही, हात एकही खांद्यावरती.
सध्या स्नेहमंदिराला आर्थिक चणचण नाही, पण खरी चणचण आहे, ती ही की रामकृष्णकाकांच्या खांद्यावरती त्यांची प्रकाशाची पाऊले चोखाळणारा हात अजून कोणी ठेवलेला नाही. त्यांची शताब्दी होईपर्यंत त्यांचे खांदे अपुरे पडतील इतके हात त्यांच्या खांद्यावर उरावेत एवढीच त्या जगन्नियंत्याकडे इच्छा व अपेक्षा.

Story img Loader