महाराष्ट्र विक्रमी उन्हाने फेब्रुवारी अखेरीलाच हैराण झाला. त्या वेळी अरवली पर्वताच्या पायथ्याशी निमलीतील ‘अनिल अग्रवाल एन्व्हायर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’मध्ये सकाळी आणि संध्याकाळी अंगावर गरम कपडे घालणं भाग होतं. दिवसा असंख्य स्वरांत पक्ष्यांचं कूजन आणि संध्याकाळपासून रातकिड्यांची एकतारी ऐकू येत होती. अशा रम्य परिसरात ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सी. एस. ई.)’ने ‘स्टेट ऑफ इंडियाज एन्व्हायर्नमेंट २०२५’ अहवालाचं प्रकाशन करताना संशोधक तसंच पर्यावरण पत्रकारांचा तीन दिवस संवाद घडवून आणला.
देशातील महत्त्वाच्या संशोधन संस्थेतील आणि ‘सी. एस. ई’मधील वैज्ञानिक, कर्तबगार अधिकारी आणि मेघालय ते लडाखपर्यंतचे अनुभवी पत्रकार यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा झाल्या. त्या ऐकताना निमलीमधील ते वातावरण किती काळ राहील, ही शंका येत होती. कारण २०२४ या वर्षानं इतिहास घडवला होता.
२०२४ साली पृथ्वीचं सरासरी तापमान औद्याोगिकपूर्व पातळीपेक्षा १.७५ अंश सेल्सिअस वाढलं असं ‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस’नं जाहीर केलं आहे. पृथ्वीवर गेल्या सहा हजार वर्षांत अशी तापमानवाढ झाली नव्हती. २०२४ हे हवामान बदलापूर्वीच्या आणि नंतरच्या काळाची विभागणी करणारं वर्ष झालं आहे. गेल्या वर्षातील प्रत्येक दिवशी जगाला अतिवृष्टी, ढगफुटी, बर्फवृष्टी, अरण्यवणवे, उष्णतेची लाट वा भूस्खलनाच्या यातनांनी हैराण केलं. तर भारतात २७५ दिवसांपैकी २५४ दिवस देशाला हवामान आपत्ती सहन करावी लागली.
‘सी. एस. ई.’ने २०२४ या वर्षात ‘पर्यावरणाची अवस्था’ दाखवत या परिस्थितीतूनही ‘व्यवस्था’ कशी घडवता येईल, यावर सविस्तर मांडणी केली. त्या वेळी ‘आपली शहरं तप्त का होत आहेत? ते रोखण्यासाठी शहर नियोजन कसं करावं?’ या उपाययोजनांचीही सखोल चर्चा झाली. त्या वेळी पुण्यातील भारतीय ‘उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र’ संस्थेचे हवामानशास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल म्हणाले, ‘‘ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत २०१३ च्या उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर सागरी सस्तन प्राणी तसेच मासे मरण पावले. ही पहिली सागरी उष्णतेची लाट मानली जाते. हिंद महासागरात सध्या वर्षभरात २० ते ५० दिवस उष्णतेच्या लाटा येत आहेत. हे प्रमाण वाढत असून, २०५० पर्यंत तो कायमस्वरूपी उष्णतेच्या लाटेच्या स्थितीत जाण्याची चिन्हे आहेत. उष्ण कटिबंधातील भारताच्या तिन्ही बाजूंचे समुद्र तापत असल्यामुळे चक्रीवादळे तीव्र होत आहेत, परिणामी पाऊसमान बिघडत आहे. भारत देश हा हवामानाच्या बदलाचे मूर्तिमंत उदाहरण ठरत आहे.’’

पुणे-मुंबई तसेच इतर सर्व शहरांमधील वेगवान बांधकामांमुळे सर्वदूर ‘काँक्रीटपूर’ तयार झाले आहेत. त्याआड येणारे डोंगर, जंगल कापून टाकण्यात आले. मिठी-मुठा आणि इतर सर्व नद्यांची गटारे बनविली गेली. या ‘विकासक’ उद्याोगांमुळे गेल्या वीस वर्षांत बंगळूरु ते श्रीनगर- अनेक शहरांतून पाणवठे आणि उद्याने झपाट्याने नष्ट होत गेली. उष्णता शोषून घेणाऱ्या निळ्या- हिरव्या अशा दोन्ही क्षेत्रांत सुमारे पंचेचाळीस टक्के घट झाली. वाढत गेलेलं काँक्रीटीकरण, हवेचं प्रदूषण यांमुळे उष्मा नियंत्रण बिघडून जात आहे.

पूर्वी शहरांत दिवसापेक्षा रात्रीचं तापमान हे १० ते १२ अंश सेल्सिअसने कमी होऊन रात्री गारवा जाणवत असे. २०२० पासून दिवसाबरोबरीनं रात्रींचंही तापमान वाढत गेलं. तेव्हापासून मुंबईसह इतर सर्व महानगरांमध्ये दिवस-रात्रीच्या तापमानात फरक हा ६ ते ९ अंश सेल्सिअस एवढाच जाणवू लागला आहे. त्यात आर्द्रतावाढीची भर पडत आहे. एकाच वेळी उष्ण आणि दमट होत जाणाऱ्या भारतीय शहरांना ‘उष्णतेच्या बेटांचं (हीट आयलँड)’ रूप आलं आहे. उष्णतेचा परिणाम रात्री अधिक जाणवत असल्यानं शहरांना रात्र कासावीस करीत आहे. रात्रीची शांत झोप ही शरीरातील पेशी आणि उतींची हानी भरून काढते, तसंच शरीरास पूर्ववत करू लागते. रात्रीचं तापमान जास्त झाल्यास ते मेंदू, फुप्फुस आणि हृदयावर यांच्यासह शरीराची प्रतिकार तसेच चयापचय यंत्रणांवर परिणाम करतं. रात्रीचा उष्मा आरोग्यास घातक आहे. उष्माघाताचा धोका हा अठरा ते पस्तीस वर्षें वयोगटातील तरुणांना अधिक आहे, असं आरोग्यतज्ज्ञांचं मत आहे.

मैदानी भागात तापमान ४० अंश सेल्सिअस, समुद्रकिनारी भागात ३७ अंश आणि टेकड्यांमध्ये ३० अंश सेल्सिअस ओलांडल्यास किंवा कुठेही ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेल्यास भारतीय हवामान खातं उष्णतेची लाट घोषित करतं. परंतु केवळ तापमानावरून उष्णतेची तीव्रता लक्षात येत नाही. वाऱ्याचा वेग अधिक असेल तर वातावरणात असलेली थंडी अधिकच जाणवते. त्याचप्रमाणे आर्द्रता वाढली की उन्हाचे चटके त्रासदायक होतात. प्रत्यक्ष तापमान आणि जाणवणारं तापमान यांत फरक असतो. म्हणूनच, तापमान आणि सापेक्ष आर्द्रता यांचा एकत्रित विचार करून ‘उष्णता निर्देशांक’ (वेट बल्ब टेम्परेचर) काढला जातो. साध्या थर्मामीटरनं मोजलं जातं ते कोरडं तापमान (ड्राय टेम्परेचर)! ओल्या कापडानं थर्मामीटर झाकून मोजलेलं तापमान हे सभोवतालच्या हवेतील आर्द्रता गृहीत धरून वेट बल्ब टेम्परेचर येतं. त्यावरून मानवी शरीर थंड होण्याची प्रक्रिया लक्षात येते.

मानवी शरीराची उष्णता सहन करण्याची सुरक्षित मर्यादा ही तीस अंश सेल्सिअस असून, त्याची कमाल मर्यादा पस्तीस अंश सेल्सिअस इतकी आहे. हा उष्णता निर्देशांक तीस ते पस्तीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्यास, शरीर थंड होण्याच्या प्रक्रियेमध्ये शरीरातील द्रव पदार्थांची पातळी कमी होऊ लागते. रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. रक्तात गुठळ्या तयार होतात. थकवा, स्नायू आखडणे, चक्कर येणं, बेशुद्ध पडणं, हृदयविकाराचा वा मेंदूचा झटका येणं, असे अनेक त्रास होऊ शकतात. शेतमजूर, वीटभट्ट्या आणि बांधकामावरील कामगार, असे उन्हातान्हात काम करावं लागणारे लोक उष्णतेच्या लाटेत होरपळून निघतात. दिल्लीमध्ये २०२४ च्या जून महिन्यात उष्णतेचा बॉम्बहल्लाच झाला होता. दिवसा तापमान ४३ अंश रात्री ते ३० अंश, तर उष्णता निर्देशांक ३३ अंश सेल्सिअस झाला. त्यात सुमारे चाळीस हजार जणांना उष्माघात झाला. पदपथ, बागा आणि रस्त्यावर एकशे नव्वद बेघर उष्माघाताने मरण पावले होते.

सध्या, देशातील २८१ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटांचा तीव्र धोका आहे. त्यात महाराष्ट्रातील चंद्रपूर, अकोला, अहमदनगर, वर्धा, वाशीम, नंदूरबार, नांदेड, हिंगोली, परभणी बीड, जालना, धाराशिव आणि लातूर हे तेरा जिल्हे येतात. या जिल्ह्यांत उन्हाळ्यातील उष्णतेचा वणवा ३० ते ४० दिवस होरपळवत राहू शकतो. ही परिस्थिती आणीबाणीसारखीच आहे. पण अजूनही ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणा’नं ‘उष्णतेची लाट’ ही अधिसूचित आपत्ती मानलेली नाही. त्यामुळे उष्णतेच्या लाटेकडे पुरेशा गांभीर्यानं पाहिलं जात नाही. ती दूरवर पसरलेली आणि विखुरलेली असल्यानं त्यात ‘बातमीमूल्य’ वाटत नाही.

२०२५ चा फेब्रुवारी महिना आजवर कधीही नव्हता एवढा उष्ण होता. महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गोव्याच्या किनारपट्टीवर ३५ ते ३७ अंश सेल्सिअस तापमान होतं. मुंबईमध्ये तापमान ३८.७ अंश सेल्सिअस, सापेक्ष आर्द्रता सुमारे ४० टक्के असल्यामुळे उष्णता निर्देशांक ३० अंश सेल्सिअस एवढा होता.

भारतीय हवामान खात्यानं- २०२५ मार्च महिना हा अधिक उष्ण असेल, असा झ्शारा दिला आहे. अशा उष्णतेच्या लाटांचा सामना करण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. ओदिशा आणि बिहारमध्ये वारंवार भोंगा फिरवून तापमानाची तसेच काळजी घेण्याची माहिती दिली जाते- ‘घराच्या छताला पांढरा रंग लाऊन घ्या. दुपारी १२ ते चार घराबाहेर पडू नका. सतत पाणी आणि सरबत प्या. डोके, कान व मान झाका.’ जागरूकता वाढवण्यासाठी ‘आशा’ कार्यकर्त्या, विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना सोबत घेतात. प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा रुग्णालयांना सजग करतात. हे उपाय सार्वत्रिक होणं अवघड आहे काय?

जनहितार्थ संशोधन करणाऱ्या ‘सी.एस.ई.’नं दिल्ली, चेन्नई, पुणे, नागपूर, अहमदाबाद आणि जयपूर या प्रमुख भारतीय शहरांमधील उष्णतेच्या ताणाचं (हीट स्ट्रेस) मापन केलं. त्यांना या शहरांतील ७५ टक्क्यांहून अधिक भूभागावर उष्णतेचा ताण जाणवला. ही शहरे रात्रीसुद्धा थंड होत नाहीत. तो ताण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात? याविषयी ‘सी.एस.ई.’नं सूचनाही केल्या आहेत. दाटीवाटीनं आभाळझाकू इमारती रचल्यानं शहरं कोंदट होत आहेत. इमारतींचं बांधकाम करताना काँक्रीटच्या विटा (ब्लॉक)ऐवजी मातीच्या किंवा राखेच्या (फ्लाय अॅश) विटा वापरल्या तर उष्णता शोषण्यात ४० टक्के घट होते. इमारती गरम होतात म्हणून त्या थंड करण्यासाठी खर्च वाढत आहे.

इमारतीमध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी वायूविजन, गरम हवा बाहेर खेचणारे पंखे आणि उभी उद्यानं असे अनेक उपाय सुचवले आहेत. हवामान बदलाच्या घटना जागतिक असल्या तरी त्याला सामोरं जाताना स्थानिक पातळीवरच उपाय करावे लागतील. युरोपमध्ये हरित इमारती, हरित शहरे, विवेकी शहरे (रॅशनल) यांवर सातत्यानं कार्यशाळा व परिसंवाद घेतले जातात. शहर नियोजनकार, वास्तुविशारद, मेंदूशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ एकत्र बसतात. नागरिकांना कोणत्या घरांमध्ये आल्हाददायक वाटतं? हे ठरवताना त्यांच्या मेंदूचा ई.ई.जी. काढतात. हरित इमारती आणि हरित शहरांतील रहिवाशांच्या होणाऱ्या आरोग्यात सकारात्मक बदल तपासतात. त्यानंतर हवामान बदलास जुळवून घेणाऱ्या इमारती तसंच वसाहती यांच्या रचना सुचवतात. स्थानिक संस्था अशा रचनांना खास अनुदान आणि कर सवलत देतात. उत्कृष्ट रचनांना राष्ट्रीय पातळीवर गौरवतात. परदेशातील महानगरपालिका ‘शहर नियोजन’ हा विषय अतिशय गंभीरपणाने घेतात. स्वत:चा वेगळा ठसा उमटवण्यासाठी महापौरांमध्ये स्पर्धा लागते तेव्हा एकेक शहर सुंदर होत जातं.

शहरामध्ये उत्तम वृक्ष लागवड केल्यास ते हरित आच्छादन ४ अंश ते १० अंश सेल्सिअसनं तापमान कमी करू शकतं. हे अनेक शहरं दाखवून देत आहेत. केवळ युरोपच नव्हे; तर सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, जपान व व्हिएतनाम आदी देशांत शहरी वनं निर्माण केली जात आहेत. चीनमधील लियोझाऊ हे पथदर्शी वनयुक्त शहर आहे. तिथे एक हजार टन प्राणवायू मिळवण्यासाठी आणि दहा हजार टन कर्ब वायू शोषून घेण्यासाठी, चाळीस हजार वृक्ष आणि दहा लाख झुडपं लावली आहेत. आपल्याकडेही महाराष्ट्रात आणि देशात ठिकठिकाणी वृक्ष लागवडीसाठी अनेक संस्था तसेच गट प्रयत्नशील आहेत. त्याला व्यवस्थित ‘आकार’ देऊन (झुडपांना वृक्ष न ठरवता) ‘शहरी वन’ वाढवता येऊ शकतं. (नगर नियोजन केल्यास कशी किमया घडून येते? यासंदर्भात नगर नियोजनकार सुलक्षणा महाजन यांची अनेक पुस्तके मराठीत उपलब्ध आहेत.)

ग्राहक, स्थापत्य अभियंते आणि वास्तुरचनाकार आणि डॉक्टरांच्या संघटना यांना ‘कारपेट एरिया’च्या पलीकडे बांधकामास पाहावं लागेल. तरच त्यांना एकत्र येऊन शहरांच्या आरोग्यावर चर्चा घडवता येईल. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस करून कचरा शून्यावर आणणं, सांडपाण्याला निर्मळ करून पुनर्वापर करणं, प्रकाश, हवा उत्तम खेळवून विजेचा वापरच कमी करणं. भिंतींमधील वाहिन्यांतून (डक्ट) थंड आणि गरम पाणी फिरवणं, सामग्री ते बांधकाम, पाया ते छत या प्रत्येक टप्प्यावर बुद्धीचा वापर करून अतोनात काटकसर करणं… हे सर्वकाही शक्य आहे. आपल्या देशातच अशा अनेक हरित वसाहती होत आहेत. त्यात आय.आय.टी. व इतर अनेक शैक्षणिक संस्था आघाडीवर आहेत. निमली येथील ‘अनिल अग्रवाल एन्व्हायर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ ही हरित वसाहतीचा एक उत्तम नमुना आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला हवामान बदलाचे तडाखे वारंवार बसत आहेत. तरीही हवामान बदल रोखण्यासाठी धडधडून काम होताना दिसत नाही. आता जगानं हवामान बदलाच्या उत्तरकाळात प्रवेश केल्यानंतर तरी महाराष्ट्र जुनी ‘कात’ टाकू शकेल? ‘जातीत’ गुरफटून गेलेल्या मराठवाड्यातील शाळकरी मुलंसुद्धा मैत्री करताना ‘जाती’ची चौकशी करू लागले आहेत. आपल्या समाजजीवनात जातीची पाळंमुळं पुन्हा एकदा खोल शिरत आहेत. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राला जाती-धर्मापलीकडे जाता येईल? आपण पुढील पिढीसाठी नेमका कोणता वारसा ठेवत आहोत? असा विचार करणारा नेता कुठे दिसू शकेल? असे नेते आणि अधिकारी पुढे आले, वाढले तर ‘होतील आपुली शहरे छान!’ मात्र, आपला विकास आहे त्याच रस्त्यानं पुढं जात राहिला, तर उष्णतेच्या लाटा तीव्र होत जातील. रात्रंदिवस होरपळ सहन करत ‘बीटा’ पिढीची वाढ होईल.

विसाव्या शतकातील पिढ्यांनी निरोगी पृथ्वी आजारी पडत असताना पाहिली. एकविसाव्या शतकातील ‘जनरेशन अल्फा’च्या वाट्यानं पृथ्वीची प्रकृती गंभीर होताना पाहिली. आता पृथ्वीवर २०२५मध्ये दाखल होणाऱ्या ‘बीटा जनरेशन’ला अत्यवस्थ पृथ्वी पाहावी आणि सहावी लागणार आहे. त्या विसाव्या शतकातील पिढ्यांना सभोवताली किमान प्रसन्न वातावरण लाभलं होतं. ते पाहून त्यांना ‘मौसम है आशिकाना’ असं वाटण्याची शक्यता तरी होती. मात्र आजच्या ‘बीटा’ पिढीला कमाल अमरोही यांच्या त्याच गीतातील ‘दिन हो गये हैं जालीम, राते हैं कातीलाना’ ही अवस्था साक्षात अनुभवावी लागत आहे. रोगट पर्यावरणाचा वारसा घेऊन आयुष्य उभी करू पाहणारी आजची पिढी त्यांच्या वाडवडिलांना (म्हणजे तुम्हाला-आम्हाला!) त्यांचे मारेकरी ठरवत आहे. कारण, तुमच्या-आमच्या पिढ्यांनी नरकपुरींचं साम्राज्य क्षितिजापर्यंत नेऊन ठेवलं आहे.

Story img Loader