प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
पुण्यापासून साधारण २६ किलोमीटर अंतरावर ‘आनंदग्राम’ नावाची एक कुष्ठरोग्यांची वसाहत आहे. येथील शुभ्र आणि नीटनेटक्या इमारतींमध्ये कुष्ठरोगापासून मुक्त झालेले अनेक रुग्ण निरनिराळय़ा हस्तकलेच्या वस्तू बनविण्यात मग्न असतात. आरंभी कुष्ठरोगाचे बळी ठरलेले हे लोक आता त्यांच्या या छोटय़ाशा टुमदार गावात स्वावलंबी बनून स्वत:चा उदरनिर्वाह करीत आहेत. कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन करणारी एक यशस्वी गाथा म्हणून ‘आनंदग्राम’ एक उत्तम उदाहरण आहे. येथे भेट देणारी प्रत्येक व्यक्ती एका उदात्त विचाराने भारून जाते आणि तिचे पाय येथून बाहेर पडायला तयार होत नाहीत. या आनंदग्रामच्या कल्पनेला मूर्त स्वरूप देऊन सत्यात आणण्याची पूर्तता करण्यात एका महिलेची- महिलेची कसली, एका राजघराण्यातील राजकन्येची कल्पना आणि जबरदस्त इच्छाशक्ती कारणीभूत आहे. ती राजकन्या होती जमखंडी संस्थांच्या राजघराण्यात १४ मे १९२६ रोजी जन्माला आलेली राजे परशुराम पटवर्धन यांची भगिनी – इंदुताई पटवर्धन! याच राजे पटवर्धनांनी मिरज, सांगली, कुरुंदवाड या जहागिरीवर राज्य केले. हेच परशुराम शंकर पटवर्धन हे भारतीय राजघराण्यांपैकी पहिले- ज्यांनी सर्वप्रथम सर्व मुंबई इलाख्यात आपले जमखंडी संस्थानाचे विलीनीकरण केले. पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट त्यांनीच स्थापन केली.
अगदी बालवयातच इंदुताईंना स्वातंत्र्याच्या चळवळीने भारले होते. गांधीजींची भारत छोडो चळवळ त्यांना देशभक्तीकडे ओढत होती. वयाच्या १७ व्या वर्षी राजघराण्यातील सर्व सुखे, ऐषाराम, तेथील राजघराण्याचे शिष्टाचार या ऐश्वर्याला त्यागून इंदुताईंनी सरळ अहमदाबाद गाठले व तेथील गांधीजींच्या साबरमती आश्रमात जाऊन देशसेवा आणि जनसेवेचे व्रत अंगीकारले. गांधीजींच्या विचारांनी त्या प्रभावित झाल्या. त्यांच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. माँटेसरी अभ्यासक्रम पूर्ण करून त्या शिक्षिका झाल्या. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धात इंदुताई प्रत्यक्ष युद्धभूमीवर जखमी जवानांच्या शुश्रूषेसाठी ब्रह्मदेश, जावा येथे गेल्या. सिंगापूर, जपान येथेही त्यांनी काम केले. ब्रह्मदेशात रेड क्रॉस संघटनेत सामील होऊन अनेक जखमी, आजारी सैनिकांची सेवा केली. दक्षिण पूर्व आशियामध्ये अशा प्रकारचे काम करणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानातून बेघर होऊन भारतात आलेल्या महिला निर्वासितांच्या पुनर्वसनाचे काम त्यांनी फिरोजपूर येथे केले. पुढे इंदुताईंना पुण्याच्या मिलिटरी इस्पितळात काम करण्यासाठी पाठविण्यात आले. तेथे त्यांनी होमिओपॅथीचा अभ्यासक्रम पूर्ण करून खेड शिवापूर येथे स्वत:चे क्लिनिक सुरू केले. लष्करातील जवान, आदिवासी समाजातील आजारी रुग्णांची त्या सेवा करू लागल्या. आपले सर्व जीवन त्यांनी या सेवेला अर्पण केले, त्यासाठी त्या अविवाहित राहिल्या.
अशाच एका क्षणी त्यांच्या नजरेस पदपथावर पडलेले काही कुष्ठरोगी पडले. कुष्ठरोग हा महाभयंकर मानला जाणारा तो काळ होता. अशा रुग्णांच्या घरी जाऊन त्यांची सेवा करण्याचे कार्य अंगीकारले; पण बरेच कुष्ठरोगी हे कुटुंबांनी घराबाहेर काढलेलेच असतात. त्यातील बहुतेक भीक मागतात. अशांसाठी एका केंद्राची गरज होती. त्या वेळी ऑक्सफॉम या ब्रिटिश संस्थेकरवी जागा घेण्यासाठी त्यांना १७००० रुपयांची मदत मिळाली; पण येथे कुष्ठरोग्यांचे केंद्र होणार या जाणिवेने तेथील कोणीही इंदुताईंना जागा विकत देण्यास तयार होईना. अशातच काही काळ गेल्यानंतर कामाचे स्वरूपच दिसेना, त्यामुळे त्या संस्थेने आपले पैसे परत मागितले. तेव्हा पाणावलेल्या डोळय़ांनी इंदुताईंनी आपली अडचण सांगताच त्या ब्रिटिश कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्वत: आळंदीजवळील दुधाळगाव येथे एक वैराण अशी अठरा एकरांची जागा मिळवून दिली. आजूबाजूला अस्वच्छता, हातभट्टीच्या दारूचा व्यवसाय, गलिच्छ वस्ती असा एकंदर सर्व कारभार होता. बुलडोझरने जागा सपाट करण्यात आली. यातच सर्व पैसे खर्च झाले. आता खरा प्रश्न होता तो या लोकांसाठी घरे उभारण्याचा. तेव्हा पोलिसांनी उद्ध्वस्त केलेल्या हातभट्टीच्या दारूच्या पत्र्यांचे अनेक रिकामे डबे जप्त केलेल्या अवस्थेत इंदुताईंच्या नजरेस पडले. त्यांनी तडक पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि ते सर्व डबे मिळविले. ते डबे कापून त्यांच्यावर रस्ता बनविण्याचा रूळ फिरवून त्यांना सपाट केले व ते सर्व रुग्णांना देऊन त्याची घरे उभारण्यास सांगितले. अशा रीतीने १९६१ साली ‘आनंदग्राम’ हा कुष्ठरोग्यांचा आश्रम तयार आला. जगाने, आप्तस्वकीयांनी, मित्रमैत्रिणींनी लाथाडलेल्या त्या दुर्दैवी जीवांच्या नशिबात एक आशेचा, उमेदीचा किरण आला. एवढय़ावरच हे दुर्दैव संपले नव्हते. हा आश्रम येथे स्थिर होऊ नये यासाठी तेथील गावकरी आजूबाजूच्या दुकानदारांवर यांना कोणताही जिन्नस, माल देऊ नये यासाठी दडपण आणू लागले. सर्व बाजूंनी कोंडी करण्याचे प्रयत्न होत होते. पण यावरही इंदुताईंनी मात केली. आनंदग्राममध्येच या सर्व गोष्टींची निर्मिती करण्यास त्यांनी सुरुवात केली. भाजीपाला, धान्य, स्वयंपाकासाठीच्या लागणाऱ्या इतर गोष्टी यांची लागवड आनंदग्राममध्येच होऊ लागली. गोबरगॅस तयार करण्यात आला. जोडीला अय्यंगार नावाच्या योग अभ्यासकांकडून पिठाची गिरणी दान म्हणून मिळाली. त्यामुळे सर्वच काम सुलभ झाले. केवळ तेलासाठी बाहेरच्या जगावर विसंबून राहावे लागत असे; त्यांनी तेलाचा घाणाही सुरू करण्याचे त्यांनी ठरविले.
हळूहळू पक्क्या इमारती उभ्या राहिल्या. तेथे येणारे जसे भीक मागून पोट भरणारे होते, तसेच नोकरी करून कमावते असलेलेही होते. या रोगाची लागण झाल्यावरही घरच्यांकडून बदललेला दृष्टिकोन पाहून तेथे आलेले रुग्णही होते. अशा पुढे बऱ्या झालेल्या लोकांना पुन्हा कोठे हात पसरवू लागू नयेत, यासाठी त्यांना स्वावलंबी बनविणे आवश्यक होते. यासाठी आनंदग्राममध्ये निरनिराळय़ा व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा सुरू करण्यात आल्या. यामध्ये सुतारकाम, चर्मकला, विणकाम असे उपक्रम होते. तेथील रहिवासी स्वत: धोतर विणून परिधान करू लागले. जोडीला तंत्रज्ञानही शिकविण्यात येऊ लागले. यामुळे बरे झालेले रुग्ण अन्य रुग्णांची सेवा करू लागले. कोणी तंत्रज्ञ म्हणून तर कोणी फिजिओथेरॅपिस्ट म्हणून. अशा दृष्टीने आनंदग्राम नेहमीच प्रयत्नशील राहिले. सध्या आश्रमात राहणारे शेती, कुक्कुटपालन, गोपालन, कापड उद्योग आदी उपक्रम चालवतात. शिवाय रेशीम उद्योगासाठी तुतीची लागवडदेखील करण्यात येते.
आमची इंदुताईंशी भेट झाली ती माझ्या विवाहानंतर १९७३ साली. माझे सासरे छायाचित्रकार बाळ जोगळेकर यांची ती मानलेली बहीण; पण सख्ख्या बहिणीप्रमाणेच त्यांचा सर्वावर अधिकार चालत असे. मुंबईला आल्या की जोगळेकरांकडेच त्यांचा मुक्काम असे. ताई, आत्या असे त्यांना सर्वाकडून संबोधण्यात येत असे. स्थूल देहाच्या, गौरवर्णी कोकणस्थी रंग, सततच्या धावपळीमुळे थकलेल्या जाणवल्या तरी चेहऱ्यावर असलेले राजघराण्याचे खानदानी सौंदर्य त्यांना खुलून दिसे. त्यांना प्राण्यांबद्दलही प्रेम वाटत असे. पुण्याच्या बोटक्लब रोडवर त्यांच्या घरी विविध जातीचे दहा-बारा कुत्रे होते. इंदुताईंनी विवाह केला नाही; पण लहानपणी त्यांना मदत केलेल्या त्यांच्या घराण्यातील एका कडपट्टी नावाच्या सेवकाला त्याच्या सर्व कुटुंबासहित त्यांनी सांभाळले. त्याच्याच एका मुलाला- विजय याला दत्तक घेतले. तोही पुढे आनंदग्राममध्ये मदत करू लागला. सध्या विजयचे बंधू जय कडपट्टी हेच आनंदग्रामचा सर्व व्याप सांभाळतात. विजय व जय यांनी या परिसरात असंख्य बाभूळ वृक्षांची लागवड केली. ज्यामुळे जळाऊ सरपणाचीही सोय झाली.
राजघराण्यात जन्माला येऊन, भव्य अशा प्रासादात खेळून- बागडून, पुढे ते सर्व लाथाडून केवळ कुष्ठरोग्यांची सेवा करण्यात धन्यता मानलेल्या या राजकन्येने प्रसिद्धीची कधीच हाव बाळगली नाही. सरकारदरबारी हजेरी लावण्यातही त्यांनी धन्यता मानली नाही. ‘‘मी काहीच केले नाही. हे छोटेसे जग या लोकांनीच निर्माण केले आहे,’’ असे इंदुताई म्हणत. अशा या दु:खितांचे अश्रू पुसणाऱ्या, त्यांची सेवा करणाऱ्या इंदुताईंनी तृप्त मनाने आपले आनंदग्राम कुटुंब मागे ठेवून ८ फेब्रुवारी १९९९ साली जगाचा निरोप घेतला. आज कुष्ठरोगही आटोक्यात आला आहे व त्यामुळे रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. आपल्या निधनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत इंदुताई रोज आनंदग्राममध्ये येत असत. तेथील रुग्णांची चौकशी, त्यांची औषधे, मुलांच्या शाळा, त्यांचा अभ्यास, आलेल्या अडचणी यांची पाहणी करीत असत. ज्यांच्यासाठी आपले अवघे आयुष्य वेचले, त्या कुष्ठरोग्यांच्या आनंदाचे क्षण त्यांनादेखील आनंदित करीत असत.
इंदुताईंनी सर्वसंग परित्याग करून समाजसेवा केली, त्यातही ज्यांना स्पर्शही करायला लोक घाबरत असत अशा कुष्ठरोग्यांसोबत त्यांनी दिवस घालवले, त्यांना सन्मानाने जगायला शिकवले आणि स्वत:च्या पायावर उभे केले; ते पाहता आपल्या मनात एकच वंदनीय भावना निर्माण होते आणि प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या या राजकन्येच्या स्मृती जागवून आपल्या ओठी आदरयुक्त शब्द येतात- ‘तेथे कर माझे जुळती!’ हाच भाव मनात दाटून येतो.
ajapost@gmail.com