का ही नावं अशी असतात की, त्या नावांचं गारूड समाजमनावर वर्षांनुर्वष असतं. जागतिक साहित्यातील अशा किती तरी लेखक-समीक्षकांना आजही आपण विसरलेलो नाही. अॅरिस्टॉटल, प्लेटो यांसारखे तत्त्वज्ञ-समीक्षक, शेक्सपीअर, गटे, बर्नार्ड शॉ, ब्रेख्तसारखे नाटककार, वर्ड्स्वर्थ, इलिएटसारखे कवी, डी. एच. लॉरेन्स, डिकन्स, डोस्तोव्हस्की, कामू, टॉलस्टॉय यांसारखे कादंबरीकार किंवा थॉमस हार्डी, चेकॉव्ह यांसारखे कथाकार आपल्या आयुष्याचेच भाग होऊन गेले आहेत. भारतीय साहित्यातील अशी नावं कमी नाहीत. कालिदास, भवभूती, ज्ञानेश्वर, तुकाराम, रवींद्रनाथ टागोर, शरदचंद्र चटर्जी, महाश्व्ोतादेवी, अमृता प्रीतम, मन्टो, इस्मत चुगताई, प्रेमचंद, मोहन राकेश यांसारखे कवी, कादंबरीकार, कथाकार, नाटककार आपल्या मनात कायमचे येऊन बसलेले आहेत. अगदी त्यांनी निर्माण केलेल्या पात्रांसकट.
मराठीत तर अशी अनेक नावं आहेत, ज्यांच्या लेखनावर मराठी माणूस वाढला, पोसला गेला. या नावांतलं अत्यंत महत्त्वाचं नाव आहे, कथाकार जी. ए. कुलकर्णी यांचं. ‘पारवा’, ‘निळासावळा’, ‘हिरवे रावे’, ‘रक्तचंदन’, ‘सांजशकुन’, ‘रमलखुणा’, ‘िपगळावेळ’, ‘काजळमाया’ यांसारख्या एकाहून एक दर्जेदार कथासंग्रहांचा खजिना हातात ठेवणाऱ्या जीएंवर मराठी वाचकानं भरभरून प्रेम केलं. वाचनाचं वेड लागलेल्या कोणत्याही मराठी रसिकानं जीए वाचला नाही असं होणार नाही. आज कदाचित या साऱ्या लेखनाकडे समीक्षक वेगवेगळ्या दृष्टीनं पाहत असतीलही, पण कथा या रूपबंधात रस असणाऱ्याला जीएंची कथा मनात मुरवून घेतल्याशिवाय पुढं जाता येणार नाही. मी तर जीए वेगवेगळ्या वयात पुन:पुन्हा वाचला आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी वाचलेल्या त्यांच्या कथा विशीच्या, पंचविशीच्या, चाळिशीच्या टप्प्यांवर वाचल्या तेव्हा लक्षात आलं, प्रत्येक वेळी जीए नव्यानं भेटत जातात. त्यांच्या कथांतील पात्रं, त्यांच्यातील नाती, त्यातील गुंते अधिकाधिक समजत जातात. ‘सांजशकुन’मधल्या प्रवाशाचा प्रवास आपल्यालाही एका गूढ अगम्य अशा प्रवासाला घेऊन जातो आणि तो प्रवास ‘रमलखुणा’, ‘काजळमाया’पर्यंत चालू राहतो.
वाचकांचं रंजन करण्यासाठी जीएंनी कधीच लिहिलं नाही. सामाजिक प्रश्नांवर ठरवून लिहिणं त्यांना मान्य नव्हतं. माणूस ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे प्रश्न, तिथले ताणेबाणे यांना त्याला सामोरं जावंच लागतं. लेखकाला या प्रश्नांची दखल घ्यावी लागते. आपल्या लेखनातून त्या प्रश्नांना भिडावं लागतंच. पण जीएंना जास्त रस होता, तो माणसाच्या जीवनात येणाऱ्या चिरंतन स्वरूपाच्या सुखदु:खांत. माणूस म्हणून स्वीकारावे लागणारे भोग, दु:ख व आनंद आणि त्यांची क्षणभंगुरता या गोष्टी त्यांना जास्त महत्त्वाच्या वाटत होत्या. त्यामुळेच त्यांनी कथा लिहिली, ती माणसाच्या सुखदु:खाची, वेदनेची. म्हणूनच सामान्य वाचकाला जीए जास्त आपले, जवळचे वाटले.
ग. प्र. प्रधानांनी वाचकाला बांधून ठेवणाऱ्या त्यांच्या या कथांबद्दल म्हटलं होतं, ‘चहा वा कॉफी, रेकॉर्डप्लेअर व बुद्धिमान, सज्जन मित्र या सर्व गोष्टी जवळ असल्या तरी तुमच्या कथा वाचताना मी त्यांचे अस्तित्व विसरून जातो.’
खरंच वाचकाला आपलं अस्तित्वही विसरून जायला लावणाऱ्या त्यांच्या कथा असोत की, त्यांनी वेगवेगळ्या साहित्यिक मित्रांना लिहिलेली पत्रं असोत, जगण्याचं विलक्षण भान त्यातून व्यक्त होतं. त्यामुळेच एका गूढ आंतरिक प्रवासाला घेऊन जाणारं त्यांचं सारंच लेखन सतत नव्यानं उलगडण्याचा छंद वाचकाला लागतो.
आयुष्यातले चढउतार पाहिलेल्या या लेखकानं मानवी स्वभावांचे वेगवेगळे नमुने त्यांच्या कथांतून आपल्यासमोर उभे केलेच, पण त्याचबरोबर या अवकाशाशी, त्यातल्या निसर्गाशी माणसाचं असलेलं आंतरिक नातं आपल्या कथांतून उभं केलं. ‘सांजशकुन’नंतर आलेल्या जवळजवळ साऱ्याच कथासंग्रहांत आपल्याला ते पाहायला मिळतं. हे नातं काहीसं गूढ, भारलेलं, मंत्राळलेलं असं होतं. ‘स्वामी’ आणि ‘इस्किलार’ या कथा वाचल्यावर कविवर्य शंकर वैद्य यांनी जीएंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं, ‘तुमच्या प्रवासाबरोबर माझ्या मनाचीही वाटचाल चाललेली आहे. जीवनाच्या गूढ, अतक्र्य लीला पाहतो आहे. दिशांमागून निघत जाणाऱ्या दिशा, न संपणारे चढउतार, विस्तारतच जाणारी वाळवंटे, विविध रंगांतील कालस्वर आणि विस्तीर्ण पटावर घडत गेलेले जीवननाटय़- गर्भातून हुंकार देत व्यूहरहस्य जाणून घेणाऱ्या अभिमन्यूच्या जिज्ञासेने मी पाहतो आहे. थक्क होतो आहे, भेदरून जातो आहे, आनंदित होतो आहे, व्यथित होतो आहे, पिळवटून निघतो आहे. अनेक वर्षांची तहान गळ्यात घेऊन मी पुढे पुढे ढकलणाऱ्या उत्कंठेने सारे पाहतो आहे.. या अशा तुमच्या गेल्या काही वर्षांतल्या कथा वाचताना मला अनेकदा असे वाटते की, अनेक वष्रे अडून राहिलेला भारतीय कथेचा प्रवाह मोठय़ा जोमाने नव्या रूपात प्रकट होत आहे. एक तुटलेले नाते पुन्हा जुळून येते आहे. गाडली गेलेली नगरेच्या नगरे वर येत आहेत.’
मानवी मनात गाडली गेलेली ही जीएंच्या कथांमधील दुनिया केवळ अद्भुतच नव्हती तर झपाटून टाकणारी होती. काळोख्या गुहेच्या आत आत नेऊन प्रकाशाचे, ज्ञानाचे, जीवनविषयक साक्षात्काराचे अनोखे दर्शन घडवणारी ही कथा आजही अनेक वाचकाच्या मनात घर करून राहिली आहे आणि कायम राहील.
‘काजळमाया’ व ‘इस्किलार’ वाचल्यावर वा. ल. कुलकर्णी यांनीही जीएंना खूप छान पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात त्यांनी म्हटलं होतं, ‘काजळमाया वाचत असता एक वेगळे असामान्य सामथ्र्य तुमच्या कथालेखनात अवतरते आहे, असे पदोपदी जाणवत होते. कथेच्या कक्षा केवळ रुंदावत नसून कथा अधिकाधिकी’ीेील्ल३ं’ बनत आहे, खऱ्या अर्थानं ती माणसाची कथा होत आहे असे वाटत होते; ‘इस्किलार’ वाचताना हा प्रत्यय उत्कटत्वाने आला. भूत, अतिभूत आणि वर्तमान यांची तुमच्या या कथालेखनात इतकी सरमिसळ झाली आहे की, कथा वाचताना काळाची बोचक जाणीव उरतच नाही. या कथालेखनाला असे रूप आले आहे की, एकाच वेळी ग्रीक शोकात्मिका, मन अस्वस्थ करणारी फँटसी व महाकाव्यांतर्गत पुराणेतिहास यांचा साक्षात्कार ती वाचताना होतो. कथावस्तूचा विचार करताना तिचे आर्केटायपल रूप जाणवून जाते. मराठीत हे सर्व अपूर्व आहे. ही कथा केवळ मराठी नाही. तिला जागतिक वाङ्मयात स्थान मिळायला पाहिजे. ‘काजळमाया’पासूनच तुम्ही मराठी कथेत जे कधीच घडले नाही ते घडवले आहे. एक मराठी कथालेखक कधी कोणाच्या स्वप्नातही नसेल एवढी प्रचंड झेप घेत आहे, ही गोष्टच किती आश्वासक आहे. ‘इस्किलार’चे िहदीत व इंग्रजीत भाषांतर होणे अत्यंत अगत्याचे आहे. कारण तिचा संसार मराठीपुरता मर्यादित करणे हे तिच्यावर अन्याय करणारे आहे.’
शंकर वैद्य किंवा वा. ल. कुलकर्णी यांनी म्हटल्याप्रमाणे या कथा िहदी किंवा इंग्रजीतच नाही तर इतर भारतीय व विदेशी भाषांमध्येही भाषांतरित व्हायला हव्या होत्या. पण त्यांच्या कथांचा अनुवाद करणं तसं कठीणच असावं, त्यामुळेच कदाचित जी. ए. आपल्याकडच्या अनुवादकांना पेलले नसावेत. आजच्या अनुवादकांनी नव्यानं हे आव्हान पेलण्याची गरज आहे. ‘काजळमाया’साठी जीएंना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. पण त्या वेळी जो वाद झाला त्यानं दुखावून जीएंनी तो पुरस्कार नाकारला. खरं तर एवढय़ा ताकदीच्या लेखकाला ज्ञानपीठ मिळायला हवं होतं, पण आपल्याकडील साहित्यबाह्य़ घटकांच्या राजकारणामुळे असे ताकदीचे लेखक उपेक्षितच राहिले आहेत.
आपल्या कथांमधील पात्रांच्या गोतावळ्यात रमणारे जीए प्रत्यक्ष आयुष्यात असलेल्या माणसात मात्र फार कमी रमले. अर्थात त्यांच्या कथांवर प्रेम करणाऱ्या रसिक वाचक, प्रकाशक आणि लेखक मंडळींशी त्यांची दोस्ती होती पण ती पत्ररूपानं. (जीए गेल्यानंतर त्या पत्रांचे चार खंड प्रकाशित झाले आहेतच.) प्रत्यक्षात मात्र खूप कमी लोकांना त्यांचा सहवास आणि मत्र अनुभवायला मिळाले. शाळेत असताना आई व पुढे कॉलेजला गेल्यावर वडील गेल्यानं जीए त्यांच्या मामाकडे राहायला गेले. मामांना जीएंच्या हुशारीचं कौतुक असलं तरी ते तसे कडकच होते. त्यामुळे मामांच्या रागावण्यापासून आणि मारापासून मुक्ती मिळवण्याकरता जीए स्वत:ला पुस्तकांमध्ये आणि चित्रं काढण्यात गुंतवत राहिले, कदाचित म्हणूनच त्यांना कधी मित्रांची गरज लागली नाही. बाहेरच्या जगात आनंद शोधण्यापेक्षा पुस्तकात आणि चित्रात आनंद शोधणाऱ्या जीएंच्या सख्ख्या बहिणी लवकर गेल्याने त्यांनी माया केली, ती प्रभावती आणि नंदा पठणकर या त्यांच्या मावस बहिणींवर. या बहिणींनीही या जगावेगळ्या भावावर म्हणजेच त्यांच्या बाबूअण्णावर विलक्षण प्रेम केलं. ११ डिसेंबर १९८७ मध्ये जीए ल्युकेमियानं गेले. जाण्याआधी ते धारवाडहून पुण्याला राहायला आले होते. आपल्या या आजारपणाविषयी कसलाही उच्चार न करता ते दोन र्वष पुण्यात राहिले. ते जाण्याआधी केलेल्या बोन मॅरोच्या टेस्टचा रिपोर्ट ते गेल्यावर आला आणि त्यातून त्यांना ल्युकेमिया असल्याचे कळले. या काळात प्रभावती आणि नंदा पठणकरच त्यांच्यासोबत होत्या.
जीए गेल्यावर त्यांना आलेल्या विविध पत्रांचं संपादन नंदा पठणकरांनी केलंच, पण पाच वर्षांपूर्वी त्यांनी जीएंच्या नावानं दोन पुरस्कारही सुरू केले आहेत. ‘जीए सन्मान’ आणि ‘प्रिय जीए-कथाकार’ असे हे पुरस्कार आहेत. ११ डिसेंबर हा जीएंचा स्मृतिदिन. दर वर्षी डिसेंबरच्या १०-११ किंवा ११-१२ या तारखांना नंदा पठणकर आणि त्यांचं कुटुंब आपल्या या लाडक्या बाबूअण्णाच्या नावानं दोन दिवसांचा ‘प्रिय जीए महोत्सव’ आयोजित करतं. या महोत्सवातच या पुरस्कारांचं वितरण करण्यात येतं. आजपर्यंत साहित्य क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना हे पुरस्कार दिले गेले आहेत. यंदाही दोन मान्यवरांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
आज नात्यांचे अर्थ बदलले आहेत. सख्ख्या भावंडांचं नातंही व्यवहाराच्या पातळीवर आलेलं आहे. असं असताना नंदा पठणकरांसारखी बहीण आपल्या मावस भावावरच्या प्रेमापोटी त्याच्या नावाचा महोत्सव भरवते आहे, ही खरोखरच दखल घेण्यासारखी गोष्ट आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा