ज्या अनुवादात कलाकृतीचा आत्मा हरवलेला असतो आणि केवळ शब्द वापरलेले असतात, तो वाईट अनुवाद असतो. चांगला अनुवाद हा नेहमीच त्या कलाकृतीचा आत्मा हरवू न देता नेमक्या शब्दांत केला जातो. पण काहींना वाटतं- अनुवादक केवळ दोन भाषांमध्ये दुवा साधणाऱ्या लमाणाचं काम करत असतो. त्यानं मूळ लेखकाचं लेखन कोणतंही स्वातंत्र्य न घेता नेमकेपणानं वाचकापर्यंत पोचवण्याचं काम करायचं. समीक्षकांना काय म्हणायचं आहे ते म्हणू देत; पण शेवटी जो अनुवादक आपल्या भाषेचा पोत त्या अनुवादात आणतो तो चांगला अनुवादक, हेच खरं!
दो भाषाएँ थीं।
दोनों के बीच
नहीं था
कोई संवाद।
लखनौच्या सुप्रसिद्ध कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्त्यां कात्यायनी यांची फक्त चार ओळींची ही कविता एकमेकींशी पुरेसा संवाद नसलेल्या भारतीय भाषांच्या आजच्या स्थितीवर नेमकं बोट ठेवते. इंग्रजी किंवा िहदी या दोन भाषांचा संपूर्ण भारतात बोलल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या भाषांशी बऱ्यापकी संवाद असला तरी अन्य भारतीय भाषांचा एकमेकींशी फारसा संवाद होत नाही, हे सत्य आहे. दूरच्या सोडाच; पण अनेकदा आपापल्या राज्यांच्या सीमेवर असलेल्या भाषांशीही आपला विशेष संबंध येत नाही. महाराष्ट्रात मुंबईतील लोकांचा गुजरातीशी थोडाफार संबंध येत असला तरी आपल्या सीमेवर असलेल्या कोंकणी, कन्नड किंवा तेलगू भाषेत काय चाललं आहे याची माहिती अनेकदा आपल्याला नसते. भाषिक अस्मितेमुळे कन्नडशी तर संवादाऐवजी विसंवादाचीच स्थिती आहे. आपण आपल्या मुलांना इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, रशियन किंवा जपानी अशा परकीय भाषा शिकवायला सहज तयार होतो. पण आपल्याच देशबांधवांच्या बंगाली, उडिया, आसामी, मथिली, कश्मिरी, डोगरी, मल्याळी किंवा इतर भाषा त्यांना शिकवायचा विचारही कधी मनात आणत नाही. त्यामुळे एका भाषेला दुसऱ्या भाषेत काय चाललं आहे याची कल्पना नाही. विशेषत: त्या- त्या भाषेतील लोकसंस्कृती, साहित्य, संगीत यांत नेमके कोणते प्रयोग चालले आहेत, हे जाणून घेण्यात काही अपवाद सोडले तर कोणाला विशेष रस आहे असं वाटत नाही.
खरं तर दोन भाषांमध्ये संवाद होतो, तो एकमेकांची भाषा शिकून अथवा जमेल तशी समजून घेऊनच! पण असा संवाद होत नसेल तर अनुवादामार्फतच त्या- त्या भाषांमध्ये नेमकं काय चाललं आहे याचा धांडोळा घेता येतो. आज आपल्याला एकमेकांना जाणून घ्यायचं असेल, एकमेकांची संस्कृती आणि एकमेकांचं जगणं समजून घ्यायचं असेल तर प्रत्येक भारतीय भाषेतील साहित्य इतर सर्व प्रांतीय भाषांत अनुवादित व्हायला हवं. अनुवादाच्या माध्यमातून असा संवाद व्हावा म्हणूनच कदाचित साने गुरुजींनी आंतरभारतीची कल्पना मांडली आणि ती वास्तवात आणण्यासाठी अनुवादाचं महत्त्वाचं काम हाती घेतलं. भारतातील सर्व भाषांना जोडण्याचं त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम आता साने गुरुजी स्मारक ट्रस्टनं हाती घेतलं आहे. माणगाव येथे ३६ एकर जमिनीवर वसलेलं हे केंद्र साने गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षांत सुरू झालं. तरुण पिढीला घडवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरू करतानाच अनुवादकांना वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यासाठी या ट्रस्टनं आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रही सुरू केलं.
भारतातील सर्व भाषांतील साहित्यिकांना एकत्र आणून साहित्यातील वेगवेगळ्या प्रवाहांवर चर्चा घडवून आणण्यासाठी ही संस्था दर दोन वर्षांनी आंतरभारती साहित्य संवाद आयोजित करते. इंदिरा गोस्वामी, कमलेश्वर, अशोक बाजपेयी, गिरीश कार्नाड, विष्णू खरे, बामा, मृदुला गर्ग, सच्चिदानंद यांसारखे विविध भाषांमधील लेखक-कवी आजपर्यंत या साहित्य संवादासाठी येऊन गेलेले आहेत. येत्या २४-२५ नोव्हेंबरला रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे सहावा साहित्य संवाद होतो आहे. या साहित्य संवादसाठी िहदीतील सुप्रसिद्ध कवी मंगलेश डबराल, कात्यायनी, व्योमेश शुक्ल, उडिया कवयित्री सरोजिनी साहू, तेलगू कवी के. शिवा रेड्डी अशी मान्यवर मंडळी येत आहेत. ‘ऐंशीनंतरची भारतीय कविता’ हा संमेलनातला मुख्य विषय असला तरी कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्त्यां कात्यायनी यांची प्रकट मुलाखत, अनुवादित बालसाहित्यावर परिसंवाद, तसेच साहित्य आणि समाज या विषयावर खुले चर्चासत्रही आयोजित केलं गेलं आहे. यात उपस्थितांमधील प्रतिनिधी व कार्यक्रमासाठी आलेले साहित्यिक आणि समीक्षक यांच्यात चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे.
सर्व भारतीय भाषांमध्ये समन्वय साधण्यासाठी अशाच प्रकारचा तीन दिवसांचा एक मेळावा अलीकडे दिल्लीतील ‘इंडिया हॅबिटेट सेंटर’तर्फे आयोजित करण्यात आला होता. ‘बोली बानी भाषा- गाँव कसबा शहर’ या विषयावर आधारित असलेल्या ‘समन्वय’ या कार्यक्रमात ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित झालेले कन्नड लेखक चंद्रशेखर कंबार, अशोक बाजपेयी, रतन थिय्यम, गुजराती कवी सीतांशु, नवनीता देब सेन, गिरीश कासारवल्ली यांसारखे भारतातील अनेक नामवंत साहित्यिक व कलाकार तिथे आले होते. तीन दिवस अतिशय छान चर्चा या कार्यक्रमात झाल्या. भेटीगाठी झाल्याच; पण त्याबरोबरच एकमेकांच्या भाषांमध्ये काय चाललं आहे याची माहिती करून घेतली गेली. एवढंच नाही तर एकमेकांच्या भाषेतील साहित्य अनुवादामार्फत त्या- त्या भाषेतील वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णयही घेण्यात आला. खरं तर भाषिक मुद्दय़ावरून आपल्याकडे प्रांता-प्रांतांत वाद होत असताना सर्व भाषांना एकत्र आणण्यासाठी अशा मेळाव्याची, अशा कार्यक्रमांची आज नितांत गरज आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांची दखल प्रसारमाध्यमांनीही घ्यायला हवी. पण दिवसभर घोटाळे आणि घोटाळ्यांवरच चर्चा करणाऱ्या माध्यमांना मात्र या कार्यक्रमांकडे फिरकावंसंही वाटत नाही. त्याचं कारण इथं आदानप्रदान होतं ते साहित्य, भाषा, कला याविषयीच्या विचारांचं; आणि तेही सौहार्दपूर्ण वातावरणात! कोणत्याही प्रकारच्या सेन्सेशनल घोषणा न करता एकमेकांची बोली, एकमेकांची अभिव्यक्ती समजून घेणाऱ्या लोकांकडून मिळणारा मानवतेचा विचार कदाचित चोवीस तास दाखवणं त्यांना कंटाळवाणं वाटत असावं. त्यापेक्षा बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला बाहेर काढण्याचा आँखो देखा हाल किंवा केजरीवाल यांनी केलेल्या सनसनाटी आरोपांचं लाइव्ह प्रक्षेपण जास्त टीआरपी मिळवून देणारं असावं. असो.
खरं तर प्रत्येक भारतीयानं हिंदी, इंग्रजी आणि आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त एक तरी भारतीय भाषा शिकायला हवी. पण तसं होत नसल्यानं अनेकदा अशा कार्यक्रमांत संवाद साधावा लागतो तो इंग्रजी किंवा हिंदीमध्येच. आपण एकमेकांच्या भाषा शिकलो तर दुसऱ्या भाषेशी संवाद साधता येईल आणि त्या- त्या भाषेतील साहित्यकृतींचा अनुवादही करता येईल. अशा थेट अनुवादासाठी मूळ व लक्ष्यभाषा माहीत असणं गरजेचं असतं. आज आपल्याकडे उमा कुलकर्णी, वीणा आलासे, लक्ष्मीकांत बोल्ली, विलास गिते यांच्यासारखे काही अनुवादक मूळ भाषेतून मराठीत अनुवादाचं काम करत आहेत. अर्थात ते पुरेसं नाही. आणखी अनुवादक तयार व्हायला हवेत. पण सर्जनशील लेखकाला जे स्थान साहित्य क्षेत्रात असतं, ते अनुवादकाला नसल्यामुळे आपल्याकडे आजही अनुवादाचं काम जेवढय़ा गंभीरपणे घ्यायला हवं, तेवढय़ा गंभीरपणे घेतलं जात नाही. इतर देशांत एखादं चांगलं पुस्तक बाजारात आलं की त्या पुस्तकाच्या अनुवादासाठी सर्व देशांतून अनुवादक बोलावले जातात. त्या पुस्तकाचा जगातील महत्त्वाच्या भाषांत अनुवाद करवून घेतला जातो आणि त्यासाठी अनुवादकाला चांगले पसेही दिले जातात. आपल्याकडे मात्र हे होत नाही. दरवर्षी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अनुवादाचं महात्म्य सांगितलं जातं आणि आपण ही हवेत उडवलेली वाक्यं विसरूनही जातो.
पश्चिम युरोपमधील लॅटिन, फ्रेंच, जर्मन, इंग्लिश या भाषांमध्ये वेगवेगळ्या लोकांनी अनुवादाविषयी जे विचार मांडले आहेत, त्याचं संकलन केलेलं आन्द्रे लेफिव्हर यांचं ‘ट्रान्सलेशन हिस्ट्री कल्चर’ हे पुस्तक मध्यंतरी वाचनात आलं. या पुस्तकात वेगवेगळ्या लोकांनी अनुवादाविषयी आपली मतं मांडली आहेत. या पुस्तकातील एक विचार मला महत्त्वाचा वाटतो. तो म्हणजे- translation is not just a window opened on another world, but it is channel opened through which foreign influences can penetrate the native culture, challenge it and even contribute to subverting it. अनुवादामुळे आपल्यासाठी दुसऱ्या जगाची फक्त खिडकीच उघडली जात नाही, तर अनुवाद हा एक असा मार्ग आहे, ज्यातून परकीय संस्कृतीचा प्रभाव एतद्देशीय संस्कृतीमध्ये झिरपत जातोच; पण त्याचबरोबर तो त्या संस्कृतीला आव्हानात्मकही ठरू शकतो. कधी कधी तर तो ती संस्कृती उलथवूनही टाकू शकतो.
अनुवादातून बाहेरच्या जगातलं साहित्य आपल्यापर्यंत पोचतंच, पण त्याचबरोबर तिथली संस्कृती, तिथले विचार.. अगदी मार्क्सवादासारखे क्रांतिकारी विचारही, विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास सारं काही आपल्यापर्यंत पोचतं आणि त्याचा आपल्या साहित्यावर तसेच संस्कृतीवरही परिणाम होत असतो. ‘डॉल्स हाऊस’सारखं नाटक जेव्हा मराठीत अनुवादित झालं, तेव्हा स्त्रीची स्वतंत्र ओळख असते, हा विचारही आपल्या संस्कृतीत रुजत गेला. हे केवळ पाश्चात्य भाषांच्या बाबतीतच होतं असं नाही, तर भारतीय भाषांतून मराठीत आलेल्या पुस्तकांतून अथवा मराठीतून इतर भारतीय भाषांत गेलेल्या पुस्तकांच्या बाबतीतही झालं आहे. मामा वरेरकरांनी अनुवादित केलेल्या शरद्चंद्रांच्या कादंबऱ्यांतील कर्तबगार, स्वाभिमानी आणि कोणत्याही परिस्थितीचा कणखरपणे सामना करणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रीव्यक्तिरेखांनी त्या काळातील वाचकांच्या मनावर गारूड केलं होतं. त्याचप्रमाणे मराठीतून इतर भाषांत अनुवादित झालेल्या दलित साहित्यानं इतर राज्यांतील दलितांमध्ये आत्मभान जागवलं होतं, हे इतर राज्यांतील दलित साहित्यिक आजही मान्य करतात.
अनुवादाचं हे महत्त्व आपल्याला मान्य करायलाच हवं. राहता राहिला प्रश्न तो चांगला अनुवाद कशाला म्हणायचा, याचा! आन्द्रे लेफिव्हरला वाटतं, ज्या अनुवादात कलाकृतीचा आत्मा हरवलेला असतो आणि केवळ शब्द वापरलेले असतात, तो वाईट अनुवाद असतो. आणि चांगला अनुवाद हा नेहमीच त्या कलाकृतीचा आत्मा हरवू न देता नेमक्या शब्दांत केला जातो. पण काहींना वाटतं- अनुवादक केवळ दोन भाषांमध्ये दुवा साधणाऱ्या लमाणाचं काम करत असतो. त्यानं मूळ लेखकाचं लेखन कोणतंही स्वातंत्र्य न घेता नेमकेपणानं वाचकापर्यंत पोचवण्याचं काम करायचं. जर्मन महाकवी गटे यांना वाटतं, if you want to influence the masses, a simple translation is always best, critical translations are of use only for conversations, the learned conduct among themselves.. समीक्षकांना काय म्हणायचं आहे ते म्हणू देत; पण शेवटी जो अनुवादक आपल्या भाषेचा पोत त्या अनुवादात आणतो, तो चांगला अनुवादक असं त्याला वाटतं.
अनुवाद ही खरं तर कला आहे की कारागिरी आहे, की ती एक स्वतंत्र सर्जक कलाकृती आहे, याविषयी वेगवेगळी मतं मांडली गेली असली तरी रशियन कवयित्री इलीझाव्येता स्तुआर्त यांना अनुवाद ही दुसरी निर्मितीच असते असं वाटतं. त्या अनुवादाविषयी म्हणतात-
कोण्या अनोळखी व्यक्तीची प्रेरणा
माझ्या हृदयात साठवून घेते
कोण्या अनोळखी व्यक्तीची वेदना
आपली समजून सादर करते
एखादं पीस जपावं तसा
शब्दातला अर्थ चाचपून घेते
जेव्हा माझ्या हातात येतो
थेट शब्दठेवा,
तेव्हा माझ्या हातातून दौडत जातो
जिवंत प्रवाह सळसळता
आणि होतो, नव्यानं जन्म कवितेचा.
(अनुवाद : निरंजन उजगरे)
चांगल्या अनुवादकाच्या मनात सृजनाचा झरा वाहत असेल तर तो अशा प्रकारची नवी निर्मिती करू शकतो. कदाचित त्यामुळेच असेल, पण विंदा करंदीकर ‘किंग लिअर’चा किंवा सदानंद रेगे यांनी मायकोव्हस्कीच्या कवितांचा उत्तम अनुवाद केला. मराठीतल्या अनेक लेखकांनी पाश्चात्त्य भाषांतील साहित्यकृतींचे उत्तम अनुवाद केले आहेत. विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर, विजय तेंडुलकर, आचार्य अत्रे, अनंत काणेकर, शांता शेळके, विद्याधर पुंडलिक, मामा वरेरकर, वि. वा. शिरवाडकर, रा. भि. जोशी, भा. रा.भागवत अशी अनेक नावं घेता येतील. विंदांनी तर असं म्हटलं आहे की, प्रत्येक लेखकानं किंवा कवीनं एक तरी भाषांतर करावं. असा अनुवाद मला वाटतं जास्त आशयसंपन्न आणि कलाकृतीला न्याय देणारा होईल.
शेवटी एवढंच म्हणेन- दोन भाषांमध्येच नाही, तर सर्व भाषांचा एकमेकींशी सहज संवाद होण्यासाठी आपण त्या भाषा शिकण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि ते जमत नसेल तर कमीत कमी अनुवादामार्फत आपल्याच भाषाभगिनींच्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी २४-२५ नोव्हेंबरला माणगावकडे पावलं वळवली तर भाषेबरोबरच त्यातील साहित्याशीही संवाद होईल.
संवाद : दोन भाषांमधला!
ज्या अनुवादात कलाकृतीचा आत्मा हरवलेला असतो आणि केवळ शब्द वापरलेले असतात, तो वाईट अनुवाद असतो. चांगला अनुवाद हा नेहमीच त्या कलाकृतीचा आत्मा हरवू न देता नेमक्या शब्दांत केला जातो. पण काहींना वाटतं- अनुवादक केवळ दोन भाषांमध्ये दुवा साधणाऱ्या लमाणाचं काम करत असतो. त्यानं मूळ लेखकाचं लेखन कोणतंही स्वातंत्र्य न घेता नेमकेपणानं वाचकापर्यंत पोचवण्याचं काम करायचं.
आणखी वाचा
First published on: 18-11-2012 at 04:14 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shabdaranya when two language talk