‘मिडास टच् असलेला लेखक’ असं प्रसिद्ध विज्ञानलेखक आयझ्ॉक अॅसिमोव्ह यांनी कार्ल सेगन यांच्याबद्दल एकदा म्हटलं होतं. कार्ल सेगन ज्या विषयाला स्पर्श करतात त्याचं ते सोनं करतात, हा त्यामागचा भावार्थ. उद्बोधक मनोरंजन करणारे विज्ञानप्रसारक म्हणून त्यांची ख्याती होती. ‘ब्रोकाज् ब्रेन’, ‘द ड्रॅगन्स ऑफ एडन’, ‘कास्मॉस’ यांसारखी त्यांची पुस्तकं लोकप्रिय झाली. ‘श्ॉडोज् ऑफ फरगॉटन अॅन्सेस्टर्स’ हे सेगन यांचं पुस्तक त्यांच्या मृत्यूपूर्वी काही वर्षे आधी- १९९२ मध्ये प्रकाशित झालं. कार्ल सेगन आणि त्यांच्या पत्नी अॅन ड्रियन यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद रमेश लऊळ यांनी केला असून मॅजेस्टिक प्रकाशनने तो प्रकाशित केला आहे.
जवळपास सहाशे पानांचा हा अनुवाद एखाद्या भव्य चित्रपटासारखा आहे. रोमांचक आणि विचारप्रवर्तक. खगोलशास्त्र आणि जीवशास्त्र अशा दोन्ही शास्त्रांच्या संशोधनाची बैठक सेगन यांच्याकडे आहे. इतर ज्ञानशाखांचे संदर्भही त्यांच्या लेखनातून सातत्याने येतात. वैज्ञानिक परिभाषेचं अवडंबर न माजवता वैज्ञानिक आशय वाचकांपर्यंत थेटपणे पोहोचवण्याचं कौशल्य त्यांच्याकडे आहे. शिवाय वैज्ञानिक आशयाला पूरक अशी प्राचीन ग्रंथांमधील, प्रसिद्ध वाङ्मयामधील अवतरणं देऊन त्यांनी हा विषय अधिक रंजक केलेला आहे. उदा. ‘‘आपण कोण आहोत?’ या प्रश्नाचं उत्तर शोधणं हे केवळ अनेक आव्हानांपैकी एक आव्हान आहे असं नाही, तर ते एक वैज्ञानिक आव्हान आहे,’ हे एरविन श्रोडिंजरचं अवतरण प्रास्ताविकाच्या सुरुवातीला दिलं आहे. खरं तर या पुस्तकाचा पसारा ‘आपण कोण आहोत?’ या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी निर्माण झालेला आहे. हा केवळ मानवाच्या निर्मितीचा आणि जीवनाचा इतिहास नाही, तर विश्वनिर्मितीच्या क्षणापासूनचा, जैविक विकासाच्या साखळीत आता नष्टप्राय झालेल्या जैविक साखळीचा हा इतिहास मांडण्याचा प्रयत्न आहे. त्याचा केंद्रबिंदू माणूस नाही, तर तो इतर जीवांप्रमाणेच या जैविक विकासाचा एक घटक आहे.
या पुस्तकात आलेला जीवितांचा इतिहास थोडक्यात सांगायचा तर तो असा सांगता येईल : विश्वरचनेच्या उत्पत्तीचा क्षण म्हणजे प्रचंड आकाराचा व वजनाचा वायू आणि धूळ असह्य़ भाराने, वाढत्या वेगाने भिरभिरू लागली आणि त्यातून ग्रह-ताऱ्यांचा जन्म झाला. या प्रकृति- द्रव्यातून पृथ्वी निर्माण झाली. जैविक द्रव्याचा वर्षांव आणि सूर्यप्रकाश यातून जैविक उत्पत्ती झाली. जीवित, भूखंड, हवामान व उत्क्रांती हे विकासाचे प्रमुख घटक आहेत.
जैविक विकास आणि या विकासाचं आपल्याला झालेलं आकलन या दोन्हींचा इतिहास एकमेकांत गुंतलेला आहे. डार्विनचा उत्क्रांतिवाद, जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांच्या डी. एन. ए.च्या शोधावर आधारित जीनी संकेत (जेनेटिक कोड), उत्परिवर्तन (म्युटेशन), लैंगिकता आणि प्रजनन, मेंदूचा विकास, जीवनतृष्णा, इतर जीवांच्या प्रेरणा आणि मानवी बुद्धीचा अहंकार याबाबतीतलं वैज्ञानिक सत्य सेगन यांनी रोचक पद्धतीने सांगितलं आहे.
प्रायमेट्स प्रजाती आणि मानव यांची निर्मिती समान पूर्वजांकडून झाली. त्यात चिम्प्स हा आपला सर्वात जवळचा नातेवाईक आहे. मानव आणि चिम्प्स यांच्या जनुकांत ९९.६ टक्के साम्य आहे. दोन्हींतला फरक फक्त ०.४ टक्के आहे. पण त्यामुळे भाषा आणि आकलनक्षमता माणसाला मिळाली आणि मानवाची प्रगती कशी झाली, त्याची हकीकत सेगन यांनी सांगितली आहे. प्राण्यांना अंतर्मन असतं का? ते विचार करू शकतात का? याबद्दलची माहिती मिळवण्याचा मार्ग उपलब्ध नाही. पण चिपांझी आणि अन्य प्राण्यांच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास करून संशोधकांनी काढलेल्या निष्कर्षांची माहिती सेगन यांनी दिली आहे. प्राण्यांना सद्गुणी आणि शक्तिमान ठरवायचं, किंवा त्यांना माणसापेक्षा कमी दर्जाचं समजायचं, असं आजपर्यंत अनेक संशोधक व तत्त्वज्ञांनी केलेलं आहे. कार्ल सेगन यांना असं वाटतं की, दोन्हीच्या अशा अतिरेकामुळे मानव आणि पशू यांमध्ये रक्ताचं असलेलं नातं नाकारलं जातं. ते योग्य नाही.
मानवाच्या विकासाबद्दल सेगन सांगतात की, मानवनिर्मितीच्या क्षणापासून आत्तापर्यंतच्या काळातील ९९ टक्के काळ हा विनासंस्कृती असलेला काळ होता. आपली बुद्धिमत्ता नजीकच्या काळातच विकसित होऊ लागल्याने ती अजून अपूर्ण आहे. आपल्या बुद्धिमत्तेचा विकास आणि वापर चांगल्या तऱ्हेने कसा करता येईल, हे आपण पाहिलं पाहिजे.
‘श्ॉडोज् ऑफ फरगॉटन अॅन्सेस्टर्स’चा इतिहासरूपी भव्य पट नाटय़मय पद्धतीने उलगडून दाखवल्यानंतर कार्ल सेगन यांनी काढलेला निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहे.. माणसाला आपल्या तर्कशक्तीचा, बुद्धीचा गर्व आहे. पण त्यामुळे आपल्यातल्या पशुत्वाची आपण दखलच घेतली नाही तर आपल्याला स्वत:ला समजून घेता येणार नाही. प्राण्यांकडून आपल्याला जो वारसा मिळालेला आहे त्याचं निश्चित स्वरूप आपण जाणून घेतलं पाहिजे. मानवांची निर्मिती एकाच मूळ शाखेतून झालेली आहे. मागील इतिहासाच्या या खुणा पुसल्या गेल्या आहेत. सावल्यांच्या रूपात त्या आपल्याला धूसर रूपात जाणवतात. आपण आपल्या पूर्वजांची ओळख करून घेतली तर भविष्य घडवताना त्याचा उपयोग होईल. आज मानवी बुद्धिमत्तेवर संगणकाची कृत्रिम बुद्धिमत्ता मात करील का, हा प्रश्न सतत चर्चेत असतो. कार्ल सेगन यांनी मानवी अस्तित्वाच्या संदर्भात जीवसृष्टीशी असलेली नाळ आणि तिचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. मानवी बुद्धिमत्तेला आव्हान देणाऱ्या संगणकीय बुद्धिमत्तेच्या धोक्यापेक्षा माणसाला आत्मविस्मृती होण्याचा धोका अधिक महत्त्वाचा आहे, असंच जणू काही कार्ल सेगन आणि अॅन ड्रियन यांनी सुचवलं आहे.
रमेश लऊळ यांनी पुस्तकाचा अनुवाद मूळ पुस्तकाची वाचनीयता कायम ठेवून आणि ओघवत्या शैलीत केला आहे. विज्ञानशाखांशी संबंधित अनेक पारिभाषिक शब्द मराठीत अर्थपूर्णरीतीने आणणं कौशल्याचं आणि कष्टाचं काम असतं. या अनुवादातील काही प्रतिशब्द अन्वर्थक, तर काही दुबरेध आहेत. व्यक्तींची अथवा ग्रंथांची नावं देताना रूढ झालेले उच्चार द्यायला हवे होते. उदा. डेस्कार्टेस- देकार्त, व्होलटायर- व्हॉल्तेर, केना उपनिषद- केनोपनिषद, अश्वघोषा-अश्वघोष. अशा पुस्तकांना पारिभाषिक शब्दांची सूची (इंग्रजी-मराठी) उपयुक्त ठरते. ती द्यायला हवी होती. संदर्भग्रंथांची सूची, विषय/ नामसूची दिलेल्या नाहीत. आजकाल अनुवाद प्रकाशित करताना संदर्भग्रंथसूची व टिपा मूळ ग्रंथात असूनही अनुवादात गाळल्या जातात. पण ही प्रथा योग्य नाही. काही असलं तरी एक महत्त्वाचं पुस्तक रमेश लऊळ यांनी मराठीत आणलं आहे आणि मराठी विज्ञानसाहित्यात मोलाची भर घातली आहे.
‘श्ॉडोज ऑफ फरगॉटन अॅन्सेस्टर्स’- कार्ल सेगन- अॅन ड्रियन, अनुवाद : रमेश लऊळ, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई. पृष्ठे : ६००, मूल्य : ५०० रुपये.
विस्मृतीत गेलेल्या पूर्वजांची कहाणी
‘मिडास टच् असलेला लेखक’ असं प्रसिद्ध विज्ञानलेखक आयझ्ॉक अॅसिमोव्ह यांनी कार्ल सेगन यांच्याबद्दल एकदा म्हटलं होतं. कार्ल सेगन ज्या विषयाला स्पर्श करतात त्याचं ते सोनं करतात, हा त्यामागचा भावार्थ.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
आणखी वाचा
First published on: 21-06-2015 at 12:15 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shadows of forgotten ancestors by carl sagan