खूपजणांना कंट्रीसंगीत आणि लोकसंगीत हे एकसारखं वाटतं. ‘फोक’ आणि ‘कंट्री’ संगीत हे वरवर ऐकताना साधारण सारखं वाटूही शकतं, पण दोन्हींत एक महत्त्वाचा फरक आहे. अॅपलेशन पर्वतरांगांमध्ये जन्मलेलं अमेरिकन लोकसंगीत हे शंभर वर्षांपूर्वी जसं वाजायचं तसंच आजही वाजतं. कंट्रीसंगीत ही काळाच्या ओघात
तिची ही शिकागोमधली मैफल मी पाहतो आहे. स्टेजवरचा अंधार सरून जशी शनाया ट्वेन (Shania Twain) हातात माईक घेऊन गाऊ लागते, तसे समोर उभे असलेले हजारो प्रेक्षक आनंदानं चीत्कार करतात. ती म्हणते, ‘‘पुरुषांनो, हे पुढचं गाणं तुमच्यासाठी तितकंही अवघड नाहीये हा!’’ आणि मिष्कील हसू सर्वत्र उमटतं. शनाया गाऊ लागते कंट्रीगाणं; पण सोबत इलेक्ट्रिक गिटार असते, ड्रम्स असतात. रॉकच्या शैलीची आठवण यावी असा एकंदर माहोल असतो. पण.. आणि हा पणच मोलाचा आहे. शनाया त्या कंट्रीगाण्याला रॉक होऊ देत नाही. ती गाते तेव्हा मागून तीन व्हायोलिनवादक जी सुरावट वाजवत असतात तीच कानात पहिली भरते. ठेका पॉप किंवा रॉकचा असतो, पण गाण्याची ढब मात्र शहरी मुळीच नसते. गावच्या शेताचा, पावसाचा, काळ्या ढगांचा, गुरांचा, घोडय़ांचा, शेतघराचा वास त्या सुरांमध्ये असतोच असतो. शेवटाला तर थेट ती हिप-हॉप शैलीत गाऊ लागते. पहिल्यांदा हे गाणं जेव्हा कंट्रीसंगीताच्या महागुरूंनी ऐकलं असेल तेव्हा त्यांना भोवळच यायची बाकी उरली असणार. पण कंट्रीला हिप-हॉप जोडतानाही मागे व्हायोलिन्स फिरत राहतात आणि ‘एनी मॅन ऑफ माइन्’ हे मग केवळ गाणं राहत नाही, तर ती ‘म्युझिक अॅक्ट’ बनते.
‘एनी मॅन ऑफ माइन्’नं कंट्रीसंगीताच्या अनेक गृहितकांना धक्का दिला, त्यांना विस्तारलं. सांगीतिकदृष्टय़ा ते कसं वेगळं आहे हे आपण पाहिलंच; पण मुळात हे ध्यानात घ्यायला हवं की, कंट्रीसंगीत हे पुष्कळ अंशी सुस्थिर, ‘कन्फर्मिस्ट’ मंडळींचं लाडकं गाणं आहे. त्याचे टीकाकार त्याला ‘pro-white, pro-republican, pro-christian’ म्हणतात. ते संपूर्णत: खरं नसलं, तरी पुष्कळ अंशी खरं आहे. खेरीज ते रॉकसारखंच अनेक दशकं पुरुषांचं गाणं होतं. १९८७ साली के. टी. ओस्लिन या गायिकेनं कंट्रीसंगीतात भरीव कामगिरी केली आणि गायिकांसाठी कंट्रीचा रस्ता मोकळा केला. १९९५ च्या आसपास शनाया ट्वेननं ती धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि त्या रस्त्याचा हमरस्ताच केला. आज अनेक गायिका सहजपणे कंट्रीसंगीत गाताना स्वत:च्या स्त्रीत्वाचा प्रत्यय त्या गाण्यांमध्ये देतात, त्याचं श्रेय पुष्कळसं शनायाला.
ही खरी ‘कंट्री’ मुलगी. कॅनडाच्या ग्रामीण भागात जन्मलेली, वाढलेली. तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला असला तरी सुदैवानं दोघांचं तिच्यावर असलेलं प्रेम आटलं नाही. सतत गुणगुणायची ती किशोरी. वडिलांचा पुनर्वनीकरणाचा व्यवसाय होता, तेव्हा त्यांच्यासोबत वनात ती काम करायची. तिच्याच भाषेत सांगायचं तर ‘‘It was a rugged existance.’’ पावडर-लाली नाही. नखरे नाहीत. डोक्यावर, खांद्यावर पुष्कळदा लाकडांच्या मोळ्या असायच्या आणि कोसच्या कोस चालायला लागायचं. (तिच्या आजच्या व्यासपीठावर न थकता गायच्या, नाचायच्या ऊर्जेचा उगम इथे तर नसेल?) आणि मग विश्रांतीच्या वेळी त्या विस्तीर्ण वृक्षांखाली गिटार घेऊन ही मुलगी तासन् तास बसायची. तिच्या आत्मचरित्रामध्ये तिनं लिहिलं आहे, ते एवढंच. पण मला दिसते- एक तरुण, स्वप्नं बघणारी, कणखर होत चाललेली, उमदी गायिका- जी त्या वनात अफाट मेहनत घेते आहे. आपल्या भारतीय पठडीतला नसला, तरी तो ‘रियाज’च आहे. एकलव्यासारखा केलेला. उतरत्या सूर्यानिशी अंधार होत असेल तेव्हा कित्येकदा गाण्यात हरवलेल्या तिला येणाऱ्या रात्रीची जाणीवही झाली नसेल. आणि तेव्हाही ती बहुधा हेच ‘एनी मॅन ऑफ माइन’चंच स्वप्न बघत असणार. कुठली षोडशा स्वत:च्या पुरुषाचं स्वप्न बघत नाही? पण शनायाच्या स्वप्नामध्ये तिच्यासाठी मोलाचं असलेलं स्वातंत्र्य कुणा पुरुषालेखी तिनं गहाण ठेवलं नव्हतं. पुष्कळ अमेरिकन फेमिनिस्ट अभ्यासकांना तिचा सशक्त स्त्रीवाद हा सुरुवातीला कळलाच नाही. याचं एक कारण म्हणजे तिची काव्यशैली फार मिष्कील आहे. हसता हसता, हसवता हसवता आपला मुद्दा रेटणारी. (जसा करण जोहर समलिंगी नात्याचा त्याचा जिव्हाळ्याचा मुद्दा त्याच्या चित्रपटांमधून विनोदाच्या आडपडद्यातून रेटतो आहे!) ती म्हणते-
‘‘This is what a woman wants
Any man of mine better be proud of me
Even when I’m ugly, he still better love me’’
(‘‘पुरुषांनो ऐका- बाईला एखाद्या हे हे हवं असतं :
माझा पुरुष चूपचाप माझा अभिमान वाहील, बरं!
जरी असेना मी कुरूप, तरी प्रेम करील खरं!’’)
त्या इंग्रजी ‘बेटर’मधला मिष्कील ठसका मराठीत येत नाही. अन् मग तसाच मिष्कील सूर वाढवत ती म्हणते, ‘मी हजारदा माझे बेत बदलले, तरी तो म्हणेल, ‘‘Yaeh, I like it that way.’’ माझा पुरुष ‘हार्ट-ब्रेकिंग’ असेल, भलं वागणारा असेल, पुरेसा बळकट असेल. आणि असा असेल, की बघता बघता माझा श्वास अडकेल! ‘‘I need a man, who knows, how the story goes.’’ शनाया ज्या पुरुषाचं स्वप्न बघते आहे, तसं ‘स्थळ’ मिळणं अवघड आहे, हे मी सांगायला नकोच! आणि तिला का ते ठाऊक नसेल? तरी एखादी गायिका आपलं असं काव्य कंट्रीसंगीताच्या पारंपरिक रूढीप्रिय अंगणात मांडते तेव्हा ती महत्त्वाची स्त्रीवादी मांडणी ठरते. आपल्या इथे स्त्रीवाद हा बव्हंशी साहित्याला जोडला जातो; संगीताशी नाही. समीक्षक संगीत हा साहित्यासारखाच ‘डिस्कोर्स’ असल्याचं मानत नाहीत. पण शनायाच्या या गाण्यानं अमेरिकन समीक्षावर्तुळात पुष्कळच वलयं उठवली. त्या गाण्याचा अधिकृत व्हिडीओही स्त्रीवादीच आहे. शनाया तिच्या शेतात घोडय़ावरून गुरांची राखण करणं संपवते, खाली उतरून ट्रक चालवत तिच्या शेतघराशी येते, स्नान करते, शेतात हुंदडते, नाचते आणि गाणं संपतं. गाण्यात तिच्याखेरीज घोडा आहे, पण कुणीही पुरुष नाही. आता हे सारं चित्र एका स्वतंत्र विचाराच्या, आत्मनिर्भर मुलीचं चित्र आहे. खेरीज तरीही तिला आपल्या स्त्रीत्वाची जाण आहे. तिचं सौंदर्य ती मिरवत नाही. पण आपला चेहरा मोहक असल्याचं तिनं सहजपणे स्वत:शी मान्य केलं आहे. ते मोहक स्त्रीत्व तिला मिरवायचं नाही, लपवायचंही नाही. किती सुंदर दिसते ती त्या व्हिडीओमध्ये! आणि त्यापेक्षा सौंदर्याविषयी किती सुंदर विचार आहेत तिचे! ती म्हणते, ‘‘जर मी पॅमेला अँडरसन असते; तेच जर माझं ‘प्रोफेशन’ असतं, तर मला ‘सेक्सी’ हे विशेषण रुचलं असतं. पण मी गायिका आहे, मॉडेल नाही!’’ आज भारतातही गायिकांना पुष्कळ वेळा वेगळ्या अर्थानं ‘मॉडेलिंग’ करायला लागताना आपण बघतो. शनायाइतका सुस्पष्ट विचार मला इथल्या किंवा तिथल्याही गायिकांनी केलेला पटकन् स्मरत नाही. अमेरिकेत प्रखर स्त्रीवादी मंडळींनी मॅडोनानं व्यासपीठावर वस्त्रं उतरवली त्या घटनेला ‘स्त्रीवादी घटना’ म्हणून नावाजलं. शनायाचा सौम्य, पण सुस्पष्ट आणि जाहिरातविहीन स्त्रीवाद त्यांना उशिराच कळला असं माझं मत आहे.
सारखी आठवते आहे मला जनाबाई. ‘जनी जाय पाणियासी, मागे धावे हृषिकेशी’ म्हणणाऱ्या जनीलेखी विठ्ठल हा देव होता. पण त्या अभंगात उमटलेलं चित्र हे बाईला सुजाणपणे, न बोलता, न गाजवता, मागून मदत करणाऱ्या पुरुषाचंच चित्र आहे! मग तो पुरुष देव, नवरा, बॉयफ्रेंड- कुणीही असला तरी काय फरक पडतो! अन् काय फरक पडतो- किशोरी आमोणकरांनी गायलेला तो अभंग असला आणि शनायाचं ‘एनी मॅन’ गाणं परकं, दूरस्थ, अमेरिकेतलं कंट्रीगाणं असलं तरी! त्यामधलं संवेदन सारखंच आहे. पुरुषांच्या जगात पिचून गेलेल्या अनेक बायाबापडय़ांचं ते स्वप्न आहे : मैत्रीचा हात उंचावलेल्या ‘माझ्या’ पुरुषाचं ते स्वप्न! ते शनायाचं आहे, जनीचं आहे, अनेकजणींचं आहे. आणि चांगल्या समाजनिर्मितीसाठी तुम्ही-आम्ही साऱ्यांनी मिळून ते पुरं करायचं आहे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा