किती जवळ असतो आपण, तरी किती दूर
एकमेकात मिसळूनही स्वत:तच चूर
जवळिकेचे क्षण आधीच हाती क्वचित येतात
येतात तेव्हा स्वप्नासारखे अवचित भेट देतात
डोळ्यांमधलं वेडं धुकं शब्दांत गवसत नाही
काळजात घुमणारे सूर.. त्यांचं गाणं फुलत नाही
कुणास ठाऊक.. काय बोलतो आणि का हसतो?
एक खरं.. क्षण क्षण हातून निसटत असतो
पुन्हा भिन्न वाटा.. सोबत फक्त एक हुरहूर
किती जवळ असतो आपण.. तरी किती दूर..
पण मग आरंभीच्या गद्यलेखनानंतर अल्पावधीतच कवी आणि गीतकार या नव्या ओळखीने शांताबाई प्रकाशाच्या लोभस वर्तुळात सहज स्वाभाविकतेने वावरू लागल्या. सुदैवानं त्यांच्या जवळ जाण्याचं आणि राहण्याचंही भाग्य मला लाभलं.. आणि एका अनोख्या शांतदांत समृद्धतेचा दीर्घकाळ सहवास लाभला. वडिलकी आणि निखळ स्नेह यांचं त्यांच्यात झालेलं संमीलन इतकं सहजमधुर होतं, की कुठल्याही नवागत पिढीच्या त्या पाहता पाहता ज्येष्ठ मैत्रीण होऊन जायच्या. शांताबाई हा खरं तर एका दीर्घलेखाचा विषय आहे. पण आज त्यांच्या एका अवीट गीतकाव्याच्या थेट या क्षणापर्यंत उलगडत जाणाऱ्या अनुबंधाविषयी थोडं सांगावं असा मानस आहे. मराठी रसिकमनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणारं ते भावकाव्य म्हणजे.. ‘तोच चंद्रमा नभात..’
स्वत: कवयित्रीच्या काव्यजीवनात, आपल्यासारख्या रसिकांच्या भावजीवनात आणि भावसंगीताच्या इतिहासात या भावगीताच्या ध्वनिमुद्रिकेला एक अपूर्व स्थान आहे. कारण मराठी भावसंगीताचा इतिहास सांगताना एका फार महत्त्वपूर्ण वळणावर ते गीत दिमाखात उभं आहे. पण तो इतिहास सांगायची ही जागा नव्हे. शिवाय प्रत्यक्षात कुठलाच इतिहास काही असा योजून, ठरवून घडत नसतो. तो दैनंदिन व्यवहारातील साध्यासुध्या घटनांतून आपसूक आकार घेत असतो. इथेही असंच घडलं.
खूप दिवस पुणे आकाशवाणीवर सुधीर फडक्यांनी गायलेलं आणि कविवर्य ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेलं ‘धुंद येथ मी’ खूपदा लागायचं. आम्ही ते लहानपणापासून ऐकत होतो आणि त्यांची रेकॉर्ड का नाही, म्हणून चुटपुटत होतो. एका मुहूर्तावर बाबूजींच्या मनात तो विचार जागा झाला असावा. पण रेकॉर्ड करायची तर आणखी एक गाणं हवं. तेव्हा बहुधा नेहमीप्रमाणे गदिमा-बाबूजींचा हंगामी अबोला वगैरे असणार. तस्मात बाबूजींनी त्या काळातील नव्या दमाच्या कवयित्रीला- म्हणजे शांताबाईंना पाचारण केलं असणार. आणि परिणामी हा ‘तोच चंद्रमा (भावसंगीताच्या) नभात’ उगवला असणार. खरं तर ही सगळी अंदाजपंचे भाषा इथं मुळात वापरायलाच नको. कारण असंच ते सगळं घडलं. मुंबई दूरदर्शनवर अरुण काकतकरनिर्मित ‘प्रतिभा-प्रतिमा’साठी शांताबाईंची एक प्रदीर्घ मुलाखत मी घेतली होती. (आजही ‘सह्य़ाद्रीच्या पाऊलखुणा’ मध्ये ती मुलाखत बऱ्याच वेळा पुन:प्रक्षेपित होत असते.) तेव्हा त्या मुलाखतीत स्वत: त्यांनीच ही सविस्तर हकिकत सांगितली होती. शांताबाईंची बहुश्रुतता आणि त्यांचं स्मरण या दोन्ही गोष्टी केवळ अद्भुत होत्या. त्यामुळे त्यांच्या त्या स्मरणसंचितातून एक सुंदर संस्कृत श्लोक त्यांनी निवडला. तो भाव त्यांना भावगीताला योग्य वाटला. आणि मग त्यांनी त्याचं सुंदर स्वैर रूपांतर केलं. तेच हे भावकाव्य.. ‘तोच चंद्रमा नभात..’
नाही म्हटलं तरी या सगळ्या इतिहासाला आज उणीपुरी पन्नास र्वष होऊन गेलीत. पण अशा अभिजात कलाकृती कधीच इतिहासजमा होत नसतात. वळणावळणावर त्या एक नवी ताजगी घेऊन भेटत राहतात. आनंद तर देतातच; पण स्वरसौंदर्य आणि अर्थसौंदर्याचे नवे नवे साक्षात्कारही घडवीत राहतात. इतकेच नाही तर सातत्यानं सहजचिंतन करीत राहणाऱ्या कलावंत-मनात विचारांचे आणि भावांचे नवे नवे तरंग त्या कलाकृती उमटवीत राहतात. आणि त्यातूनच कदाचित नवे नवे उन्मेषही साकार होत राहतात. या काव्याच्या बाबतीतही अगदी परवा-परवापर्यंत असंच काहीतरी घडलं.
खूप र्वष केवळ भावगीत म्हणून ऐकून झाल्यावर माझं मन अलीकडे या गीतातील निखळ काव्यतत्त्वाचा वेध घेऊ लागलं होतं. विचार करताना तो मूळचा श्लोक वारंवार समोर येऊ लागला आणि त्याचा भाव मनासमोर अधिकाधिक उत्कट होऊ लागला. नवल वाटू लागलं, की पूर्णपणे आजचा आधुनिक वाटणारा हा प्रीतीवैफल्याचा जिवंत भाव इतक्या जुन्या काळात- तोही संस्कृत भाषेत आणि त्यातही एका अनाम कवयित्रीनं व्यक्त करावा, ही घटना सर्वसामान्य नव्हेच. त्या भावातील कटू वास्तव, तरीही मूळच्या नात्यातला हळुवारपणा आणि या सर्वामागची परिपक्वता हे सारं फार अजोड आहे. प्रदीर्घ कालावधीनंतरच्या या पुनर्भेटीत ती प्रियकराला सांगते आहे- ‘सारं सारं काही ते आणि तसंच आहे रे.. तशीच पौर्णिमा आहे, तोच लताकुंज आहे, तीच मी आहे, आणि माझं कौमार्य हरण करणारा तोही तूच आहेस.. पण तरीही या सर्वातून काहीतरी हरवून गेलं आहे.. सगळं तेच आहे, पण तरीही काहीही नाहीये राजा, काहीही नाही..’
आणि मग जाणवलं, की तेव्हा हे गाणं बाबूजींसारखा समर्थ पुरुष गायक गाणार म्हणून मूळचा हा स्त्रीभाव शांताबाईंनी पुरुषभावात परावर्तित केला. त्यातून एक अजोड भावगीत निर्माण झालं. मराठी भावसंगीताला एक अनमोल नजराणा मिळाला, हे तर सर्वमान्यच. पण मूळ काव्यातली स्त्री-अभिव्यक्ती होती तशीच आणि तिथेच अव्यक्त राहिली. मागे एका चित्रपटात एका सुंदर कथेतील मूळचा कुमारवयातला मुलगा पुसून त्या जागी त्याच वयाची मुलगी आणल्यावर मूळ कथाच पोरकी झाली होती. तसंच काहीतरी इथंही झालं. मग वाटलं, आता शांताबाई असत्या तर त्यांना आग्रह केला असता, की तो मूळचा श्लोक मूळच्या स्त्रीभावातच व्यक्त करा. एक नवं, अनोखं भावगीत साकार होईल. तोच चंद्रमा आपल्या जागी आणि ते नवं भावकाव्य त्याच्या जागी. दोन्ही एकत्र वाचायला, ऐकायलाही केवढी बहार येईल! पण आता शांताबाईच नाहीत. मग असं करू या? .. दुसऱ्या एखाद्या कवयित्रीला आग्रह करू या. पण हे झालंच पाहिजे. तेवढय़ात पुन्हा आणखी एक तरंग मनात उठला. स्वत: शांताबाई स्त्री असून त्यांनी ‘तोच चंद्रमा’ लिहिताना पुरुषभाव समर्थपणे पेलला. मग मूळचा हा स्त्रीभाव व्यक्त करायला स्त्री-कवीच पाहिजे असं थोडंच आहे? पुरुष-कवीही चालू शकतो. आणि तसं असेल तर..
असे तरंगामागून तरंग उठत राहिले आणि पाहता पाहता कवितेच्या ओळी एकापाठोपाठ एक तरंगत अलगद सामोऱ्या होऊ लागल्या..
तोच तूही.. तीच मीही..
सारे पूर्वीचे पहिले
परि जादूचे मोहन.. प्रिया,
त्यातले लोपले
तोच तूही.. तीच मीही..
आणि पाहता पाहता तीन कडव्यांचं एक भावकाव्य समूर्त साकार झालंही..
काय म्हणता? पुढची संपूर्ण कविता पाहिजे? तीही इतक्या सहजासहजी? पण त्यासोबत स्वरही नकोत का? नवे.. ताजे?
मग असं करा.. थेट कवीलाच भेटा ना..
कधी जमवता?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा