त्या दिवशीची.. खरे तर संध्याकाळची गोष्ट.
शरद यादव यांच्या गुबगुबीत डाव्या हाताखालून सूर मारत नानाने जयाप्रदांच्या झगमगीत पदराचे टोक गाठले. निमिषमात्रच तो तेथे विसावला. त्या सुळसुळीत वस्त्रावर वक्षप्रदेश टेकवून त्याने आपली दोन्ही श्वासरंध्रे भरून घेतली. चॅनेल नंबर फाइव्हच्या मंद गंधाने त्याचे रोम रोम सैलावले. येथेच काही क्षण विसावून अमरत्वाची प्रचीती घ्यावी असे त्यास वाटून गेले. तेवढय़ात जयाप्रदांनी आपला नाजूक हात उचलला. नानाच्या मनात येथे ‘गोरापान’ हे विशेषणही आले होते. पण मनात येईल ते गुणगुणण्यास आपण म्हणजे शरदजी नाही, असे म्हणत त्याने मन आवरले. तो हात बेंच वाजवण्यासाठी की आपल्याला वारण्यासाठी, हे पाहण्यास मग नाना तेथे थांबलाच नाही. हात जनाना असो की मर्दाना- त्याची चापट जीवघेणी असते, हे त्याला चांगलेच माहीत होते.
नाना तसा वस्ताद. थप्पड चुकवण्यात तर मुलखाचा महामाहीर. वर पुन्हा आपण म्हणजे डॉ. डेंगी असल्याच्या थाटात त्या थप्पड देणाऱ्याच्या कानाशी जाऊन म्हणणार, ‘इस थप्पड की गुंज सुनी तुमने राणा? अब तुम्हे इस गुंज की गुणगुण सुनाई देगी!’
मात्र, त्याचा पेटंट डायलॉग एकच- ‘एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है..!’ पाटेकरांच्या डिट्टो आवाजातील या संवादामुळे त्याला अख्खी मशकपुरी ‘नाना’ म्हणूनच ओळखते.
आपल्या दोन्ही शृंगिका रोखून त्याने तेथून उड्डाण केले ते नजमा हेपतुल्ला यांच्या दिशेने. नानाचे आणि त्यांचे जुने रक्ताचे नाते. बाई काँग्रेसमध्ये असल्यापासूनचे. हल्ली त्या भाजपमध्ये आहेत. पण एवढा काळ संसदेच्या प्रांगणात वावरल्यानंतर भाजपाई काय आणि काँग्रेसवासी काय, साऱ्यांचे रक्त सारखेच- ‘ए पॉझिटिव्ह’ हे नानाला कळून चुकले होते. हा ‘ए’ अंबानीतला की अदानीतला, हे मात्र त्या बिचाऱ्या वज्रतुंडालाही ठाऊक नव्हते.
नजमादादींच्या कानाशी हलकेच इटालियन गुणगुण करून त्यांना छेडावे या विचाराने त्याने आपले तलम पंख फैलावले. हा नानाचाच नव्हे, तर समस्त एडिस इजिप्ताय कुलाचा आवडता खेळ. माणूस शांत पडलेला असला की त्याच्या कानाशी जाऊन गुणगुण करावी आणि त्याने आपलेच कान झोडण्याआधी सटकावे, यात या समस्त सूचितुण्डांना कसली मौज वाटते कोण जाणे!
हेपतुल्लांच्या कानाशी तो लागणार इतक्यात त्याच्या कानावर जया बच्चन यांची रागदारी पडली. बाई साधे बोलतच नाहीत. सतत आपल्या घुश्शातच! तरी बरे, अमितजी अजून काम करतात!
नाना त्यांना जाम टरकतो. बाई पडल्या समाजवादी. त्यामुळे सतत शोषकांच्या विरोधात! थेट अमरसिंहांप्रमाणेच!
त्यांचे बोलणे ऐकून नाना जागी थिजलाच.
त्या म्हणत होत्या, ‘सर, एक तक्रार आहे. सदन उशिरापर्यंत चालले की संध्याकाळी सहानंतर येथे मच्छर आम्हाला चावू लागतात. येथे धूर फवारला पाहिजे.’
धूर?
नानाच्या पंखांखालची हवाच सरकली. त्याला काहीच समजेना. स्वच्छ भारताचे नारे देता ना तुम्ही? आणि मग थेट राज्यसभेत हवाप्रदूषण करा असे सांगता? ध्वनिप्रदूषण करून मन नाही का भरत तुमचे? त्याने ठरवले- उद्या अशी धुरकट वेळ आलीच, तर त्यात गुदमरून पळ काढण्यापेक्षा सरळ एखाद्या काँग्रेस सदस्याच्या हाताखाली आत्महत्या करायची. त्याला तरी काही पराक्रम केल्याचे समाधान मिळेल. तिकडे नजमादादींनीपण जयाभाभींच्या बोलण्यावर मान हलवली. त्या म्हणाल्या, ‘आम्ही इथं निवडून येतो. पण हे मच्छरसुद्धा निवडून येतात काय?’
राज्यसभेतला तो विद्वान आणि ज्येष्ठ सवाल ऐकून सारेच हसले. नानाही सोंडेतल्या सोंडेत किंचित हसला. मग विचारात पडला. खरेच येथे निवडून येता येईल? काय क्वालिफिकेशन लागते त्यासाठी? हे लोक कसे आले निवडून येथे? आपण तर फक्त लोकांचे रक्त शोषू शकतो. त्याने भागेल?
काहीही असो. आता येथे यायचे ते निवडूनच. त्याने जोरजोरात पंख हलवून पण केला. आणि तो पक्षकार्यालयाच्या दिशेने गेला..
०००
वाचकांतील सभ्य स्त्री-पुरुष व अन्यहो, आगामी निवडणुकीत आमचा नाना वा तत्सम कोणी कुठे दिसलाच तर दचकू नका हं!      

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा