डॉ. आशुतोष जावडेकर
ती बसून आहे शांतपणे शंकराच्या देवळाच्या पायरीवर. समोरच्या बागेत तिचा मुलगा खेळतो आहे मित्रांसोबत. डोळे सरावाने त्याच्यावर लक्ष ठेवत असताना ती मात्र आत आत डोकावून पाहते आहे. तेजस तिला निघताना सांगून गेला, ‘‘माझ्या फोनची रेंज लागली नाही तर माहीचा नाहीतर अरिनचा नंबर आहेच तुझ्याकडे. येतो दीड दिवसात. विल मिस यू.’’ तिनं ऐकून घेतलं. ती.. तेजसची बायको! तिचं नावही अद्याप तुम्हाला (सदर आता संपत आलं तरीही) माहीत नाही, यातच पुष्कळ काही आलं, नाही का! ती त्या तिघांच्या ग्रुपमध्ये नाही. तिचा नवरा त्या ग्रुपमध्ये समरसून राहणार आहे हेही तिनं कधीच स्वीकारलं आहे. तिला फक्त वाटतं की त्याने खोटं बोलू नये! आत्ताही निघताना त्याने ‘मिस यू’ असं सरावाने का म्हणावं?
त्याचा चेहराच इतका आनंदी होता की स्वच्छ कळत होतं, त्याला ती दीड दिवस आठवणारही नाही! माहीच्या लग्नाला दोन आठवडे उरलेले असताना अरिनने घाट घातला की त्या तिघांचीच अशी एक ट्रिप व्हायला हवी. माही जेव्हा तिच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला तेजसच्या घरी आली, तेव्हा ती बोलत असताना हा प्लॅन उलगडला आणि तेजसच्या बायकोला कळला. तेजसने आधी का नाही सांगितलं? तिने विचारलं नाही त्याला. कारण तिला माहीत आहे की तो म्हणेल, ‘‘अगं, विसरलो कामात.’’ किंवा लाडाने एखादी पापी घेत म्हणेल, ‘‘सो सॉरी डिअर. अरिन म्हणजे ना.. काहीतरी प्लॅन लावून मोकळा होत असतो.’’ तो फेकत जाईल शब्द आणि ती तिचं आयसोलेशन मानीपणे जपत जाईल! पण त्या दिवशी माहीला मात्र काय वाटलं कुणास ठाऊक, तिने तेजसच्या बायकोचा हात हातात धरला एकीकडे टेरेसमध्ये जाताना आणि म्हटलं, ‘‘थँक यू.. आमच्या मत्रीला तू समजून घेतल्याबद्दल! ते सोपं नाही हे कळतं मला. माझ्या लग्नाला नक्की ये. असंही धीरज म्हणतोय, की गुडगावला बदली घेऊन दिल्लीलाच जाऊ या. तिकडे गेले की आमचा तिघांचा ग्रुप तसाही संपणारच.’’
तेजसची बायको हसून म्हणाली, ‘‘नाही गं, तुम्ही फार आतून जोडले गेले आहात.’’ क्षणभर कुणी काही बोललं नाही, पण मग एकदम माही हात घट्ट पकडत म्हणाली, ‘‘अगं, मला ना आता टेन्शनच यायला लागलं आहे. जमेल का मला लग्न निभावणं? धीरज लग्नानंतर बदलला तर? आणि मुलंबाळं? मला हवी आहेत, पण त्यामुळे माझं सगळं जगणं व्यापूनच जाईल का? ३० वर्षे स्वत:च्याच कलाने वागायची सवय आहे. जमेल का आता वेगळ्या सवयींसह राहणं?’’
‘‘माही, तू काळजी करू नकोस. तुला शिकावं लागेल नवं बरंच. आणि तू शिकशील.’’ ती म्हणालेली. मग माही स्वत:च्या डोळ्यात आलेलं पाणी पटकन् पुसत होती तेव्हा तेजस टेरेसवर आला आणि बायकोला म्हणाला, ‘‘माझ्या मत्रिणीला चोरू नकोस.. काय!’’ माहीच रागावून म्हणाली, ‘‘तेजस, तुझी बायको माझी मत्रीण नाही असं म्हणणं दुष्टपणाचं आहे! आपल्या ग्रुपमध्ये ती नाही, पण म्हणून मला अनोळखी नाही आहे ती!’’ त्या क्षणी तेजस जर तिथे आला नसता तर ती माहीला सांगणार होती, ‘‘लग्न म्हणजे फार काही नाही, पण गृहीत धरतात पुरुष. सगळे नसतील तसे, पण बरेचसे असतात. कधी आईला, कधी पत्नीला, कधी मुलीलाही गृहीत धरतात. बायकांना गृहीत धरतात.’’ आणि पुढे तिला हेही म्हणायचं होतं की, नसतं मी स्वीकारलं तुमचं मत्र- तर? इतक्या सहज झाला नसता तुमचा तिघांचा ग्रुप! पण तेजस तिथे होता म्हणून ती एवढंच म्हणालेली, ‘‘मी माहीची मत्रीण आहेच, पण तू पन्नास वेळा म्हणतोस की माझी बायको माझी मत्रीण आहे, त्यावरचा माझा विश्वास मात्र हल्ली कमी होतो आहे.’’ तेजस एकदम चमकून टेरेसमधून काही न बोलता परत हॉलमध्ये गेला. माहीने म्हटलं, ‘‘मी एक तुला नक्की सांगते आणि प्रामाणिकपणे सांगते, तेजस लव्हज् यू. मला ते जाणवलं आहे.’’ आणि मग जरा थांबत समोरच्या कुंडीकडे बघत माही पुढे म्हणाली, ‘‘आणि हेही मला सांगायला हवं.. माझ्याकडून किंवा तेजसकडून कधी मत्रीची मर्यादा ओलांडली गेलेली नाही.’’ त्यावर पटकन् तेजसची पत्नी म्हणाली, ‘‘ओलांडली गेली असती तेजसकडून- तर आधी मला कळलं असतं. असं काही माझ्या मनातही नाही. आणि माही, तू अतिशय चांगली मुलगी आहेस याबद्दलही माझ्या मनात शंका नाही. आत्ताही तुम्ही तिघेच ट्रिपला जात आहात याचाही मला काही राग-लोभ नाही. तेजस मोकळा होतो तुमच्या सहवासात. तो आनंदी राहतो मग. कधी कधी वाटतं, आपण दोघीच भेटलो असतो तर.. आपल्या दोघींचा ग्रुप झाला असता तर! माझे अनेक कलीग मित्र आहेत. मैत्रिणींचे ग्रुप्स आहेत. पण माझं जिवलग असं कुणी नाही. माही, कधी कधी एकटी पडते मी. आणि त्याचवेळी नेमके तुम्ही तिघे भेटलात तर मला राग येण्याऐवजी उदास वाटतं.’’ माहीने तिचा हात हातात धरून पटकन् म्हटलं, ‘‘हे मला जाणवलं नाही ही माझी चूकच झाली. आजपासून मी तुझीही आहे! दिल्लीत गेले तरी रोज व्हॉट्सअॅपवर आहे.’’ मग हसत ती पुढे म्हणाली, ‘‘धीरजशी भांडण झालं की ट्रिक्स आणि टिप्ससाठी तुलाच गाठणार आहे मी. चल, आम्ही निघतो. लग्नाला ये. साधंसं आहे. पत्रिका फक्त व्हॉट्सअॅपवर आहे. तुला पाठवली आहे. तुझ्या नवऱ्याला तू माझ्या आयुष्यात मित्र म्हणून इतक्या सहजभावाने राहू आणि रेंगाळू दिलंस, हेच गिफ्ट मिळालं मला. खूप मोठं गिफ्ट! लग्नात आता वेगळं काही आणू नकोस.’’
ती पायरीवरून उठत असताना व्हॉट्स अॅपची घंटी टंग टंग वाजते. तेजसने आठ-दहा फोटो पाठवले आहेत. आणि धमाल सुरू असल्याचा सांगावा.. मेसेज. हेही तो लिहितो, ‘‘तुला आणि आपल्या पिल्लूला आणेन मी या हॉटेलमध्ये.’’ ती एकेक फोटो पाहते. अरिन सायकल चालवतो आहे. तेजस आणि माही एका झाडाच्या पारावार बसून आहेत. तिसऱ्या फोटोत तिघे एकत्र हॉटेलच्या बागेत पळण्याची अॅक्टिंग करत आहेत. अरिन पाण्यात उतरलाय पोहायला. माही आणि तेजस स्विमिंग पूलच्या डेकवर नुसते पहुडले आहेत. पाहिलेच नाहीत तिने पुढचे फोटो मग.. तिला राग आला नाही. तेजसच्या आयुष्यात असा आनंद यावा याचा आनंदच झाला तिला. पण तिला अपार एकटेपण येऊन भिडलं. तिचा असा का ग्रुप नाही? होत्या ना तिच्या शाळेपासूनच्या तीन मत्रिणी. पण सगळ्यांच्या घरातल्यांचे नखरे आणि वेळा सांभाळताना त्यांच्या भेटी कधी आणि कशा थांबल्या, हेच कळलं नाही. ऑफिसचा ग्रुप हा अखेर ऑफिसचाच राहतो. ते काही जिवलग होऊ शकत नाहीत. तेजस जसा सारखा व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर कुणाशी तरी चॅट करतो तसंही तिला आवडत नाही, जमत नाही. आणि मुळात तिला या सगळ्यासाठी वेळ मिळत नाही. पहाटे मुलाचा आणि नवऱ्याचा डबा करण्यापासून, स्वत:चं आवरून ऑफिसमध्ये जाऊन घरी संध्याकाळी परतलं तरी कामांचा डोंगर राहतोच पुढे. तेजस म्हणतो, ‘‘फेक तो पसारा जिथल्या तिथे. काही आवरत बसू नकोस. घर आहे हे, हॉटेल नाही.’’ तिलाही क्षणभर पटतं. पण दुसऱ्या दिवशी त्याच पसाऱ्यामुळे तेजसचं पाकीट ऑफिसला जाण्याआधी सापडलं नाही तर अंतिम जबाबदारी नकळत तिच्यावर येते. येते की ती घेते? आणि का घेते? तेजस मात्र जाऊ शकतो- कुठेही, कधीही.
ती पुन्हा एक चक्कर मारून देवळात येते. मनोभावे शंकराला नमस्कार करते. काही सुचत नाही तिला. तेजस चांगलाच नवरा आहे, त्याविषयी प्रश्नच नाही. पण तो सगळ्या कामांच्या ओझ्यात तिला मिळतच नाही. मिळाला तर आजकाल त्याचं मन तिला सापडत नाही. तितक्यात पुन्हा मेसेजची रिंग वाजते. ‘‘अगं, इथल्या लोकल मार्केटमध्ये तुझ्यासाठी वारली डिझाइनचं कानातलं बघतो आहे मी आणि माही. त्याचेच फोटो पाठवलेत. बघ. कुठलं घेऊ?’’
ती मागे वळते. उतरत्या संध्याकाळी स्वत:च्या आत पुन्हा डोकावून बघते नि मग लिहिते, ‘‘डिअर तेजस, तुला हे माझ्यासाठी घ्यावंसं सुचलं, हेच विशेष. मला छान वाटलं. पण आत्ता काही घेऊ नकोस. मी आणि माझी कुणीतरी मत्रीण या रिसॉर्टला जाऊ एकदा. मला माहीत नाही कधी, केव्हा.. कुणी सोबत नाही मिळालं तर मी एकटीही जाईन असं म्हणतेय. पोहेन, खेळेन, पुस्तक वाचेन, शांतपणे बुफे जेवण जेवेन. आणि मग तिथल्या या लोकल मार्केटमध्ये माझ्यासाठी कानातले घेईन. आणि तुझ्यासाठी ते खेडय़ातले टपोरी घालतात तसे जाळीजाळीचे बनियन विकत घेईन! माझी ती एक फँटसी राहिलीच आहे.’’ मग ती एक स्माईली टाकते, दोन किसचे इमोजी देते आणि मुलाला सोबत घेऊन त्याला दुसऱ्या दिवशी शाळेत लागणाऱ्या प्रोजेक्टचं सामान विकत घेण्यासाठी स्टेशनरीचं दुकान गाठते. मुलाला खायला घालून, ओटा आवरून, अखेर त्याला झोपवून ती पलंगावर विसावते. व्हॉट्सअॅपवरचे ऑफिसचे कामाचे निरोप लिहिले जातात आणि ती पडणार इतक्यात तेजसचा व्हॉट्सअॅपवर फोटो येतो. फोटोत जाळीजाळीच्या बनियनमध्ये तेजस उभा असतो! मनापासून स्माईली आणि अजून योग्य ती चिन्हे ती टाकते आणि नि:भ्रांत झोपून जाते.
ashudentist@gmail.com