मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com
पाश्चात्य अभिजात संगीतातील प्रसिद्ध अमेरिकन रचनाकार शीला सिल्व्हरला (जन्म १९४६) मी मुंबईत २०१६ सालच्या सप्टेंबर महिन्यात भेटलो होतो. ही भेट शक्य झाली ती आमच्या दोघांचा मित्र दीपक राजाच्या सौजन्याने. शीला ही युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाची (बर्कले) पदवीधर असून, तिनं ब्रँडिस युनिव्हर्सिटी (मॅसॅच्युसेटस्)मधून ‘संगीतरचना’ या विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. गेली तीन दशकं ती पाश्चात्य संगीतातील अमेरिकेचा एक महत्त्वाचा आवाज म्हणून ओळखली जाते. स्टोनी ब्रुक येथील स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यू यॉर्क आणि कॉलेज ऑफ विल्यम अँड मेरी (व्हर्जिनिया) या दोन्ही संस्थांमध्ये ती संगीताची प्राध्यापिका होती. विद्वत्ता आणि सर्जकता या दोहोंचा मिलाफ शीलाच्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. आपल्या दीर्घकालीन कारकीर्दीत तिला अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मान व पुरस्कार मिळाले आहेत.
दीपक राजाच्या घरी झालेल्या शीलाच्या आणि माझ्या प्रदीर्घ संवादात ती भारतात का आणि कशी आली, इथपासून ते अनेक मुद्दय़ांवर आमची चर्चा झाली. त्या संभाषणातला संपादित अंश पुढे देत आहे..
ी दीपक म्हणतो त्याप्रमाणे भारतीय गुरूचा शोध घेणं ही एका अर्थानं तुझ्या ‘कार्मिक कनेक्शन्स’ची परिणती होती, तर हा शोध ग्वाल्हेर घराण्याच्या पंडित केदार बोडस यांच्यापाशी येऊन कसा संपला?
– खालेद हुसेनी यांच्या ‘अ थाऊजंड स्प्लेंडिड सन्स’ या कादंबरीवर मला ऑपेरा करायचा होता. (वाचकांना हुसेनीची ‘द काईट रनर’ ही अतिशय लोकप्रिय कादंबरी आठवत असेल.) ही कादंबरी आणि ऑपेरा अफगाणिस्तानात घडतो. त्यामुळे मला माझ्या पूर्व युरोपियन ज्युईश मुळांपासून खूप दूर जावं लागणार हे तर निश्चित होतंच. पण मला त्यात अफगाणिस्तानातलं भावविश्व आणावयाचं होतं, म्हणून त्या देशाचं सांगीतिक नादविश्व असणाऱ्या हिंदुस्थानी संगीताबद्दल मी इंटरनेटवर वाचन करायला सुरुवात केली. मी पुन्हा पुन्हा दीपक राजाच्या ब्लॉगकडे वळते आहे असं माझ्या लक्षात आलं. याचं कारण म्हणजे हा ब्लॉग फार सुरेख लिहिला होता आणि दीपकला नक्की काय म्हणायचं आहे, ते मला समजत होतं. मग मी एक धाडसी निर्णय घेऊन त्याला एक ई-मेल पाठवली. (त्यावेळी भारतात येऊन अभ्यास करण्यासाठी गुगनहाईमकडून अनुदान मिळावं म्हणून मी अर्ज केला होता.) त्या मेलमध्ये मी दीपकला माझी सगळी परिस्थिती समजावून सांगितली होती आणि शेवटी भारतात संगीत गुरू कसा शोधावा, असा प्रश्नही मी त्याला विचारला होता. दीपकचं मला लगेचच उत्तर आलं. आमचा संवाद सुरू झाला. तो वाढत गेला. आणि शेवटी तो माझा पथदर्शक झाला. अनेक वेडय़ावाकडय़ा वळणांनंतर आम्ही शेवटी पुण्यातल्या बोडस पिता-पुत्रांपर्यंत पोहोचलो. आज मागे वळून पाहताना हाच योग्य मार्ग होता असं वाटतं आणि दीपकची मी त्याबद्दल शतश: ऋ णी आहे.
ी भारतात येऊन एखाद्या भारतीय गुरूच्या चरणाशी बसून आपण भारतीय संगीत शिकू अशी कल्पना तरी तू कधी केली होतीस का?
– कधीच नाही. पण या गोष्टीचं मला फारसं आश्चर्यही वाटत नाही. कारण माझा अशा प्रकारचा आध्यात्मिक शोध अखंडपणे चालूच होता. आणि संगीत- विशेषकरून भारतीय संगीत हा अध्यात्माचाच एक मार्ग आहे असं मला नेहमीच वाटत असे. म्हणून माझं बोडस कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचणं हे एका अर्थानं विधिलिखितच होतं असं मला वाटतं. मी बर्कले इथे विद्यार्थी असताना भारतीय संगीत खूप ऐकत असे. त्यावेळी पाश्चात्य जगतात अतिशय लोकप्रिय असणाऱ्या पंडित रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खान यांच्या काही रेकॉर्ड्स माझ्याकडे होत्या. त्यावेळी मला भारतीय शास्त्रीय संगीत फारसं कळत नव्हतं, पण तरीही मी ते ऐकत असे. पण जोपर्यंत हा ऑपेरा लिहावं असं माझ्या डोक्यात नव्हतं तोपर्यंत हे संगीत आपण शिकावं असं मला कधीच वाटलं नाही. भारतात येऊन भारतीय तत्त्वज्ञानाबद्दल जास्त जाणून घ्यावं असं मात्र मला नेहमी वाटत असे. पण हे कसं शक्य होईल याचा मी विचार तोवर केलेला नव्हता. परंतु यानिमित्ताने भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्याची आणि भारताशी नातं जोडण्याची संधी माझ्याकडे चालून आली.
ी पंडित केदार बोडस यांच्याकडे प्रथम पुणे आणि नंतर हुबळी (कर्नाटक) इथे शिकताना तू भारतीय शास्त्रीय संगीतातील अनेक राग आणि रागिण्या शिकली असणार. तर त्यापैकी तुला कुठले राग जास्त भावले आणि कुठल्या रागांचा तू तुझ्या ऑपेरामध्ये उपयोग केलास याबद्दल काही सांग..
– नक्की. माझ्या ऑपेराची सुरुवात बिलासखानी तोडीच्या स्वरांनी होते. या रागात एक प्रार्थनेचा भाव आहे, जो माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. आणि हा भाव जेव्हा जेव्हा ऑपेरात येतो तिथे मी या रागाचा वापर केला आहे. अफगाण लोक बरेच भक्तिपरायण आहेत आणि म्हणून ऑपेरात येणाऱ्या अशा जागी या रागाचा वापर करणं मला सयुक्तिक वाटलं. त्याचप्रमाणे भैरव या शांत आणि प्रार्थनेचा भाव निर्माण करणाऱ्या रागाचे सूरदेखील मी अनेक ठिकाणी वापरले आहेत. माझ्या दृष्टीने मियां की तोडी हा एक नाटय़पूर्ण आणि ताण असलेला राग आहे. (कदाचित भारतीयांना माझा हा विचार पटणार नाही.) आणि म्हणून ऑपेरामध्ये ताण सूचित करायला मी या रागाचा वापर केला आहे. बागेश्री हा शृंगाररसप्रधान राग आहे आणि मी ऑपेरातल्या पहिल्या प्रेमप्रसंगात या रागाचा वापर केला आहे. भूप, शुद्धसारंग (बाजारात गेलेल्या स्त्रिया एकत्र होतात तो प्रसंग), झिंझोटी (तरल, दु:खी प्रसंगात) आणि काही ठिकाणी ललत अशा इतर काही रागांचा वापरदेखील मी केला आहे. जेव्हा मी राग असं म्हणतेय तेव्हा ते भारतीय शास्त्रीय संगीतात जसे असतात तसा वापर मी केलेला नाहीये, तर माझ्या रचनेची सुरुवात त्या स्वरांनी होते. भारतीय संगीताची जाण असणाऱ्यांना ते पटकन् ओळखता येतील. पण फक्त पाश्चात्य संगीतच ऐकणाऱ्यांना (ज्यांना भारतीय संगीताची ओळखदेखील नाही अशांना) ते अजिबात ओळखता येणार नाहीत. वैशिष्टय़पूर्ण रचना करण्याचं जणू काही आमंत्रणच मला हे राग देतात. मला भारतीय संगीताची माहिती नसती तर हे शक्य झालं नसतं.
ी भारतीय गुरू-शिष्य परंपरेत शिष्याला गुरूपुढे आपला अभिमान, अहंकार यांचं विसर्जन करून संपूर्ण समर्पणात्मक भावनेनं शिकावं लागतं. तू केदारजींपेक्षा वयानं मोठी आहेस. शिवाय अमेरिकेत तू स्वत:देखील एक गुरू आहेस. असं असताना तू या परिस्थितीला कशी सामोरी गेलीस?
– मी अमेरिकेत गुरू असेन, पण मला परत एकदा नव्यानं विद्यार्थी व्हावं लागणार- ही कल्पनाच मला ताजतवानं करणारी होती. आणि मूळाक्षरं गिरवण्यापासून मला सुरुवात करायची होती. हा फारच रोमांचक अनुभव होता. संश्लेषणाच्या पायावर शिकायचं आणि गायचं हे माझ्यासाठी अत्यंत आनंददायी होतं. आणि मग रियाज करायचा. मी विद्यार्थी असताना पियानोचा रियाज करत असे. त्यानंतर माझा रियाज तुटलाच होता. त्यामुळे मला हे सगळं स्वागतार्ह होतं. मी भराभर शिकत गेले.
मी मुळात संगीतकार असल्यामुळे एका धारेतून दुसऱ्या धारेत जाणं मला अवघड गेलं नाही. कारण भारतीय आणि पाश्चात्य या दोन्ही पद्धतींमध्ये सूर आणि ताल हे मूळ घटक समानच असतात. त्या दोन्ही धारेत फरक आहेत.. मान्य. पण साम्यंदेखील आहेत. निदान सुरुवातीच्या पातळीवर तरी साम्यं आहेत. तू म्हणतोस ते खरं आहे. भारतीय गुरू-शिष्य पद्धतीत पूर्ण समर्पण असावं लागतं. पाश्चात्य पद्धतीत तसं नसतं. पण मला हे सहज शक्य झालं, कारण हिंदुस्थानी संगीताच्या बाबतीत तर मी नवशिकी होती. दुसरं म्हणजे फुकट दवडण्यासाठी माझ्याकडे वेळच नव्हता. माझा अहंकार, अभिमान मी माझ्या शिकण्याच्या आड कधीच येऊ दिला नाही. मला माझ्या गुरुजींना खूश ठेवायचं होतं. इतर शिष्यांप्रमाणेच ते नाराज झाले तर..? अशी भीती होतीच. मला वाटतं, मी वयानं मोठी आहे याचा माझ्यापेक्षा केदारजींनाच त्रास झाला असावा. अमेरिकेत मी माझ्यापेक्षा वयानं मोठय़ा असणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकदा शिकवले आहे. पाश्चात्य जगात यात काही विपरीत चाललंय असं वाटत नाही. विशेषत: ग्रॅज्युएट शाळेत. पाश्चात्य जगात सगळ्या वयाची माणसं पुन्हा शिक्षण घ्यायला येतात. माझे अनेक विद्यार्थी चाळीस ते पन्नास या वयोगटातले असायचे. अर्थात भारतीय जसे ज्येष्ठ व्यक्तींना मान देतात तसा आम्ही पाश्चात्य जगात देत नाही, हे मात्र खरं आहे. ज्येष्ठ व्यक्ती आणि गुरुजनांचा भारतीय लोक जसा आदर करतात, ते मला फार आवडतं. या प्रकारची गुरुभक्ती किंवा वडील मंडळींबद्दल आदर पाश्चात्य जगात विरळाच दिसतो. पण मी एक नक्की सांगते, की केदारजी आणि त्यांचे वडील नारायणराव (नाना) बोडस ही भारतीय कल्चरमधला भक्तिभाव जागवणारी व्यक्तिमत्त्वं आहेत.
ी २०१३ साली तू जेव्हा शिकण्यासाठी भारतात पुणे इथे आलीस तेव्हा तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना एक प्रकारचा ‘कल्चरल शॉक’च (सांस्कृतिक धक्का) बसला असणार.
– अगदी खरंय. पण आम्हाला त्याचा फारसा त्रास झाला नाही. उलट, हे सगळं बरंच सुखावह वाटलं. त्यावेळी माझा मुलगा १५ वर्षांचा होता. त्याला एक सेमिस्टर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जावं लागलं होतं. शिवाय प्रदूषण आणि भयानक ट्रॅफिक यांचा सामना करावा लागला होता. पण आम्ही आमच्या पुण्याच्या छोटय़ाशा घरात आम्हाला नीट सामावून घेतलं. हळूहळू आम्हाला आमच्या जीवनाचा ताल साधला. त्या काळाच्या सुखद आठवणी आम्ही आजही काढतो. माझ्या कुटुंबाला मला सहा महिने अमेरिकेत सोडून येणे शक्य नव्हतं. म्हणून आम्ही सगळेच पुण्याला आलो. मला मिळालेल्या ‘गुगनहाईम’ संस्थेच्या अनुदानामुळेच हे सगळं शक्य झालं. माझा नवरा एक फ्रीलान्सिंग फिल्ममेकर आहे. त्यावेळी त्याचा एक प्रोजेक्ट चालू होता. स्पेन्सरटाऊन (न्यू यॉर्क)मधल्या त्याच्या स्टुडियोमध्ये काम करण्याऐवजी पुण्यातल्या आमच्या घरातून त्याने त्याचं काम केलं. आमच्या मुलाला एका अतिशय नव्या जगातील शाळेत शिकायला घालणं हा आमच्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित, तरीही समृद्ध करणारा अनुभव होता. अशा या अनुभवांनी आम्ही सगळेच समृद्ध झालो. खूप मजाही केली आम्ही. शिवाय काही प्रेक्षणीय स्थळेही पाहिली.
ी तुझा ऑपेरा एका प्रभावी ‘ुमन इंटरेस्ट’ असलेल्या जगप्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे. त्यात हिंदुस्थानी रागांच्या रंगांची पखरण अनेक भारतीय वाद्यांनी केली आहे. (उदा. सरोद, बासरी, सतार) आणि त्यातले गायलेले संवाद हे साध्या आणि आधुनिक इंग्रजीत आहे. या घटकांमुळे तो भारतीय प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असं मला वाटतं.
– भारतात या ऑपेराचे प्रयोग झाले तर फारच उत्तम. बघू.
जाता जाता : (१) १९६१ सालच्या ‘काबुलीवाला’ या सिनेमातलं ‘ऐ मेरे प्यारे वतन’ हे गाणं मी शीलाला मुंबईत असताना युटय़ुबवर ऐकवलं होतं आणि रबाब या वाद्याचा उपयोग ऑपेराच्या वाद्यमेळात करावा असं सुचवलं होतं. (रबाब हे अफगाणिस्तानचं एक राष्ट्रीय वाद्य आहे.) पण काही अडचणींमुळे शीलाला तसं करता आलं नाही. (२) सोपानची प्रतिक्रिया त्याच्याच शब्दात अशी.. ‘‘शीला सिल्व्हर हे नाव मी तुझ्याकडून बऱ्याच वेळा ऐकलं होतं. पण या बाई इतक्या प्रतिष्ठित कलाकार असतील असं हा लेख वाचण्यापूर्वी मला कधीच वाटलं नव्हतं.’’
शब्दांकन : आनंद थत्ते