-शेखर राजेशिर्के

निसर्गप्रेमाने झपाटलेल्या आणि माहितीपटाद्वारे सह्याद्रीच्या सौंदर्याचे दस्तावेजीकरण करण्याची इच्छा बाळगणाऱ्या दिग्दर्शकाची ही गोष्ट. आर्थिक आणि कुठलेही तांत्रिक पाठबळ नसताना ते आत्मसात करण्यासाठी त्याने भरपूर वेळ अभ्यासात घालवला. डॉक्युमेण्ट्री निर्मितीचे स्वप्न पूर्ण करीत त्याद्वारे गिर्यारोहकांना उपयुक्त माहिती दिली आणि गिरिभ्रमणाविषयी जनजागृती केली. माहितीपटांबाबत हौस आणि ध्यास असल्यास आर्थिक अडचणींवर कशी मात करता येईल, याची उत्तरे शोधून काढली…

नव्वदोत्तरीत नॅशनल जिओग्राफिक ( NGC), अॅनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरी या वाहिन्यांमुळे वन्यजीवप्रेमींसमोर माहितीपटांचा खजाना खुला झाला. डॉक्युमेण्ट्रीच्या माध्यमातून निसर्ग वा ठिकाणं मांडण्याची त्यांची पद्धत, त्यासाठी घेतलेले कष्ट, परिणामकारक निवेदन, सर्वच हरखून टाकणारे होते. आपल्याकडेही सुंदर निसर्ग आहे, चलतचित्रणाच्या माध्यमातून मांडण्यासाठी भरपूर विषय आहेत; परंतु आपल्या दूरदर्शनवर तसे काही दाखवले जात नव्हते. मग आपण काहीतरी केले पाहिजे असे वाटू लागले आणि चलतचित्रणाचे तंत्र शिकण्याची गरज भासू लागली. परंतु चलचित्रण हे स्थिरचित्रणापेक्षा वेगळे तंत्र आणि न परवडणारे. पुस्तके वाचून शिकण्याचा हा विषय अजिबात नव्हता. अनुभवी कॅमेरामनच्या गाठीभेटी झाल्या. त्यांनी तर ‘हे तंत्र तुला जमणार नाही’असे सरळ सांगून टाकले. तंत्र शिकवणाऱ्या संस्थांचे शुल्क आवाक्याबाहेरचे. खूपच बेचैन झालो. आपण स्वत: कधी गडकोटांवर माहितीपट बनवलाच तर तो कसा असेल? तर तसा माहितीपट डोळ्यासमोर उभा राही. अशा स्वप्नांमध्येच काही वर्षे गेली आणि अचानक एक आशेचा किरण दिसला.

Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
article about social and political polarization facing by american media
वृत्तवाळवंट सुफलाम करण्यासाठी…
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
how to use data science properly how to learn data science
कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात : डेटा सायन्स
319 crores received for birth certificates of Bangladeshis and Rohingye says kirit somaiya
“बांगलादेशी, रोहिंग्यांच्या जन्म दाखल्यासाठी ३१९ कोटी आले”… किरीट सोमय्यांनी थेट…
A bull carrying sugarcane sat on the road
त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का? ऊस वाहून नेणारा बैल रस्त्यातच बसला अन्… ; काळजाचे पाणी करणारा VIDEO

मुंबई दूरदर्शनचे सेवानिवृत्त उपसंचालक आकाशानंद अर्थात आनंद बालाजी देशपांडे यांनी १९९६ साली ‘मालिका व माहितीपट निर्मितीचे प्रशिक्षण शिबीर’ घेतले होते. या आकाशानंदांनी ‘ज्ञानदीप’ कार्यक्रमांद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात, दूरदर्शनच्या शिक्षण आणि मनोरंजन या मूळ हेतूनुसार दारूबंदी, हुंडाबंदी, प्रौढ शिक्षण आदी विषयांतून समाजात जनजागरण घडवून आणले होते. भारतीय टेलिव्हिजनचे ते असे एकमेव स्टेशन-डायरेक्टर होते की ज्यांच्या त्या कार्यावर बी.बी.सी.ने माहितीपट बनवला. त्यांच्याकडून माहितीपट निर्मितीचे शिक्षण मिळणार म्हटल्यावर नावनोंदणी केली.

हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प

त्यांच्या नेरळ येथील बंगल्यावर सकाळी सात ते रात्री अकरा असे सलग १० दिवस हे प्रशिक्षण पार पडले. कथेतून परिणामकारक पटकथा कशी साकारायची, शॉट ब्रेकअप, कॅमेऱ्याची हाताळणी, प्रकाशयोजना आदी सर्व तांत्रिक व कलात्मक घटक व्यवस्थित घोटवले गेले. शेवटी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून माथेरानवर माहितीपट तयार केला गेला. तसेच सर्वांनी मिळून एक गोष्ट लिहिली. मग त्याची पटकथा लिहून एक एपिसोडही तयार झाला. या प्रशिक्षणाने चलतचित्रणाचे व विषय बांधणीचे तंत्र समजले व डॉक्युमेण्ट्री निर्मितीसाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास आला.

मग मी सह्याद्रीतील गडकोटांवर माहितीपटांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रत्येक किल्ल्याची पटकथा कशी असेल, कॅमेरा अँगल, चित्रणाच्या सोयीसाठी सूर्याची किरणे कधी कशी असतील याची कच्ची टिपणे तयार झाली. निर्मिती व्यवस्थापनाचा आराखडा तयार झाला आणि मी दूरदर्शनच्या गेटवर धडक मारण्यास सुरुवात केली. दूरदर्शनच्या प्रादेशिक व उपग्रह वाहिनीवर प्रक्षेपण करण्यासाठी निर्मितीची काही तांत्रिक मानके सांभाळायला लागतात. त्यासाठी त्या काळी सोनी बिटाकॅमसारखे कॅमेरे वापरावे लागत. तसा अवजड कॅमेरा त्याचा अवजड स्टँड , डोंगरवाटांची सवय नसणारा कॅमेरामन व इतर साहित्य सह्याद्रीच्या कडेकपारीत कसे बागडणार हा मला मोठाच प्रश्न पडला. नंतर दूरदर्शन मान्यताप्राप्त संकलकाकडून त्या एपिसोडचे संकलन व त्याची युमॅटिक वा डिजिबीटा कॅसेट. असा सर्व खर्चाचा अंदाज त्या काळी तीन-चार लाखांवर गेला आणि माझी पावले धाडकन जमिनीवर आदळली.

२००२ साली महाराष्ट्रातील गिर्यारोहण संस्थांना एकत्र आणण्याच्या निमित्ताने गिरिमित्र चळवळ सुरू झाली. या गिरिमित्र संमेलनाने एक कल्पना मांडली. ती म्हणजे वर्षभरात केलेल्या गिर्यारोहण मोहीमेवर वा दूर्ग, निसर्गादी विषयांवर दृक्श्राव्य सादरीकरण करायचे आणि चांगल्या सादरीकरणांचे, बक्षिसाने कौतुक करायचे. या संकल्पनेमुळे मला व्यासपीठ मिळाले.

हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : प्रयोगांची शाळा

किल्ल्यांच्या माहितीपटांची संकल्पना तयार होतीच. त्यातला राजगड हा महत्त्वाचा किल्ला निवडला. पुरातत्त्व खात्याकडे चित्रीकरणाच्या परवानगीसाठी अर्ज केला. पुढे आमची पायताणं झिजली, पण त्यांच्याकडून होकारही नाही आणि नकारही नाही. तेव्हा हा माहितीपट गुंडाळावा लागणार अशी चिन्हे दिसत असताना, ‘एनजीसी’वर पहिल्या महायुद्धावरील एक अप्रतिम माहितीपट माझ्या पाहण्यात आला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो संपूर्ण माहितीपट स्थिर छायाचित्रे वापरून तयार केला होता. मला अचानक दिशा मिळाली. आपल्याकडे ‘स्थिर’ फोटो काढायचा कॅमेरा होताच व त्याला ट्रायपॉडची आवश्यकताही नव्हती. मग काय? पटकथा तयार होतीच! फोटो कसले काढायचे तेही डोक्यात होते. राजगडाच्या पुन्हा तीन फेऱ्या झाल्या व गडाचे सर्व अंगोपांग चित्रबद्ध झाले. चलतचित्रण असो वा स्थिरचित्रण असो, माध्यम कसलेही असले तरी त्याने काही फरक पडत नव्हता.

राजगडाच्या व्यथा जनतेपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे होते. पैशांची अडचण सदाचीच. मग पटकथा, निवेदन, ध्वनिमुद्रण व संकलनाचे संस्कार घरगुती स्वरूपात घरातच झाले. राजगडावर जाण्यायेण्याचा आणि छायाचित्रणाचा खर्च सोडता ‘झिरो बजेट’मध्ये ‘उद्ध्वस्त राजगड’ ही फिल्म तयार झाली. व्यावसायिक सफाईदारपणा नसला तरीही पटकथा जमल्याने ती अत्यंत परिणामकारक झाली होती. कारण त्यात व्यक्त केलेल्या व्यथा या प्रत्येक गिरिमित्राच्या होत्या. या फिल्मला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.

फुटेज जमवल्यानंतर त्याचे रूपांतर करण्यासाठी ‘एडिट’ हा महत्त्वाचा टप्पा येतो. त्या काळात फक्त मालिका आणि चित्रसृष्टीसाठी एडिटिंग स्टुडिओ असायचे. तिथे एक मित्र होता. तो मला अंधेरीतील एका स्टुडिओत घेऊन गेला. गडकोटांच्या फोटोंचा गठ्ठा स्कॅन करून तो संगणकावर आणायचा, त्या जोडीला निवेदनाची ध्वनिफीत घेऊन फिल्म तयार करायची. मुळात त्यांना विषय समजेना. टीव्ही मालिकेचे एडिट करणे हा तसा सोपा विषय आहे. कारण फॉर्म्युला ठरलेला असतो आणि एडिट डोक्यात ठेवूनच चित्रण केलेले असते. डॉक्युमेण्ट्रीत तसे नसते. ऐन वेळेससुद्धा भरपूर बदल होऊ शकतात. विषय समजता समजता एडिटरची शिफ्ट संपली आणि तो खुर्चीतून उठला. त्यामुळे घरी येताना फिल्म एडिटिंगचे तंत्रदेखील शिकण्याचे मी नक्की केले. मी कॉम्प्युटर आणि स्कॅनर विकत घेतला. सर्व किल्ल्यांचे फोटो स्कॅन करून संगणकावर आणले. आता पुस्तकांना हाताशी धरण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यासाठी ब्रिटिश लायब्ररीचा सभासद झालो. तिथे तर फिल्म एडिटिंग व एकंदरीतच डॉक्युमेण्ट्री या विषयावर पुस्तकांचा खजिनाच सापडला. अधाशासारखी ती पुस्तके वाचून काढली. पुस्तकांतून एडिटचे तंत्र शिकून घेतले आणि कॉम्प्युटरवर एडिट करायला बसलो. आर्थिक मदत नसेल तर एक फायदा असतो. सर्व स्वत:लाच शिकायला लागते. स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसतही नसतो.

हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : लोकदानातून सिनेधनुष्य..

आमचे गिरिभ्रमण सुरू व्हायच्या व छायाचित्रण कलेचा स्वयंअभ्यास करण्याच्या काळात मला फोर्टच्या फुटपाथवर फोकल प्रेस पब्लिकेशनचे ‘Photo guide to Mountain for Backpackers and Climbers’ हे जबरदस्त पुस्तक मिळाले होते. त्या पुस्तकातून डोंगरांचे कलात्मक फोटो कसे काढायचे याचे चांगले तांत्रिक मार्गदर्शन मिळाले.

गिरिदुर्गभ्रमण करता करता सह्याद्री पर्वतरांगेतील बऱ्याच रॉक-क्लाइंबिंगच्या साहसी मोहिमांत भाग घेता आला. कडेसुळक्यांवर बागडणे ही जशी साहसी क्रिया आहे, तसेच त्या बागडण्याचे चित्रण करणे हेसुद्धा एक वेगळे साहसच आहे. कड्यावर अडचणीच्या ठिकाणी कॅमेऱ्याचे आणि इतर साहित्याचे वजन बाळगत चढत जायचे आणि तिथल्या असुरक्षित जागी सुरक्षित बसून डोक्यात चित्रणाच्या सर्व तांत्रिक व कलात्मक गणितांचा विचार करीत मोहिमेचे चित्रीकरण करायचे हे निश्चितच आव्हानात्मक आणि आनंददायी आहे. त्या कडेसुळक्यांचे, रॉकक्लाइंबिंगचे छायाचित्रण तसेच त्या साहसी मोहिमांवर माहितीपटही तयार करता आले. हल्ली या माहितीपटांचा उपयोग नवीन पिढीला रॉक क्लाइंबिंगची आणि गिरिभ्रमणाची माहिती होण्यासाठी निश्चितच होत आहे.

आता पुढची पायरी. या निसर्ग, संस्कृती वा साहसपटांचा वापर स्थानिक पातळीवर करता येऊ शकेल का? स्थानिक लोकांना मुळात कळायला तरी पाहिजे की त्यांच्याकडे सांस्कृतिक व नैसर्गिक वारसांचे भांडार आहे. तसेच त्या भांडारामुळे व पर्यावरणस्नेही पर्यटनातून त्यांना आर्थिक लाभही होऊ शकतो. जतनाची क्रिया तर नंतरची! असे माहितीपट, छायाचित्रे व पुस्तकांच्या स्वरूपातले दस्तावेजीकरण स्थानिक जनतेमध्ये तिथल्या वारशाबाबत जाणिवा, आपुलकी तयार करण्यास चांगली मदत करू शकतात. ‘Photography for Conservation’ हा एक त्यासाठीचा सशक्त मार्ग आहे. म्हणूनच अशा डॉक्युमेण्ट्री निर्मिती आणि त्यांचा योग्य ठिकाणी वापर हा महत्त्वाचा.

हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : प्रयोगांच्या अमर्यादित शक्यता..

गिर्यारोहणासाठी परदेशांत, शिखर गायचे या मुख्य हेतूबरोबर माहितीपटाची निर्मिती हासुद्धा मुख्य हेतू ठरवून बऱ्याच मोहिमा आखल्या जातात आणि मोहिमेचे बजेटही माहितीपटाचा खर्च धरून ठरवले जाते. ‘तज्ज्ञ’ माहितीपट निर्मात्याची टीम मोहिमेत शेवटपर्यंत सहभागी असते. त्यामुळे त्या माहितीपटांची गुणवत्ता चांगल्या प्रतीची राखली जाते. आपल्याकडे हे क्वचित होते. साहसी खेळांमुळे राष्ट्र बलवान होते, तर नैसर्गिक व सांस्कृतिक वारशांमुळे राष्ट्र घडत जाते. तसे ते घडण्यासाठी त्या त्या प्रकारच्या माहितीपटांची मदत होऊ शकते. मालिका, चित्रपट निर्मितीसारखे वातावरण माहितीपटांसाठी तयार झाल्यास तसा प्रेक्षकवर्ग तयार होईल आणि माहितीपट निर्मितीकडे व्यवसाय म्हणून पाहिले जाईल. ओटीटी फलाटाचे दरवाजेदेखील सहज उघडतील. दुसरे असे की, डिजिटल क्रांतीमुळे आता कुणालाही डोळ्याला कॅमेरा लावून फोटो/ व्हिडीओ घेता येतो. त्या क्रियेमागे अभ्यास, विचारधारा आणि साधना असेल तरच गुणवत्ता साधली जाऊ शकते. हल्लीच्या मनोरंजन-माहिती स्फोटाच्या काळात डॉक्युमेण्ट्री परिणामकारक व्हायची असेल तर निर्मितीच्या प्रत्येक विषयात गुणवत्ता असायलाच हवी.

साहसाचे किंवा वारशांच्या माहितीपटांची निर्मिती हे मालिका/ चित्रपट निर्मितीपेक्षा संपूर्णपणे वेगळे तंत्र व कला आहे. निसर्गाधीन राहून प्रतिकूल परिस्थितीत चित्रीकरण साहित्य, त्याचे व्यवस्थापन करणारी ‘क्रिएटिव्ह टीम’ आणि साहसी मोहिमेची टीम यामध्ये चांगले मानसिक बंधही असले पाहिजेत. दोन्ही संघांनी एकामेकांना सांभाळत आपापले उद्दिष्ट साध्य केले की माहितीपटाची गुणवत्ता साधता येऊ शकते. सह्याद्रीतील रॉक क्लाइंबिंगच्या साहसी मोहिमांत मला हा अनुभव चांगला आला.

रॉक क्लाइंबिंग, निसर्ग, किल्ले आदी अनेक विषयांवर १५-१६ डॉक्युमेण्ट्रीज् मी तयार केल्या. त्यासाठी घरातच आम्ही गुणवत्तेनुसार विभागणी केली. छायाचित्रण, पटकथा, दिग्दर्शन आणि संकलन माझ्याकडे, मराठी निवेदन पत्नीकडे, इंग्रजी निवेदन तसेच ध्वनिमुद्रणाची जबाबदारी मुलीकडे, प्रकल्प गुणवत्ता तपासणी मुलाकडे अशा जबाबदाऱ्यांचे वाटप केले. या जबाबदाऱ्या सर्वजण व्यवस्थित पार पाडत आहेत, त्यामुळे माहितीपटांचा हा ‘गृहउद्योग’ फुलत राहिला आहे.

हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : दृष्टिकोनातला बदलकार..

२००८ साली यूट्यूबचे माध्यम सुरू झाले. त्यावर या सर्व फिल्म आता पाहण्यास उपलब्ध आहेत. आम्ही केलेल्या निसर्ग आणि साहसविषयक माहितीपटांद्वारे जनजागृतीचे उद्दिष्ट साध्य झाले. करोनाकाळात ‘विंडो बर्डिंग’ हा माहितीपट आम्ही यूट्यूबवर प्रसारित केला. त्याला अजूनही जो प्रतिसाद मिळतोय त्यातून इतक्या वर्षांच्या कष्टांचे सार्थक झाल्यासारखे वाटते.

हेही वाचा…माणुसकीच्या अविरत लढ्याची गोष्ट

निसर्ग छायाचित्रकार, गिर्यारोहक ही एक ओळख. निसर्ग आणि वन्यप्राण्यांविषयीच्या माहितीपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक ही दुसरी. सह्याद्रीतल्या डोंगरांवर छायाचित्र आणि उपयोजित माहितीने भरलेला ‘डोंगरवाटा’ हा ग्रंथ. गृह प्रकल्प म्हणून केलेल्या ‘विंडो बर्डिंग’ या माहितीपटाला अनेक पुरस्कार.

shekhar.rajeshirke@gmail.com

Story img Loader