शेषराव मोहिते
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
किरण गुरव यांच्या कथेत गावातून शहरात शिकण्यासाठी जाणाऱ्या मुलाची आपल्या कुटुंबाकडे आणि आपल्या भणंग अवस्थेकडे तिरकस दृष्टी आहे. मुलाला वसतिगृहात सोडण्यासाठी आलेल्या कुटुंबाचा दिवसभराचा शहर सोहळा एकाच वेळी विनोद आणि करुणेने वाचकाला हादरवून सोडतो आणि वर्तमानाचं सजग भान देतो..
किरण गुरव यांचा ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ हा केवळ तीन दीर्घकथांचा संग्रह. ज्यास २०२१चा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार प्राप्त झाला. या संग्रहातील पहिल्याच ६७ पानांच्या कथेचं शीर्षक आहे ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’. या कथेचा वरवर साधासरळ वाटणारा विषय म्हणजे एका दुर्गम खेडय़ातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील मुलगा चांगल्या टक्केवारीने दहावी पास होतो. त्याचा कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश झालेला आहे. त्या मुलास कॉलेज सुरू होण्याच्या एक दिवस आधीच्या रविवारी त्याचे वडील वसतिगृहावर सोडण्यासाठी येतात. अशी ही एकाच दिवसापुरती घडलेली साधीशी घटना. परंतु जगण्याचा मोठा पट मांडणाऱ्या एखाद्या कालातीत परिणामप्राप्त झालेल्या महान कादंबरीची उंची या कथेने प्राप्त केलेली आहे.
म्हटले तर बाळू हाच या कथेचा ‘केंद्रबिंदू’. प्रथम पुरुषी निवेदनातून तो स्वत:च ही कथा सांगत जातो. लहानपणापासूनच त्याला वाचनाची सवय. कुठल्याही कागदाचा कपटा असू दे, पान असू दे, पुस्तक असू दे, नाहीतर अहवाल असू दे; नाकाला लावून वाचून पूर्ण झाल्याखेरीज तो हातावेगळा करीत नसे. शाळेचं सगळं ग्रंथालयही त्याने कांबळे सरांच्या मध्यस्थीनं वाचून काढलं आहे. झालंच तर गावातील ग्रामपंचायतीचं एकाच कपाटाचं जुनाट बंद पडलेलं ग्रंथालय होतं. त्यातीलही सगळी मोठी मोठी, जुनाट जुनाट पुस्तकं त्याने वाचलेली आहेत. मग ते पिवळे पडलेले बोजड निबंध असू देत. कसर लागलेली थोरा- मोठय़ांची चरित्रं -आत्मचरित्रं असू देत की कथा-कादंबऱ्या असू देत. बाळूची जडण-घडण कशी झालेली आहे हे दर्शविणारे हे उडत उडत आलेले या कथेतील तपशील.
बाळूचे वडील स्वत:च्या वडिलांशी भांडण करून अंगावरील वस्त्रानिशी बायकोला सोबत घेऊन बाहेर पडलेले आहेत. याचं स्वत:च्या वडिलांशी कधी पटलंच नाही. ही म्हटलं तर खेडय़ातील प्रत्येकच शेतकरी, शेतमजूर कुटुंबात घडून येणारी अपरिहार्य घटना. ज्या कुटुंबाकडे वाडवडिलांपासून वंश परंपरेनं प्राप्त झालेला जमीनजुमला आहे आणि वडिलांच्या नावावर बऱ्यापैकी शेतीवाडी आहे, अशा वडिलांची मुलं सहसा वडील बैठकीत बसलेले असतील तर त्यांच्यासमोर बसत नाहीत. एक आब राखून कोपऱ्यात उभी राहतात. कारण वडिलांच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टीचे ते नैसर्गिक वारस असतात. पण ज्या वडिलांकडे स्वत:चेच पोट भरेल एवढीही प्रॉपर्टी नसेल तेव्हा सहसा कुठल्याही मुलाचं आणि त्याच्या वडिलांचं पटत नाही.
या कथेतील बाळूच्या वडिलांनी नंतर पंचकमीटी बसवून घर ताब्यात घेतलं आहे. शेतीची वाटणी घेतली आहे. देवदयेनं त्यांना गावातल्या पतसंस्थेत लिखापढीची नोकरी लागली आहे. म्हणजे हे वडील कामापुरते खेडय़ातील आदल्या पिढीची माणसं जसं थोडं बहुत शिकायची, तेवढं शिकलेले आहेत. शेतीतून तरी काही कुटुंब चालविण्याइतपत आमदनी होत नाही. तेवढी दोन-चार पैशांची का होईना आवक घरात सुरू झालेली आहे.
या कुटुंबातील दुसरी महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे ती म्हणजे बाळूची आई बनाक्का. स्वत: शेतात राबणारी, कोंबडय़ा, म्हैस सांभाळता सांभाळता अटीतटीच्या संसाराचा गाडा ओढायला बाळूच्या वडिलांना जीव तोडून मदत करणारी. नवरा आणि तीन मुलांसाठी अहोरात्र खस्ता खाणारी. पण गावातल्या कुठल्याही सर्वसाधारण घरातील व्यवहार चतुर बाई असावी तशी ती आहे. बाळूच्या भाषेत, प्रसंगी मायाळू, प्रसंगी कष्टाळू, प्रसंगी भांडकुदळ, प्रसंगी आतल्या गाठीची, सर्व प्रसंगी प्रपंचस्वार्थी.
किरण गुरव अतिशय कमीत कमी शब्दात बनाक्काचं जे व्यक्तिचित्र उभं करतात त्याची तुलना केवळ उद्धव शेळके यांच्या ‘धग’मधील शब्दकळेशीच होऊ शकते. या कथेत बाळूच्या दोन धाकटय़ा भावांचेही शब्दचित्र असेच येते. चित्रमय शैलीत. ते वाचताना कधी ओठात अस्फूट हसू उमटते, तर कधी किंचित पापणीची कड ओली होते. घरातील हे पाचही जण बाळूला होस्टेलवर सोडून यायला निघालेले आहेत. दिवस पावसाळय़ाचे आहेत. कथेची सुरुवातच पावसात छत्र्या घेऊन अर्धवट भिजत निघालेल्या यांच्या कबिल्याने होते. तेवढय़ा त्या काय पंधरा-वीस मिनिटांच्या पावसात अर्धवट भिजतानाचा झालेला प्रवास आहे. त्याचे तपशील अफलातून आहेत. यात पराकोटीचे कारुण्य आहे, मन पिवळटून टाकणारा विनोद आहे. विशेषत: बाळूचा लहान भाऊ सल्याच्या निमित्ताने जे प्रसंग उद्भवतात, त्यांचे चित्रण अद्भुत आहे. पावसाची संततधार थांबेपर्यंत कुठं तरी थांबण्याचा विचार करून जेव्हा वडील बाळूला भान देऊन म्हणतात- ‘‘हिथं सगळीच कुठं तरी च्या पिऊ या?’’ तेव्हा ‘‘हां,हां, पिऊया.. पिऊ या.’’ सल्याची जीभ अचानक सळसळते. बाळू म्हणतो ‘‘पिऊ या..’’ तेव्हा चेकाळून सल्या म्हणतो, ‘‘मला भजी बी पायजेत.’’ तर वडीलराव, ‘‘तुला दोन कानाखाली दोन भजी मिळतील..’’ तर तो म्हणतो, ‘‘मग मला शेवपापडी’’ हे संभाषण सुरू असतानाच आई बनाक्काची मात्र सावध पुटपुट. ‘‘पैसे किती हाईत आगुदर बघा..’’
यावर एक प्रशस्त तीन मजली हॉटेल मनानं वरलेले वडील उसळून म्हणतात, ‘‘तू आपली गप मागनं ये. लहान धाकल्यांनी आक्कल पाजळली तर ते दडून जाईल. तू नव्हं..’’ शेवटी त्या हॉटेल सन्मानमध्ये गेल्यावर बाळूची प्रतिक्रिया विषण्ण करणारी. आजूबाजूच्या लोकांच्या कपडय़ांच्या आणि दिसण्याच्या तर सोडाच, त्यांच्या पायातल्या पादत्राणांच्याही लायकीचे आपण अखंड नाही आहोत, असा लज्जित विचार त्याच्या मनात अनवाणीपणे चोरपावलांनी प्रवेश करतो. एकाच स्थळ काळात वावरणाऱ्या शहरी- मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय आणि खेडय़ातील अध:स्तरीय जीवन जगणाऱ्या माणसांच्या जगण्यातील विषण्ण करणारी दरी भेदकपणे येथे अधोरेखित होते. त्या हॉटेलमधील वेटर साध्या चहाच्या ऑर्डरकडे लक्षही देत नाहीत. तेव्हा कंटाळून वडिलांचा निर्णय, ‘‘चला हिथनं भाईर, काय हाटेल हाय का फाटेल हाय हे..’’
तरीही सल्याचं सुरूच आहे- ‘‘ते काय? मला ते पायजे.. मला तिकडलं ते.’’ तेव्हा निवेदक म्हणतो, वडीलरावांनी शेवटी सल्याच्या हाताला धरून तेला बाहेर वडला आणि म्हशीच्या पोटात आडकलेलं रेडकू वडून बाहेर काढावं तसा तेला टेबलाच्या पोटातून वडून बाहेर काढला.
या सर्वांना कोल्हापूरला घेऊन येण्याचा हेतू चालता चालता अचानक थांबून मधल्या संदिपाला सांगतात तो असा, ‘‘संदिपा हे रस्तं सगळं बघून ठेव. दादा काय आता हितंच हाय. तेला सगळी माहिती हुणार. खरं तुलाबी जमलं तर हितंच ठेवायचा हाय पुढं शिकायला. दहावीला चांगलं, दादासारखं मार्क काढलंस तर आणि आवंदा स्कॉलरशिपला पयला नंबरानं पास झालास तर..’’
दहावीला चांगल्या टक्केवारीनं पास झालेल्या आणि आता होस्टेलवर राहायला चाललेल्या बाळूसाठी एखादा चांगला ड्रेस तरी घ्यावा म्हणून वडील जेव्हा बोलून दाखवितात, तेव्हाही सल्याचं ‘‘घिऊया, घिऊया.. मला बी टी शर्ट नि फुलपँट पायजे.’’ आई बनाक्कानं दटावून गप्प बसविण्याचा प्रयत्न केला तरी त्याचं पुन्हा तेच. ‘‘मला नवी कापडं पायजेत मंजे पायजेत.’’ त्यावर वडील, ‘‘सल्या तू मोठा झालास मंजे तुलाबी घिऊया..’’ वडील सांगतात. तरी त्याचं ‘‘नाही, मला आत्ताच पायजे. तिकडनं ते जात्यालं पोरगं बघा..’’
‘‘सल्या तुझ्या ढुंगणावरली हाय तीबी चड्डी काढून घिऊन तुला हिथं कुठं तरी नागडा सोडीन बघ..’’ तेव्हा वडीलरावांची िहसक आणि निर्णायक धमकी येते. तेव्हा ‘‘थांबा , मीच काढून व्हलपटतो ही चड्डी. धा ठिकाणी पाटलीया नि बारा ठिकाणी शिवलीया..’’ असं म्हणत सल्या हुरपानं रस्त्यावरच चड्डी जेव्हा काढायला लागतो. मग आई बनाक्का त्याच्या पाठीत एक दणका देऊन त्याला ताळय़ावर आणते. वर नवऱ्याला ऐकू जाईल असं म्हणते. ‘‘काय चेकाळल्यागत कराय लागलाईसा सगळीच आज? ’’
‘‘पैसे कुठं झाडाला लागल्यात व्हय ते तोडून आणायचं हाईत?’’ असे म्हणत असले तरी वडील बाळूसाठी एक आठशेचा ड्रेस घेतातच. त्यांच्या मानाने तो खूप महागडा आहे, पण वडिलांनी कसलीही खळखळ न करता जेव्हा ते पैसे काढून दुकानदारास दिले, तेव्हा बाळूला प्रश्न पडतो, बाळ संदिपाचं एसटीचं हाफ तिकीट काढून उरलेल्या हाफ तिकिटाचे पैसे वाचविण्यासाठी कंडक्टरशी प्राणपणाने लढणारे वडीलराव ते हेच का काय? पण त्या दुकानाच्या प्रवेशद्वारातून बाहेर आल्यावर मात्र सल्याला थडाथड कानफटात लगावली जाते. वडील पाठीत, इकडं तिकडं बुक्क्या हाणतात. सल्या भयाण केविलवाणा रडायला लागतो. आता मात्र आई बनाक्काला राहावत नाही. ती नवऱ्याला म्हणते, ‘‘काय नवसाचा यो योकच थोरला काढून ठेवलासा नुसता? दोन पोरं आणि त्येंच्या मागे शिकणारी हाईत हे धेनात ठेवा जरा. मग घ्या जावा एकालाच हाजारा हाजाराचे ड्रेस.’’ त्यावर वडीलही ‘‘घिन की सगळय़ास्नीच वेळ आली तर. खरं आधी तेनी बाळूवानी टक्केवारी काढून दाखवावी. ज्येच्या टक्केवारीचा त्यो. ह्यो भाद्दर त्येच्या शिक्षणाला कमी पडणार नाही. तशीच वेळ आली तर हमाली करीन हिथंच कुठं तरी. काय समजलीस?’’
सल्याचा वडिलांवरचा राग अजून गेला नाही. वाटेत एका ठिकाणी थांबून वडील म्हणतात ‘‘सल्या तुला झालंय काय तुमायला? तिथं लाईन लागलीय बघ.’’. त्यावर सल्या, ‘‘तिथं लायनीत उभा ऱ्हाऊन मुतण्यापेक्षा हिथं चड्डीत मुतल्यालं काय वाईट?’’
या कथेत हॉस्टेलच्या गेटवरील वॉचमन, शिपाई साखरे, रेक्टर मूर्ती या सर्वांची व्यक्तिमत्त्वं अत्यंत जीवंतपणे आलेली आहेत. बाळूला वसतिगृहावर सोडून जेव्हा हे चौघे परत जाण्यासाठी त्याच दिवशी निघतात तेव्हा ‘जाऊ काय दादा?’ म्हणून बाळ संदिपा जेव्हा एकदम प्रौढपणानं परवानगी मागतो तेव्हा तर सल्या कॉटवरनं धाडकन् बाळूच्या अंगावर उडीच मारतो. निघताना आई बनाक्का म्हणते, ‘‘उद्यापासनं कोणी न्हाई बघ आमी हिथं. कसा आभेस करायचा, कसं ऱ्हायचं तुझं तू बघ. मोठा झालाईस आता. चांगलं ऱ्हायचं. चांगला आभेस करायचा. अशीच टक्केवारी पुढं ऱ्हायाय पाहिजे. तुझ्याकडं बघीत वाट तुडविणारं मागं दोन भाऊ हाईत, हे कायम धेनात ठेवायचं. तू चांगला मार्ग तेस्नी दावायचास. गावात आपल्या बघतोस न्हवं लेका, मोठं मोठं झ्यागिरदार, व्यापारी हाईत, मस्त जमीनदार, सावकार हाईत तेनी ते पोरं कुठं पुढं शिकाय घातली नाहीत. ती पोरं बी तसलीच असतील ते सोड. खरं तुझ्या बानं छातीला हात लावून हे धाडस केलंय. ते तू कडंला न्यायला पायजेस भाद्दरा.’’ आणि शेवटी निघताना ती तिचं भरतवाक्य उच्चारते, ‘‘बाळा शात आपल्या वाटणीचं जशानं तसं. तुमा तिघातल्या एकाचं बी पॉट त्यावर सरळ पुढं भरणार न्हाई. हिथनं मागलं दिवस कसं बी निघालं. खरं तुमाला पुढं शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग न्हाई..’’
किरण गुरव यांची ‘जुगाड’ ही कादंबरी असो की ‘सुधा शांतीभवन’ या कथासंग्रहातील कथा किंवा अन्य काही कथा असोत. अलंकारिकतेचा सोस न धरता आणि भाषिक चमत्कृतीत न अडकता वरवर सहज साध्या भाषेत वाटावं असं त्यांचं लिहिणं. पण आजच्या वर्तमान वास्तव्याचं अत्यंत सजग भान असणारं हे लेखन आहे. सामान्य कष्टकरी माणसांच्या जगण्याचे प्रामाणिक आणि नितळ दर्शन घडविणारे प्रसंग गुरव यांनी जसे या कथेत मांडलेले आहेत, तसेच ‘इंदुलकर: चरित्र, काळ आणि निर्मिती यांची अन्वेषण कथा’ व ‘बाजार दि मार्के’ या कथांतूनही मांडलेले आहेत. पण जगण्यासाठी बळ देणारी सकारात्मकता बाळूच्या अवस्थांतराची डायरीमधून कितीतरी पटींनी अधिक आढळून येते.
ग्रामीण कादंबरीकार आणि शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते ही ओळख. ऐंशीच्या दशकात जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनीचे संयोजक म्हणून जबाबदारी. पीकशास्त्राचे अध्यापक. ‘बरा हाय घरचा गोठा’, ‘धूळपेरणी’,‘असं जगणं तोलाचं’ आदी कथनात्मक साहित्य आणि ‘पंधरा ऑगस्ट कवा हाय’ ही कविता लोकप्रिय.
smmohite16@gmail.com