शिवाजीमहाराजांची दोनशेहून थोडी अधिक पत्रे आजवर उजेडात आली आहेत. त्यांपैकी जुन्यातले जुने पत्र पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळातील अभ्यासक अजित पटवर्धन आणि डॉ. अनुराधा कुलकर्णी यांना अलीकडेच पुन्हा सापडले. प्रसारमाध्यमांतून त्याला भरपूर प्रसिद्धीही मिळाली. ‘पत्र पुन्हा सापडले’ असे म्हणण्याचे कारण असे की, हे पत्र- म्हणजे त्याचा मजकूर ‘मराठी दफ्तर’ या पुस्तकाच्या तिसऱ्या भागात १९२८ मध्येच छापला होता. तिथे तो मूळ पत्राच्या एका प्रतीवरून घेतला होता. त्याच्या पुढील वर्षी भारत इतिहास संशोधक मंडळातील एक संशोधक स. ग. जोशी यांना त्या पत्राची शिक्कामोर्तब असलेली मूळ अस्सल प्रतच मिळाली. तिच्यावरून त्या पत्रातील मजकूर ‘शिवचरित्र-साहित्य खंड २’ या पुस्तकात पुन्हा छापण्यात आला. त्या अस्सल पत्राचे छायाचित्र मात्र कुठे छापलेले नव्हते आणि पत्राचा ठावठिकाणाही दीर्घकाळ कोणाला माहीत नव्हता. पत्राची तारीख तेव्हा रूढ असलेल्या कालगणनेनुसार ‘२० जिल्हेज, शुहूर सन १०४६’ अशी आहे. ती २८ जानेवारी १६४६ या तारखेशी जुळते. म्हणजे हे पत्र लिहिले तेव्हा शिवाजीमहाराजांच्या वयाची १६ वर्षे पूर्ण व्हायला २१ दिवसांचा अवधी होता.
शिवाजीमहाराजांची म्हणून लिहिलेली या तारखेपूर्वीची चार पत्रे आजवर उजेडात आली आहेत. त्यांपैकी पहिली तीन अनुक्रमे १६३२, १६३८ आणि १६४५ या वर्षांतली असून ती बनावट आहेत. मालमत्तेवरील हक्क शाबित करण्याकरिता अशी बनावट पत्रे केली जात. या पत्रांपैकी पहिली दोन तर कोणाही शिवचरित्रकाराने विचारातसुद्धा घेतलेली नाहीत, इतका त्यांचा बनावटपणा उघड आहे. तिसरे पत्र १६४५ चे म्हणून तयार केलेले बनावट पत्र असले तरी काही इतिहासकारांनी ते खरे मानले आहे. पण त्या पत्रावर शिक्कामोर्तब नाहीत. चौथे पत्र प्रथम प्रकाशित झाले तेव्हा त्याच्या तारखेतील सन वाचण्यात मुळातल्या खाडाखोडीमुळे चूक झाली होती. त्यामुळे काही काळ ते पत्र २४ सप्टेंबर १६३९ चे मानले गेले होते. पण त्याची वास्तविक तारीख ७ जून १६४९ अशी असल्याचे दाखवून देण्यात आले, त्यालाही आता ८० वर्षे उलटून गेली आहेत. ते पत्र सातारा जिल्ह्य़ातील औंध येथील श्रीभवानी संग्रहालयात आहे. सारांश- अलीकडे जे पत्र पुन्हा सापडले ते शिवाजीमहाराजांच्या आजवर सापडलेल्या पत्रांपैकी सर्वात जुने पत्र आहे. किंवा निदान, जरी १६४५ चे म्हणून केलेले बनावट पत्र खरे मानले तरी, त्यांचा शिक्कामोर्तब असलेले सर्वात जुने पत्र आहे यात काही संशय नाही.
खेडेबारे तरफेतील- म्हणजे सध्याच्या परिभाषेत तालुक्यातील, रांझे या गावच्या पाटलाने ‘बदअमल’ केला म्हणून त्याचे हात-पाय तोडून महाराजांनी त्याला पाटीलकीवरून काढून टाकले आणि ती पाटीलकी त्याच्याच गोतातील सोनजी बजाजी याला दिली. सोनजीला ‘पाटील’ म्हणून नेमल्याचे २८ जानेवारी १६४६ या तारखेचे जे पत्र महाराजांनी खेडेबारे तरफेच्या सरकारी अधिकाऱ्यांना व देशमुखांना पाठविले, ते हे पत्र. त्यात ही सर्व हकीकत नमूद केली आहे. अर्थात त्याला शिक्षा करण्यापूर्वी त्याला पकडून आणवून त्याच्या गुन्ह्य़ाची महाराजांनी चौकशी केली होती आणि त्याने गुन्हा केल्याचे सिद्ध झाले होते, हेही त्या पत्रात सांगितले आहे. सध्याच्या पुणे-सातारा रस्त्यावर कात्रज घाट ओलांडल्यापासून ते शिरवळच्या अलीकडे नीरा नदीवर जो पूल आहे, तिथपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लागणारी गावे खेडेबारे तरफेत मोडत असत. खेड शिवापूरमधील खेड हे त्या तरफेचे मुख्य ठिकाण होते. तिथून जवळच पश्चिमेला रांझे हे गाव आहे.
रांझ्याच्या पाटलाचा हा प्रसंग शिवचरित्रात प्रसिद्ध आहे. कथा-कादंबऱ्यांमध्ये आणि चित्रपटांमध्ये तो रंगविताना रांझ्याचा पाटील महाराजांशी उर्मटपणे वागला असे दाखविले जाते. तो निव्वळ कल्पनाविलास आहे. महाराजांचे स्थान तेव्हाही एवढे वरचे होते, की पाटील-कुलकर्णी तर सोडाच; कोणा देशमुख- देशपांडय़ांचीही महाराजांशी उर्मटपणे वागण्याची हिंमत झाली नसती.
हे पत्र तीन कारणांकरिता महत्त्वाचे आहे : त्याची तारीख, त्यावरील शिक्कामोर्तब आणि त्यात आलेली हकीकत. महाराज त्यांना १७ वे वर्ष लागण्यापूर्वीच कारभार पाहू लागले होते, असे या पत्राच्या तारखेवरून दिसते. त्यांचे पुढील काळातील चरित्र विचारात घेतले तर पत्रातील निर्णय त्यांच्या वतीने दुसऱ्या कोणी घेतलेला नसून त्यांनी स्वत:च घेतलेला होता असे मानण्यास हरकत नाही. पत्र त्यांचे आहे याचा अर्थ ते त्यांनी स्वत:च्या हाताने लिहिले आहे असा नाही. त्याकाळीही मातब्बर व्यक्ती आपली पत्रे स्वत:च्या हाताने लिहीत नसत; त्यांच्या सांगण्यावरून त्यांचे लेखनिक ती लिहून घेत. पत्रावरील शिक्कामोर्तब हे त्याचे दुसरे वैशिष्टय़. शिक्का सामान्यत: पत्राच्या डोक्यावर उमटवीत आणि मोर्तब नेहमीच पत्राच्या शेवटी उमटवीत. त्याकाळी सर्व मातब्बर व्यक्तींच्या मुद्रा फार्सी भाषेत असत. शहाजीराजे आणि जिजाबाई यांचे शिक्कामोर्तब फार्सीत आहेत. शिवाजीमहाराजांचे शिक्कामोर्तब मात्र संस्कृतमध्ये होते. या पत्रावरील शिक्कामोर्तब शाई जास्त लागल्यामुळे पूर्णपणे वाचता येत नाहीत. शिक्कामोर्तब तेव्हा धातूचे असत आणि शाई कमी-जास्त लागणे, ठसा उमटविताना दाब कमी-जास्त दिला जाणे, इत्यादी कारणांमुळे त्यांच्या ठशांच्या स्पष्टपणात फरक पडत असे. म्हणूनच एखाद्या शिक्क्य़ातील सर्व मजकूर उलगडण्याकरिता त्याचे अनेक ठसे पाहावे लागतात. महाराजांच्या या पहिल्याच पत्रावरील शिक्कामोर्तबामधील एखाद् दुसरेच अक्षर वाचता येते. त्यांचा बहुतेक भाग काळाच उमटला आहे. पण शिक्कामोर्तबांचे आकारमान आणि जी एक-दोन अक्षरे वाचता येतात, त्यांचे शिक्क्य़ातीत स्थान यावरून हे शिक्कामोर्तब म्हणजे महाराजांचे संस्कृतमध्ये असलेले प्रसिद्ध शिक्कामोर्तबच आहेत, याविषयी काही शंका वाटत नाही. या पत्रानंतर पुढे बऱ्याच वर्षांनी महाराजांनी मराठीत शिरलेल्या फार्सी शब्दांना संस्कृत प्रतिशब्द देण्याकरिता ‘राजव्यवहारकोश’ करवून घेतला. त्यांच्या त्या धोरणाचा उगम या पत्रापासूनच आपल्याला पाहावयास मिळतो.
या पत्राचे तिसरे वैशिष्टय़ आहे, त्यात आलेली हकिकत. महाराजांचे स्त्रियांविषयीचे धोरण त्यातून दिसून येते. रांझ्याच्या पाटलाने बदअमल केला म्हणून महाराजांनी त्याला कठोर शिक्षा केली. शब्दश: पाहिले तर ‘बदअमल’ याचा अर्थ होतो वाईट कृत्य. पण व्यवहारात शब्दांना त्यांच्या शब्दश: अर्थापेक्षा अधिक किंवा वेगळा अर्थ प्राप्त झालेला असतो. जुन्या कागदपत्रांमधील वापरावरून पाहिले तर ‘बदअमल’ शब्दाचा अर्थ ‘व्यभिचार’ असा होतो. निदान तो त्या शब्दाचा एक अर्थ आहे. व्यभिचार हा गुन्हा बलात्काराच्या मानाने कमी गंभीर आहे हे खरे; पण सध्याच्या कायद्यातही तो काही मर्यादेत गुन्हाच मानला गेला आहे. आपल्या राज्यात व्यभिचारालाही इतकी कडक शिक्षा करणाऱ्या महाराजांनी बलात्काराला त्याहूनही कडक शिक्षा केली असती यात संशय नाही.
या पत्रात ज्या प्रकारचा प्रसंग महाराजांसमोर आला, तसे आणखीही काही प्रसंग पुढे त्यांच्या आयुष्यात आले. महाराज कर्नाटक स्वारीहून परत येत असताना (१६७७) बेलवडी येथील देसाईणीने त्यांच्या पुरवठय़ाच्या सामानाचे बैल लुटले. म्हणून त्यांनी तिथल्या गढीला वेढा घातला. त्यांना शौर्याने प्रतिकार करून शेवटी ती शरण आली. या प्रसंगाचा उल्लेख एका तत्कालीन इंग्रजी पत्रात आहे, जेधे शकावलीत आहे आणि उत्तरकालीन बखरींमध्येही आहे. यासंदर्भात ‘‘शकूजी (सखूजी, सखोजी) याची परद्वारावर नजर याजकरिता त्याचे डोळे काढिले..’’ असा उल्लेख ९१ कलमी बखरीच्या एका प्रतीत आहे. (तिथे त्याचे आडनावही दिले आहे.) परद्वारावर म्हणजे परस्त्रीवर. सखोजीने देसाईणीशी किंवा तिथल्या कोणा स्त्रीशी गैरवर्तन केले आणि म्हणून महाराजांनी त्याचे डोळे काढले, असा या उल्लेखाचा अर्थ आहे. उल्लेख बखरीतला असला तरी त्यात तथ्य असावे. कारण कर्नाटक स्वारीत महाराजांच्या सैन्यात हा सखोजी होता, असा उल्लेख १७१९ मध्ये लिहिलेल्या खटाव परगण्याच्या एका हकिकतीतही आहे.
या शूर स्त्रीशी स्वत: महाराजांचे वर्तन स्त्रीदाक्षिण्याचेच होते. त्यामुळेच त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तिने तिच्या ताब्यातील गावामध्ये महाराजांच्या स्मृतिशिला उभारल्या, अशी माहिती श्री सिद्धांती शिवबसवस्वामी यांनी लिहिलेल्या ‘तुरकारि पंचमर इतिहासवु’ या कानडी पुस्तकात दिली आहे. अशी एक स्मृतिशिला धारवाडजवळील यादवाड नावाच्या खेडय़ात १९५५ मध्ये ग. ह. खऱ्यांनी पाहिली होती. दाढी असलेल्या एका पुरुषाच्या मांडीवर एक लहान मूल असून, हातात (दुधाचा) पेला आहे, असे एक दृश्य त्या शिल्पात होते. बहुधा ती स्मृतिशिला अद्यापही तिथे असेल.
जावळीतील दादाजी यशवंतराव याचेही डोळे महाराजांनी काढले होते. त्या प्रसंगामुळे घाबरून अनेक देशमुख गायब झाले होते असे दिसते. अशा निदान तीन देशमुखांना महाराजांनी पाठविलेले कौलनामे- म्हणजे अभयपत्रे उपलब्ध आहेत. त्यापैकी गुंजण मावळच्या देशमुखाला १६७१ मध्ये पाठविलेल्या कौलनाम्यात ‘‘दादाजी यशवंतराऊ सिवतरकर याणे कितीयेक बेसंगपणाची वर्तणूक केली, याबद्दल साहेबी (म्हणजे महाराजांनी) त्यावरी निकट करून डोले काढून गडावरी अदबखाना (तुरुंगात) घातले,’’ असा उल्लेख आहे. बेसंगपणा म्हणजे निर्लज्जपणा, बेशरमपणा. हा निर्लज्जपणा स्त्रीविषयक असावा असे शिक्षेच्या कठोरपणावरून वाटते.
महाराजांच्या एका अधिकाऱ्याने कल्याणच्या आदिलशाही सुभेदाराची सून पकडून महाराजांसमोर आणली असता महाराजांनी तिला सन्मानाने तिच्या सासऱ्याकडे पाठवून दिले, अशी हकिकत चिटणीस बखरीत आहे. वाईजवळील गोळेवाडी येथील एका बंडखोराच्या सुनेसंबंधीही अशाच स्वरूपाची हकीकत शेडगावकर बखरीत आहे. बखरीमधील या गोष्टी तपशिलाच्या दृष्टीने विश्वसनीय मानून चालता येत नाहीत. पण एखाद्या व्यक्तीविषयीच्या अशा आख्यायिकादेखील सामान्यत: तिच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशाच असतात.
‘हाती सापडलेल्या शत्रूच्या बायका-मुलांनाही शिवाजी सन्मानाने वागवीत असे, याबाबतीत त्याचे हुकूम कडक असत आणि ते न पाळणाऱ्यांना शिक्षा केली जाई,’ असे एरवी शिवाजीमहाराजांना दूषणे देणारा खाफीखानही म्हणतो. मग रामदासांनी महाराजांना ‘पुण्यवंत’ आणि ‘नीतिवंत’ अशी विशेषणे लावावीत, यात काय आश्चर्य?
शिवाजीराजांचे पहिले सामाजिक पत्र
शिवाजीमहाराजांची दोनशेहून थोडी अधिक पत्रे आजवर उजेडात आली आहेत. त्यांपैकी जुन्यातले जुने पत्र पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळातील अभ्यासक अजित पटवर्धन आणि डॉ. अनुराधा कुलकर्णी यांना अलीकडेच पुन्हा सापडले. प्रसारमाध्यमांतून त्याला भरपूर प्रसिद्धीही मिळाली. 'पत्र पुन्हा सापडले' असे म्हणण्याचे कारण …

First published on: 23-12-2012 at 12:11 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivaji maharajs first social letter