आण्णाच्या पोराला काही करून चमकायचं व्हतं.. म्हणूनच त्यानं घोटून दाढी करून घेतली. तसं गावात सध्या लई कामं उरले न्हाई म्हणून सगळेच झळकायसाठी धडपडतेत. तेवढी मनाची भूक तरी भागली पायजी म्हणून सगळे बेजार. आपला देस निव्वळ कुणबिकीवर आसल्यामुळं आपल्या देशात न्हाई पण भाईरच्या देशात मानसाचं पोट दिवसातून तीनतीनदा भरवायची ऐपत हाई. पण मन म्हणतान त जगाच्या पाठीवर आपल्याच काय कोणत्याच देशात भरायचं साधन न्हाई. मनाची सगळ्यात मोठी भूक हे ती झळकायची. आता झळकायला कोन्हाला न्हाई आवडत? बरं करतुतवावर झळकायला तेव काय मतदानाचा अधिकार हे का सगळ्याय जवळ असायला. बरं आसलं बी तरी ते दाखवायला संधी मिळत न्हाई. मिळाली तरी ती पाहायला रिकामपण कोन्हाला हाई ह्य़ा टीव्हीच्या काळात. हां, पहिलं जे काय होतं ते नशिबाच्या हातात. झळकन्यासगट. पण आता विज्ञानयुगात नशिबाला किरडेट कसं देता येईन. झळकायचं चॅनेलच्या हातात. टीव्हीवाल्याच्या मनात आलं की खड्डय़ात पडल्याला माणूसबी रात्यात जगाच्या कान्याकोपऱ्यात झळकीतेत. टायफडच्या तापासारखा दोन-दोन दिवस उतरत नाही. ज्याच्यावर बारी येईन तेव चर्चेच्या शिखराहून. वाटतं जगात फक्त एवढाच माणूस हे.. पण हे सगळ्यायच्याच नशिबी नसतं, अन् टीव्हीचा आकार पाह्य़लात सगळ्या लोकायला समावून घ्यायला आभाळायेवढा स्क्रीन का काय ते नाही ना टीव्हीचा. त्याच्यामुळं जमन त्या वाटानं सगळेच झळकायसाठी धडपडतेत. आता त्याच्यात बी येगयेगल्या पातळ्याहेत म्हणा. खालची, वरची. तसं टीव्हीवाले जास्तीत जास्त खालच्याच पातळीवर काम करतेत (खालच्या मंजी तळागाळातल्या) मंजी बघा खालची पातळी मंजी गल्ली अन् वरली मंजी दिल्ली. (दिल्लीत बी गल्ली आसतीच) खालून जोर लावल्याबगर वर जाता येत न्हाई. खाली चमकलं की वर घेतेत अन् वर चमकायलं की खाली घालतेत. खरं तं तेव निसर्गाचा नेम हे. मातीसुद्धा दरवर्सा खालीवर नाही केली त पिकत न्हाई. आता दिल्लीचंच बघा ना. कायम तेवच थर वर हेत नापीक निजूर झालाय का नाही सगळं. चला वरच्या गोष्टी करून उठाचा मुका कशाला घ्यायचा? आपून आपल्या पायरीनच बोलावं. चर्चा करावं. तर झळकायचं.. आण्णाच्या पोरासगट सगळ्या गावाला काही करून चमकायचं. आपलं नाव झळकलं पाह्य़जी म्हणून सगळेच जन हात-पाय धून-पुसून माघं लागलेत. आगदी आपलं नाव सात-बारावर राह्य़लं नाही तरी घोर न्हाई. सात-बारा कोण पहातय हो? तेव थोडाच सार्वजनिक भितीवर चिटकिल्याला आसतू? सार्वजनिक भितीवर चिटकिल्यालं असतं जत्राचं, जयंत्याचं, सप्त्याचं पोस्टर. त्याच्यावर नावं आलं पाह्य़जी म्हणून खटपट. पहिलं लई उलटं होतं. बापाचं नाव राखण्यासाठी आपल्याला चांगलं वागावं लागायचं. आपल्या वागण्यावर बापाचं नाव व्हायचं. तव्हा आडनावाच्या जागी बापाचंच नाव आसायचं. माईचं असायचं पांडव, राधेय, नंदलाल स्वत:ची वळखच नसायची, पन आपून आडनावं लावून माय-बापापसून सुटका करून घेतली. आता पुरं किरडेट आपल्याला. इषय झळकन्याचा. तसं म्हणलं त आम्हाला गाववाल्याला झळकायला जागाच न्हाई. मंजी दहा-बाय इसचा नाही बर का.. वाव नाही.. एक त हागनदारीमुक्त गाव, त त्याच्यात बी टाकायइतकं पाणी नाही. दुसरं यसनमुक्ती. त लोक म्हणतेत करमनूक म्हणून खातोत. आपल्या इथं गरज म्हणून खानारापेक्षा करमनूक म्हणून खानारेच पोटभर खातेत. लईतं लई करमनुकीवर कर लावता येईन, बंद कशी करता येईन.
 बरं शेतीत नवे परयोग करायला घरातलं कोन्ही ना राजकारणात हे ना दुबईला. चमकायला लागणाऱ्या अंगमेहनतीची लई तयारी हे पण कुस्तीत दोघच जण आसतेत. किरकेटमधी आकरा. पंतपरधान त एकच जण, पण सगळ्या जागा बुक. अन् गावात मानसं काय थोडे हेत का? आहो ग्रामपंचायतच्या एक्या जाग्यासाठी पंचीसजन उभा राहातेत. सगळ्यायनं ठरीलं जीवनात एकदा का व्हायना झळकायचंच. अन् तशी संधी बी मिळून देली. सरकार नं नाही बरं का. (आपलं सगळं सरकारनंच करावं असंच वाटतं.) लोकायनंच. म्हणून तं आण्णाचं पोरगं चकाट दाढी करून आलतं. झळकायसाठीच. तेबी डिजिटल बोर्डावर झळकायचं व्हतं. लग्नाच्या बादमधी पहिल्यांदाच. आवघ्या शंभर रुपयांत चार चौकात झळकायला मिळणार व्हतं. खर तं पक्षाच्या बॅनरवर झळकल्यावर तं पैसाबी लागत नाही. पण हे आपलं खासगी शुभेच्छाचं बॅनर व्हतं. मित्र मंडळाच्या पक्षाच्या बॅनरवर तं फोटू बी फुकटचं काढतेत इलेक्शन कार्डासारखे. अन् जागा बी (बॅनरवरची) एकदम पायापशी. मोबाइल घेऊन हात कानाला अन् एक हात वर. तंगडी करून हाका मारणाऱ्या युवा नेत्याच्या पायाजवळ. फुलाची माळ ववावं अस्या हारमाळीत आसतू आपला फोटू अभिनंदन करतानी. आहो कौतिक तं किती. तीन-तीनदा येऊन पहावा आपला आपूनच. .लख्ख उन्हात काळवंडून गेल्याला चेहरा. न्याहाळू न्याहाळू पाहावा वाटतू. अंधूकअसतू ना. आण्णाच्या पोरानं तं येगयेगळ्या निमतानं येगयेगळे फोटू काढून घेतले. जत्रा, दिवाळी, ईद, ख्रिसमस, वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी, आदरांजली, श्रद्धांजली, सगळ्या नमुन्याच्या बॅनरवर सुट होत्यान अस्या येगयेगळ्या भावना. तसा तेव भावनाशून्य.. पण आता नसल्याल्या भावना टिपनारा कॅमीरा निघाल्यामुळं आगदी मेल्याल्या मानसाच्या बी चेहऱ्यावर हासू दाखीनारा गावाकडं लई फेमस झालाय. दु:ख हासतमुखानं स्वीकारनारा माणूस फक्त कॅमीऱ्यामुळंच गावाकडं पाहायला मिळायलाय. आण्णाच्या पोरानं त्याच कॅमीऱ्यातून फोटू काढून घेतलाय. पोरीला पाहायला आल्याल्या पाव्हण्याला देतोत तसा. सगळ्याच पक्ष संघटनाला द्यायला, कोन्हालाच राग नकू. पहिले पक्ष ठरावीक होते. आता पक्ष वाढले तसी फोटूची डिमांड वाढली. जसं फोटू काढायला बंधन न्हाई तसंच कितीबी पक्षांच्या डिजिटलवर फोटू असले तरी कोणतीच चौकशी व्हत नाही. अन् पक्षाचे लोक बी फोटू घेतानी, याच्या आधी कोन्हाला देला? आसं इचारीत नाहीत. फक्त त्याह्य़च्या फोटूतला चष्मा, शर्ट कशा रंगाचा व्हता एवढच इचारतेत . खरं हे ना त्याह्य़चं. आहो शर्ट/चष्मे लागतेन तेवढे बजारात मिळतेन. मानसं कुठून आनायचे. मानसं इकत घ्यायची सोय न्हाई. अन् पुन्हा मानसाच्या वाढीवर कुटुंब नियोजनानं आळा बसला. पक्षाला तसं बंधन न्हाई. बरं पक्ष जन्माला घालतानी पहिल्यासारख्या परसुती येदना सोसायचं काम नाही. आतल्या आत गुदमरून भाईर पडलं कीच नवा पक्ष.. अंडय़ातून पिलू भाईर पडल्यागत. अंडय़ाच्या कळा कोंबडीला. टरफलाला काय वेदना पिलू भाईर पडल्याच्या? जव्हरुक इचाराच्या पोटी पक्ष जन्मायचे तव्हा मानसं इकत घ्यायचं कामं नव्हतं. पण आता मतभेदातुन जन्माला यायलेत तव्हापसून बजार सुरू झाला. अन् बजार म्हणलं की दुकान आलं अन् मंग आण्णाच्या पोऱ्हायसारखे आपसुदीक गिऱ्हाईक बनिले. आधी सोईस्कर धंदे बंद पाडले. धंदे बंद करून हात रिकामे केले अन् कामाला लावले. टाळ्या वाजवायला, जय म्हणायला अन् दगड उचलायला अन् नेत्याच्या हाळीवर कूँक यूऽऽऽ म्हणलं की वळायला अन् हटोऽऽ हठोऽऽ म्हणलं की पळायला. पदयात्रेत, मोर्चात तेव सगळ्यात पुढं लाठी खायला. त्याच्या तोंडात भावना भडकीन्याचं बळ जरी नसलं तरी गोळी झेलन्याची ताकद नक्कीच होती. मंग हुतात्मा होऊन झळकतु चौकातल्या बोर्डावर अन् बायकूच्या पुसल्याल्या कपाळावर. माईच्या डोळ्यात. त्यानं फोटू काढल्याला कामी येतू कालच्या मोच्र्याची बातमी बनन्यासाठी. मोठ्ठा बोर्ड लागतु ‘अभिनंदन, अभिनंदन .’ कालच्या दंगलीत जामीन मिळाल्याबद्दल. उद्या तेव सत्तेत आला तर ह्य़ोच फोटू बोर्डावर झळकन अभिनंदन. अभिनंदन मोर्चात उसळलेल्या दंगलीतून निर्दोष मुक्तता झाल्याबद्दल.. अमुक घोटाळ्यात अटकपूर्व जामीन मिळाल्याबद्दल. नक्की झळकणार..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा