आपून जेव्हढं झाकून ठुतो नं तेवढंच लोकं वाकून बघतेत. अन् समजा तरी बी न्हाई दिसलं, तं मंग मनानंच चित्त रंगीतेन. रंगून सांगन्याच्या बाबतीत मानसाचा हात कोणीच धरूनी. एखांदी गोष्ट इतकी रंगून सांगतेन्, की सातीरंग कमी पडून समूरच्याचं जीवन बेरंग होतं तसा -तसा आम्हाला आनंद मिळतू. आता एखांद्याला आम्हाला क्रूर रंगवायचं आसन् तं येगयेगळे प्रयोग करतात. आता राक्षिसाचंच उदाहरण घ्या ना! निस्त्या सभावानं, वागन्यानं त्याची क्रूरता आम्हाला (पाहिजी) तसी रंगीता येईना. ती सेम मानसासारखीच दिसू लागली. तं मंग आम्ही त्याला शिंग लावून जिब भाईर काढून पुरी केली. त्याच्यामुळं वर्तमान जरी नाही, तरी दिसन्यातला फरक दाखिता आला. अन तेबी जमलं कशानं? तं कुणीच राक्षीस पाह्य़ल्याला नसल्यानं. आता आता उघडं पडायलंय, की आपून ज्याह्य़ला राक्षीस म्हणतोत ते जणू रक्षक होते! भूमीचे! अन् त्याह्य़नं लुटारूला इरोध केला. पण जव्हा भूमी लुटणाऱ्यायच्या ताब्यात गेली तव्हा त्या रक्षकायला लोकायच्या नजरांत राक्षीस ठरील, पण हे आता खरं का खोटं? तं आपून लोकशाहीतले मानसं. आपल्या इथं न्हाई का मीडिया न्हाई तं इरुधी पक्षाच्या लोकायचे निस्ते कपडे फाडून समाधान होत न्हाई; तं कपडय़ाबरुबर लोकायच्या नजरांतून उतरीन्यापस्तोर जातेन. आसंच समाजातल्या कलावंत ठेकेदारांनी रंगवून बेरंग झाल्यालं चित्र पाहायला मिळालं. त्याचं झालं असं..
मला एक जणानं सांगितलं की, तुला दलालाचं काम करायचंय.त्या कामाची दलाली न्हाई, पण मानधन मिळणार व्हतंच. कामाची जागा व्हती ती मंजी शेरबजार, मंत्रालय नाही; तं वेश्यावस्ती! कामाची जागा तशी बिनवळखीचीच. कारण आमच्या गावायनं कव्हाच तशी वस्ती पाहायला मिळणार न्हाई. तसं आमच्या इथं या वेश्या व्यवसायाला धंदा बी म्हणतेत, पण आमच्या कृषी संस्कृतीनं माय-मावश्यांवर दुकान उघडून बसायची येळ आनली न्हाई. आमच्या इथं समदं मानवी गरज म्हणून येतेन; धंदा म्हणून न्हाई. त्याच्यामुळं असं सकाळपसूनच दुकान उघडून, उदबत्ती लावून गिऱ्हाईकाची वाट बघत कोन्हीच बसत न्हाई. उलट, मानसं धंदा करतेत. मंजी गावागणीस चार-दोन जमायला भाईरचा नाद आसतू. त्याह्य़चं सरचित्त त्याच्यातच असतं. तव्हा सगळे लोकं त्याह्य़ला म्हणतेत- त्याह्य़ला तेवढाच धंदा हे! तं अस्या बिन वळखीच्या कामासाठी मला मुंबईला जायचं व्हतं. कुठल्या तरी पुरात, (जसं नगर तसं पूर!) आपल्या इकडं जरी नसली तरी मुंबईत दलालाला पत हे. तशी आगुदर तिथं बी नव्हती, पण शेरबजारानं त्या नावाला मार्केटमधी आनलं. पुन्हा त्याच्यात शहरीकरणानं तं तुराच खोसला. पद्मश्री- पद्मभूषनच्या मांडीला मांडी देऊन बसिलं. त्याच्यामुळं मला दलाल म्हणून उजळ माथ्यानं मिरवायला लाज वाटायचं काम नव्हतं. पण तरीबी काम सुरू झालं तेव्हा मी नजर चोरीत चाललो व्हतो. कॅमिऱ्याची अन् लाली अन् तोंडाला बटबटीत भासलेल्या पावडरवाल्यांची! शेंदूर लावून झालेल्या दगडागत आपली आपूनच दुसऱ्याला देवपणाची जान करून देणाऱ्या दगडागत, उभ्या! तसं त्याह्य़ला असं तोंड रंगवून येगळेपण मिरवायचं नसावं, तर सभ्यपणा पांघरुण फिरणाऱ्या जगाला फटकन् वळखू यावा अन् भेद न कळाल्यानं पाप घडलं याचं खापर फुटूनी. पहानारायला सगळ्यायलाच एका नजरानं पाहायची सवं लागूनी म्हणून! मी चाललेल्या रस्त्याच्या कडीनं त्या उभ्या व्हत्या. चलतानी चावट मन संस्कृतीचं टरफल फाडून कोंबासारखं डोकावत व्हतं. पण मी त्या मनाला मारून खुडीत व्हतो. रस्त्यावरच्या खड्डय़ानं मला लागल्याली नाकासमूर पाहून चलायची सवय इथं मोडली. ती पुढं त्याच रस्त्याच्या कडीला हातात बीअरची बाटली घेऊन चार मानसाच्या घोळक्यापुढं दांगडू घालनाऱ्या त्या काळ्या जांभुळ रंगाची ठसठशीत पण कुणी तरी माथी मारल्यालं कुंखू, दोटांगी काष्टा घातलेली नारी. तोंडात पान अन् चाळीशीनं उतरलेला रंग. दोन-तीन जनाला गचुरीला धरून फिरवलं. तिच्याकडं कोन्ही पाह्य़ल तं चवताळून अंगावर जायची अन् मधातच खुद्कन हसून गांभीर्यावर पाणी फिरवायची. आतापस्तोर मानसंच काय, पण पोलीस, पुढारी, एवढंच काय, पुजाऱ्यानं पेऊन घातलेल्या दांगडून बसला न्हाई एवढा धक्का इथं बसला. आपल्या अंगावर बालंट नगं म्हणून उचलता पाय घेतला तेव भेट ‘पुरा’तल्या गल्लीत. गल्ली नंबर आमुक-आमुक. आपल्या देशात जातीवरून, धंद्यावरून गल्ल्यांची नावं अन् गल्ल्यावरून धंद्याचा स्तर ठरतू. पण तेवढी बी प्रतिष्ठा या गल्ल्याला नावं न देता कैद्यासारखे नंबर देल्यानं राहिली नसावी. आमची सगळी टीम तिथं दाखल झाली. अन् सदानकदा इशाऱ्यानं खेळणाऱ्या भुवया अन् बाव्हल्या संशयानं भिरभिरल्या. अन् त्याह्य़ ची खुसपूस सुरू झाली. ‘क्यों रे, हमारे फोटू छपवाने हैं क्या?’ म्हणून एकीनं इचारलं. टी. व्ही.-पेपरचं काय, पण लग्न पत्रिकात बी फोटूसाठी धडपडणाऱ्या काळात असं तोंड लपवावं वाटणं समजत व्हतं. आमच्या टीमचं काम सुरू झालं तव्हा त्याह्य़च्या कामाची येळ नसावी. रिकामच इकडं-तिकडं फिरत व्हत्या. आम्ही नेमकं काय करतोत याचा चाकचोळ पाहत! महं कामं संपलं अन् येळ मिळाला की आपलं येडय़ाचं सोंग घेऊन (मंजी ते आपल्या दिसन्यातच आसल्यानं मुद्दाम घ्यायची गरज न्हाई.) त्याह्य़च्या माघं माघं फिरू लागलो. संगं एक मित्रीन बी व्हती. मह्य़ा संगं ते सगळं पाहन्यासाठी माघं लागून आल्याली. पंधरा दिसान आधी गर्जत व्हती. ‘मला त्याह्य़ला जाणून घ्यायचंय, समजून घ्यायचंय.’ मंजी एक्या स्त्रीलाच स्त्री समजून घेणं बाकी व्हती. तं पुरुषांच्या तं समानीच्या पलिकडलं .तश्या या मूळच्या रानटी प्राण्यानं हारलेल्या शत्रूला गुलाम करण्याच्या सवईनं स्त्रीला बी गुलाम करून शोकेस मधी ठुलं. आपल्या रानटी पूर्वजांच्या आपमतलबी, रानटी कारस्थानी मुंडक्यातून भाईर पडल्याली ही वस्तू आज बी तशीच कशी घडती, याची उत्सुकता! आम्ही बसल्यावर म्या त्या मित्रिनीला त्याह्य़च्या संगं बोलायला सांगितलं. पण पंधरा दिवस आधी पट्टय़ाचे हात हाननारी, उच्चभ्रू वस्तीतली, क्लास वन अधिकाऱ्याच्या घरातली ती पोरगी क्लासमधीच न गेल्याल्या त्या पोऱ्ही पाहून गर्भगळीत झाली. मला मातर त्या मह्य़ाच वर्ग मैत्रिनी वाटल्या. मला राहवलंच नाही. भाषणात जसं कंपलसरी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसं मी त्याहायना विचारलं -‘तुम्हाराच नाम क्या है?’ म्या समुरच्या घोळक्यावर नजर फिरीली तं आख्खा भारत दिसला. दक्षिन, पश्चिम, पूर्व, उत्तर. चेहऱ्यातली विविधता दिसली. मी नाव सांगितलं तसा हशा पिकला. ‘अरे ए मेरा नाम हैं किताब. थोडीही हैं. जो मेरा कर्तृत्व देखकर दिया हो. नाम तो कुछ भी रख सखते हैं ना?’ पुन्हा हशा. काहीसं नेपाळी-आसामी दिसणाऱ्या मुलीकडं पाहून विचारलं, ‘तुम्हारा नाम?’ तिनं सांगितलं. आपल्या भाषेत त्याचा अर्थ ‘वर्षां’ होता. म्या ‘वर्षां’ म्हणलं. तिला पटलं .ती हसली. बोलता बोलता इस्वास आला. (माणूस न्हाई.) ती भाईरच्या देशातली. तिचं म्हणनं -पोट भरायला आले घेऊन. दोन र्र्वस सोडून देल व्हतं. पुन्हा सुरू केलं. जास्त काही मिळत न्हाई.’ तितक्यात काही पोलीस बायाला झिंज्याला धरून रस्त्यानं बडवीत नेहत व्हत्या. म्या वर्षांला म्हणलं, ‘हाप्ता द्यावा लागतू?’ तिला संशय आला. ती गप. तितक्यात ती रस्त्याला दांगडू करणारी बाई वर येऊन परिशान करू लागली. बोलता बोलता तिच्या तोंडून ‘परभणी’ निघालं. बाकीच्यांनी मला तिथं बोलविलं. ‘हा तुमच्या भागातला.’ की तिनं लगेच गाव बदललं. पण तिच्या बोलीवरून ती मह्य़ाच पट्टय़ातली होती. ती शांत व्हावी म्हणून मी तिला बोलन्यात गुंगीन्यासाठी म्हणलं, ‘पण तिच्या बोलीवरून ठामपणे तू परतूर, सेलू, पाथ्री, माजलगाव?’ तिचा चेहरा पडला. दातात जीब धरली. ‘भाऊ नोकरीला म्हणून सांगून आलते. घरी म्हतारे माय-बाप हेत. लेकरं शाळांत हेत. फोटू नकू छापू. तू मह्य़ा लहान्या भावासारखा हेस,’ म्हणून मयेनं तोंडाहून हात फिरीला. पण मी फुटलोच. तिची समज काढून वर्षांकडं आलो. जाहिरातीनंतर जशी लागती तशी लिंक परत लागली. म्या म्हणलं, ‘बरं, किती मिळतेत ?’ ती म्हणाली, ‘भय्या कैसा हे , कोही फिदा होके हजार- दो हजार भी देता है?’ मी- ‘फिर बचाके रखती हो क्या नहीं?’
‘हां भैय्या. फिर महिना-दो महिने धंदा नहीं करती.’
मला नव्या कोऱ्या ब्लेडनं कोन्ही तरी आडवं उभं फाडलं व्हतं.. आपूनच रंगवून बेरंग केलेलं जिवंत चित्र पहातानी!
lokrang@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा