अनिल पवार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षांच्या निमित्ताने डॉ. सदानंद मोरे यांनी संपादित केलेल्या ‘शिवराज्याभिषेक – भारताच्या इतिहासातील असामान्य घटना’ या कृष्णा प्रकाशनाच्या ग्रंथाचे आज (२७ ऑगस्ट) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे. या निमित्ताने ग्रंथाच्या संकल्पनेची प्रेरणा आणि निर्मितीच्या प्रवासाविषयी..
युगपुरुष, राष्ट्रनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारताचे प्रेरणास्थान आहेत. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवला गेलेला आणि या महापुरुषाच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे ६ जून १६७४. याच दिवशी राजधानी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि ते ‘छत्रपती’ झाले. या लोककल्याणकारी राजाने सार्वभौम स्वराज्याचा मंगल कलश रयतेसाठी अर्पण केला आणि रयतेला सुखी-समृद्ध केले. स्वराज्य-निर्मितीतील असंख्य महत्त्वाच्या घटनांपैकी भारताच्या इतिहासाला वळण देणारी आणि इथल्या भूमीत स्वातंत्र्याचा पहिला उद्घोष करणारी सर्वोच्च घटना म्हणजे ‘शिवराज्याभिषेक’. मी स्वत:ला यासाठी भाग्यवान समजतो की, ही सर्वोच्च घटना महाराष्ट्रातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याचे सद्भाग्य मला लाभले.
‘६ जून – शिवराज्याभिषेक दिन’ महाराष्ट्राच्या प्रत्येक ग्रामपंचायतीत साजरा व्हावा, यासाठी मी अनेक वर्षे महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अर्ज, विनंत्या आणि संबंधित खात्यातील मंत्री-अधिकारी वर्गासोबत झालेल्या चर्चाच्या असंख्य फेऱ्यांनंतर मी लावून धरलेली मागणी शासनाने अखेर मान्य केली. माझ्या आयुष्यातील हा अत्यंत प्रेरणादायी आणि आजवरचे प्रयत्न सार्थकी लावणारा क्षण होता. भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून ६ जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येणार असल्याचे शासनाने १ जानेवारी, २०२१ रोजी जाहीर केले. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्याच्या निर्णयानुसार, ६ जून २०२१ रोजी महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित होते. ३५१ पंचायत समित्यांच्या मुख्य भवनासमोर तालुक्याचे आमदार, सभापती, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातील २८,००० ग्रामपंचायती आणि ४३००० गावांमध्येदेखील त्या त्या गावच्या सरपंच व सदस्यांसह ग्रामस्थांनी हा सोहळा तितक्याच आनंदात आणि उत्साहात साजरा केला.
शिवरायांचा राज्याभिषेक हा तत्कालीन मुघलशाही, आदिलशाही किंवा कुतुबशाही अशा कोणत्याही सत्तेचे मांडलिकत्व न पत्करता, शेकडो वर्षांची जुलमी राजवट झुगारून देणारा सार्वभौम आणि निर्भेळ स्वातंत्र्याचा बुलंद उद्घोष होता म्हणूनच भारताच्या इतिहासात ही घटना सुवर्णाक्षरांत लिहून ठेवलेली आहे. आज ३५० वर्षांनंतर शिवस्वराज्य दिन महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात साजरा होत असलेला पाहताना मी अक्षरश: कृतकृत्य होत होतो. हे ऐतिहासिक कार्य माझ्या हातून व्हावे हे इथल्या मातीशी असलेल्या माझ्या अपूर्व ऋणानुबंधाचे सुकृतच!
स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनाला आपण जसा उत्सव साजरा करतो, अगदी तसाच उत्सव साजरा करण्याची आणि शिवविचारांचा जागर मांडण्याची संधी शिवस्वराज्य दिनामुळे सबंध महाराष्ट्राला लाभली. पण हा दिवस केवळ उत्सवी रूपात साजरा न होता त्याला वैचारिक अधिष्ठान असावे, असे मला वाटत होते. त्यातूनच ‘शिवराज्याभिषेक – भारताच्या इतिहासातील असामान्य घटना’ या पुस्तकाचा जन्म झाला.
आजवर राज्याभिषेक या ऐतिहासिक घटनेची समग्र मांडणी करणारे, त्याचे संतुलित विश्लेषण करणारे एकही पुस्तक माझ्या पाहण्यात नव्हते. उपलब्ध साहित्यात या विषयासंदर्भातील ज्ञानाचे मोती इतस्तत: विखुरलेले असल्याचे मला जाणवत होते. त्यासाठी पुणे मराठी ग्रंथालय, जयकर लायब्ररी, गोखले इन्स्टिटय़ूटची लायब्ररी, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे ग्रंथालय, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, बालभारती, भारत इतिहास संशोधक मंडळ, यशवंतराव चव्हाण सेंटरचे ग्रंथालय अशा अनेक ठिकाणी भेटी दिल्या. शोधमोहिमेत माझ्या हाती जवळपास दीडशेहून अधिक पुस्तके लागली. उपलब्ध होणाऱ्या पुस्तकांत दिलेली ग्रंथसूची आणि संदर्भसाधने पाहून ती पुस्तकेही मिळवत गेलो. ३०० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ज्यांनी ज्यांनी लेखन केलं होतं, तेदेखील मिळवलं. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वत: अनुभवलेला शिवराज्याभिषेक सोहळा त्यांच्या बुधभूषण ग्रंथातील श्लोकांमुळे माझ्या मन:पटलावर उभा राहिला. कवींद्र परमानंद, कवी जयराम पिंडय़े, कृष्णाजी अनंत सभासद, रामचंद्रपंत अमात्य आणि हेन्री ऑिक्झडनसारख्या काही परकीयांनी नोंदवलेली शिवराज्याभिषेकाची हकिकत आणि महाराजांच्या संदर्भात केलेले लेखन अभ्यासता आले. ज्यांनी आपली उभी हयात इतिहास संशोधनासाठी व ग्रंथलेखनार्थ समर्पित केली अशा – न्यायमूर्ती म. गो. रानडे, राजारामशास्त्री भागवत, कृ. अ. केळुसकर, वि. का. राजवाडे, गो. स. सरदेसाई, सर जदुनाथ सरकार, डॉ. बाळकृष्ण, चिं. वि. वैद्य, चिं. ना. परचुरे, वा. सी. बेंद्रे, शं. ना. जोशी, द. वा. पोतदार, त्र्यं. शं. शेजवलकर, ग. ह. खरे, य. न. केळकर, सेतुमाधवराव पगडी, शां. वि. आवळसकर, अ. रा. कुलकर्णी, नरहर कुरुंदकर, प्र. न. देशपांडे, दि. वि. काळे अशा इतिहास अभ्यासकांच्या लेखणीचं तेज पाहून मी प्रत्येक पानावर स्तिमित होत असे. राज्याभिषेकासंदर्भात या सर्व इतिहासकारांनी केलेले लेखन काहीसे विखुरलेले वाटले. असे विखुरलेले ज्ञानमोती एका सूत्रात गुंफून आणि त्याला सद्यकालीन इतिहास अभ्यासकांच्या लेखांचा साज चढवत ‘शिवराज्याभिषेक’ या विषयावरील समग्र ग्रंथ करावा हे मनात स्पष्ट झाले. माझा सहकारी चेतन कोळी याने ग्रंथनिर्मितीची जबाबदारी स्वीकारली. डॉ. सदानंद मोरे ग्रंथाचे मुख्य संपादक असावेत असे मला वाटले. त्यांना ही संकल्पनाच आवडल्याने ते या प्रकल्पात सहभागी झाले. डॉ. गणेश राऊत यांनी साहाय्यक संपादक या नात्याने सर्व लेख वाचून महत्त्वाच्या संपादकीय सूचना केल्या. लेखकांच्या यादीत डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. जयसिंगराव पवार, श्री. ग. भा. मेहेंदळे, डॉ. रमेश जाधव, डॉ. प्रकाश पवार, डॉ. राजा दीक्षित, पांडुरंग बलकवडे यांसारखे ज्येष्ठ इतिहासकार समाविष्ट करून घेता आले. कोल्हापूरच्या संजय शेलारांसारख्या कलाकाराशी संवाद साधताना मुखपृष्ठाची कल्पना स्पष्ट होत गेली. संदीप तापकीर, यशोधन जोशी, रोहित पवार, चेतन कोळी, सुशांत उदावंत यांनी केलेल्या लेखन-संपादनामुळे तरुण लेखकवर्गही यात सहभागी झाला आहे. ऐतिहासिक साधने धुंडाळताना बऱ्याचदा मौलिक शब्दरत्नांनी आपली ओंजळ भरून जाते. कवीन्द्र परमानंदकृत ‘शिवभारत’ अभ्यासताना मला असाच अनुभव आला. छत्रपती शिवरायांची महती गाणारा आणि अर्थगर्भ असा अन्य कोणताच श्लोक आजवर माझ्या वाचनात आला नव्हता.
कवी परमानंद लिहितो –
महाराष्ट्रो जनपदस्तदानीं तत्समाश्रयात्।
अन्वर्थतामन्वभवत् समृद्धजनतान्वित:॥
या श्लोकाचा अर्थ असा- छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्रातील जनता समृद्ध झाली आणि ‘महाराष्ट्र’ हे नाव अन्वर्थ (सार्थ) झाले. हे वर्णन आजही अत्यंत समर्पक वाटते. कोणत्याही महापुरुषाची जयंती, पुण्यतिथी किंवा तत्सम विशेष दिन डीजे-डॉल्बीच्या दणदणाटात साजरा करण्याची प्रथा आपल्या समाजात दुर्दैवाने रुजत आहे. पण या उत्सवासोबतच या ऐतिहासिक घटनेचे विभिन्न पैलू किती तरुणांना माहीत असतात? महाराजांनी स्वत:स राज्याभिषेक का करवून घेतला, या घटनेचे राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक-पारमार्थिक परिप्रेक्ष्यात नेमके काय महत्त्व होते? ‘छत्रपती’ या शब्दाचा आशयार्थ काय? महाराज ‘शककर्ते’ झाले म्हणजे नेमके काय झाले? भगव्या ध्वजाचा इतिहास काय सांगतो? अशा अनेक मुद्दय़ांवर सांगोपांग चर्चा राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षांच्या निमित्ताने घडायला हवी, असे मला प्रांजळपणे वाटत होते. यासाठीच ५६८ पानी ग्रंथ सिद्ध करण्याचा प्रपंच मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केला. अर्थात, राज्याभिषेकाचा सोहळा हा जसा एक लोकोत्सव आहे, तसाच हा ग्रंथही उत्सवाला-उत्साहाला दिशा देणारा दस्तऐवज ठरेल अशी मला आशा आहे.
anilpawar4677 @gmail.com
(लेखक सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष आहेत. )