‘एक मुठ्ठी आसमाँ’ ही शोभा बोंद्रे यांची कादंबरी लवकरच रोहन प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे. त्यातील एका प्रकरणाचा संपादित अंश..
‘चांदण्यांचा हार आणि इंद्रधनुष्याची घसरगुंडी आणायला गेलेला माणूस तिकडे जन्नतमध्येच रमला का?’
कारण वाढदिवसाच्या दिवशी सकाळी दहा वाजून गेले तरी आदिलचा पत्ता नाही. वाट पाहून पाहून शेवटी मी एकटीच सगळ्या मुलांना घेऊन घराबाहेर पडले. आम्ही बसमध्ये बसून राणीच्या बागेत पोचलो. तिथे हत्ती, वाघ, अस्वल असा एक- एक प्राणी पाहत शेवटी सापांच्या काचेच्या पेटय़ांसमोर उभे राहिलो.
पेटय़ांमधली सापांची वेटोळी आणि भेंडोळी पाहताना मला किळस येत होती. पण बच्चेकंपनी मात्र डोळे विस्फारून ते वळवळणारे प्राणी निरखून पाहत होती.
शेवटी उरलेलेही प्राणी आणि पक्षी बघून झाल्यानंतर मग थकूनभागून आम्ही हिरवळीवर विसावलो. तिथे खाण्यापिण्याचा कार्यक्रम यथास्थित पार पडला आणि आम्ही परत यायला निघालो. पोरं खूप दमली होती. पण सगळ्यांच्या तोंडावरून आनंद ओसंडून वाहत होता. राणीच्या बागेतल्या गमतीजमती सांगताना त्यांना शब्द अपुरे पडत होते.
घरी गेल्यावर सना आणि रिझवानला कसंबसं सात वाजेपर्यंत थोपवून धरलं आणि चार घास खायला घालून झोपवून टाकलं.
खरं म्हणजे माझेही डोळे मिटत होते, पण दोन खोल्यांच्या घरात मनात आल्याबरोबर थोडंच आडवं होता येतं?
उज्जैनच्या आमच्या हवेलीतली माझी बेडरूम मला आठवली. तिथला अल्पसा सुखाचा काळ आणि संसार डोळ्यांसमोर आला आणि क्षणभर मन खिन्न झालं.
पण पुढच्याच क्षणी डोळ्यांसमोर आली-आज राणीच्या बागेत फुलपाखरासारखी बागडणारी सना आणि तिचा हसरा, प्रसन्न चेहरा.
असं वाटलं, जे भूतकाळात जमा झालंय, त्याची खंत करण्यात काय अर्थ आहे? आज माझं वर्तमान आणि भविष्यही असणार आहे, सना. आता यापुढे माझं सगळं जग जर तिच्याभोवतीच फिरणार असेल, तर या जगात आनंदाचे अधिकाधिक क्षण शोधणं, हीच शहाणपणाची गोष्ट!
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणेच सकाळच्या कामांची घाईगर्दी उडाली होती. आज मला परळ- लालबागला जाऊन कापडं आणायची होती. भराभरा घरातलं आटोपून मी तयार झाले, तेवढय़ात बाहेरून सनाचा आरडाओरडा- ‘‘मेले पापा आ गये.’’
कधी नव्हे, ते माझ्या कपाळाला आठी पडली. साडीच्या निऱ्या नीट करीत पुटपुटले,
‘‘आज मुहूर्त मिळाला यांना यायला. आता माझ्या कामाचा खोळंबा!’’
सना हाक मारायला लागली, ‘‘मम्मीऽऽ बाहल आ जाव! पापा आये है।’’ मी बाहेर गेले, तर सनाच्या हातात एक मोठा फुगा होता. आनंदाने उडय़ा मारत ती गाणं म्हटल्यासारखं गुणगुणत होती, ‘‘मेला बऽऽलून.. मेला बऽऽलून!’’
मला पाहताच ती उत्साहाने म्हणाली, ‘‘मम्मी देख, पापा ने क्या लाया है?’’
तिच्या गालाचा पापा घेऊन आदिलनी विचारलं, ‘‘हमारी प्रिन्सेस को बर्थ- डे गिफ्ट पसंद आया?’’
न राहवून मी म्हणाले, ‘‘पण बर्थ- डे तर काल झाला.’’
आदिल हसून म्हणाले, ‘‘माझ्यासाठी प्रिन्सेसचा बर्थ- डे रोजच असतो आणि रोज नवा आनंद देतो. ती भेटते त्या दिवशी मी तो साजरा करतो, इतकंच!’’
शब्द आणि शब्दांचे खेळ! मी एक नि:श्वास टाकला.
तेवढय़ात रिझवान आला. मग सनाने त्याला फुगा दाखवला आणि दोघं फुगा घेऊन खेळण्यासाठी बाहेर पळाले.
माझ्या डोक्यातला राग अजून गेला नव्हता. जरा फणकाऱ्यानेच मी म्हणाले,
‘‘तुम्ही थांबणार तर थांबा. मला कामासाठी बाहेर जायचं आहे.’’ आणि आत जायला वळले.
पटकन माझा हात धरून मला थांबवत ते म्हणाले, ‘‘एक मिनिट थांब. माझं बोलणं ऐकून तर घे.’’ मी थांबले.
‘‘आपण आता एकत्र राहूया. मी घर शोधलं आहे.’’
‘‘काय?’’
कित्येक दिवसांनी (की वर्षांनी?) जबाबदार नवऱ्यासारखं पहिलंच काहीतरी वाक्य मी त्यांच्या तोंडून ऐकलं.
ते उत्साहाने सांगायला लागले, ‘‘मला एक चांगली नोकरी मिळाली आहे. मालकाने राहायला घरही दिलं आहे, अंबरनाथला!’’
‘‘अंबरनाथ? इतक्या लांब?’’
‘‘हो, इथून लांब आहे खरं! पण तिथे घर आहे. चांगला शेजार आहे. आपण आपला संसार नव्याने सुरू करू.’’
या शब्दांसाठीच तर मी आसुसलेली होते. इथे आईकडे आधार होता, सुरक्षितता होती; पण कुठेतरी खूप मिंधेपणाची भावना होती.
आदिलसोबत संसार नव्याने सुरू करता आला तर ते माझं हक्काचं घर असेल, माझी हक्काची माणसं माझ्यासोबत असतील.
स्वप्नरंजन चालूच राहिलं असतं; पण अचानक व्यवहाराचा विचार मनात आला आणि मी खाडकन् जमिनीवर आले.
‘‘आदिल, आपण सनाला घेऊन एकत्र राहावं असं मला वाटत नाही का? पण इथे मला शिवणाची चांगली कामं मिळतायत. काही नाही, तर माझा आणि सनाचा खर्च तरी मी भागवू शकते.. शिवाय..’’
‘‘बेगम, शिवणकाम तू तिथेही करू शकतेस. कपडे घालणारी माणसं अंबरनाथला राहतातच की!’’
मी हसायला लागले आणि आदिलही! कुठच्याही कठीण परिस्थितीमध्ये हसून वातावरण प्रसन्न कसं करावं, ते आदिलकडून शिकावं.
‘‘हो. पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी नोकरी शोधते आहे. अंबरनाथपेक्षा मुंबईत नोकरी मिळण्याचा चान्स जास्त नाही का?’’
आदिलकडे या प्रश्नाचंही उत्तर होतं, ‘‘हे बघ, इंटरव्हय़ू वगैरे द्यायचा असेल तर तेवढय़ापुरती तू अंबरनाथहून ये. हवं तर एक-दोन दिवस माहेरी राहा. जेव्हा तुझं सिलेक्शन होऊन कुठेतरी नोकरी मिळेल, तेव्हा कदाचित आपण नोकरीच्या जवळपासचं दुसरं घर शोधू. पण ते सर्व पुढचं पुढे. त्यावर आत्ता चर्चा कशाला? या क्षणाला तू एवढंच सांग की, सध्या आपण अंबरनाथला एकत्र राहायचं की नाही?’’
त्यांच्या चेहऱ्यावरचा व्याकूळ आणि आर्जवी भाव पाहून मी विरघळले.
मी ‘हो’ म्हटल्याबरोबर एखाद्या लहान मुलासारखी त्यांची कळी खुलली. पटकन् उठून ते म्हणाले, ‘‘मिठाईचा पुडा घेऊन येतो. तुझ्या घरच्यांचं तोंड गोड करूनच त्यांनी ही बातमी सांगू या.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा