आत्मचरित्र वाचण्यासाठी मी तसा नेहमीच निरुत्साही असतो. त्यात प्रसिद्धी वलयांमध्ये आयुष्य काढलेल्या अनेक माणसांची आत्मचरित्रं वाचताना त्यांनी कितपत खरं लिहिलं असेल किंवा कितपत संभ्रमावस्था ठेवून लिहिलंय बरं असे प्रश्न निर्माण होत जातात.. आणि वाचनाच्या आनंदावर सातत्यानं विरजण पडत राहतं. हा यापूर्वीचा माझा (वैयक्तिक) अनुभव असला तरीही कार्नाडांच्या पहिल्या प्रत्यक्ष भेटीनंतर माझं त्यांच्याविषयी वाढलेलं कुतूहल त्यांच्या आत्मचरित्रापासून दूर ठेवू शकलं नाही.
‘खेळता खेळता आयुष्य’ हे नाव कन्नड भाषेतील प्रसिद्ध कवी द. रा. बेन्द्रे यांच्या ‘आडाडता दिनमान’ या कवितेतील ओळीतून प्रेरित असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. ते तसं या पुस्तकातही विशद केलंच आहे. सुबक मांडणी असलेल्या या पुस्तकातली एकंदरीत जवळपास सर्वच छायाचित्रं मात्र (अगदी मुखपृष्ठापासूनच) फार छोटी वाटतात. निर्मिती मूल्य उत्तम राखत असताना केलेली काटकसर म्हणून हे केलं नसेल अशी आशा आहे, पण कार्नाडांच्या आयुष्यात डोकावून पाहण्याची त्यांनी दिलेली ही संधी घेण्यासाठी सरसावणारा वाचक हा वयानं चाळिशीच्या पुढे असण्याची शक्यता मांडणी करताना महत्त्वाची धरलेली दिसत नाही. अक्षरांचा टाइपही मला जरा लहानच वाटत राहिला. हे वास्तविकत: उत्तम प्रकारे रचलेल्या या पुस्तकाच्या बाह्य़ स्वरूपामधले काही अडसर (अशा प्रथमदर्शनानंतर) मात्र एकदा सुरुवात झाल्यावर सलग वाचनाच्या आनंदाच्या आड सतत येत नाहीत. याला महत्त्वाचं कारण ठरतो तो या आत्मकथनाला असलेला एक विलक्षण ओघ.
कार्नाडांची शैली विलक्षण ओघवती आहे. म्हणजे एकीकडे अगदी बारीकबारीक वर्णनं, बाबी प्रत्येक ठिकाणी ते आवर्जून आणि अगदी रस घेऊन सांगत असले तरीही त्यांचं कथन रेंगाळतंय असं मात्र वाटत नाही. कार्नाडांच्या आयुष्यातल्याही कथनशैलीकडे पाहता कन्नडमध्ये हा ओघ नक्कीच असेल आणि मराठी अनुवादातही हा ऐवज या गुणापासून दुरावला नाही हे नक्की. या कथनशैलीतही काही प्रकारचं वैविध्य प्रकरणानुरूप आपण अनुभवू शकतो. काही प्रकरणांमध्ये हे फरक फार प्रकर्षांनं जाणवतात. एकंदर कथन एखाद्या गोधडीप्रमाणे तुकडेजोड न वाटता एका सलग आयुष्याच्या कथनात प्रत्येक टप्प्यावर एखादा वेगळा रंग, वास, गती, रूपडं घेऊन त्या वेगवेगळ्या टप्प्याबद्दल बोलत लेखकाची भाषा समोर येते. गाजलेल्या कन्नड साहित्यामध्ये जो तपशीलवार कथन करण्याचा सामथ्र्यवजा गुण दिसतो तो या कथनात बऱ्याच ठिकाणी आग्रहानं उतरलेला दिसतो. म्हणजे कार्नाडांच्या सांगण्याच्या ऊर्मीतच तो उतरलेला जाणवतो. त्या त्यांच्या नादात ते जवळपास सर्व घटना, संवाद, परिस्थिती यांची वर्णनं अगदी तपशीलवार करत राहिलेले आपल्याला जाणवतात. यामुळे हे सर्व प्रसंग, कालावधी रोचक होत गेले आहेत. एखाद्याला ते कंटाळवाणे वाटण्याची शक्यता असली तरी ती खूपच कमी वाटते. कारण तपशीलवार होतानाच त्यांची कथनशैली आणि भाषा त्या त्या भागाला विशिष्ट संवेदनात्मक परिमाण प्राप्त करून देत जाते.
उदाहरणार्थ, त्यांची ही शैली आणि भाषा सिरसीमधला बराचसा बालपणीचा काळ रंगगंध-संवेदनांसह जिवंत करते. धारवाडबद्दल नॉस्टॅल्जिक होत राहते, मुंबईबद्दल जेवढय़ास तेवढं बोलणं पसंत करते, ऑक्सफर्डचं उत्तम चित्र रंगवत रमते आणि बऱ्याचदा बऱ्याच बाबतीत एक शांत, कृतज्ञ भाव मनात घेऊन भाष्य करत जात असताना मध्येच काही व्यक्तींबद्दल (अगदी कितीही ज्येष्ठ, मानाच्या किंवा प्रसिद्धीच्या असल्या तरीही) परखडही होत राहते. आपल्याला एखाद्या बाबतीत काय खटकलं, जमलं नाही, काय चुकलं याचे पश्चात्तापी पाढे न वाचता, वस्तुनिष्ठ अवलोकन करणं पसंत करते. छोटी वाक्यं, सोपे पण जुन्या भाषारूपाकडे झुकणारे शब्द आणि सविस्तर वर्णनं यामुळे घरातल्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीनं भूतकाळातल्या गप्पा, किस्से सांगावेत तसं हे सर्व वाचताना वाटत राहतं. स्वत:च्या आयुष्यात आलेल्या सर्वच व्यक्तींसोबत कार्नाड आपला फार उत्तम परिचय करून देत राहतात.
त्यांच्या कथनातली परिसरांची वर्णनंही अतिशय बोलकी आहेत. त्यांच्यात उत्तम प्रतीची चित्रमयता आहे. त्यातले जे परिसर आपण पाहिले आहेत ते हुबेहूब उभे राहत आहेत हे जाणवतं. तसंच जे परिसर पाहिलेले नाहीत त्यांची चित्रं मनात उभी राहू शकतात. अशा शब्दचित्रांनी हे आत्मचरित्र भरलेलं आणि भारावणारंही आहे. त्या त्या परिसरात, परिस्थितीत प्रथम ते कथनाच्या जोरावर आपल्याला थेट नेत राहतात आणि मग तिथली सर्व कहाणी उलगडत राहतात. चित्रपट माध्यमावरच्या त्यांच्या पकडीकरता आवश्यक ठरलेली त्यांची विशिष्ट दृष्टी आणि नाटकांमध्ये प्रकट होणारी त्यांच्या पाहण्यातली मार्मिकता इथे जागोजागी जाणवते.
नाटककार म्हणून कार्नाडांकडे आपण मराठी लोक जरा जास्त आत्मीयतेनं पाहतो. म्हणजे ते आपल्यापकी बहुसंख्यांना ‘परके’ वाटत नाहीत. त्यांच्या पौराणिक कथानकांच्या नाटकांमधला आधुनिक आशय त्यांच्या मराठी भाषांतरकारांना, दिग्दर्शकांना, कलाकारांना आणि प्रेक्षक-समीक्षकांनाही विशेष भावला आहे. त्यांच्या आधुनिक नाटकांना मात्र मराठीमध्ये यापकी अनेकांनी उघड टीका न करता (रूमालाच्या आधारानं नाकं मुरडून) स्वीकारलं अथवा नाकारलं आहे असं एकंदरीत दिसतं. व्यामिश्रतेचा आग्रह धरणारे आधुनिक किंवा अतिआधुनिकतेची धुरा वाहाणारे जाणकार असोत किंवा अगदी करण जोहरच्या आधुनिक िहदी सिनेमात रमणारा पांढरपेशा मराठी प्रेक्षक असो, ‘‘कार्नाडांच्या या नव्या लेखनात नक्की काय दम आहे..’’ हे शोधत बसताना त्यांना कदाचित कार्नाडांच्या आत्मचरित्रात या दिशेनं काही हाती लागेल हे नक्की.
एखाद्या लेखकाच्या लेखनाबाबत विचार करताना त्यातले विविध विचार, वैचित्र्य, घटना ‘हे सर्व कुठून येते?’ हा प्रश्न वाचकांसाठी किंवा इतर अभ्यासकांसाठी अनिवार्य आहेतच. पण हे सर्व आपण एखाद्या मान्यवर मराठी लेखकाच्या कलाकृती सादर करताना शोधू लागलो तर ते अवघडतात हे मी पाहिलेलं आहे. ‘ऑल राइटिंग इज ऑटोबायोग्राफिकल’ असं एकीकडे आपल्याला माहीत असतं आणि त्यामुळेच ‘हे सर्व कुठून आलं आहे बरं?’ असं एक चिकित्सक कुतूहल एखाद्या लेखकाचं साहित्य आपण जेवढं वाचत जातो तेवढं ते त्या प्रमाणात आपल्याला निर्माण होत जातंच. असं कुतूहल निर्माण होणं हे अभ्यासाचा विषय असल्यानं मला ते विकृत वाटत नाही (काही जणांच्या बाबतीत ते विकृत असेलही.).
कार्नाडांची नाटकं करताना, वाचताना त्यातल्या कितीतरी विलक्षण गोष्टी, पात्रं यांच्याबाबतचं हे कुतूहल या आत्मचरित्रातल्या रोचक प्रसंगांमधून शमत राहतं. पण हे ‘सत्य’दर्शनही काही अनपेक्षित वळणं घेत एखाद्या घाटात एखाद्या धबधब्यानं समोर यावं तसं घडतं. ‘वेिडग अल्बम’ हे नाटक ज्यांनी वाचलं असेल, पाहिलं असेल त्यांना त्यातले प्रसंग, पात्रं यांच्याबद्दल हे, विशेषत: धारवाडमधली वर्णनं वाचताना पदोपदी जाणवेल आणि एक स्मित निर्माण करेल यात शंका नाही. ‘‘कदाचित आपण जन्मलोच नसतो आणि आजूबाजूचं सारं जग आपण असे जन्मलोच नसतो तरीही असंच अर्निबध, अनिवार चालू राहिलं असतं’’ हा ‘उणे पुरे शहर एक’मधल्या कुणाल या पात्राला झालेला ‘साक्षात्कार’ हा खुद्द कार्नाडांचा स्वत:चाच साक्षात्कार आहे हे वाचताना किंवा ‘ययाती’मधला पुरू किंवा ‘चित्रलेखे’मधला प्रश्नकर्ता कसा निर्माण झाला असेल हे वाचताना कार्नाडांचा वाचक किंवा अभ्यासक म्हणून आपलं हे कुतूहल कधी विस्मयानं तर कधी गमतशीर पद्धतीनं शमतं. या आत्मकथेमध्ये असलेले आणि एरवी वैयक्तिक वाटतील असे कितीतरी संदर्भ कार्नाडांची नाटकं वाचून झाल्यावर या एका बाबीमुळे विशेष महत्त्वाचे होत राहतात.
या आत्मचरित्रामध्ये एकप्रकारचा मोकळेपणा आहे. कधी कधी तो कमाल स्वरूपाचा आहे तर कधी तो निखळपणाच्या सहज श्रेणीतला आहे. कार्नाड एखादा प्रसंग मोकळ्या ‘कथनासाठी आता अडचणीचा होतोय’ या कारणानं अपवादानेच चटकन् आवरता घेतात. असं आवरतं घेणं हे त्यात संबंधित इतर व्यक्तींबद्दलच्या मानातून किंवा कृतज्ञतेतून होताना जाणवतं. स्वत:च्या तारुण्याविषयी, वडीलधाऱ्यांशी असलेल्या मतभेदांविषयी, परिस्थितीमधल्या अडचणीच्या मुद्दय़ांविषयी बोलताना ते कोणताही अडसर बाळगत नसलेलेच दिसतात. ‘बलि’मध्ये वासनेच्या खेळात अडकलेल्या पात्रांच्या नाटकातल्या जगण्याशी कार्नाडांच्या स्वत:च्या जगण्याचा संदर्भ कसा जोडलेला आहे हे कमालीच्या थेटपणानं आणि मोकळेपणानं ते सांगून टाकतात. विद्यार्थी दशेतल्या विवशता, अनिवार्यतांचं त्यांनी केलेलं वर्णन इतकं साधं आणि सरळ आहे की एखाद्या मध्यमवर्गीय घरातल्या कोणाही तरुणाला त्याच्याशी स्वत:ला सरळ जोडता यावं. कार्नाडांना बरेच पुरस्कार मिळालेले असले तरीही आत्मचरित्रात मात्र ते संक्षिप्त उल्लेखांपुरतेच येतात. शिष्यवृत्ती मिळण्याबाबतचे प्रसंग मात्र तपशीलवार येतात. हा कदाचित सुसंकृत घरातला संस्कार असावा.
महत्त्वाच्या व्यक्तींशी झालेले मतभेद, कामांचं श्रेय न मिळणं किंवा इतर समकालीन लेखक-कलावंतांनी कार्नाडांना एरवी वैयक्तिक स्वरूपात दिलेलं श्रेय अधिकृतरीत्या न देणं असे काही मुद्दे मधेमधे येत राहतात. कार्नाड हे मुद्दे लिहिताना ‘जास्त पॉलिटिकली करेक्ट’ लिहिण्याचा प्रयत्न करताना जाणवतात किंवा आवरतं घेताना दिसतात. देवदेवता किंवा धर्मसंस्थेविरुद्ध लिहिताना ते टोकदारपणे होत नाहीत. संयत किंवा साध्या आवाजात लिहितात असं जाणवतं. त्यांच्या नाटकांमधेही या पद्धतीच्या ‘कॉमेंटस्’ तशा थेटपणे नसल्या तरीही हा विरोधी सूर एका संयततेच्या वेष्टनात येत असतो तसंच हे वाटतं. समाजातलं किंवा आपल्याच नातेवाइकांमधलं आणि सारस्वत ब्राह्मण समाजातलं किंवा इतर छोटय़ा छोटय़ा गटांमधलं त्यांना जाणवलेलं दंभही उकलून ते त्यावर टिप्पणी करतात. पण ही टिप्पणी आगपाखड या स्वरूपाकडे जात नाही. राजकीय स्वरूपातलं भाष्य हे त्या मानाने कमी धारदार झाल्याचं इथे जाणवतं. मराठीचा
मुद्दा, सीमाभाग याविषयी एरवीही कार्नाड फारसे कधी
बोलताना दिसत नाहीत तसेच ते या आत्मचरित्रातही फार बोलत नाहीत.
अशोक कुलकर्णी, सत्यदेव दुबे, विजय तेंडुलकर, विनोद दोशी यासारख्या मराठी नाटकवाल्यांना माहीत असलेल्या काहींचं उत्तम आणि वेगळं चित्रण बऱ्याच विस्ताराने यात वरचेवर येत राहातं. आई-वडिलांच्या व्यक्तिरेखांबरोबरच, इंग्लंडमधले मित्र-मत्रिणी, धारवाडमधले शिक्षक – प्रकाशक, दिल्ली, मुंबई, चेन्नईमधले सवंगडी – वरिष्ठ अशा अनेक व्यक्तिरेखा अतिशय समर्थपणे ते उभ्या करत जातात. ऑक्सफर्डमधली व्यक्ती आणि प्रसंगचित्रणं तर विशेष वठली आहेत.
या आत्मकथेमध्ये आयुष्यातल्या इतर प्रत्येक घटनेपेक्षा तुलनेनं जास्त पानं एका कलाकृतीनं पटकावली आहेत. ती कलाकृती म्हणजे ‘संस्कार’ हा त्यांचा चित्रपट. त्या काळात ट्रेंड किंवा आवश्यकता म्हणूनही जे होत नसे त्या ‘मेकिंग ऑफ संस्कार’ पद्धतीच्या डॉक्युमेंटरीचं काम हे प्रकरण करतं. अतिशय छोटय़ा छोटय़ा तपशिलांचा भरणा या प्रकरणात आल्यानं आपण जवळपास ‘मेकिंग ऑफ संस्कार’ पाहतोवाचतो आहोत असंच आपल्याला भासू लागतं. मात्र त्यातही मतभेदांविषयी, तडजोडींविषयी बोलताना काही जागा थोडय़ा संदिग्ध राहतात हेही खरं.
संस्कारच्या प्रकरणापर्यंत आपण येतो, ते संपवतो तेव्हा आपण शेवटच्या काही पानांवर येऊन ठेपल्याचं भान आपल्याला येतं. शेवटच्या प्रकरणात चौदा वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या त्यांच्या विवाहापाशी येऊन कार्नाड (आणि त्यांच्या सोबत आपण) थांबतो.
या टप्प्यावर कार्नाड म्हणतात, ‘‘आत्मचरित्राच्या इथवरच्या भागाचं नाव ‘खेळता खेळता आयुष्य’ हे आहे पण जर यापुढचा भाग कधी लिहिला गेला तर त्याचं नाव ‘आडाडता दिनमान’ असेल..’’ मला तरी ही या आत्मचरित्राच्या उत्तरार्धाची चाहूल वाटते.
या आत्मचरित्रामध्ये प्रसंग, घटना, कृतज्ञता, खंत अशा कितीतरी गोष्टींचा खजिना आपल्याला सापडतो हे खरं, पण कार्नाडांचं चिंतन फारसं वेगळेपणानं समोर येत नाही. वेगळं उभं राहत नाही. त्यांचा आपल्याला माहीत नसलेला कालावधी उलगडत जातो. पण आपण समोर पाहिलेला त्यांचा कालावधी, त्यातले त्यांचे विचार, त्याबद्दलचं चिंतन हे आमच्या समोर एकत्रितपणे येत नाही, येऊ शकत नाही. कारण या आत्मकथेला कार्नाडांनी हा एक बांध घातला आहे. कार्नाडांच्या आपल्यासारख्या चाहत्यांना ‘मेकिंग ऑफ उत्सव’ पण वाचायला / अनुभवायला आवडेल असं या पुस्तकाचं मलपृष्ठ बंद करताना जाणवत राहतं. या हुरहुरीच्या भावनेसह मी हे आत्मचरित्र खाली ठेवलं.
आत्मचरित्रं वेगवेगळ्या प्रकारची असतात. आत्मचरित्र लिहिण्यापूर्वी प्रत्येक आत्मचरित्रकार व्यक्ती आपल्यासमोर तिच्या एका विशिष्ट व्यक्त स्वरूपात असते. आत्मचरित्राच्या प्रकाशनानंतर आपण वाचक त्या व्यक्तीच्या त्या व्यक्त स्वरूपाच्या कारणांशी नकळतपणे जोडले जातो. हा जोड कितपत वरवरचा किंवा कितपत खोलवर होईल हे ते आत्मचरित्र कसं लिहिलं गेलं आहे यावर ठरतं. काही लेखकांबाबत आपला हा जोड त्यांच्या अव्यक्ततेशीही होऊ शकतो. कार्नाडांचं आत्मचरित्र वाचताना, त्यांच्या नाटकाशी ओळख असल्यानं हे जाणवत राहिलं की या व्यक्तीच्या या चरित्राशी जोडलं जाण्याची संधी या व्यक्तीनं मला तिच्या अभिव्यक्तीत आधीच देऊन ठेवलेली आहे. आता मला होते आहे ती मी त्या सर्वाशी आधीच जोडला गेलो आहे ही जाणीव. पण मग ‘हे आत्मचरित्र आत्ता नव्यानं वेगळं काय करत आहे?’ हा प्रश्न उभा राहतो. मला माझ्यापुरतं सापडलेलं या प्रश्नाचं उत्तर इथे द्यावंच लागेल. कार्नाडांशी माझी झालेली प्रत्यक्ष ओळख ही अगदी नवीन असल्याचं मी सुरुवातीलाच सांगितलं आहे. जर ही ओळख होण्याआधी मी हे पुस्तक वाचलं असतं आणि मग त्यांची-माझी प्रत्यक्ष ओळख झाली असती तर त्यावेळी माझ्या मनातली सर्व प्रकारची औपचारिकता जाऊन ‘मी आधीच ज्या व्यक्तीशी जोडला गेलो आहे त्या व्यक्तीला आज मी प्रत्यक्ष भेटतोय’ ही भावना दृढ झाली असती हे नक्की.
कार्नाडांना प्रत्यक्ष ओळखत नसलेल्या प्रत्येक वाचकाला त्यांच्या व्यक्त रूपापासून पुढे जाऊन कार्नाड या व्यक्तीशी थेट जोडण्याचं काम वाचता वाचता हे आत्मचरित्र नक्की करेल यात शंका नाही.
‘खेळता खेळता आयुष्य’ – गिरीश कार्नाड,
राजंहस प्रकाशन, पुणे,
पृष्ठे – ३१८, मूल्य – ३०० रुपये.
प्रदीप वैद्य
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा