तमुक एका संस्थेने आयोजित केलेल्या परिसंवादात भाग घेऊ की नको? यांच्या हस्ते सत्कार स्वीकारू की नको? अन् माझ्या अध्यक्षतेखाली त्यांचा सन्मान आहे, अध्यक्षपद स्वीकारू की नको?.. असे अनेक प्रश्न अमुकरावांना अनेकदा पडतात. तसे पाहिले तर किती सोपे प्रश्न आहेत हे! मनाला पटले तर जावे, नाहीतर जाऊ नये. पण प्रश्न केवळ स्वत:च्या मनाचा असता तर अमुकरावांनी केव्हाच निर्णय घेतला असता. अमुकरावांना विचार पडतो की, या ठिकाणी गेलो तर आपल्यावर ‘तो’ ठप्पा पडेल का? आणि त्या व्यासपीठावर बोललो तर ‘हा’ शिक्का बसेल का?
या संमेलनाला जाऊ की नको? त्या संस्थेने आयोजित केलेल्या परिसंवादात भाग घेऊ की नको? यांच्या हस्ते सत्कार स्वीकारू की नको? अन् माझ्या अध्यक्षतेखाली त्यांचा सन्मान आहे, अध्यक्षपद स्वीकारू की नको?.. असे अनेक प्रश्न अमुकरावांना अनेकदा पडतात. तसे पाहिले तर किती सोपे प्रश्न आहेत! मनाला पटले तर जावे, नाहीतर जाऊ नये. पण प्रश्न केवळ स्वत:च्या मनाचा असता तर अमुकरावांनी केव्हाच निर्णय घेतला असता. अमुकरावांना विचार पडतो की, या ठिकाणी गेलो तर आपल्यावर ‘तो’ ठप्पा पडेल का? आणि त्या व्यासपीठावर बोललो तर ‘हा’ शिक्का बसेल का? अशा घनघोर पेचातून सुटण्यासाठी मी अमुकरावांना मोलाचा आणि सार्वकालिन सल्ला दिला. तो असा की, ‘अमुकराव, काही स्पष्टीकरणात्मक वाक्ये पाठ करून ठेवा. उदाहरणार्थ- ‘खरेच माझे चुकलेच त्यावेळी.’ किंवा ‘पुढील वेळी लक्षात ठेवीन.’ ‘माणूस चांगला होता म्हणून सत्कार केला. संस्था तर काय, तुम्हाला माहितीच आहे!’ ‘आणि अमुकराव, तुम्ही काही टिकोजीराव नाही, की अवघा महाराष्ट्र तुमची दखल घेईल. उगी, उगाच अस्वस्थ होऊ नका. कुठेही जा, पण न डगमगता जे वाटते तेच बोला..’ हे ऐकून अमुकरावांनी समजूत पटल्यासारखी मान हलवली आणि ते पुढे गेले.
एक कविमित्र खादीचा झब्बा घालायचे. ते म्हणाले, ‘मी बूट कधी घालत नाही. नेहमी चप्पलच घालतो.’ मी म्हणालो, ‘का बरं?’ तर ते म्हणाले, ‘एकदा समाजवादी विचारसरणी स्वीकारली की आचारही आपोआपच अंगवळणी पडतात.’ मी काही त्यांना त्यांनी घातलेल्या ब्रँडेड जीन्स-पँटची किंमत विचारली नाही. संध्याकाळी श्रमपरिहारासाठी बसलो तर उंची विंग्लिश सोनेरी द्रव आणि विल्सफ्लेक किंगसाइज सिगारेट हीच त्यांची आवड असल्याचे त्यांनी सांगितले. घरी परतण्यासाठी रस्त्यावर उभा राहिलो तर म्हातारपणाकडे झुकू लागलेला सायकलरिक्षावाला ‘चला साहेब..’ म्हणू लागला. कविमित्र म्हणाले, ‘माणसाने माणसाला ओढणे मला पटत नाही. मी बसणार नाही.’ मी शांतपणे सांगितले, ‘अकोल्यात अजून ऑटोरिक्षा फारशा धावत नाहीत. आणि घर दीड किलोमीटरवर आहे. मुख्य म्हणजे रिक्षावाल्याला पोटासाठी वीस रुपये मिळतील, याचा विचार करा.’
भारावलेल्या अवस्थेत दीड किलोमीटर पायी चालण्याच्या जाणिवेने परिणाम केला असावा; पण कविमित्र म्हणाले, ‘तू त्याच्या कमाईचा विषय काढलास म्हणून बसतो. पण हे सायकलरिक्षात बसणे आयुष्यातील पहिले आणि शेवटचे. शिवाय आजकाल थोडा प्रकृतीचाही त्रास..’ आणि काहीतरी पुटपुटत ते रिक्षात चढले आणि आम्ही घरी आलो. प्रकृतीही महत्त्वाचीच ना! तंदुरुस्ती हजार नियामत.
आपल्याकडे असे होते की, एखाद्या साहित्यिक वा सांस्कृतिक संघटनेच्या विरोधात ‘ती प्रतिगामी आहे, उच्चवर्णीयांच्या आणि उच्चवर्गीयांच्या हातात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या कलानिर्मितीची गळचेपी होते. सांस्कृतिक विकासाच्या वाटा अवरुद्ध होतात,’ असे सांगून, भूमिका मांडून नवी संस्था वा संघटना स्थापन केली जाते. विद्रोह, बंड, संघर्ष आणि क्रांती वगैरे शब्द उधळले जातात. आणि काही दिवसांनी हा आवाज क्षीण होत जातो. उसना आणलेला उत्साह ओसरत जातो. मात्र, निराशा पदरी पडते ती नेत्यांच्या किंवा मुखंडांच्या नाही, तर मोठय़ा आशेने एकत्र आलेल्या सर्वसामान्य माणसांच्या! राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक अशा सर्वच क्षेत्रांमध्ये असे नेहमीच घडत असते. नेत्यांवर, त्यांच्या शब्दांवर, त्यांनी मांडलेल्या भूमिकांवर विश्वास ठेवल्यानंतर त्यांच्या घूमजावमुळे तोंडघशी पडलेल्या महाराष्ट्रातील अनुयायांची संख्या प्रचंड आहे. काहीजणांचा भ्रमनिरास होतो. काहीजण निराश होतात. काहीजण हताश होतात. पण सुदैवाने वीस-पंचवीस वर्षांच्या अंतराने एक पिढी अशी निर्माण होते, की जी दुढ्ढाचार्याची धोतरे फेडण्याचे साहसी काम करते. हे लेखक एकूणच वाङ्मयव्यवहाराची उलटतपासणी, फेरतपासणी करतात आणि नवीन मांडणीही करतात. यासंदर्भात अशोक शहाणे, भालचंद्र नेमाडे, सुधीर बेडेकर यांची नावे ठळकपणे आठवतात. ‘मराठी साहित्यावर क्ष-किरण’, ‘लेखकाचा लेखकराव का होतो?’, ‘निशासूक्त की सूर्यगर्जना?’ असे लेख मराठी साहित्यविश्वाला आंदोलित करणारे म्हणून आठवतात.
या लेखनामध्ये जो एक वैचारिक पीळ जाणवतो आणि एक निश्चित अशी ठाम भूमिका जाणवते, ती नंतरच्या अनेक थोरामोठय़ांच्या लेखनात विसविशीत स्वरूपात दिसते. एखाद्या वाङ्मयप्रकाराचा किंवा साहित्यप्रवाहाचा उदोउदो करताना मांडलेल्या भूमिका अतिरेकी, एकांगी वाटू लागतात. याचे दुष्परिणाम असे जाणवू लागतात, की साहित्यनिर्मिती कच्ची, उथळ, आरोपसदृश्य होऊ लागते. एखाद्या भूमिकेची मांडणी सशक्त, ठाशीव, मुद्देसूद असेल तरच ती टिकते आणि योग्य तो परिणाम साधते. आक्रोश आणि आदळआपट स्थायी परिणाम साधत नाहीत. आपल्याकडे तर गंमत म्हणजे विरोधाच्या भूमिकाही कधी बावळट, तर कधी लडिवाळ असतात. म्हणजे कवी धूमिल म्हणतात तशा-
कि साख भी बनी रहे
काख भी ढंकी रहे
और मुठ्ठी भी तनी रहे..
पाब्लो नेरुदांनी भूमिका घेतली आणि प्राणाची किंमत मोजली. चिंचोळ्या गल्लीसारख्या चिली नावाच्या देशात अमेरिकेची निर्घृण, कावेबाज सीआयए आणि लष्करी हुकूमशहा जनरल पिनोचे यांच्या अभद्र युतीच्या विरोधात ते उभे राहिले. आपला लोकशाही मार्गाने निवडून आलेला अध्यक्ष मित्र अॅलेन्दे आणि त्याचे सरकार यांच्या बाजूने उभे राहिले. अनेक देशांत राजदूत म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांना तर कधीच संकोच नाही वाटला, की जग आपल्याला सरकारी कवी म्हणेल म्हणून! किंवा खाण कामगारांसमोर कविता वाचताना असा विचार नाही केला त्यांनी, की आपण बघे निर्माण करीत आहोत की श्रोते की रसिक? भूमिका ठाम आणि स्वच्छ असल्या की गोंधळ निर्माण होत नाही. आपण मात्र अवघ्या समाजजीवनावर प्रतिपल परिणाम करणाऱ्या राजकारण नावाच्या व्यवस्थेला जळमटासारखे झटकून टाकत असतो व शूचितेचा आव आणत असतो. किंवा आपले राजकीय आकलनही इतके वरवरचे, तात्कालिक असते, की आपण घेतलेल्या भूमिकाही त्यामुळे तकलादू वाटू लागतात.
जवळच्याच पाकिस्तानात लष्करशहामागून लष्करशहा येतात किंवा सत्ता बळकावतात तेव्हा हबीब ‘ज़ालिब’ नावाचा कवी निषेधाचे वा विरोधाचे कर्कश ढोल न वाजवता त्याची इतकी सुरेख खिल्ली उडवतो-
तुमसे पहले भी तो शख्स यहाँ तख्तनशीं था
उसको भी अपने खुदा होने पर इतनाही यकीं था
परिणाम? तुरुंगात रवानगी! उद्या पाकिस्तानात लोकशाही रुजली, वाढली, तर त्यात एक मोठा वाटा फैज़्ा अहमद फैज़्ा, हबीब ‘ज़ालिब’ यांनी घेतलेल्या भूमिकेचा आणि त्यासाठी योजलेल्या किमतीचाही असेल.
असा काही विचार करत असतानाच घाम पुसत अमुकराव आले.
‘काय झाले अमुकराव? काय नवे संकट?’
‘अहो नारायणराव, फार मोठा तिढा सोडवून आलो.’
‘अमुकराव, म्हणजे कमालच झाली. एरवी तुम्ही विचार करून करून तिढा अधिकच आडातिढा करता.’
‘नाही, यावेळी असे झाले की, आमच्या शेजारी एक शिक्षक राहतो. तो सकाळीच दहावीचे मराठीचे पुस्तक घेऊन आला आणि एकदम म्हणाला, अमुकराव, मी माझ्या भूमिकेशी प्रतारणा करणार नाही. मी म्हणालो, काय झाले सर? तर तो म्हणाला, या सर्व संतांच्या अभंगांमध्ये देव आहे, धर्म आहे. मी यापैकी काहीही मानत नाही. त्यामुळे मी ते शिकवणार नाही. मग काय? बरीच वादावादी झाली.’
मी म्हणालो, ‘अमुकराव, मग तिढा सुटला कसा?’
अमुकराव म्हणाले, ‘तेच सांगतो ना! मी त्यांना म्हणालो, तुमची भूमिका तुम्हाला लखलाभ आणि संतांची संतांना. पण तुम्हाला नोकरीवर यासाठी ठेवले आहे आणि पगार यासाठी मिळतो, की संत काय म्हणतात ते विद्यार्थ्यांना समजावून सांगायचे फक्त; आणि तुमची भूमिका तुमच्याजवळ ठेवायची. ती शेजाऱ्यांना सांगायची. असे नाही केले तर नोकरी जाईल, पगार मिळणार नाही. तेव्हा कुठे तो सरळ आला.’
मी म्हणालो, ‘वा.. वा, अमुकराव. कमाल केलीत तुम्ही. भूमिकाही शाबूत आणि तिढाही सुटला. अभिनंदन!’
अमुकराव म्हणाले, ‘पण माझी एक शंका दूर कराल का?’
मी म्हणालो, ‘आता काय आणखी?’
अमुकराव बोलले, ‘गिरीशभाऊंनी बिचाऱ्या अमिताभला का झोडपले?’
मी म्हणालो, ‘कोण गिरीशभाऊ?’
अमुकराव बोलू लागले.. ‘अहो, तुमचे ते मोठ्ठे कार्नाडसाहेब. नाटककार आहेत ते. आता अमिताभने काय चार पैसे कमावू नयेत का? गिरीशभाऊंनी म्हटलं असतं तर अमिताभने कर्नाटकचा अॅम्बेसेडर बनून त्यांची जाहिरात केली असती. त्याला पैसे मिळण्याशी मतलब. पण एक सांगा, तो गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची तर जाहिरात नाही करत ना? गुजरात काय नमोजींच्या मालकीचा आहे का? उद्या नमोसुद्धा दंगल प्रकरणात गुंतून जेलात जाऊ शकतात. कोणी सांगावे? एक डायलॉग मी ऐकला होता पाहा- वक्त की चक्की चलती बहुत अहिस्ता है, लेकीन पिसती बहुत बारीक है। आणि हे पाहा, असेही केव्हातरी होईल, की नमोजींच्या जागी दुसऱ्या पक्षाचे वेगळे मुख्यमंत्री येतील. पण ते लोक तर दिल्लीतील शिखांच्या कत्तलीत सहभागी असलेल्या पक्षाचे असतील तर? मग गिरीशभाऊ कोणती भूमिका घेतील? सहज मनात आलं म्हणून विचारलं. आणखी एक पाहा- गिरीशभाऊ म्हणाले की, सलीम-जावेद या मुसलमानांमुळे अमिताभ मोठा झाला. हे पहा- कोणाची जात काढू नये, तसा धर्मही काढू नये. जावेदसाहेबांनी काय सुंदर गाणी लिहिलीत पाहा. आणि सलीमसाहेबांनी किती सुंदर पटकथा लिहिल्यात. शिवाय त्यांच्या कुटुंबामध्ये मुस्लीम, हिंदू, ख्रिश्चन असा सुंदर मेळ आहे. सलमान खान घरात मांडलेला गणपती विसर्जन करायला निघाला तेव्हा पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सलीमसाहेब काय म्हणाले माहिती आहे? ‘गणेशभक्ती तो सलमान के खून में उसकी माँ के पेट से आयी है.’ अमिताभ काही माझा मावसभाऊ नाही आणि सलीम-जावेद काही माझे साडभाऊ नाहीत. पण वाईट याचं वाटतं की, मी सलीम-जावेद यांना कलावंत मानत होतो, पण गिरीशभाऊंनी त्यांना मुसलमान करून टाकलं. गिरीशभाऊ म्हणजे मोठा आणि प्रसिद्ध माणूस. मी लहान. चुकीचं बोललो असेन तर माफ करा, पण..’
मी गप्पच झालो. अमुकरावांच्या डोक्यात असं काही घोळत असेल याची मी कल्पनाही केली नव्हती. कोण बोलत होतं अमुकरावांच्या तोंडून? किंवा कोण कोण?
मी नुसतं पुटपुटत होतो.. विचार एके विचार, विचार दुणे भूमिका.. विचार त्रिक..
विचार दुनी भूमिका!
तमुक एका संस्थेने आयोजित केलेल्या परिसंवादात भाग घेऊ की नको? यांच्या हस्ते सत्कार स्वीकारू की नको? अन् माझ्या अध्यक्षतेखाली त्यांचा सन्मान आहे, अध्यक्षपद स्वीकारू की नको?.. असे अनेक प्रश्न अमुकरावांना अनेकदा पडतात. तसे पाहिले तर किती सोपे प्रश्न आहेत हे! मनाला पटले तर जावे, नाहीतर जाऊ नये. पण प्रश्न केवळ स्वत:च्या मनाचा असता तर अमुकरावांनी केव्हाच निर्णय घेतला असता.
First published on: 16-06-2013 at 12:38 IST
मराठीतील सर्व ऱ्हस्व आणि दीर्घ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Should i attend that program