सुचिता घोरपडे
‘‘पंचमी हब्बा उळदाव दिन नाक, अण्णा बरलील्ला याक करी याक..
नन्न तवरूरू गोकुलनगरा, मनी यंतात राजमंदिरा
नन्न अण्णा दोड्ड साहुकारा… अण्णा बरलील्ला याक करी याक.’’
सीमा भागातील या गाण्यातून एक माहेरवाशीण पंचमी चार दिवसांवर आली तरी भाऊ का आला नाही म्हणून मनातील गुजगोष्टी बोलून दाखवत आहे. श्रावणधारांसारखे तिचे मनही माहेराच्या आठवणीत भिजलेले आहे. सासुरवाशीण मुलीला तिच्या आई-वडिलांचा, भावा-बहिणींचा नेहमीच मोठा आधार वाटतो. आषाढातील एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंतच्या काळात लेकीसुनांना माहेरपण घडावं, त्यांनाही कामाच्या धबडग्यातून थोडी उसंत मिळावी आणि माहेराच्या अंगणात लहान होऊन मनमुराद बागडण्याची हौस पुरवली जावी यासाठीच तर हे सण-उत्सव साजरे केले जातात.
हेही वाचा : व्रणभरला ऋतू…
लोकसंस्कृतीतील चालीरीती, विधी-परंपरा, व्रत-वैकल्ये, श्रद्धा, सण-उत्सवसारख्या अनेक गोष्टी लोकजीवनाचे प्रमुख आधार असतात. किंबहुना असे म्हणता येईल की, आपल्या लोकसंस्कृतीचा उगमच मुळी या अशा लोकमानसातून तयार झाला आहे. केवळ श्रावणातीलच नाहीतर बऱ्याच सण-उत्सवांमध्ये स्त्रीप्रधानता दिसून येईल. आता नागपंचमीचेच उदाहरण घेऊ-
‘‘झाल्या सख्या गे गोळा,
गेल्या वारू गे खुळूशी,
हाणलं वनगाईचं शेण,
तेवढा जागाशी सारवला,
ठेवलान पानाचा गे विडा,
ठेवल्यान मूठभर भिजाणे,
गेवल्यान तंबीटाचा गोळा सर्व्या खेळाया लागला.’’
बेळगाव भागातील या गाण्यातून वारूळ पुजायला जाणाऱ्या सख्या-गडणींचे चित्र नजरेसमोर उभे राहते. बालपणीच्या अनेक आठवणींमधील ही एक सुरेल आठवण म्हणजे नागपंचमी. यावेळेस सकाळी कुंभाराकडून नागोबाची मूर्ती भोपळ्याच्या पानात ठेवून आणली जाते. भोपळ्याच्या पानातच का, तर त्याला बारीक काटे असतात जे मातीमध्ये शिरल्याने त्याला तडा जात नाही. घरी नागोबाचे पूजन झाल्यावर शेतात वारूळ पुजायला, झोके घ्यायला आतुर झालेल्या लेकी-बाळी तिकडे वारुळाची पूजा करून दूध, पोहे, बेदाणे वाहतात. त्या दिवशी घरी काही चिरलं, दळण-कांडलं, तळलं जात नाही. नागपंचमी म्हटले की घरोघरी नानाविध पदार्थांची रेलचेल दिसून येते. यात कुंबुळकाई फल्ले (भोपळ्याच्या पानाची भाजी), मुलंगी फल्ले (मुळयाची), तंबिट्टू म्हणजे तंबीटाचा लाडू, रागी उंडे, धपाटी, कडली उसळे (हरभऱ्याची उसळ), होळगी (पोळ्या), ओम पुडी, आळपुडी, आळ्ळद उंडे, उकडलेले कडबू, लाह्यपुड्यांचे मुटगे असे एकाहून एक चविष्ट आणि रुचकर खाद्यापदार्थांची नावे घेता येतील. सीमा भागातील निपाणीकडे रामलिंग यात्रा, आडी मल्लया यात्रा, बुदुलमुख सिद्धेश्वर यात्रा या तिसऱ्या किंवा शेवटच्या श्रावण सोमवारी भरतात. श्रावणातल्या सोमवारी दरवेळेस वेगळ्या धान्याची जसं तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू यांची शिवामूठही वाहिली जाते. श्रावणातील दर शुक्रवारी देवीचे पूजन करतात, ज्याला वरदलक्ष्मीचे व्रतही म्हणतात.
हेही वाचा : आम्ही डॉक्युमेंट्रीवाले : बदल घडण्यासाठी…
‘‘पड पड तू मेघराजा… पड तू झीरीमिरी…
माज्या बंधवाची शेती..पिकू जवारी नी तुरी…
पड पड तू मेघराजा… पिकू दे मूग राळा…
गुरांना गं चारा… बंधू हायी लेकुरवाळा.’’
श्रावणातील प्रत्येक सण-उत्सवांचे जर निरीक्षण केले तर ध्यानात येईल की, माहेरवाशीण असणाऱ्या निसर्गकन्यांचे आपल्या माहेराशी आणि सोबतच सर्जनशील भूमीशी एक जिव्हाळ्याचं नातं जडलेलं असतं. म्हणून तर ती श्रावणात पावसा-पाण्याची व्याकूळ होऊन वाट पाहत असते. कारण त्यांनतर मग तिच्या कथांसोबत तिच्या भावाचे शेतही बहरणार असते. तिच्या स्वप्नांना पंख फुटणार असतात. तिचं सासर-माहेर धनधान्यांनी भरून जाणार असते म्हणून ती म्हणते-
‘‘पाऊस झिरीमिरी बंधू माझ्याच्या उसावरी,
बंधू पिकू दे तुझा उस माझ्या डोरल्या लावी घस,
पाऊस झिरीमिरी बंधू माझ्याच्या साळ्यावरी,
बंधू पिकू दे तुझा मक्का माझ्या डोरल्यामदी टिक्का.’’
ऊन-पावसाचा खेळ करत श्रावण पुढे सरकत राहतो आणि नागपंचमी झाली की वेध लागतात ते गोकुळअष्टमीचे. यावेळी मंदिरांमध्ये बाळकृष्णाचा पाळणा सजवून आरती, भजन गायलं जातं.
‘‘गवळण सांगं गवळणीला, पुत्र झाला यसोदेला..
एकी म्होरं एक धावं, एक वाटं सुंटवडी..
अशी गलबल झाली, दासी जनी हेल घाली…
वान घेऊनिया ताटी, नंदाघरी झाली दाटी…’’
श्रीकृष्णजन्माष्टमीला जन्मकाळ सोहळा झाला की सुंठवडा वाटण्यात येतो. देवाला मोसरू अवलक्की, गोज्जू अवलक्की, हिरेकाई बोंडा, चुरमुरे, बुंदी, राजगिरा, पोह्यांचे लाडू असे विविध प्रकारचे नेवैद्या अर्पण केले जातात.
हेही वाचा : निमित्त : एकनिष्ठ वाङ्मय अभ्यासक…
नागपंचमी-कृष्णजन्माष्टमी या सणांच्या अगोदर काही दिवस किशोरवयीन मुलींसाठी मंगळागौरीसारखीच एक पूजा असायची. यात ‘गुळ्ळव्वा’ नावाच्या देवीची पूजा केली जात असे. ही पूजा करण्यासाठी कुंभाराकडून मातीची मूर्ती आणून करडे, गुंजा वगैरे लावून गुळ्ळव्वाला सजवले जाई. तिचा साज-शिणगार अगदी मन लावून मुली करत असत. आषाढातल्या दर मंगळवारी गुळ्ळव्वाची मोर, साप, विंचू, हत्ती, बैल अशा वेगवेगळ्या आकारात मूर्ती बनवून तिची पूजा केली जायची.
‘‘गुळ्ळव्वान गंडा, वणकी तुंडा… वैय्यं वैय्यं गुळ्ळव्वा गुळ्ळव्वा…’’
अशी गाणी गाऊन आनंद साजरा करण्याची गंमतच वेगळी. पण दर बुधवारी गुळ्ळव्वाला निरोप देताना मात्र मुली ‘‘ह्यांग सत्ते कुयंव्वा, निन्न गंड परदेशी, बळ्ळोळ्ळी बनदाग, उळ्याडी अळतानं.’’ म्हणत असताना उदास होत. या गुळ्ळव्वाचे रानावनात, शेतात विसर्जन करण्याच्या अगोदर त्यात खपली गहू टोचले जायचे. ज्याला श्रावण सोमवारपर्यंत कोंब यायचे आणि नागपंचमीला यातून उगवलेल्या पाना-फुलांचा साज मुली आपल्या केसात माळत असत. या पूजेबद्दलचा आणखीन एक संदर्भ ‘आठवणी आणि संस्मरणे’ या पुस्तकातही पाहायला मिळेल. जमखंडीमध्ये असताना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे त्यांच्या भगिनी जनाक्का शिंदे यांच्यासमवेत ‘गुळ्ळव्वा’ सजवून जन्नाक्कांसोबत खेळत असत ही गोड आठवण महर्षींनी आत्मपर लेखनात नोंदवली आहे.
सीमा भागात कोल्हापूरकडे नागपंचमी झाली की दुसऱ्या दिवशी श्रीयाळ षष्ठी ही पूजा केली जाते. श्रीयाळसेठचे अपभ्रंश होऊन शिराळसेठ असे नाव पडले. शिराळसेठचा वाडा, मूर्ती बनवून त्या मूर्तीला लांब मिश्या काढल्या जातात आणि त्याला रंगवून, सजवून त्याची पूजा केली जाते. श्रीयाळ राजाच्या अनेक दंत कथा प्रसिद्ध आहेत, पण औट घटकेचा राजा असणाऱ्या श्रीयाळसेठने दुष्काळात गोर-गरीब जनतेसाठी आपले धान्य कोठार खुले केले. अगदी स्वत:च्या अंगावरचे वस्त्रही दान करून तो जंगलात निघून गेला. या उदार राजाचे, त्याच्या दानशूरपणाचे स्मरण करण्यासाठी म्हणून नांगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी शिराळसेठची पूजा करून नैवेद्या दाखवला जातो. गाणी म्हटली जातात आणि संध्याकाळी त्याचे विसर्जन करतात. शिवलीलामृतमध्येही याबद्दलची एक कथाही आढळते.
चंदगडकडेही अजून एक वेगळी प्रथा आजही पाहायला मिळेल. श्रावणात नवीन लग्न झालेल्या मुलाच्या घरून नवऱ्या मुलीच्या घरी म्हणजे मुलीच्या सासरकडून मुलीच्या माहेरी एक लहान आकाराचा सजवलेला पाळणा पाठवला जातो. त्याच्या खाली पाच नारळाचे बेल्ले ठेवतात. लहान मुलांमध्येही सुक्या नारळाचे बेल्ले फिरवण्याचा एक खेळही खेळला जातो. या पाळण्यासोबत वेगवेगळ्या पदार्थांची दुरडीसुद्धा सजवून पाठवली जाते. जे पाळणा-दुरडी घेऊन येतात त्यांचेही आदरातिथ्य छत्र्या आणि आहेर देऊन खास पद्धतीने केले जाते. हौसेला मोल नसते हेही तितकेच खरे.
‘‘पिराच्या दरग्यात काय वाजतं रुणझुणं, लाडक्या बाळासाठी नवसाचं लोटांगण,
पिराच्या दरग्यात काय वाजतं रुणझुणं, गलिपा संगं मला नेलं बंधूजीनं,
पिराच्या दरग्यात सभा बसली फकिरांची, पयली कंदुरी माझ्या लाडक्या बंधूजीची.’’
श्रावणाच्या थोडे मागेपुढे सीमा भागात मोहरमचा सण साजरा केला जातो. इकडे बोरगाव गावची एक सर्वधर्मसमभाव जागृत करणारी परंपरा पाहायला मिळेल, जी ५०९ वर्षांपासून चालत आलेली आहे असे मानले जाते. या गावात एकही मुस्लीमबांधव नाही, पण तरीही गावातील सर्व लोकांकडून देवाची सवारी सजवली जाते. दंडवत घातला जातो. वाजत-गाजत नैवेद्या घेऊन येतात. खाई खेळली जाते. कारदगा गावातदेखील अशाच प्रकारे मोहरम साजरा केला जातो. बेरडाचे सोंग आणि इतर कलाविष्कार मोहरमच्या वेळी सादर केले जातात. इथे जात-पात न मानता अगदी एकोप्याने सण साजरा केला जातो.
हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : ‘स्व’च्या शोधातला टप्पा…
श्रावण-भाद्रपद या महिन्यात अनेक सण-उत्सवांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. गणेश चतुर्थीदरम्यान कुमारस्वामी पुजला जातो. या लोकदैवताला बऱ्याच ठिकाणी जोकमार, जोकाप्पा, जोक्या म्हणूनही संबोधले जाते. शंकर-पार्वतीचा तिसरा पुत्र म्हणूनही जोकमार ओळखला जातो. जसा यल्लमाचा जग असतो. तशा पद्धतीचा जोकमार देवाचा जग गावोगावी फिरवला जातो. यामध्ये एका बुट्टीत कडुनिंबाची पाने पसरून जोकमाराची मातीची मूर्ती ठेवतात. या मूर्तीच्या एका हातात तलवार दिसते. मोठे डोळे, धष्टपुष्ट देहाचा आणि धारदार मिशा असलेल्या जोकमाराची बैठ्या अवस्थेतील मूर्ती सजवून, रंगवून बुट्टीत बसवलेली असते. या मूर्तीच्या जननेंद्रियाचा आकारही मोठा असतो. त्याच्या तोंडाला लोणी लावले जाते. पाहताना हे जरी वेगळे वाटले तरी अनेक लोकदैवतेही अशीच कष्टकरी वर्गातील लोकांच्या मनातील श्रद्धा, भीती, विश्वास अशा अनेक गोष्टीतून या प्रथा-परंपरा उदयास आल्या आहेत. पण आपले पीक-पाणी चांगले असावे. संकटांपासून सुटका व्हावी अशा पद्धतीची या सगळ्याच्या पाठीमागे एक भाबडी श्रद्धा दिसून येते. या जोकमाराची मूर्ती असलेली बुट्टी म्हणजे जग फिरवून जोगवा मागितला जातो. बाजरी, आंबील, कण्या यांचा नैवेद्या दाखवतात. जोकमाराचे विसर्जनही वेगळ्या पद्धतीने होते. त्याची मिरवणूक काढून ती परिटाच्या दारी येते आणि मग तिथे त्यांच्या धुण्याच्या दगडावर जोकमाराचे डोके आपटून नदी, पाण्याच्या ठिकाणी त्याचे विसर्जन केले जाते. या मागे असणाऱ्या आख्यायिकाही तितक्याच प्रसिद्ध आहेत.
भूमातेची अनेक रूपे ही लोकदेवतांच्या रूपात पुजली गेली आहेत. वारूळ, कृष्णजन्माष्टमीचे गोकुळ, मातीचा बैल, श्रीयाळ सेठ, गुळ्ळव्वा, जोकमार, गणपती हे याच भूमीतील मातीपासून बनवले जातात. नागपंचमीला वारूळ पुजले जाते, त्या वारुळाची सुपीक माती शेतात पसरली जाते. म्हणजे श्रावणात मातीचे, सर्जनशील भूमीचे पूजन केले जाते. मुळात स्त्री आणि भूमी दोघीही सर्जनशील. त्यांची सर्जनक्षमता सुफलीकरण घडवून आणते, समृद्धी निर्माण करते, म्हणूनच तर कृषीसंस्कृतीमध्ये ही सुफलनशक्ती वाढत राहावी यासाठी सण-उत्सव साजरे केले जातात.
हेही वाचा : वैद्याक शोधकथांच्या ‘आतल्या गोष्टी…’
सीमा भागातील श्रावणानिमित्ताने अनेक गोष्टींचा आढावा घेता एक गोष्ट दिसून येईल ती म्हणजे, विविधतेतही एकता. कर्नाटक-महाराष्ट्र राज्यांमध्ये सांस्कृतिक, भौगोलिक वेगळेपण जरी दिसत असले तरी सीमा भागात कानडी-मराठी संस्कृती गुण्या-गोविंदाने नांदताना आढळून येईल. इथली भाषा वेगळी असूदे, प्रांत वेगळा असूदे. अगदी जात-धर्मही, पण तरीही माणसाच्या भूमीवरील श्रद्धा सारख्याच आणि लोकधारणाही सारख्याच. जर निसर्ग प्रांत-प्रदेश असा कधी भेदभाव करत नाही, तर मग मानवाने तरी का करावा. निसर्ग-भूमी, सूर्य, पर्जन्य या सगळ्यांशी मानवाचा एक अतूट बंध जोडला गेला आहे. म्हणूनच तर ऋतूबदल होत असताना त्याला सामावून घेण्यासाठी, सृजनाचा आनंद लुटण्यासाठी आणि सृजनोत्सव साजरा करण्यासाठी मन आसुसलेले राहते.
suchitapatilhll@gmail.com