हसरा नाचरा किंवा धुंदफुंद कवितांची ढगफुटी करणारा श्रावणमास ही सर्वमान्य कल्पना असली, तरी राज्यातील काही भागांत या काळापर्यंत पाण्याचा टिपूसही नसतो. कुठे या काळात जलधारांना नुकतीच सुरुवात झालेली असते, तर कुठे अतिकोरड्यामुळे वस्त्यांमधून चुलीचा धूर हरपतो. मूठभर पिठात रानभाज्या मिसळून वेळ ढकलावी लागते. गावाकडे रम्यकाव्य रूपात त्याचे अस्तित्व राहत नाही. मराठवाड्यातील कथाकाराचे ऋतुस्मरण आणि बेळगाव सीमेलगतच्या जिल्ह्यांत वावरलेल्या लोकसंस्कृती अभ्यासकाने या काळात तिथे चालणाऱ्या व्रतवैकल्ये, प्रथापरंपरेवर टाकलेला दृष्टिक्षेप…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बालपणाच्या गावाकडच्या आठवणींपासून ते पुस्तकाच्या पानांत आणि असंख्य कविता- गाण्यांत श्रावण आजवर भेटत आलाय. कधी हा श्रावण कोणाच्यातरी येण्याने बहरून आलेला, मोहरलेला… उस्ताद राशीद खानच्या आवाजात ‘आओगे जब तुम साजना… अंगना फुल खिलेंगे, बरसेगा सावन झूम झूम के’ या मिलनातुर ओळींनी साकळलेला भाव अधिक गहिरा करणारा… कधी काळोख दाटून आलेला आहे, तो सर्वांगाला लपेटून आहे. आभाळ झरतंय. कोणीतरी कोणाच्यातरी आठवणींनी व्याकुळ झालं आहे. या आठवणी सलत आहेत, छळत आहेत. बरसणाऱ्या धारा त्या आठवणींना आणखीच विकल, उदास करून टाकत आहेत. अशा वेळीची तगमग नुसरत फतेह अली खानच्या आवाजात ऐकू येणाऱ्या ‘सावन की भिगी रातों में’ या आर्त कोलाहलासारखी किंवा ना. धों. महानोरांच्या ‘अशा वलस राती… गळ्या शपथा येती’ या घुसमटीसारखी. अर्थात श्रावणाची ही ओळख कितीतरी नंतरची.

हेही वाचा : निमित्त : एकनिष्ठ वाङ्मय अभ्यासक…

कलकलत्या पांढुरक्या उन्हात डोळ्यांना खुपणारे उजाड डोंगरमाथे आणि त्यावर जखमेच्या व्रणांसारख्या टक्क दिसणाऱ्या दूरवरच्या पाऊलवाटा… दूरवर डोळ्यांना कुठेच हिरवा पट्टा दिसणार नाही असा रखरखीत भवताल. मातीवर दुडदुडत येणाऱ्या थेंबांनी हे चित्र काही दिवसांत बदलायचे. एका मोठ्या कॅनव्हॉसवर भराभरा रंगाचे फटकारे मारावेत तसे बदल घडत जायचे. खाचखळग्यांत पाणी साचलेल्या ठिकाणी हिरवळीचे ठिपके दिसू लागत. आता- आतापर्यंत उजाड दिसणाऱ्या डोंगरमाथ्यांवर हिरवी साय दिसू लागायची. दररोज त्यात बदल जाणवायचे. रांगणारे गवत वाऱ्याच्या झुळकीनं डोलायला, लहरायला लागायचं. आजूबाजूंनी हे सारे बदल घडत असताना पायवाटांचे व्रण मात्र जसेच्या तसे राहायचे- क्वचित दोन्ही बाजूंच्या लवंडणाऱ्या गवताने त्या झाकून जायच्या.

श्रावणात या चित्रात आणखी रंग भरले जातात. अनेक रंगांची रानफुलं दिसून येतात. पाहता पाहता रखरखीत भवताल रंगीबेरंगी दिसू लागतो. आधीचा धो-धो पाऊस बरसून गेलेला असतो. ओढे-नाले एक करणाऱ्या पावसाने अनेकदा झोडपून काढलेले असते, ताल धरलेला असतो. छप्परफाड दणका दिलेला असतो. आता मात्र तो असा चारीठाव कोसळत नाही. चौखुर उधळल्यासारखा सणसणीत येत नाही. श्रावणातल्या पावसात एक कमावलेली लय असते. म्हणूनच लय अंगात भिनल्यासारखा तो छाया-प्रकाशात थिरकायला लागतो. या पावसाला साथ असते ऊन- सावलीची, क्षणात पडणारे पिवळे धम्मक ऊन आणि क्षणात शिवाराच्या माथ्यावर सावली धरणारे ढग असा लपंडाव दिवसभर चाललेला असतो… श्रावणात सगळीकडे डवरून आलेली हिरवाई, भराभरा वाढलेले गवत, नाना रंगांची रानफुलं या सगळ्यांवर पाऊस अक्षरश: थिरकतो. एरवी कधी तो रिमझिमतो तर कधी बरसतो, कधी धसमुसळ्यासारखा कोसळतो, पण थिरकतो मात्र श्रावणातच!

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : ‘स्व’च्या शोधातला टप्पा…

सगळीकडेच श्रावणाचे हे उत्फुल्ल दर्शन घडायचे असे नाही. कधी कधी खूप दिवसांची झड लागलेली असायची. हाताला काम नसायचे, अशा वेळी गावातल्या गोरगरिबांच्या चुली पेटणंही मुश्कील होऊन जाई. झडी- पाण्याच्या दिवसांत अशा वस्त्यांमध्ये कुठूनच चुलीचा धूर दिसत नसे. क्वचित मूठभर पिठात रानभाज्या मिसळून ही वेळ ढकलली जायची. बाहेरची सर्दाळलेली हवा आणि पोटातला आगीचा खड्डा असा विचित्र अनुभव घेत माणसे अंगाचा मुटकुळा करून खोपटात पडलेली असायची. श्रावणात काय खावं, काय खाऊ नये यांसारख्या चर्चाविश्वाच्या हजारो मैल दूर असणारं हे जग होतं. अण्णा भाऊंच्या अनेक कथा कादंबऱ्यात अशा भुकेल्या वस्त्यांचे तपशील वाचायला मिळतात.

पुढे हसरा-नाचरा, धुंदफुंद आणि झिम्माड श्रावण पुस्तकांच्या पानांतून भेटला. कित्येक कवींच्या कवितांमधून त्याची सजलेली मोरपंखी रूपे पाहायला मिळाली. अनेक गीतातून ‘झुमके’ येणारा तो आधीच्या काही लोकगीतांतूनही पुन्हा नव्याने आकळू लागला. केवळ मराठीच नव्हे तर अनेक भाषेतल्या लोकगीतांमध्ये लोकजीवनातला श्रावण झिरपलेला आहे. गावाकडे अशा काही रम्य रूपात त्याचे अस्तित्व जाणवायचे नाही. रस्त्यात सगळीकडे झालेला चिखल, झड पावसातही चिखलातून वाट काढत रानात कामाला जाणारी बाया- माणसं… दिवसभर ऊन-पावसाचा लपंडाव चालायचा. पडता पाऊस अंगावर झेलत भिजलेल्या अंगानंच कामं चाललेली असायची. कपडे अंगावरच वाळायचे आणि पुन्हा ओले व्हायचे. एखाद्याच्या पायात जर चिखलातला दाभणी काटा रुतला, मोडला तर त्याची ठणक अंगभर जाणवायची. रात्री काटा मोडलेल्या ठिकाणी मेण लावून त्याला चटका दिला जायचा. ही आग अक्षरश: तळतळून प्राणांतिक उद्गार काढायला लावणारी असायची.

श्रावणातच गावात पोथ्या लावल्या जायच्या. गाव छोटं असेल तर एकाच ठिकाणी आणि मोठं असेल तर दोन-चार ठिकाणी त्या वाचल्या जायच्या. कुठे मंदिरात तर कधी कोणाच्या घरी… दिवसभर काम करणारी बाया-माणसं कंदिलाच्या उजेडात चिखलाचा रस्ता तुडवत पोथी ऐकायला यायची. पत्र्यावर पावसाचा तडतड ताशासारखा वाजणारा आवाज आणि पोथी सांगणाऱ्याची लय या दोन गोष्टी वेगळ्या वाटायच्याच नाहीत. दिवसभरच्या कामाने आंबून गेलेल्या माणसांचे हेही एक विसाव्याचे ठिकाण होते. जगण्यातला सारा अभाव भरून काढण्याची ती एक जागा असायची.

हेही वाचा :वैद्याक शोधकथांच्या ‘आतल्या गोष्टी…’

श्रावणातच सगळीकडे नागपंचमीचे झोके लागायचे. नागपंचमीच्या निमित्ताने येणाऱ्या माहेरवाशिणी… गावातल्या मोठमोठ्या झाडांना बांधलेले झोके आणि दिवसभर या झोक्यांवर भुई-आभाळाचा पाळणा अनुभवण्यासाठी लागलेली रीघ… नागपंचमीच्या दिवशी गावाबाहेर चिखलाच्या नागोबाला लाह्या वगैरे वाहून दर्शन घेण्यासाठी झुंबड उडालेली असायची. घरीही भिंतीवर काढलेल्या नागांची चित्रं… त्यांचे चुन्याच्या ठिपक्याने जिवंत होणारे डोळे, लाल काळ्या रंगातल्या बारीक काडीने काढलेल्या, लवलवणाऱ्या जिभा… हे चित्र घरोघर पाहायला मिळायचं. श्रावणात जास्त गजबज दिसायची ती पोळ्याच्या सणाला. आधी सुत कातणं, बैलांचा साज तयार करणं, संदुकात जपून ठेवलेल्या त्यांच्या घागरमाळा काढणं, आदल्या दिवशी बैलांची खांदेमळण… तूप आणि हळदीने त्यांचे खांदे मळणं. भिंतीवर, दाराच्या, देवळीच्या दोन्ही बाजूंनी चुना आणि गेरूने काढलेली चित्रं… एरवी दबून गेल्यासारख्या वाटणाऱ्या या भिंतीसुद्धा अशा चित्रांनी जिवंत व्हायच्या…

अशा अनेक गोष्टी श्रावणातच दिसायच्या. एरवी वर्षभर फक्त राबवणूकच. कलाकुसर आणि सणावारांचा विसावा दिसायचा तो फक्त याच महिन्यात. पावसाळा सुरू झाल्यानंतर पिकं जमिनीपासून वर उठायची. वाऱ्यावर लहरायची. साऱ्या शिवारात एक वेगळाच उग्र गंध पसरायचा. फोफावलेल्या गवताला ‘माजलंय’ असा शब्द त्यातूनच आला असावा. उन्हाळ्यातली रखरख, नंतर पावसाची वाट पाहणं, पिकं वाढीला लागणं, हंगाम हाताशी येणं-न येणं, त्याच्या नफ्या तोट्यावरून लावली जाणारी गणितं असं सगळं वर्षभराचं रहाटगाडगं असायचं, पण हा श्रावणाचा महिना मात्र इतर महिन्यांपेक्षा जरा वेगळा वाटायचा. जी माणसं एरवी कामाच्या रगाड्यात वर्षभर घाण्याला जुंपलेली असायची त्यांच्या आयुष्यातल्या काही क्षणांना श्रावण असा साज चढवायचा. मात्र जेव्हा पाऊस ताण द्यायचा, जमिनीला भेगा पडायच्या, पिकं कोमेजून जायची तेव्हा याच सगळ्या सण-उत्सवांवर काजळी चढायची. उरला-सुरला जगण्याचा कोंबही जळून जायचा. अशा वेळी साऱ्या श्रावणावरच काळोखी असायची. ही सुतकीकळा गावभर जाणवायची.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेंट्रीवाले : बदल घडण्यासाठी…

गावाकडे दिसणारा श्रावण हा असा होता. खूप उशिरा तो रंगीबेरंगी पुस्तकांमधून, कवितांमधून, गीतांमधून भेटायला लागला. गावाकडच्या माणसांच्या तो जगण्यातच मिसळलेला होता. त्याचे उठावदार आणि नितांत-रमणीय असे वेगळे अस्तित्व नव्हते. त्याला शब्दातून जोजावणं, मखरात बसवणं, त्याचा उत्सव करणं नव्हतं. केवळ हसरे- नाचरे विभ्रम एवढ्यापुरताही तो मर्यादित नव्हता.

aasaramlomte@gmail.com