नाटय़, चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेता अशी श्रीकांत मोघे यांची प्रामुख्याने ओळख आहे. ते चित्रकार आहेत, वास्तुविशारद आहेत, उत्तम सुगम संगीत गायकही आहेत; पण त्यांचे त्यांना जाणवले की अखेर आपण एक नट आहोत. त्यांचा साठ वर्षांचा कला-प्रवास त्यांनी त्यांच्या ‘नटरंगी रंगलो’ या पुस्तकामध्ये सांगितला आहे. मुंबईच्या ‘मत्रेय प्रकाशन’ने तो वाचकांसमोर आणला आहे.

सुरुवातीलाच श्रीकांत मोघे आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणतात, ‘‘आपले हे पुस्तक म्हणजे टिपिकल आत्मचरित्र नाही, तर आपल्या सहा दशकांच्या प्रवासाचे डॉक्युमेंटेशन आहे. आणि जे आपल्याला विश्लेषणात्मक सांगायचे आहे ते आपण केलेल्या भूमिकांच्या आधारे सांगावे, अशी आपली कल्पना आहे.’’
आई-वडिलांनी आपल्यावर कितीकिती आणि कसे संस्कार आपल्यावर केले ते श्रीकांत मोघे यांनी ‘राम गणेश-विमल संस्कार’ या अत्यंत हृद्य प्रकरणामध्ये सांगितले आहे. ‘आठवणीच्या माळ्यावर पडलेल्या’ त्या हकीगती आपल्यासमोर एका सुविद्य, सुसंस्कृत मध्यमवर्गीय कुटुंबाचे चित्र तिथल्या लहान-मोठय़ा सुख-दु:खांसह उभे करतात. पाठांतर, स्वच्छ-स्पष्ट शब्दोच्चार, उत्कृष्ट हस्ताक्षर आणि घटना उत्स्फूर्तपणे रंगवून सांगण्याची हातोटी असे खूप काही वडिलांकडून मिळाले, तर आपला सुरेल गळा आईचा वारसा असे ते मोठय़ा अभिमानाने सांगतात.
मग वर्णन येते त्यांच्या भ्रमंतीचे. किर्लोस्करवाडी, सांगलीचे विलिंग्डन महाविद्यालय, पुणे, दिल्ली आणि अखेर ते जिथे स्थिरावले ती मुंबई. अभ्यासाच्या व नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने झालेल्या मुशाफिरीतले अनुभव त्याना सांगावेसे वाटतात. पाप कमीच, पण भिरुपणाच जास्त हा माझा पुण्याचा स्वभाव बदलून दिल्लीत बिनधास्त झालो, हा त्यांचा अनुभव बोलका आहे.
पुस्तकाची खरी सुरुवात होते ती ‘नटाचे नटत्व’ या प्रकरणापासून. सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्जता या अभिनयाच्या पायऱ्या असल्याचे मोघे म्हणतात आणि पुस्तकात त्यांचा वेळोवेळी संदर्भ जागवितात. ‘‘वाङ्मयीन संस्कार नटावर होणं गरजेचं आहे. भूमिकांच्या प्रतिमेत न अडकून पडणं हे नटाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. असाही एक क्षण येतो की नट नाटककारापेक्षाही मोठा होतो. मराठी वाङ्मयाचा ओघ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे केवळ वाचनाने गेलेला नाही, तर कथनाने व श्रवणानेही गेला आहे. व्यक्तीचं आणि शब्दांचं अद्वैत झालं म्हणजे नटत्व, असे निमित्तानिमित्ताने प्रगट होणारे त्यांचे चिंतन हे या प्रकरणाचे विशिष्टय़.’’
‘पी. एल. नावाचा संस्कार’ या प्रकरणाचा सारांश मोघे यांच्याच शब्दांत असा आहे- ‘भक्त-भगवंताचं नातं’. ‘वाऱ्यावरची वरात’ या प्रयोगाच्या निमित्ताने मोघे यांना पुलंचा सहवास लाभला. त्याबद्दल किती सांगू असे मोघे यांना झालेले दिसते. इतके की, आपला जन्म ६ नोव्हेंबरचा तर भाईंचा ८ नोव्हेंबरचा अशीही जवळीक सांगायचा मोह त्यांना आवरत नाही. त्या प्रयोगाचे वर्णन पु. ल. ‘सहकुटुंब सहपरिवार’ असे करीत हा एरव्ही किरकोळ वाटणारा तपशील निर्माता-दिग्दर्शक-नटनटी आणि इतर सहकारी यांच्यामधले नाते कसे असावे ते सुचवितो आणि सूचक भाष्यही करतो. नाटकाची सुरुवात खूप अपेक्षा निर्माण करणारी असावी आणि पुढचा त्याचा प्रवास खूपच निराशाजनक व्हावा, तसे काहीसे इथून पुढे मोघे यांच्या पुस्तकाचे झाले आहे. नाटय़प्रयोगांमध्ये व चित्रपटांमध्ये मोघे यांनी केलेल्या भूमिकांबद्दल त्यांनी केलेले ‘विश्लेषण’ (हा त्यांचाच शब्द) हा या पुस्तकाचा खरा विषय. त्याचप्रमाणे ‘डॉक्युमेंटेशन’ करावे असाही एक उद्देश. त्यापकी काहीच इथे साधलेले नाही. एक तर मोघे नाटक-चित्रपटांच्या गोष्टी सांगतात आणि अनेकदा संवाद उधृत करतात.
श्रीकांत मोघे यांच्या बोलण्यामधून काहीच अर्थबोध होत नाही अशी वाक्ये या पुस्तकात जागोजागी आहेत. हे काही नमुने : कंट्रोल्ड अँिक्टग किंवा रिजिड अभिनय (पृ. ९१)- (दोन्हीचा अर्थ एकच आहे काय?). ‘‘शिवाजीराजांची लढाई मानवी पातळीवर नव्हतीच कधी. ती मानसिक पातळीवरही तितकीच होती.’’ (पृ.१६९)- (मानवी पातळी व मानसिक पातळी हा काय प्रकार आहे?). अभिनय हा मोघे यांचा प्रांत. ते लिहितात, ‘‘(अलेक्झांडरच्या भूमिकेत) आपण अधिक प्रमाणबद्ध कसे दिसू व त्याद्वारे मायबाप प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे कसे फेडू शकू यासाठी प्रयोगाआधी िवगेत चेस्ट एक्स्पानडरच्या साह्याने थोडा वॉर्मअप करत असू; त्यामुळे आमचा बांधा देखणा दिसत असे.’’ (पृ.१०१)- (प्रमाणबद्ध शरीर पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते काय? आणि प्रयोगाआधी िवगेत व्यायाम करून बांधा देखणा होतो काय?). ‘‘अलेक्झांडर म्हणून रंगमंचावर आल्याबरोबर प्रस्थापित होण्यासाठी मी नेमकं काय करीत होतो ते आता विचाराल तर ते मला नक्की सांगता येणार नाही. (पृ.१०१)- (नटाने काय केले ते त्यालाच सांगता येत नाही, याला काय म्हणावे?). ‘‘शेक्सपिअरच्या हॅम्लेटची छाया (रणजित) देसाईंच्या या (‘गरुडझेप’ नाटकातील) शिवाजीवर पडलेली दिसते.’’ (उदाहरणार्थ?). (कल्पना देशपांडे आणि दया डोंगरे) या दोन वेगळ्या स्वभावाच्या स्त्रिया (‘लेकुरे उदंड जाली’ या) नाटकामध्ये पत्नी म्हणून काम करण्यास मिळाल्यामुळे मलाही माझ्या अभिनयाचा बाज त्यांच्या रंगमंचावरच्या स्वभावाप्रमाणे थोडाफार बदलावाही लागला.’’ ( अतिशय चांगला मुद्दा; पण त्याचे स्पष्टीकरण एका अक्षराने मोघे देत नाहीत!). ‘‘ सई परांजपेनं (‘बिकट वाट वहिवाट’) हे नाटक फार हृद्य पद्धतीनं बसवलं.’’ (एक तरी उदाहरण?).
मोघे स्वकेंद्रित असल्याचे पुस्तक वाचताना जाणवत राहते. दिलीप प्रभावळकर, शंकर नाग, आशालता वागबावकर, दया डोंगरे, कल्पना देशपांडे, गणेश सोळंकी, डॉ. वसंतराव देशपांडे हे आणि तसेच नावाजलेले नटनटी मोघे यांच्याबरोबर निरनिराळ्या नाटकांमध्ये होते. पण त्यांच्या अभिनयाविषयी मोघे अवाक्षरही काढत नाहीत. स्वत:च्या देखणेपणाचा, पीळदार बांधेसूद देहयष्टीचा उल्लेख मात्र वारंवार करतात. याला ‘विश्लेषण म्हणत नाहीत आणि ते डॉक्युमेंटेशनही नाही. मराठी रंगभूमीच्या अतिशय धामधुमीच्या काळाचा एक भाग आणि साक्षीदार असलेल्या श्रीकांत मोघे यांनी त्या रंगभूमीवरील अनेक प्रश्नांचा ओझरताही उल्लेख केलेला नाही. ‘स्वकेंद्रित स्मरण रंजन’ असे पुस्तकाचे एकंदर वर्णन केले पाहिजे.
नटरंगी रंगले
श्रीकांत मोघे
मैत्रेय प्रकाशन
पृष्ठे- २०८, किंमत- २५० रुपये ल्ल