‘शुक्रतारा मंद वारा..’ हे गाणं तुम्ही- आम्ही ज्या जगात राहतो तिथलं नाही. ते उंच उंच गेलेल्या स्वच्छ, निळ्या आकाशामधलं गाणं आहे. तिथे गॅसची टंचाई नाही. मोलकरणींच्या दांडय़ा नाहीत आणि एफ.डी.चे हिशोबही नाहीत. ते जग अगदी स्वतंत्र, वेगळं आहे. तिथे चांदणं आहे, वारा आहे, प्रेमिक आहेत, जिवाला बिलगणारा गंध आहे. तिथे फुलं आहेत, स्वप्नं आहेत आणि भारलेला स्वरही आहे. कुणी त्या गाण्याला अती-स्वप्नील म्हणू शकतील; कुणी पलायनवादीही म्हणू शकतील. पण जशी जगण्याच्या वास्तवाशी भिडणं, झगडणं, विद्रोह मांडणं ही माणसाची मूलभूत प्रेरणा आहे, तशीच कोरडय़ा-करडय़ा जगण्यापाासून लांब जाणं, स्वप्नात हरवणं, प्रेमाचा विशुद्ध अनुभव घ्यायची इच्छा बाळगणं हीदेखील माणसाची एक मूलभूत प्रेरणा आहे. ‘शुक्रतारा..’ त्या सनातन स्वप्नसत्याचा सहजोद्गार आहे! हे गाणं तुमच्या- माझ्या जगापेक्षा, आत्ताच्या काळापेक्षा इतकं वेगळं आहे आणि तरीही ते अगदी आपलं हक्काचं आहे. एखादं गाणं जगण्याच्या इतकं जवळ येतं की त्याविषयी बोलताना नुसतं विश्लेषण करून भागत नाही, त्या विश्लेषणाच्या पुष्कळच मागे-पुढे ते पसरलेलं असतं. ‘शुक्रतारा ..’ हे अशा मोजक्या गाण्यांच्या मांदियाळीत बसणारं आहे.
किती र्वष माणसं हे गाणं ऐकत आहेत. केवढा काळ झरझर बदलत गेला; माणसाचे उठण्या-बसण्या-खाण्याचे संदर्भ बदलत गेले आणि मराठी गाणंही गेल्या पाच दशकात केवढं पालटत गेलं! तो बदल सगळ्यांनाच रुचलेला नाही. पुष्कळांना ‘जुनं ते सोनं’ असं मनापासून वाटतं. पण सगळंच जुनं ते सोनं नसतं. सगळंच नवं टाकाऊही नसतं. जुन्या गाण्यांमध्येही पुष्कळ गाणी टाकाऊ होती आणि नव्या संगीतामध्ये पुढे पुष्कळ र्वष तरेल असे प्रवाह आहेत. ‘शुक्रतारा..’ इतकी र्वष गाजतं आहे; वाजतं आहे, कारण ते मुदलात अस्सल आहे. कमअस्सल गोष्ट काळाच्या ओघात टिकूच शकत नाही आणि म्हणूनच कानाशी आय-पॅड लावून शकिरा किंवा मायकल जॅक्सन ऐकणाऱ्या आजच्या एखाद्या तरुणाला हे गाणं आवडतं-आवडू शकतं. कदाचित त्याला ते ‘त्याचं’ वाटणार नाही- कारण प्रेमाची जातकुळीच बदलावी असा काळाचा रेटा आहे. पण तरी ते त्याला आवडू शकतं आणि आजच्या तिशीवरच्या बहुतेक मराठी (आणि पुष्कळ अमराठी) रसिकांना तर आवडतंच आवडतं. जे आता वृद्ध आहेत, त्यांना हे गाणं आवडतं. कारण त्यांचा तारुण्याचा तुकडाच या गाण्यानं तोडून आणलेला असतो पुन्हा! सहज यू टय़ुबवर मी ‘शुक्रतारा..’ पुन्हा ऐकलं आणि ऐकता ऐकता व्हिडीओवरच्या कॉमेंट्स वाचल्या. बहुतांशी प्रतिक्रिया या भारावून लिहिल्यासारख्याच आहेत. ‘सुंदर’, ‘अप्रतिम’, ‘शब्द नाहीत’ इत्यादी विशेषणं रसिकांनी वापरली आहेत. पण काही काही प्रतिक्रिया किती वेगळ्या आहेत! मिसिसिपचे   डॉ. सुधीर यांनी म्हटले आहे की, ‘या गाण्यामुळे भारताची पुन्हा आठवण आली. आम्ही दक्षिण भारतीय आहोत; पण घरी मात्र मराठी बोलतो. कारण आमच्या तीन पिढय़ा मुंबईत झाल्या. माझी बायको आंध्रची आहे. तिला मराठी बरोबर येत नाही म्हणून तिला गाणं भाषांतरित करून ऐकवलं आणि तीदेखील ऐकून रडली.’ सुनील तांबे म्हणतात, ‘‘तबला- तो अरुण दातेसाहेब आणि सुधाताईंसोबत गातो.’’ कॅपवट या टोपणनावाची व्यक्ती एकदम तरुण असणार. कारण ती म्हणते, I just love this. स्टॅफर्ड पिंटो यांची प्रतिक्रिया अजून वेगळी आहे. ते लिहितात, ‘‘माझे बॉस दातेसाहेब हे बिर्ला ग्रुपमध्ये रीजनल एक्झिक्युटिव्ह होते. ते आम्हाला सर्वाना सारखं वागवायचे आणि एवढे मोठे गायक असूनही अतिशय साधे, सुस्वभावी होते. hats off to you sir. we really miss you.’’
इंटरनेटच्या परिप्रेक्ष्याची मजा अशी आहे की, तिच्यामुळे घटनेचे अनेक कोन सहजगत्या कळतात. ही शेवटची प्रतिक्रिया वाचून मला आश्चर्य वाटलं नाही. कारण निर्मळ, स्वच्छ माणूसच असं गाणं प्रभावीरीत्या गाऊ शकतो. अरुण दात्यांनी हे गाणं गाताना जो सहजभाव प्रकट केला आहे तो गाण्याच्या नव्हे, तर बरं माणूस होत जाण्याच्या रियाझातून केलेला आहे. त्यांच्या एकंदरीतच गायकीचं बलस्थान स्वरांची राजसत्ता हे आहे. त्यांचा सूर इतका निर्मळ, वाहता आणि स्वत:वर ताबा ठेवून असलेला असा आहे की, तो थेट आपल्या आत भिनतो. तानांवर ताना गाणारा गळा हा चमत्कृतीचा आनंद देऊ शकतो आणि तेही काही सोपं काम नाही. पण बौद्धिक कसरत करण्याची क्षमता असतानाही स्वत:च्या सुरांवर संयम ठेवणं ही त्याहून अवघड गोष्ट आहे आणि दाते या गाण्यात त्या, तशा जातकुळीचा संयम दाखवतात. त्यांचा आवाजाचा पोत आणि फिरत हे दोन्ही प्रमाणाबाहेर जात नाही. संपूर्ण गाण्यामध्ये एकदाही लोकसंगीतामध्ये ‘फेकतात’ तसा स्वर त्यांनी फेकलेला नाही. एकदाही, एकही अनावश्यक फिरत त्यांनी घेतलेली नाही आणि म्हणूनच ते गायन इतकं उठावशीर झालेलं आहे. कुठे लयीला धक्का देणं नाही, चकवणं नाही, कुठे शब्दाच्या उच्चारणावर अनावश्यक जोरकसपणा नाही- फार राजस गायकी आहे ही! पण हे गाणं काही एकटय़ाचं नाही. हे द्वंद्वगीत आहे. मुदलात सुधा मल्होत्रांनी गायलेलं हे गाणं नंतर अनुराधा पौडवालांनी गायलं आणि जाहीर कार्यक्रमात तर पुष्कळच वेगवेगळ्या गायिकांनी गायलेलं आहे, पण मूळ गाण्यापुरतं बोलायचं तर सुधा मल्होत्रा यांनाही संयमाची तीच अचूक समज या गाण्यामध्ये सापडलेली दिसते. गाणं पुष्कळ वर जातं, तेव्हा वरचे सूर कर्कश होत नाहीत आणि गाणं गुंगवत खाली खाली येतं, तेव्हा खालचे सूर अनावश्यक जाडय़ता टाळतात. अनुराधा पौडवालांची आणि सुधा मल्होत्रांची तुलना मला अनावश्यक वाटते, कारण दोन्ही रेकॉर्डिग्जमध्ये काळाचा आणि स्वरसमूहाचा पुष्कळ फरक आहे. बदललेलं अ‍ॅरेंजिंग, रेकॉर्डिगचं तंत्र हे गायकाचा गळाही कळत-नकळत घडवतं. फक्त अनुराधाबाईंच्या आवाजात या गाण्यामधला अगदी आत लपलेला उन्मादक धागा जास्त ठळकपणे प्रकट झाला आहे असं मला वाटतं. गाण्याच्या शेवटी गायक-गायिका एकत्र गातात तो टप्पा फार कौशल्यानं ध्वनिमुद्रित झालेला दिसतो. सुधाताई आणि दातेसाहेब हे दोघेही एकमेकांवर कुरघोडी न करता खरोखरीच आवाजात आवाज मिळवतात, नाहीतर खूपदा द्वंद्वगीत हे युद्धामधल्या द्वंद्वासारखं असतं आणि म्हणूनच आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे की, चांगला गायक हा गाण्यानिशी आपलं स्वर-रूप पालटतो. ‘भातुकलीच्या खेळामधले’ या गाण्यामधले जे अरुण दाते आहेत, ते इथे ‘शुक्रतारा..’च्या आसपासही फिरकत नाहीत! जसे ‘कमोदिनी काय जाणिजे’मधले श्रीनिवास खळे ‘शुक्रतारा..’पाशी फिरकत नाहीत! खळेसाहेबांचं संगीत हे विलक्षणच आहे. ते संगीत एकाच वेळी अवघड आणि सोपं असं आहे- फक्त गायकांसाठी नव्हे तर रसिकांसाठीदेखील!
माझ्या ‘नवे सूर अन् नवे तराणे’ या पुस्तकामध्ये मी खळ्यांविषयी लिहिलं आहे की, खळेसाहेबांच्या चाली हा मराठी संगीतामधला झगमगता रत्नजडित मुकुट आहे. त्यांच्या संगीताचं सौंदर्य हे मूलत: सुरांच्या चमत्कृतीपेक्षाही ताल आणि सुरांचं जे अवघड नातं त्यांनी घडवलं, त्यामध्ये आहे. खेरीज त्यांची गायकांची निवड ही फडक्यांपेक्षाही धाडसी आहे. ‘शुक्रतारा..’च्या संगीतामध्येही खळ्यांचे हे सारे विशेष दिसून येतात. ती चाल खळेसाहेबांच्या पुष्कळ चालींइतकी सकृद्दर्शनी तरी अवघड नाही हे खरं; पण तुम्ही गायला लागलात की, लगोलग त्या चालीचं अदृश्य काठिण्य तुमच्या ध्यानात येईल. साधं ध्रुवपदही गाणं हे अवघड काम आहे. म्हणजे सुरांचा आराखडा तसा सोपा आहे खरा; पण आराखडाच. त्याचं पक्कं बांधकाम तसंच्या तसं प्रतीत करणं ही कुठल्याही गायकासाठी अवघड गोष्ट आहे. खेरीज तो सुंदर ताल, किती निवांत, प्रसन्न लय या गाण्याला लाभली आहे! पहिल्या प्रथम रसिकांना भेटते ती ही लय. तीच त्याचा पुरा कबजा घेते, त्याला गुंगवून टाकते. त्या लयीचं नितळपण या गाण्याला उंचावतं, त्याला भक्कम आधार देत राहतं. अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा या दोघा गायकांचे गळे खळ्यांनी किती अचूकपणे वापरले आहेत! त्या दोन आवाजांची टक्कर होऊ न देण्यासाठी खळ्यांनी अजून एक काळजी घेतलेली दिसते. पुष्कळ द्वंद्वगीतांमध्ये एक कडवं गायकानं; एक गायिकेनं; मग दोघांनी आलटून-पालटून ओळी म्हणत तिसरं कडवं वगैरे रचना दिसते. इथे तुलनेने कडव्यांचे सांगीतिक चरण दीर्घ असूनही खळ्यांनी तो ‘आलटून-पालटून’चा प्रयोग केलेला नाही. ध्रुवपद पुरं पुरुषाचं, पहिलं आणि तिसरं संपूर्ण कडवी स्त्री- आवाजात आणि मधलं दुसरं कडवं पुरुषाचं असं सरळसोट काम खळ्यांनी जाणीवपूर्वक पार पाडलेलं दिसतं. फक्त सगळ्यात शेवटी दोन सूर एकत्र गातात. त्यामुळे आश्चर्यजनकरीत्या हे गाणं एकाच वेळी द्वंद्वगीताचा आणि ‘सोलो’ गाण्याचा प्रत्यय देतं. खळ्यांच्या संगीतामधली अभिजातता त्या चालीत नकळत उतरते आणि या गाण्याचा शृंगारिक धागा काबूत ठेवते.
या गाण्यात शृंगार आहेच; प्रेमाचे कानेकोपरे तपासणारा उन्मादही अदृश्यपणे घोटाळतो आहे, कारण अखेरीस हे गाणं चिरतरुण कवीनं- मंगेश पाडगावकरांनी लिहिलेलं आहे. अर्थात जसे ‘खेळ मांडियेला’मधले खळे इथे नाहीत तसे ‘सलाम’मधले किंवा ‘जिप्सी’मधले पाडगावकर इथे नाहीत. पाडगावकरांचे शब्द हे संगीताच्या लयीला कधीच विसंगत नसतात. खरं तर, ‘सलाम’सारख्या त्यांच्या मुक्तछंदामधल्या कवितेमध्येही अंत: संगीत लयीत खेळत असतं. ‘शुक्रतारा..’ तर बोलून चालून गाणं! त्याचे शब्द साधे, सोपे, सहज आहेत, पण त्यामागचं संवेदन मात्र तितकं सोपं नाही. एक गती त्या शब्दांमधून अंतापर्यंत फिरत जाते. हे गाणं प्रेमिकांनी तलावाच्या काठावर बसून म्हटलेलं नाही- त्यात एक प्रवास आहे. ‘चांदणं पाण्यातून’ वाहत जातं, डोळ्यांत डोळे ‘मिसळत’ राहतात; ‘गंध पवनाला वहा’ असं ती त्याला सांगते. हवा स्तब्ध राहत नाही तर ‘स्पंदनाने थरारते’. ‘स्वप्नात’ ती त्याला ‘शोधते’, जीव सुखाने स्तिमित होऊन उभा राहत नाही तर ‘फांदीसारखा वाकतो’..
एक विलक्षण चैतन्यमयी हालचाल, जाग या गाण्यामध्ये आढळते. तीच जाग आपल्याला साद घालते, बोलावते. आपल्याला हे असं, अशा तऱ्हेनं कळत नाही, पण तो ओढा आपल्यालाही वाहवत नेतो आणि म्हणूनच ती तरुण मुलगी यूटय़ूबवर हे गाणं ऐकून म्हणते- I Just like this. कारण आपण ‘का लाइक’ करतोय हे कोडं चटकन उकलत नाही- आपण ‘लाइक’ करतोय हेच उरतं!
मला मात्र हे गाणं ऐकल्यावर शेवटी जाणवतो तो शोक! साऱ्या सुखनिधानामागे वसून राहिलेला शोक. पाडगावकरांच्या किती कवितांमध्ये तो नकळत आहे! शेलेनं म्हटलंय ना – ’’Our sweetest songs are those that tell of saddest thought.’’
‘शुक्रतारा..’ शेलेच्या कसोटीला उतरणारं अतिमधाळ, तरी शोक वाहणारं गाणं आहे. एकाच वेळी काहीतरी मिळाल्याची आणि गमावल्याची भावना हे गाणं ऐकल्यावर येते. अर्थात हे जाणवायला ते तितक्याच उत्कटतेने ऐकायला हवं. पु. शि. रेग्यांच्या थाटात सांगायचं तर आपणच गाणं व्हायचं! (जिज्ञासूंनी ‘सावित्री’ पाहावं.) सुदैवाने, तसे पुष्कळ रसिक गेले कैक र्वष या गाण्याला भेटले आणि हे गाणं सफळ, संपूर्ण झालं.
किट्स, वर्डस्वर्थचा रोमँटिक काळ मराठी भावसंगीतानं पुन्हा खेचून आणला आणि फडके, खळे, शांताबाई, गदिमा आदी मंडळींनी तो वाढवला-फुलवला (खेरीज बायरॉनिक हीरोसारखा एक हृदयनाथ त्या चळवळीत होताच) हे मराठी भावसंगीताचं ‘रोमांचपर्व’ नानाविध भावगीतांमधून आणि चित्रपटगीतांमधूनही प्रकट होत राहिलं आणि रसिकांचे कान तृप्त करीत राहिलं. ‘शुक्रतारा..’ हे  त्या पर्वाचं बोधगीत आहे! काळ पुष्कळ पुढे सरकला, जगण्याचं रोमांच हरवून गेलं, गाणं चाचपडत पुढे गेलं आणि भविष्यामध्ये अजून वेगळं वळण मराठी गाणं घेईल. ‘शुक्रतारा..’ मावळेल? कधी? -कुणी उत्तर द्यावं? पण त्यानं पसरलेली चंदेरी आभा मात्र फार अस्सल, फार जिवंत होती, यावर कुणाचं भविष्यातही दुमत असणार नाही.

Trending video boy from village singing song of nathicha nakhara goosebumps came on people after listing his song viral video
“नथीचा नखरा नऊवारी साडी” शाळकरी मुलाच्या गाण्यानं अख्ख्या महाराष्ट्राला लावलं वेड; सूर असा की अंगावर येतील शहारे, VIDEO पाहाच
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
an old lady enjoying Ropeway by wearing nauwari
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे! नऊवारीत मराठमोळ्या आज्जीने घेतला रोप वे चा आनंद; व्हिडीओ होतोय व्हायरल
This is real patriotism The national anthem is sung every morning at rameshwaram cafe in Hyderabad Watch the beautiful
“हीच खरी देशभक्ती!” हैद्राबादमधील या कॅफेमध्ये रोज सकाळी गायले जाते राष्ट्रगीत! पाहा सुंदर Video
Girlfriend write message for boyfriend on 50 Rs Note goes Viral on social media
PHOTO: “तुझा पैसा नको प्रेम हवं, तू बसच्या मागे…” तरुणीनं ५०च्या नोटेवर बॉयफ्रेंडसाठी लिहला खतरनाक मेसेज; वाचून पोट धरुन हसाल
chandrika new song sonu nigam sangeet manapman
सोनू निगमने मराठी गाण्याने केली नवीन वर्षाची सुरुवात, ‘संगीत मानापमान’ मध्ये गायलंय ‘चंद्रिका’ गाणं; पाहा व्हिडीओ
kaka dance on marathi song bai g pichali Majhi bangadi goes viral on social media
“बाई गं पिचली माझी बांगडी बांगडी” मराठमोळ्या गाण्यावर काकांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Beautiful dance performance by barkat arora
‘हिच्या डान्सपुढे हिरोईनही पडेल फिकी…’; बघाल तर बघतच राहाल चिमुकलीचा डान्स; पाहा VIDEO
Story img Loader