‘शुक्रतारा मंद वारा..’ या अवीट गोडीच्या भावगीताला नुकतीच पन्नास र्वष पूर्ण झाली आहेत. मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले आणि अरुण दाते यांनी गायलेले, हे गीत गेली पाच दशके रसिक श्रोत्यांच्या मनात घर करून आहे. भावगीतांच्या बहराच्या काळात लोकप्रिय ठरलेल्या या गीताची मोहिनी अजूनही कायम आहे. तिचा मागोवा घेणारे हे दोन विशेष लेख.
कविवर्य मंगेश पाडगांवकर यांनी लिहिलेलं आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं ‘शुक्रतारा मंद वारा..’ हे गाणं मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मी शाळेत जात होतो. माझी बहीण मीना त्यावेळी मेलडी मेकर्स वगैरे ऑर्केस्ट्रात गात असे. तीही शाळेत जात होती. तिला सोबत म्हणून मी तिच्यासोबत ऑर्केस्ट्राला जात असे. तेव्हा सगळ्या ऑर्केस्ट्रातून ‘शुक्रतारा मंद वारा..’ हे गाणं असे. या गाण्याचं वैशिष्टय़ म्हणजे ते पहिल्यापासूनच हिट झालेलं होतं. प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते गायलं जाई. आजही या गाण्याशिवाय ‘सारेगम’ किंवा गाण्यांचा इतर कुठलाही रिअ‍ॅलिटी शो पूर्ण होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ ‘शुक्रतारा मंद वारा..’चा शुक्र फार पॉवरफुल असणार यात शंका नाही.
‘शुक्रतारा..’ जेव्हा पहिल्यांदा प्रसारित झालं, तो काळ भावगीतांच्या परमोच्च लोकप्रियतेचा होता. लोकांना छान निवांतपणा होता. व्यक्तिगत नातेसंबंधांत ओलावा होता. एकमेकांविषयी प्रेम आणि आपुलकी असण्याचा तो काळ होता. माणसं एकमेकांच्या भावनांना जपत. प्रेमाकडे रोमँटिक नजरेनं पाहिलं जाई. त्यात शारीरिकते- पेक्षा त्याग, समर्पण, एकमेकांना समजून घेणं, दुसऱ्याच्या सुखात सुख आणि दु:खात दु:ख मानणं होतं. संगीत, कला आणि साहित्याबद्दलची ओढ होती. काहीशी भाबडी, भावुकताही वातावरणात होती. म्हणूनच भावगीतांचा सुवर्णकाळ या काळात अनुभवायला मिळाला. याचा फायदा गीतकार, गायक आणि संगीतकार असा सर्वानाच झाला. भावगीतं ऐन बहरात आली. त्यांना धुमारे फुटले.
कुठलंही गाणं जमून येण्यासाठी गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्यात परस्परांबद्दल चांगली समज असावी लागते. विशेषत: कवी आणि संगीतकार यांच्यात उत्तम टय़ुनिंग जमावं लागतं. उत्तम गाणं जमून येणं हे त्यांच्यातल्या या मैत्रीचंच प्रतीक असतं. त्या काळी वसंत प्रभू, बाबूजी (सुधीर फडके) यांची भावगीतं लोकप्रिय होती, ती यामुळेच. त्यात या दोघांची किंवा अन्यही संगीतकारांची जास्तीत जास्त गाणी असत, ती बहुधा केरवा आणि दादरामध्ये. या पाश्र्वभूमीवर ‘शुक्रतारा मंद वारा..’ हे गाणं रूपक तालामधलं आहे. त्यामुळे त्याचं वेगळेपण श्रोत्यांना विशेष भावलं. तशात हे गाणं सर्वसामान्य श्रोत्यांना सुपरिचित असलेल्या यमन रागावर आधारित होतं. पाडगांवकरांचे सोपे, अर्थवाही, नादमयी शब्द आणि श्रीनिवास खळ्यांची तितकीच सोपी चाल आणि सुटसुटीत स्वररचना..गाण्यात हरकतीही फारशा नव्हत्याच. त्यामुळे लोकांना ते गुणगुणावंसं वाटणं स्वाभाविक होतं. एखादं गाणं हिट होण्यासाठी ज्या गोष्टी जुळून याव्या लागतात, म्हणजे चांगली सुरावट, भाववाही शब्दरचना, सहज ओठांवर येईल अशी चाल, ऑर्केस्ट्रेशन- असं सगळं काही या गाण्याच्या बाबतीत सहजगत्या जुळून आलेलं होतं. या गाण्याचं ऑर्केस्ट्रेशनही थोडंसं आगळं आहे. त्या काळी गाण्यांकरता सहसा चार वा पाचच वादक वापरत. ‘शुक्रतारा..’मध्ये व्हायोलिन वगैरे वापरल्याने त्यात सिनेमाचा आवाका आला..एकप्रकारचा भरीवपणा आला.
दुसरी गोष्ट म्हणजे गायक अरुण दाते यांचं नाव तोवर तितकंसं लोकांपर्यंत पोचलेलं नव्हतं. ‘शुक्रतारा..’ने त्यांना गायक म्हणून ओळख दिली. आजही त्यांचं नाव या गाण्याशी एवढं जोडलं गेलेलं आहे की, ‘शुक्रतारा..’ म्हटलं की त्यासोबत अरुण दाते हे नाव ओघानं येतंच. तेच गायिका सुधा मल्होत्रांच्या बाबतीतही. एका अमराठी गायिकेचा आवाज हेही या गाण्याचं वेगळेपण होतं. आज जसं शंकर महादेवनने मराठी गाणं गायलं की त्या गाण्यात एक वेगळं टेक्श्चर येतं, तेच त्याकाळी सुधा मल्होत्रांच्या आवाजानं ‘शुक्रतारा..’ला दिलं.
आणखीही एक गोष्ट म्हणजे त्याकाळी रेडिओ हे एकच माध्यम असल्याने आणि त्यावरील निरनिराळ्या कार्यक्रमांतून हे गाणं सतत श्रोत्यांच्या कानावर पडत राहिल्यानं ते अधिक लोकांपर्यंत पोचलं. त्यातल्या गोडव्याने ते त्यांच्या मनात घर करून राहिलं. आणि आज तीन पिढय़ांनंतरही ते तितकंच ताजंतवानं राहिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा