-श्याम मनोहर
छोट्या कच्च्या घरातली एक खोली. अंधार.
तरुण तिथे येतो. तरुण अर्धी चड्डी आणि बनियनमध्ये. दिवा लावतो. तरुणी जुन्या गाऊनमध्ये हाताने वारा घेत सतरंजीवर बसलेली.
तरुण- काय झालं?
तरुणी- (हाताने वारा घेत) लय उकडतंय. झोप नाहीय येत.
तरुण- एक्केचाळीस टेम्परेचर आहेय.
तरुण तरुणीजवळ बसतो. तिच्या खांद्यावरनं एक हात टाकतो. तरुणी त्याचा हात झिडकारून बाजूला टाकते.
तरुणी- अंगाला हात नको लावूस, गरम होतंय.
तरुण तरुणीपासून थोडे लांब सरकतो.
तरुण- आता थंड वाटतेय?
तरुणी- फ्रिजसारखं थंड वाटतंय!
तरुण- हा गाऊन अंगावरचा- उन्हाळ्यात कुचकामाचा असतोय. साडीच झ्याक. पदरानं वारा घेता येतो.
तरुणी- बायकांनी पुरुषांप्रमाणे बनियनच घालायला पायज्ये.
तरुण- तो पोषाख निरूपयोगीच असतोय. उघड्या अंगाला जास्त गरम होतं.
तरुणी- पुर्र उघडं झालं तरी मग जास्तच गरम होणार.
तरुण- जास्तच गरम होणार.
तरुणी- काही तरी गोड गोड बोल बरं झोप येईपर्यंत.
तरुण हसतो.

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : माझ्या आयुष्यातील रजतयोग!

great leaders, Study , Haritatya ,
ऊब आणि उमेद : माझ्यातले हरितात्या…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Sturggle Story
“शर्यत धावण्याची असो किंवा आयुष्याची…संघर्ष रडवतो पण इतिहास घडवतो!” चिमुकलीने केलं सिद्ध, Viral Video देतोय जगण्याची प्रेरणा
bmc commissioner bhushan gagrani express view about bmc fd
मुदतठेवींबाबत चिंता नाही! नियोजन न केल्यास मात्र आर्थिक चणचण, मुंबई पालिका आयुक्तांचा इशारा
Kshitee Jog
“सरसकट निर्मात्यांना अक्कल नसते….”, क्षिती जोग निर्माती होण्याआधी ‘असा’ करायची विचार; स्वत:च सांगत म्हणाली, “हेमंत फार हळवा होऊन…”
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar make cold coffee for spardha thigle
‘प्रेमाची गोष्ट’ फेम अपूर्वा नेमळेकरने नव्या मुक्तासाठी केली ‘ही’ खास गोष्ट, स्वरदा ठिगळे फोटो शेअर करत म्हणाली…
these zodiac signs who easily break their partners hear
दुसऱ्यांचे मन दुखावण्यात आणि ब्रेकअप करण्यात तरबेज असतात ‘या’ ३ राशींचे लोक! स्वभावाने असतात हट्टी अन् रागीष्ट

तरुणी- हसू नकोस. गोड बोल.
तरुण- आसं एकदम गोड कसं बोलता यील? मूड हवा ना? विषय हवा. काही तरी असल्याशिवाय गोड कसं बोलता यील?
तरुणी- मग भांडण काढ.
तरुण- (दोन्ही गालावर दोन्ही पंजांनी हल्के मारून घेत) भांडण आता बापजन्मी नायी. तू म्हणालीस दारू सोड. सहा महिने झालं. सोडली. सुटली कायमची. तू म्हणालीस- मित्रांच्यात जायचं नाही, बंद. भांडण… गेलं आभाळापलीकडे ब्लॅक होलमधे. भांडण नकोच.
तरुणी- तू भांडण काढलं नाहीस तर मी भांडण काढत्ये.
तरुण- नको, लाडके… नको भांडण. मी एकशे अठरा घरी दुधाच्या पिशव्या टाकतो, तू सात घरी धुण्याभांड्याची कामं करतीस… आपण कष्ट करतो. आहे त्यात आनंदानं जगायचं. भांडण नको.
तरुणी- बरं तर, आनंदाचं बोल. टाइमपास कर. लई उकडतंय, झोप येत नाहीय. सुचतंय आनंदाचं बोलायला? नाही सुचत ना? मग भांडण काढू या. भांडणात खूप आपोआप टाइमपास होतो. मी काढते भांडण.
तरुण- (हसत) तुला भांडण काढताच येणार नाही. तू गरीब स्वभावाची आहेस.
तरुणी- मी गरीब स्वभावाची असं म्हणून माझा अपमान करू नकोस.
तरुण- चिडू नकोस, तुझा अपमान यापुढे कध्धी करणार नाही.
तरुणी- गरीब स्वभावाची की चांगल्या स्वभावाची की वाईट स्वभावाची. उकडायचं बंद होत नाही.
तरुण- हे खरंय.
तरुणी- मी काढते भांडण.
तरुण- नको, नको राणी.
तरुणी- गोड बोलता येत नाहीय, आनंदाचे येत नाही, भांडण नको, झोप येत नाहीय, उकडताय. टाइमपास कसा करायचा? नुस्तं जागता येतं? नुस्तं जगता येतं? माणसाला भांडण आपोआप येतं.

आणखी वाचा-चित्रसंस्कार, दृश्यश्रीमंती आणि सांस्कृतिक अवकाश

तरुण- नको, नको भांडण, नको भांडण.
तरुणी- (खूप हसून) मी भांडण काढणार आहे… तुझ्यावरून नाही, तुझ्या आईवडलांवरनं, बहिणीवरनं… नाही, आपण आपलं सोडून भांडण काढते. भांडण आपल्या आपल्यात. पण आपले सगळे सोडून.
तरुण- (मोकळे वाटून) खोटं खोटं भांडण!… चालेल.
तरुणी- खोटं खोटं भांडण. टाइमपास. खोटं भांडायचं, दमायचं, मग झोप येईल.
तरुण- मग झोप येईल.
तरुणी दोन भांडी पाणी पिते, तरुण दोन भांडी पाणी पितो. तरी येरझारा घालू लागते. तरुण उठतो. करंगळी दाखवून आत जातो. बसतो. तरुणी येरझारा घालतेय. तरुण पुन्हा आत जातो. परततो. बसतो. तरुणी येरझारा घालतेय. थोड्या वेळाने तरुण पुन्हा आत जातो. परततो. बसतो. तरुणीच्या येरझारा चालूच. तरुण उठतो. आत जाऊ पाहतो…
तरुणी- नको जाऊस (तरुण थांबतो). एवढ्यातल्या एवढ्यात तीनदा लघवीला जाऊन आलास. टेंशन घेतोयस. नको जाऊस. बैस.
तरुण बसतो. पाणी पिऊ लागतो.
तरुणी- उगाच जास्त पाणी पिऊ नकोस. लघवीला लागेल. टेंशन घेऊ नकोस. खोटं खोटं भांडायचेय.
तरुण- (कापत) खोटं खोटं भांडायचेय, टेंशन नको यायला.
दोघं काही वेळ गप्प.
तरुणी- (थांबून, कुठे तरी बघत) पंध्रा लाख.
तरुण- (गोंधळून) पंध्रा लाख?
तरुणी- पंध्रा लाखाचं… आठवतंय?
तरुण- (कापत) नाही… काय?
तरुणी- आठव.
दोघे गप्प.

तरुणी- आठव, जोरात आठव. छान टाइमपास होईल.
तरुण- (आठवायचा प्रयत्न करून) नाही…, नाही आठवत.
तरुणी- पंध्रा लाख… कुणी बोललेलं… आठवतेय?
तरुण- नाही कुणी बोलले… आठवत.
तरुणी- आठव, आठव… तू दुधाच्या पिशव्या पोचवतोस. तिथले कुणी? आठव.
तरुण- पंध्रा लाख… नाही कुणी बोललेलं.
तरुणी- ते मग काय बोलतात? आठवतंय एखादे?
तरुण- तसे माझ्याशी कुणी बोलत नाही. पिशवी द्यायची, निघायचे. हा, परवा ससाणेसाहेब मोबाईलवर बोलत होते.
तरुणी- काय बोलत होते?
तरुण- म्हणत होते, आपल्या हयातीत तीनशे सत्तर रद्द झाले, आपल्या हयातीत राम मंदिर झाले, आता पीओके आपल्या हयातीत ताब्यात यायला हवं. आपल्या आयुष्याचे सार्थक होईल.

आणखी वाचा-म्हणा…

तरुणी- तुला छान नीट आठवले. क्लू आलाय तुला. आता पंध्रा लाख आठव.
तरुणी बसते. तरुण उठून येरझारा घालू लागतो.
तरुणी- पंध्रा लाख… आठव.
तरुण- नाही आठवत.
तरुण- आत जायचं करू पाहतो.
तरुणी- नको जाऊस. टेंशन नको घेऊस. आठव.
तरुण- (चाचरत) नाही.
तरुण- मानेने अनेक वेळ नाही दाखवत राहतो.
तरुणी- (उठून) ऐक. (तरुण तिच्यासमोर उभा) आपल्याला, देशातल्या प्रत्येकाला पंध्रा लाख रुपये मिळणार होते.
तरुण- (आश्चर्याने) आपल्याला पंध्रा लाख रुपे मिळणार होते?
तरुणी- आठवत नाही? विसरलास का? आठव. आठवच. नाहीतर मला राग येईल.
तरुण- खोटा खोटा राग ना?
तरुणी- ते नंतर. आठव, आठव. नाहीतर मला भयंकर राग येईल.
तरुण- (गडबडून) ते आपल्याला देशातल्या प्रत्येकाला पंध्रा लाख रुपे देणार होते. आठवले. रागावू नकोस. भयंकर रागावू नकोस.
तरुणी- ते, ते देणार होते. ते कोण आठवतंय?
तरुण- (चाचरत) नाही आठवत असे नाहीय.
तरुणी- कोण मग? नाव सांग.
तरुण- नाव… भीती वाटतेय सांगायची.
तरुणी- खरी भीती? की खोटी खोटी?

तरुण- गोष्ट वाचताना गोष्टीत भीतीदायक प्रसंग आला की वाचताना भीती वाटते तशी भीती वाटतेय.
तरुणी- नाव नाहीच घ्यायचे. येतील त्या भावना येऊ देत. येणारच, मला एक गंमत वाटतेय. पंध्रा आकडा कुठून आला? बघ. वर्षांचे किती महिने?
तरुण- बारा.
तरुणी- महिन्याचे दिवस किती?
तरुण- तीस किंवा एकतीस.
तरुणी- आठवड्याचे दिवस?
तरुण- सात.
तरुणी- म्हणजे पंध्रा आकडा कुठेच नाही.
तरुण- आहे.
तरुणी- आहे? कुठे?
तरुण- महालाचा पंधरवडा असतो. भाद्रपदात.
तरुणी- आहाहा? महाळ! नात्यातल्या वारलेल्यांना बोलवायचे. खिरीचे जेवण करायचं. पंध्रा लाखाचा महाळ करायचा. ते देशातल्या प्रत्येकाला पंध्रा लाख रुपे देणार होते. दहा वर्षे झाली. नाही. महाळ पंध्रा लाख रुपयाचा नाही करायचा. पंध्रा लाख रुपे जीवंत ठेवायचे. पंध्रा लाख रुपे आपण मिळवायचे. तू म्हणतोस, मी गरीब स्वभावाची. नाही. मी गरीब स्वभावाची नाही आता. आता तू कणखर स्वभावाचा.
तरुण- (चाचरत) नाही. कबूल करतो.
तरुणी- आता तू आपल्या गोष्टीत कणखर स्वभावाचा.
तरुण- खोटे खोटे. मी कणखर स्वभावाचा!
तरुणी- तू त्यांच्याकडून आपले, तुझे पंध्रा लाख रुपे मिळवायचे.
तरुण- कल्पनेतून. तरुणी- हो, कल्पनेतून. कल्पना जुळली, तर खऱ्यातही करायचे.
तरुण- खऱ्यात जुळलं तर आपले दुधाचे दुकान होईल. बेकरीचा मालही ठेवायचा. अजूनही माल ठेवायचा. व्वा! दुधाच्या पिशव्यांची हिंडाहिंड बंद होईल. एका ठिकाणी राहायचे. स्वत:च्या दुकानात काऊंटरशी खुर्ची टाकून. तुझी कामेही बंद. आनंदात जगायचे. गोड बोलायचे. झोपडपट्टी सोडायची. फ्लॅट घ्यायचा. सगळ्या खोल्यांत पंखे, एसीदेखील. त्यांनी पंध्रा लाख रुपे द्यायचा शब्द दिलाय. त्यांना शब्द पाळायला लावायचे.

आणखी वाचा-केवळ योगायोग…!

तरुणी- कसे, ते आत्ता जुळवायचे.
तरुण- (हर्ष होऊन) आणि खरं खरं जुळवायचे. उकडू दे किती उकडायचं ते. टेंशन गेले. लघवीला बंद. आपण असं करायचं.
तरुणी- हं.
तरुण- आपण राजधानीला जायचे. थेट त्यांना भेटायचे. पंध्रा लाख मागायचे.
तरुणी- भेट देणार नाहीत ते.
तरुण- देतील. त्यांचे गरीबांवर प्रेम आहेच.
तरुणी- त्यांचे सर्व गरीबांवर प्रेम असते. एका एका गरीबावर नसते प्रेम.
तरुण- पेपरात पत्र लिहू.
तरुणी- खूप पत्रं असतात टीका करणारी. कायी उपयोग होत नाही.
तरुण- टी.व्हीवर बोलू.
तरुणी- नुस्ती बातमी होते.
तरुण- आमरण उपोषण करू.
तरुणी- त्याची धार गेलीय.
तरुण- संघटना करू. मोठा मोर्चा काढू.
तरुणी- पोलीस उधळून लावतात.
तरुण- विरोधी पक्षात जाऊ, आवाज उठवू.
तरुणी- नायी उपयोग होत.
तरुण- भयंकर सुचतेय. भयंकर सुचतेय…
तरुणी- ते भयंकर केलेस तर… तुरुंगात दहा वर्षं तुरुंगात. मग फाशी.
तरुण- हां, फाशी… माझा काका. माझ्या काकाने खून केला. जन्मठेप. काय झालं त्याचं पुढे कुणास ठाऊक.
तरुणी- क्रॅकपणा करून पंध्रा लाख नाही मिळणार. हिंस्रा धाडस करून नायी मिळणार.
तरुण- मग काय करायचं तरी काय?
तरुणी- काय तरी नामी युक्ती केली पायजे.
तरुण- काय पण?
तरुणी- युक्ती सुचली पाहिजे.
तरुण- युक्ती सुचली पाहिजे.
तरुणी- का…य युक्ती?
तरुण- का…य?
तरुणी- नायी सुचत.
तरुण- नायी सुचत.
तरुणी- ना य सु च त
तरुण- नाय सु…चत
तरुणी- पंध्रा लाख.
तरुण- रुपे, रुपे…
तरुणी- नाय मिळणार. मिळणार नायीच.
तरुण- नाय का? पंध्रा लाख रुपे मिळालेच पायज्येत.
तरुणी- आपण कोर्टात जाऊ या.

तरुण- ऊठसूट कोर्टात जायचं. नाय. सगळं कायद्याचं नसतं. प्रेम करायचं? कायद्याचं असतं? शब्द दिलाय. तो पाळायचा असतो. जीवनाचे नियम पाळायचे असतात. त्याच्यासाठी कायदा नको, कोर्ट नको. त्यांनी पंध्रा लाख रुपे द्यायचा शब्द दिलाय. आपण त्यांना मागितले नव्हते. ते हून बोललेत. त्यांनी हून द्यायला हवेत. त्यांनी हून शब्द पाळला पाहिजे. परंपरा असते. परंपरा झाली पाहिजे. तरुणी- मग पाळत नायीत ना.
तरुण- मग लोक विकृत होतील. नाहीतर आजारी पडतील.
तरुण- येरझारा घालू लागतो. हळूहळू वेग वाढतो.
तरुण- हां, मी विकृत नाहीय. मी आजारी झालोय. मला शुगर होईल. बीपी होईल. मला ऑसिडिटी झालीय, पित्त झालेय. खा खा होतेय. उल्टी होतेय. खा खा. उलटी. खा खा. उल्टी हा रोग नाहीय. आजारपण नाहीय. विकृती आहे. मी विकृत होतोय.
तरुणी- तुझी आई विकृत होती. आपले लग्न झाले. तुझ्या आईने मला वर्षभर गोठ्यात झोपवले होते आणि तुला परसदारी.आठवतंय. नाही. विकृत नाही व्हायचं. पंध्रा लाख रुपे मिळले पायज्येत. विकृत नाही व्हायचं.
तरुण- मान्य. पटलं. विकृत नाही व्हायचं. आठवतेय. तुझी आई आपल्याकडे आली होती. तिने माझ्या पँटच्या खिशातले पैसे चोरले. रेडहँड पकडलं होतं.
तरुणी- आठवायचं. विकृत नाही व्हायचं. तुझ्या बहिणी काय चालीच्या ते सगळ्या जगाला माहित्येय.
तरुण- उल्टे उत्तर द्यायचे, विकृत नाही व्हायचे. तुझा भाऊ देशी दारू कुठे कुठे पोहोचवायचा.
तरुणी- तू स्कूटर दुरुस्तीचं शिकायला हवं होतं. दुधाच्या पिशव्या घरोघरी पोचवतोस. पांढरपेशांच्या सहवासामुळे बुळा झालायस. प्रत्युत्तर द्यायचे, विकृत व्हायचे नाही.
तरुण- विकृत व्हायचं नाही. तू कामाच्या ठिकाणी गुलुगुलु बोलतेस. तिथं तुला काय काय खायला मिळते. तू हावरट आहेस. तू वांझ आहेस.
तरुणी- तू सोडून दुसऱ्याशी लग्न झाले असते तर एव्हाना मी दहा मुलांची आई झाले असते… उत्तर दिलेय. विकृत नाही झालेय. यापुढे घडायचेय, ते घडू दे. लक्ष ठेवायचे.
तरुण- लक्ष ठेवायचे.

तरुण आतल्या बारक्या खोलीत गेला. क्वार्टरची बाटली आणि ग्लास घेऊन आला.
तरुणीने तिरमिरीने तरुणाच्या हातातली बाटली उडवली. ग्लास उडवला. बाटली, ग्लास प्लास्टिकचे. फुटले नाहीत. द्रव सतरंजीवर पडले. सतरंजी ओली झाली. तरुण त्वेषाने आत गेला. पट्टा घेऊन आला.
‘‘मला मारलंस तर बघ, मी ह्या उंदराच्या गोळ्या खाऊन जीव देईन.’’
‘‘खा, खा, खा की, मर, मर एकदाची.’’
तरुणाने तरुणीला मानेला धरले. तरुणीने मुठीतल्या गोळ्या फेकून दिल्या आणि भर्रकन् आत गेली. तरुण तिच्या मागोमाग धावला. तरुणी बाथरुममध्ये घुसली. तरुण घुसू पाहात होता. तरुणीने बाथरूमचे दार लावून घेतले. तरुणाच्या कपाळाला दार लागले.
‘‘आज तुला सोडणार नाही. जीवंत ठेवणार नाही. दार उघड…’’
हूं की चूं नाही.
तरुण बाथरूमच्या दाराला लाथ घालू लागला. थांबून थांबून लाथा घालत राह्यला. थांबण्याच्या काळात तरुणाला दाराला धापा पडल्याचे आवाज आले. येत राह्यले. तरुण गडबडला. तरुणाने बाथरूमचे दार कान टवकारून पाह्यले. दारावर थापांचे आवाज येत होते. हां. बाहेरच्या दारावर थापा पडताहेत. तरुण घराच्या दाराशी आला.
‘‘कोण आहेय?’’
‘‘पोलीस. दार उघडा.’’
तरुणाने दार उघडले. एक पुरुष पोलीस, दुसरी स्त्री पोलीस. स्त्री पोलीस तरुणाला म्हणाली, ‘‘बाथरूम कुठाय?’’
तरुण, दोन्ही पोलीस बाथरूमशी आले. स्त्री पोलीस बाथरूमच्या दाराशी म्हणाली, ‘‘दार उघडा. मी पोलीस. तुमचा फोन आला. उघडा दार.’’
दार उघडले गेले. तरुणी बाहेर आली. चौघे बाहेरच्या खोलीत आले. पुरुष पोलिसाला बाटली दिसली. पुरुष पोलिसाने बाटली घेतली. दरडावत तरुणाला म्हणाला, ‘‘दारू प्यायलास?’’

‘‘नाही.’’ चाचरत तरुण म्हणाला.
‘‘खोटं बोलतोस?’’ पुरुष पोलीस दरडावत तरुणाला म्हणाला आणि पुरुष पोलिसाने तरुणावर हात उगारला.
तरुणीने चपळाईने पुरुष पोलिसाचा उगारलेला हात खाली ओढला. ठामपणे म्हणाली, ‘‘नवरा दारू आता पीत नाही. वर्ष झालेय सोडलीय. नाही पीत. पूर्ण सुटलीय. पाणी, पाणी होतं. सतरंजीवर सांडलंय. हे बघा ओली आहेय सतरंजी. वास घेऊन बघा.’’
‘‘मूर्ख.’’ पुरुष पोलीस म्हणाला.
स्त्री पोलिसानी सतरंजीवरची गोळी उचलली. तरुणीसमोर धरली. तरुणीला दरडावत म्हणाली, ‘‘ड्रग घेत होता का? आँ?’’
‘‘ड्रग नाहीय. ऑसिडिटीची गोळी आहेय. लई गरम होतेय. पित्त उसळतंय.’’
तरुणीने जमिनीवरची गोळी उचलली. तोंडात टाकली.
‘‘मूर्ख.’’ संतापत पुरुष पोलीस म्हणाला.
स्त्री पोलीस चिडचिडत तरुणीला म्हणाली, ‘‘फोन करून बोलावलं कशाला?’’
‘‘पंध्रा लाख रुपे.’’
‘‘कसलं पंध्रा लाख रुपे?’’ स्त्री पोलीस तरुणीला म्हणाली.
‘‘बघ.’’ तरुण तरुणीला म्हणाला, ‘‘पोलीस विसरलेत. लोक विसरतात. लोक विसरलीत म्हणून राजकारण्यांचं फावतं.’’

तरुण बारके हसला. स्त्री पोलीस गंभीरपणे तरुणाला म्हणाली, ‘‘हसायचं नाही. पंध्रा लाख रुपे कसले? काय आहेय?’’
‘‘मी सांगत्ये.’’ तरुणी म्हणाली. ‘‘न हसता सांगत्ये. माझ्या नवऱ्याला हसायची लय खोड आहेय.’’
‘‘मूर्खपणा पुरे. नीट बोला.’’ पुरुष पोलिसाने तरुणीला दरडावले.
‘‘देशातल्या प्रत्येकाच्या अकाऊंटमध्ये पंध्रा लाख रुपे जमा होतील.’’ तरुणी मंदपणे म्हणाली.
‘‘कोण म्हणालं असं?’’ स्त्री पोलीस तरुणीला म्हणाली.
‘‘ते.’’ मंदपणे तरुणी म्हणाली.
‘‘ते… ते कोण? नाव काय?’’
‘‘नाव नाही सांगणार.’’
‘‘माहीत नाही का?’’
‘‘माहीत आहे. नाही सांगणार.’’
‘‘का? कारण काय? पोलिसांपास्नं काही लपवायचं नाही. तो गुन्हा आहे.’’
‘‘भीती वाटतेय.’’ तरुणी घाबरून म्हणाली.
तरुण अजीजीनं स्त्री पोलिसाला म्हणाला, ‘‘खरं तर नाव फेमस आहे. मुद्दाम सांगायची गरज नाही. जगप्रसिद्ध आहे.’’
स्त्री पोलीस पुरुष पोलिसाच्या कानात कुजबुजली. काहीशा प्रेमाने न कळेल असं ओठातल्या ओठात हसत तरुणीला म्हणाली, ‘‘तो जुमला होता.’’
‘‘एव्हढा मोठा माणूस जुमला करतो.’’ … तरुणी कसंबसं म्हणाली आणि ती ऊर बडवून घेऊ लागली.
‘‘शटप!’’
तरुण छपराकडे बघत घोगरट आवाजात म्हणाला, ‘‘देवारे, आमच्यासारख्या गरीबांशी जुमला व्हावा ना? काय रे करायचं देवा आम्ही?’’
‘‘शटप!’’

तरुणी तरुणाजवळ आली. दोघे एकमेकांना सांभाळू लागले.
‘‘थांबा. पुरे तुमचे चाळे. तुम्हा दोघांना पोलीसचौकीतच नेतो. पोलिसी खाक्या दाखवतो.’’
तरुणाने पुरुष पोलिसाचे पाय धरले, ‘‘हवालदारसाहेब, नको. माफ करा. चुकलं आमचं.’’
तरुणीने स्त्री पोलिसाचे पाय धरले, ‘‘तुमी पोलीस लोकंही आमच्यागत गरीब असता, रातदिन कष्ट करता, आमची दु:खं ओळखा, दया करा.’’
‘‘तुमी पोलीस डिपार्टमेंटची थट्टा केलीय. तुम्हाला अटक करीन.’’ पुरुष पोलीस म्हणाला. त्याने तरुणाला लाथाडले.
तरुण उठला, घाईने आत गेला. परतला. पन्नासची नोट पुरुष पोलिसापुढं धरून म्हणाला, ‘‘येवढेच आहेत. माफ करा.’’
पुरुष पोलिसाने पटकन त्यालाही न कळेल अशी नोट घेतली. खिशात ठेवली. सहकारी पोलिसाला म्हणाला, ‘‘चला.’’
स्त्री पोलीस क्षणभर रेंगाळली, तरुणीला म्हणाली, ‘‘प्रेमाने, आनंदाने संसार करा.’’
तरुणी तरुणाला म्हणाली, ‘‘पंध्रा लाखाच्या प्रकरणात पोलिसांना ओढायचं आणि पोलिसांच्यात पसरवायचंच, पोलिसांनाच ऑक्टीव करायचं. अशी गोष्ट करायची. तर भलतीच गोष्ट झाली.’’

तरुण म्हणाला, ‘‘बिचारे पन्नास रुपयात भागले.’’
तरुणी म्हणाली, ‘‘बोलण्याला भुलायचे नाही.’’
‘‘त्यांनी जुमला होईल असं बोलायला नको होतं.’’
‘‘हां, वेगळं वाक्य करायला हवं होतं.’’
‘‘हां. वेगळं वाक्य करायला हवं होतं. त्यांनाना वेगळं खरं वाक्य नाही करता येत. त्याना भरजरी वाक्य करता येतं.’’
‘‘भरजरी भाषेचं खरं नसतं. नुस्तं भुलायचं होतं. आणि दु:खं निर्माण होतं.’’
‘‘आपल्याला जास्त मिळणार नाहीत.’’
‘‘आपल्याला भरपूर मिळायला हवं. हवंच. हे डोक्यात ठेवायचं. घट्ट. हटायचं नाही. आपल्या मुलालाही हेच शिकावयचं. मुलगा त्याच्या मामाकडनं उद्या येणाराय. त्याला मी लगेच सांगणार. या समाजात तुला भरपूर मिळाले पाहिजे. सगळं. घर, कपडे, खाणं… डोक्यात घट्ट ठेवायचं आपण.’’
तरुणाने दिवा घालवला.
दोघे एकमेकांच्या अंगावर हात टाकून झोपले.
तरुणी पुटपुटली, ‘‘पैशे साठवून फॅन घ्यायचा.’’
‘‘हं, मी बघतो कुणाकडे जुना फॅनआहे का.’’
‘मी पण बघते. मिळंल टेबल फॅन जुना.’’
(समाप्त)
lokrang@expressindia.com

Story img Loader