‘सीतेची गोष्ट आणि इतर कथा’ हे ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांच्या निवडक कथांचे संपादन वंदना बोकील कुलकर्णी यांनी केले असून, सुरेश एजन्सीतर्फे २३ मेला हे पुस्तक प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने पुस्तकाच्या प्रस्तावनेतील अंश…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरुणाताईंच्या लेखन कारकीर्दीला पंचेचाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने त्यांच्या निवडक कथा संग्रहरूपाने वाचकांच्या हाती सोपवताना आनंद वाटतोय. या संग्रहात त्यांच्या एकोणीस कथांचा समावेश केला असून, पूर्वी संग्रहात न आलेल्या काही कथादेखील वाचायला मिळतील. अरुणा ढेरे यांच्या कथाविश्वाचे ठळकपणे दोन भाग दिसतात. एक आहे प्राचीन साहित्यातील कथांच्या आशयाचा किंवा व्यक्तिरेखांचं पुनर्निर्माण करणारा. काही अतिप्राचीन तर काही अलीकडच्या इतिहासाचा. काही केवळ लोककथांतून नजरेत येणारा.

रामायण, महाभारत, पुराणं, लोकसाहित्य इत्यादी संचिताचा व्यासंग आणि चिंतन यांमधून या कथा त्यांच्या प्रतिभेनं नव्यानं रचल्या आहेत. आधुनिक दृष्टीतून, अपार समजुतीनं आणि जिव्हाळ तरी पुरेसं वस्तुनिष्ठ असं आकलन आपल्या समोर ठेवलं आहे. या कथांतून परंपरेचा शोध घेणं, तिचा अर्थ नव्यानं आणि नव्या दृष्टीनं शोधणं, तिच्यातील आणि समकालीन वर्तमानातील पूल शोधणं, तो सूचित करणं हा एक अर्थसंपन्न अनुभव असतोच. अशा कथांचा, अशा व्यक्तिरेखांचा आत्मा लेखिकेला नेमका सापडला आहे. सामान्यत: प्रत्येक भारतीय माणसात आपल्या प्राचीन वारशाचं प्रेम असतं, अस्मिता असते. रक्तात ओढ असते तो जाणून घेण्याची. अनेक अनुच्चारित प्रश्न असतात त्यांची उत्तरं मिळून जातात आणि अशा कथांच्या लोकप्रियतेचं एक रहस्य काहीसं उलगडतं. माहितीचं रूपांतर कथाघटकात करण्याचं लेखिकेचं हे कौशल्य वादातीत म्हटलं पाहिजे.

हेही वाचा…‘ईव्हीएम’चा प्रवास वाद आणि प्रवाद…

या कथाविश्वाचा दुसरा भाग आहे समकालीन वास्तव टिपणारा. त्यात सामान्य माणसाच्या जगण्यातील भलेबुरे अनुभव मांडणाऱ्या काही कथा आहेत. प्रेम, अपेक्षा आणि अपेक्षाभंग, लौकिक यश-अपयश अशी सांसारिक सुखदु:खे रंगवणाऱ्या काही कथा आहेत. लहानसे पुरते बिनसायला किंवा सावरायला. दिलासा मिळतो, फुंकर मिळते. पुन्हा नव्या उमेदीनं नवा दिवस जगायला, नवा संघर्ष करायला ताकद मिळते. हे सारं अशा कथांतून मांडलं आहे. आणि काही कथा आहेत साहित्य व्यवहारातील भल्याबुऱ्या अनुभवांवर आधारित.

ढेरे यांच्या कथांमधील संवेदनशील स्त्रीपात्रे लक्षवेधी आहेत. बाईचं शहाणपण आणि आत्मभान त्यांनी सहजपणे त्यांच्या वर्तनातून दाखवून दिलं आहे. विसाव्या शतकातली एक व्यासंगी, प्रगल्भ आणि कविहृदयाची लेखिका या स्त्रियांविषयी जे चिंतन करते त्यात त्या त्या स्त्रीची ‘स्त्री’ म्हणून प्रतिष्ठा, सन्मान आणि अस्तित्व त्यांना मोलाचं वाटलं आहे. आणि तेच त्यांनी ठळकपणे निदर्शनास आणून दिलं आहे. वडीलधारी स्त्री-पुरुषपात्रं त्यांच्या स्त्रीपात्रांना अनेकदा मूल्ययुक्त जगण्याचं बळ पुरवतात. त्यांच्याशी संवाद, त्यांचं पाठबळ यात महत्त्वाची भूमिका बजावतं. वडीलधारी व्यक्ती आणि आई हे आदिबंध त्यामधून पुनरावृत्त होतात. स्त्रीत्वाला विविध प्रकारे भिडतात अरुणाताई. त्यांच्या स्त्रीपात्रांच्या चित्रणात आपुलकी आणि औदासिन्य, आकर्षण आणि अपसारण, जवळीक आणि दूरता, भावनात्मक ओलावा आणि शुष्कता, कोमलता आणि कठोरता, जिव्हाळा नि कोरडेपणा, आस्था नि अनास्था, असे अनेक परस्परविरोधी रंग खुलले आहेत. विरोधरम्यतेचं एक विशेष परिमाण त्यांना लाभलं आहे. स्वत: ठरवलेली काही रीत म्हणा, मूल्ये म्हणा; त्यासाठी व्यावहारिक सुखांवर पाणी सोडणारी त्यांच्या स्त्रीपात्रांची निष्ठा आणि मार्दव मोहक आहे. लौकिक जगापलीकडे नात्यांतला गोडवा त्या जपतात. त्यांचा स्वत्वयुक्त जगण्याचा प्रयत्न अनेक कथांतून दृग्गोचर होतो.

हेही वाचा…यंत्र हवेच आणि पेटीसुद्धा..

कोणतीही कलाकृती ठरवते तिची समीक्षा कशी करायला हवी. अरुणा ढेरे यांच्या या कथांविषयी लिहिताना रूढ समीक्षकी परिभाषा चकवते आहे, हे लक्षात आलं. या कथांतील निवेदकाचा वावर मोठा वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो स्थिर आहे. सतत एका दृष्टिक्षेत्राचं आवाहन घेत तो साऱ्या भाववास्तवाकडे पाहतो आणि दिवा सांभाळावा तशी आपली मूल्यदृष्टी सांभाळत त्या वास्तवाचा वेध घेतो. आपला परीघ आखून घ्यावा आणि त्या परिघाच्या बाहेर न जाण्याची स्वत:ला शपथ घालावी तसा त्याचा वावर आहे. निवेदनाच्या कथन, भाष्य, चिंतन आणि संवाद या साऱ्या घटकांचा यथोचित वापर इथे आहे. त्यात विचार आणि अनुभव यांचा एकजिनसीपणा जाणवतो. मौखिक वाटावं, असं हे कथन आहे- सहज, प्रवाही आणि वेल्हाळ. कथानकं सरळ आहेत. घटनांची फारशी रेलचेल त्यात नाही. एक किंवा दोन मुख्य घटनांतून कथानकाची उभारणी होते. बाह्य वास्तवाचा गुंता त्यात फारसा नाही. मात्र पात्रांच्या मनात, भावविश्वात अनेक पातळ्यांवरील येरझार आहे. बहुतेक कथांना एक भावकेंद्र आहे आणि त्याभोवती सारी उभारणी आहे. अरुणाताईंच्या कथेतील निवेदन अनेकदा दिशादर्शक असतं. नकळत. ज्या मूल्यांचा आग्रह गर्भित लेखिका धरते, ती पात्रांच्या उक्ती-कृतीतून अधोरेखित होतात. कदाचित हेतू तो नसला तरी परिणाम तो होतो. पात्रांच्याच नव्हे तर निवेदकामागेही लेखकाची दृष्टी असते. त्यामागे उभा असलेला लेखक गर्भित असला तरी त्याच्या दृष्टिक्षेत्र नियंत्रणात कथा आकाराला येत असते. निवेदक हेही कथनात्म साहित्यामधील एक पात्र असतं आणि त्याचीही निर्मिती लेखकच करीत असतो; हे लक्षात घेतलं की या कथांतून उजागर होणारी मूल्यं ही लेखिकेची मूल्यं आहेत, असं म्हणता येतं. माणसावर आणि जगण्यावर विश्वास ठेवता आला पाहिजे, ही अरुणाताईंची माणूस म्हणून आणि लेखक म्हणून धारणा आहे. हेच गर्भित लेखिकेचं जीवनविषयक तत्त्वज्ञान आहे.

पात्रांच्या घडणीत अनेकदा लेखक त्याच्या कल्पनेचे, विचारांचे आणि धारणांचे अंश नकळत मिसळू देत असतो. माणसातला माणसाला धरून ठेवणारा बंध लेखिकेला महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे त्यांची अनेक पात्रं सुजन आहेत. सहृदय आहेत. सामान्य माणसंही त्याला अपवाद नाहीत. त्यांच्या एका कथेची नायिका जेव्हा ‘गर्जा जयजयकार’ या कवितेच्या आधारानं स्वत:ला कारगिल युद्धातील सैनिकांच्या देशप्रेमाशी जोडून घेते, तेव्हा ते सुरुवातीला भाबडं वाटलं तरी सामान्य माणसाचं हेच तर अ-सामान्यपण असतं, याची जाणीवही देते.

वाङ्मयीन मोठेपणापेक्षा या कथा या जाणिवेसाठी महत्त्वाच्या ठरतात. लहानशा सांसारिक सुखदु:खात तन्मयतेनं समरस होणारी सामान्य माणसं मनातून सद्भाव जपत असतात. त्यांच्या अनेक पात्रांना अंत:प्रेरणा महत्त्वाच्या वाटतात. शांततामय आणि आनंदमय जगण्याचा पैस मिळवण्यासाठी समजुतीच्या प्रदेशाचा परीघ विस्तारायला हवा, याची जाणीव देणारी ही पात्रे आहेत. ‘कसं आहे’ हे दाखवताना ते ‘कसं असायला हवं’, हे दाखवणारं हे कथासाहित्य आहे.

हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : निसर्गसंवर्धनाची गाथा

जीवनातला साधेपणा, सहजता आणि जिवंतपणा टिकवायला हवा, संहाराला सर्जन हेच उत्तर आहे, अशी सर्जनशक्तीवर ठाम विश्वास ठेवणारी, इतिहासाकडे पाहण्याची स्वतंत्र दृष्टी असलेली, नवे अन्वयार्थ लावत जाण्याची आणि चिकित्सा करण्याची तयारी असणारी, आपल्या वारशावर डोळस प्रेम करणारी ही खंबीर लेखिका आहे. या लेखनातला आद्या सूर आहे तो समजुतीचा- समजून घेण्याचा आणि समजून देण्याचाही. आपला सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जोडलेपणाचा आहे. तुटलेपणाचं समर्थन होत राहणाऱ्या काळात जोडलेपणाची आवश्यकता जाणीवपूर्वक आणि सातत्यानं व्यक्त करत राहणं, सोपं नव्हे. अरुणा ढेरे यांच्या कथा साहित्याचं योगदान हे आहे.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sitechi gosht aani itar katha aruna dhere s selected stories edited by vandana bokil kulkarni psg