आता सुश्री स्मृतीजी इराणी, एचआरडी मिनिस्टर, भारत सरकार आणि ज्योतिष यांचा विषय निघालाच आहे तर तुम्हाला हे सांगण्यास हरकत नाही की आमुची रास (जगातील तमाम उपसंपादकांप्रमाणे) मेष आहे!
काही उपसंपादकांची वृषभही असते. (पण त्याला कोणाचा (पक्षी : मालक, मुद्रक, प्रकाशक, संपादक, वाचक आदीकरोनी सर्वाचा) काय इलाज? ते त्या- त्या वृत्तपत्राचे प्राक्तन म्हणावयाचे! दुसरे काय!!)
आम्ही मात्र जन्मास घेऊन आलो ती मेष रासच.
पूर्वेची स्वामिनी, पुरुषजातीची, लाल-पिवळ्या रंगाची, कांतीहीन, अग्नी- तत्त्वाची, पित्तप्रकृतीची, रात्रबली, रजोगुणी- मेष रास.
कशी फिट्ट बसतात नाही आम्हांस ही लक्षणे!
पूर्वेची स्वामिनी! आम्हीही तसे सतत पूर्वेकडे पाहणारे! उगवत्या सूर्यदेवास पाहून नमोनमस्कार करणारे!
कांतीहीन, पित्तप्रकृती, रात्रबली, रजोगुणी हे तर सौ टका आम्हीच. सलग तेरा वर्षे रात्रपाळी केल्यावर कोणाचेही असेच होते.. कांतीहीन, पित्तप्रकृती वगैरे वगैरे!
या राशीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ही मित्र-मैत्रिणींविषयी जरा विशेषच प्रेमळ असते.
आता तुमच्या ध्यानी येईल की आम्हांस सुश्री स्मृतीजी तथा तुलसीभाभींबद्दल इतके का वाटते? वाटणारच ना! अखेर विरानी खानदानाशी आमचे आणि आमच्या हिचे अगदी घट्टमुट्ट- कितीतरीशे एपिसोडांचे- नाते होते. तुम्हांस सांगतो, तुलसीभाभींचा अपघाती मृत्यू झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी लोकसत्ताने त्यांचे जीवन, कार्य व कर्तृत्व यावर लिहिलेला व्यक्तिवेध पाहून आम्ही हमसाहमशी रडलो होतो. इतके, की सोसायटीतले लोक पांढरेस्वच्छ कपडे चढवून आमच्या दारात जमा झाले होते! आमचे सोडा, आमच्या हिने तर दु:खातिरेकाने स्वत:च्या कपाळावरचे कुंकूच पुसून टाकले होते, म्हणजे पाहा! आता कुणाकडे बघून ही कुंकवाच्या टिळ्याची फ्याशन करू म्हणत होती!!
तर अगदी तेव्हापासून आमच्या मनी भाभींविषयी अतीव आदर एवम् प्रेमभावना वसत आहे.
त्यामुळेच भाभीजी निवडणुकीत पडल्या तेव्हा आम्ही आमच्यासाठी वीट गरम करून आणली होती.
तरीही त्या मंत्रीजी झाल्या तेव्हा आम्ही घरातले सगळे बल्ब लावून लायटिंग केली होती.
त्यांनी अमेरिकेतील येल विद्यापीठाची पदवी संपादन केली तेव्हा तर आम्ही घरातल्या सर्वाना साखर वाटून तो आनंदोत्सव साजरा केला होता. येलची  पदवी म्हणजे ज्योक नाही मिस्टर! तीसुद्धा अवघ्या आठवडय़ाच्या मुक्कामावर कमवायची म्हणजे काही येरागबाळ्याचे काम नाही. येथे आमच्यासारख्या व्युत्पन्नमती धीमंतासही सात वर्षे लागली बीए व्हायला!
अशा येलविदुषीवर त्या केवळ ज्योतिषास भेटल्या म्हणून एवढा गहजब व्हावा? टीका व्हावी? त्यांच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण व्हावे? त्या मंत्री झाल्या म्हणून काय झाले? मंत्र्याला भविष्य नसते? हात नसतात? ते त्याने पोपटवाल्यास दाखवावे वा होराभूषणास- तो त्याच्या खासगी अकलेचा प्रश्न झाला. त्यात अन्यांनी लुडबूड करणे म्हणजे अ-संस्कृतपणाच नव्हे काय? (खरे सांगतो, या अ-संस्कृत लोकांना ज्ञानमार्गावर आणायचे तर केजीपासून सु-संस्कृत कम्पल्सरीच केले पाहिजे!)
आमचा हा सात्त्विक संताप (मेष असलो म्हणून संताप येत नाही, हे तुम्हांस कोणी सांगितले?) घेऊनच आम्ही थेट शास्त्री भवनी धडकलो.
भाभीजी दालनात येरझाऱ्या घालत कसलासा कागद मन लावून बाय-हार्ट करीत होत्या. मधेच डोळे मिटून त्यांनी ‘घृ ब्रू भ्रू’ असे काही चित्रविचित्र आवाज काढले. मग समजेलशा भाषेत म्हणाल्या, ‘‘छे.. हे काही समजतच नाही! मेले हे धातू चालवायचे तरी कसे?’’
धातू? आम्हांस काहीच कळेना. मनी आले, भाभींची बदली खाणखात्यात झाली की काय?
भाभी स्वत:शी बोलतच होत्या- ‘‘आणि हे परस्मैपदी काय, आत्मनेपदी काय? नकोच बाई हे संस्कृत शिकणे. रद्दच करते तो निर्णय.’’
मनी म्हटले, याला म्हणतात गतिमान प्रशासन! निर्णय कसे चटाचट घेऊन पटापट मागे घेता आले पाहिजेत!
त्यांनी आणखी काही निर्णय घ्यायच्या आत आम्ही दोन्ही करकमले जोडली.
‘‘भाभीजी, नमस्ते!’’
‘‘अं? नमस्ते नमस्ते! बोलिये, काय काम काढलंत?’’
‘‘ते तुमच्या भविष्याबद्दल वाचले..’’
‘‘तो माझा पर्सनल मामला आहे.’’
‘‘तेच तर म्हणतोय आम्ही. त्यात इतरांनी हस्तक्षेप करण्याचे काही कारणच नाही.. आम्हांला फक्त एवढीच उत्सुकता आहे, की तुम्ही राष्ट्रपती कधी होणार?’’
हा प्रश्न ऐकला आणि भाभीजी चक्क पदरात तोंड लपवून लाजल्या.
‘‘नत्थुलालजी पण ना, काहीही सांगतात! म्हणे मी राष्ट्रपती होणार!’’
‘‘त्यांची भविष्ये खरी ठरतात ना पण?’’
‘‘हां जी! मागच्या वेळी म्हणाले होते, इलेक्शनमधी हरलात तरी मंत्री व्हाल. तसेच झाले! आता म्हणतात राष्ट्रपती व्हाल..!’’
‘‘पण कधी?’’
हातावरची भाग्यरेषा कुरवाळत त्या म्हणाल्या, ‘‘म्हणाले, त्यासाठी मोदीजींचा हात पाहावा लागेल. आणि म्हणाले..’’
‘‘काय?’’
‘‘काहीतरी संस्कृतमध्ये म्हणाले.. यत्र नमोजीस्य कृपादृष्टीर्भवती तत्र किम् नच भवती.. असे कायसेसे. पण त्याचा मतलब हो काय?’’
त्याचा मतलब आहे- नमोजी मेहरबान तो..
असो!
भाभीजींना आपण कशाला तो अर्थ सांगावा?    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा