मेधा पाटकर medha.narmada@gmail.com

शालेय शिक्षण जर पाया बांधत असेल तर महाविद्यालयीन शिक्षण हे घराचे वासे उभारणारे असते. जगण्यासाठी आवश्यक आणि ऊर्जादायक अशा अनेक बाबींची तोंडओळख ही ज्यांना शाळेतूनच मिळते, त्यांना महाविद्यालयीन काळात त्यावर काही सृजनात्मक क्रिया-प्रतिक्रियांची संधीही लाभू शकते, हा माझा अनुभव आहे. आमच्या काळातील शैक्षणिक वातावरण हे असे भारलेले होते. ‘फेसबुक’सारख्या ‘फेसलेस कम्युनिकेशन’मध्ये हरवून जाणे तेव्हा नव्हते. ‘व्हॉट्सअ‍ॅप’सारखे समोरचे जडणे-घडणे सतत वर-खाली करत, त्याचाच एकतर्फी हल्लाही नव्हता. म्हणूनच असेल, पण अनेकानेक गोष्टींमध्ये एकाच वेळी गुंतून राहणे माझ्यासारख्यांना तेव्हा शक्य होत होते.

दादरच्या शाळेत मी शिकत असतानाच भावाची जबाबदारीही पोस्ट ऑफिसात नोकरी करणाऱ्या आईबरोबर वाटून घ्यावी लागायची. तिचे काम संपेपर्यंत त्याला तिच्या ऑफिसच्या बाहेर मला खेळत ठेवावे लागे. मात्र, त्याच वेळेस कधी वक्तृत्व स्पर्धेची, कधी नाटकाच्या रंगीत तालमीची, तर कधी संमेलन आयोजित करण्याची माझी धावपळही सुरू असायची. अर्थात त्यावेळच्या अकरावी मॅट्रिकच्या परीक्षेतील ‘मेरिट’- म्हणजे पहिल्या शंभरांत येण्याची धडपड ही कोचिंग क्लासेसमध्ये नव्हे, तर अनेक गुरुवर्याचे मार्गदर्शन घेत होत असल्याने ती आजच्या जखडणाऱ्या कोचिंगप्रमाणे मुलांचं बालपण हरवणारी नसे. इंग्रजी, गणित, विज्ञान अशा प्रत्येक विषयासाठी उत्कृष्ट शिक्षक शोधून त्यांच्याकडून मार्गदर्शन करवीत ते आई-वडीलच! हे सर्व आजच्या मुलांना मिळणे दुरापास्तच. स्वावलंबी शिक्षणाची ही गरज आजही नाकारता येणार नाही. राजस्थानात कोटा इथे आणि मुंबई-दिल्लीत चालणारे हजारोंचे कोचिंग क्लास आणि सर्वत्र माजलेला शिक्षणाचा बाजार स्पर्धेच्या ‘अ‍ॅक्सिलरेटर’वर विद्यार्थ्यांना पुढे ढकलतो.. अति वेगवान बनवतो. मग त्याचा विस्फोट मानसिक ताणतणावांपासून आत्महत्येपर्यंत पोहोचतो. आमच्या शिक्षणात स्पर्धा, गुणवत्ता यांना स्थान नव्हते असे नाही. परंतु त्यातील मर्यादा ही शिक्षणाचे जीवनदायित्व राखण्याची गुरुकिल्ली होती.

आमचे रुईया महाविद्यालय तर अशा कार्यकलापांचे आगर होते. त्यात किती रममाण व्हायचे, हे ज्याचे त्याच्यावर अवलंबून असते. हे म्हणणे सोपे असले तरी दलित व गरीब कुटुंबांतून आलेल्या, प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्यांना ते जाचक बनून त्यांच्या पदरी वंचनाच येते, हेही खरे. आमच्या विज्ञान शाखेतल्या मैत्रिणींमध्ये या विषमतेचे भान असलेल्या बऱ्याच जणी होत्या. घरापासून राष्ट्रसेवा दलाच्या सुट्टीतील शिबिरांपर्यंत मिळालेले समाजकारणाचे भान ठेवून आम्ही विज्ञानाचे प्रयोग करत होतो. एखाद्या रासायनिक द्रव्याची लिटमस टेस्ट असो वा बेडकाचे डिसेक्शन- सारे प्रत्यक्ष जगण्यासाठी निरुपयोगीच असल्याचे वाटायचे. मग याची भरपाई मी माझ्यापुरतीच नव्हे, तर आमचा चमू (सुनीती, नंदा, रजनी आदी मैत्रिणींचा!)  मागच्या बाकावर बसून आयुष्याची चित्रे रंगवून करत असे. त्यातून आपण डॉक्टर होऊन गावात गेलो तरच लोकसंग्रह आणि त्याद्वारे बदल शक्य होईल, असा ‘ग्लॅमरस’ विचार पक्का झाला. हा विचार मेडिकलला अ‍ॅडमिशन चुकेपर्यंत अभ्यासात गुंतवून ठेवणारा ठरला. नंतर हाच भविष्यवेध समाजकार्यशिक्षणात स्थिरावला. अन्यथा न जाणो, महाविद्यालय सोडून बाहेरच पडलो असतो आम्ही साऱ्याजणी!

विज्ञान शाखेतला रूक्षपणा रुईयातील कला शाखेच्या प्राध्यापकांसोबत चर्चा, गाणी, त्यांचे वर्ग यांत मिसळल्याने ओलावायचा, हेलावून टाकायचा. पुष्पाताई भावे आणि वसंत बापट यांच्या मराठीच्या वर्गाला हजर राहण्याचे वेडच आम्हाला लागले होते. आम्ही वैज्ञानिकाचे स्थान अनुभवत असतानाच स्वत:ला थोडे वेगळे राखत होतो की काय, कुणास ठाऊक. आम्ही प्रयोगशाळेतून धावत सरळ कलाशाखेच्या वर्गात जात असू. बापटसरही खूश व्हायचे. एरव्हीही त्यांच्या केबिनमध्ये मंगल पाध्ये दया पवारांचे ‘बाई मी धरण बांधिते.. माझं मरण कांडिते’ गायची तेव्हाही सारे भारावत असू. मात्र, कला आणि विज्ञान या दोन्हीत मेळ घालण्याकरता अटीतटीचे, सतत कार्यरत राहण्याचे आव्हानही स्वीकारावे लागत होते. कमलाकर सोनटक्केंचे नाटय़प्रशिक्षण ते झाशीच्या राणीचा एकपात्री प्रयोग आणि महेश एलकुंचवारांचे नाटक घेऊन पुरोगामी विचारांचा उद्घोष चालूच असायचा.

विज्ञान प्रयोगशाळेतील अवास्तव नव्हे, परंतु बंदिस्त व भौतिक वास्तवातले काम हे कुठेतरी अपुरे वाटत राहायचे. अर्थात आजच्या आयुष्यात.. अगदी आंदोलनांतही ते ‘विशेष ज्ञान’ सतत कामी येते. प्रदूषणावरील कुठलाही अहवाल असो वा पर्यावरणीय परिणामांचे अध्ययन असो, किंवा ‘एन्रॉन’सारख्या कंपनीचा विद्युत खरेदी करार असो, वा सरदार सरोवर व अन्य योजनांची विविध कागदपत्रे, संशोधन अहवाल असोत; या सगळ्याच्या अभ्यासात ते विशेष ज्ञानच उपयुक्त ठरते. मात्र, विज्ञानाचा अहंकार हा भौतिक संसाधने हेच भांडवल मानून, केवळ माणसांसाठी त्यांचा अंधाधुंद वापर करण्याचे अधिकार आणि स्वातंत्र्य स्वत:कडेच राखून ठेवण्यासाठी कारण ठरत असतो. यातूनच शासक, प्रशासक, तंत्रज्ञ, वैज्ञानिक आणि नियोजनकर्ते ही संसाधने, जमीन, पाणी आणि जंगल देशभर हडपताहेत, लुटताहेत. कधी कायदा डावलून, तर कधी कायद्याचेच हत्यार व न्यायपालिकेचा आधार घेत! विज्ञानाच्या नावे सूक्ष्मगामी व दूरगामी परिणामांचा अभ्यासही न करता अ-वैज्ञानिक निर्णय कसे घेतले जातात, याचे एक उदाहरण पुरेसे आहे.

एक तर नर्मदेसह गंगा, कृष्णा, कावेरी, गोदावरी, पेरियार अशी प्रत्येक नदी पूर्णत: बांधून काढून त्यांच्या धरणाच्या जलाशयात नक्की पाणी किती आहे, याचा विचार न करता त्याचे वाटप केले जाते. त्याद्वारे आम जनतेकरता सिंचन व पिण्याचे पाणी आणि उद्योगपतींसाठी औद्योगिक क्षेत्रांना पाणी असे लाभाचे अतिशयोक्त गणित मांडले जाते. त्यावर आणखी वीजनिर्मितीचा चमचमाट चढवत खरे तर मतपेटय़ांचेच गणित आखले जाते. प्रत्यक्ष नदीत वर्षभर वाहणारे सरासरी आणि संभाव्य पाण्याचे प्रमाण किती आहे आणि त्यातून पाण्याचे निश्चित वाटप किती करता येणे शक्य आहे याचा आढावाच घेतलेला नसतो. त्यामुळे पाऊस दारात येऊन जलाशय भरेपर्यंत वीज उत्पादन चालू ठेवणे आणि नंतर पूर आला म्हणत अचानक ते पाणी सोडून देऊन धरणाखालची शेते व गावे बुडवणे- हा शासनकर्त्यांचा खेळ सुरूच राहतो. मात्र, या सगळ्यात बळी जातो तो कालव्यांच्या जाळ्यात अडकलेल्या टोकाच्या शेतकऱ्यांचा आणि पिण्याच्या पाण्यासाठी आसुसलेल्या दुष्काळग्रस्तांचा! दुसरीकडे जलाशयांच्या काठी वास्तव्याला असणारेही तहानलेलेच राहतात. धरणाखालची नदी पावसाळ्यानंतरही अनेक महिने कोरडीच राहते. सरदार सरोवराखालच्या गुजरातेत असे घडले आहे. समुद्र ८० कि.मी.पर्यंत आत घुसून पाणी, जमीन खारवून जातो. त्यापायी गंगेच्या अलकनंदा, भागीरथी, मंदाकिनीसारख्या उपनद्याही पूर व सुक्या दुष्काळाचे हे चक्र भोगत राहतात. विज्ञानाच्या या खेळात मग अध्यात्माचा आधार शोधावा लागतो. त्यातून मग आमची उपोषणे ही विज्ञानाच्या नावे अज्ञानात ढकलले गेल्यामुळेच लाखों भूकभोग्यांतर्फे उपभोग्यांना दिलेले आव्हान या स्वरूपात करावी लागलेली.

गंगेच्या काठी नदी वाचवण्यासाठी, ती अविरत निर्मळ राखण्यासाठी- म्हणजेच जिवंत ठेवण्यासाठी ११० दिवस उपोषण (थोडा मध, लिंबू घेऊन) केलेले प्रा. जी. डी. अग्रवाल हे  आयआयटी, कानपूरचे प्राध्यापक! त्यांनी अनेक वेळा उपोषण केल्यानंतर ‘स्वामी सानंद’ हे नामाभिधान घेऊनसुद्धा शासन, वैज्ञानिक, नियोजनकर्ते, समाज वा धुरीण कुणीही त्यांच्याशी चर्चेला आले नाहीत. पोलिसी बळ वापरून दिल्लीच्या ‘एम्स’ इस्पितळात नेऊन त्यांची एका प्रकारे हत्याच केली गेली. त्यांच्यामागोमाग गोपालदास या साधूलाही तिथूनच शंभराहून अधिक दिवस उपोषण केल्यावर पोलिसांनी उचलून उत्तराखंडात रस्त्यावर भर थंडीत पटकले. तेव्हापासून आजतागायत ते गायब आहेत. आज गंगेकाठी ‘मातृसदन’ या मानवीय आणि प्राकृतिक आधाराने धर्म पाळणाऱ्या आश्रमात स्वामी आत्मबोधानंद हे गेले ९० दिवस उपोषण करीत आहेत. मी तिथूनच परतल्यावर हा लेख लिहिते आहे. आता मी विज्ञानप्रेमींना की कुंभमेळ्यातील अपवित्र, अशुद्ध गंगेचे आचमन करणाऱ्या भाविकांना यासंबंधी आवाहन करू? कारण संवादहीन शासनकर्ते हे निवडणुकांपुरतेच ‘गंगापुत्र’ बनणारे!

नर्मदेची कहाणी या लेखमालेतून सांगेपर्यंत नर्मदा टिकेल की नाही याचाही भरवसा वाटू नये अशी परिस्थिती आज आहे. केरळमधील डाव्यांच्या शासनासही विनाशकारी पुराच्या तांडवानंतर विकासाचे चित्र बदलावेसे वाटू नये अशा स्थितीत आज समाज आहे. निष्क्रिय समाजही ‘विज्ञान.. विज्ञान’ आणि ‘विकास.. विकास’ म्हणत स्वत: जरी खेळखंडोबा करत नसला तरी त्यांचा साथी बनतो आहे. दोष विज्ञानाचा नाही, तर त्याच्या उपयोगितेत योग्य तो ताळमेळ राखला जात नाहीए. नैसर्गिक संसाधने ही मानवी जगण्याचा आधार असताना प्रत्यक्षात आज ती उपभोगासाठीचे भांडवल बनली आहेत. त्यातून लाभाचे अर्थकारण व राजकारण पहाड, जंगले, नद्या, भूजल, रेती, मासळी आणि पिढय़ान् पिढय़ांच्या मानवी वसाहती संपवीत आहे. या लाभांचे तात्कालिक उपभोक्ते आपणही आहोतच. म्हणून आपण गप्प बसून राहिलो तर आपल्या पुढच्या पिढय़ांसाठी ना कोळसा, ना भूजल, ना धरेच्या गर्भातले कुठलेही खनिज उरणार. शहरांत चमचमती वीज वा नळाद्वारे दुष्काळातही २४ तास पाणी धनिकांना पैसे ओतूनही खरेदी करणे भविष्यात शक्य होणार नाही. यालाच प्रश्नचिन्ह लावत आदिवासी, शेतकरी, मच्छिमार, गायरानावर जगणारे दलित आणि मातीत हात व कष्टावर पोट असणाऱ्या महिला लढताहेत म्हणून यातल्या काही गोष्टी वाचताहेत तरी. मग खरे वैज्ञानिक कोण? विज्ञान शिकणारे वा प्रयोगशाळेत व पाठय़पुस्तकांतून मांडणारे? की परिसर ते पर्यावरण या भवतालासह जगणारे?

विज्ञानास एक भांडवली साधन म्हणून वापरणाऱ्या जीवनप्रणालीच्या विरोधात पर्याय देणारे हेच तर होते आणि आहे- गांधीविज्ञान! गांधीजींचे हे सूत्र प्रत्येकाला जगण्यासाठी, जगण्यापुरते संसाधने वापरून इतरांना जगू देण्याचे व पिढय़ापार निरंतरतेचे होते. त्यात विशेष ज्ञानातून सामाजिक, आर्थिक न्याय साधण्याचे उद्दिष्ट होते. महाडच्या चवदार तळ्यावर दलितांचा हक्क स्थापणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व घटनाकर्ते गांधीजींच्या मागोमाग त्यांच्या सूत्रांना मूर्तरूप देते झाले. भूदान, ग्रामदान यांसारख्या खऱ्या नियोजनाद्वारे विनोबाजी, जे जिथे खपतात त्यांनाच त्या नैसर्गिक साधनांवर हक्क आणि नियंत्रण देण्याचे तत्त्व मांडणारे कार्ल मार्क्‍स आणि शोषणाविरुद्ध हौतात्म्य पत्करणारे भगतसिंग- राजगुरू- सुखदेव तसेच जयप्रकाश नारायण.. या साऱ्यांनाच विज्ञानाचे खरे चिंतन आणि अवलंबन करणारे म्हणायला हवे.

विज्ञानाची खरी परीक्षा होते ती तंत्रज्ञानाच्या निवडीत! तंत्रज्ञानाचा हा पर्याय माणसाचे माणसाशी व निसर्गाशी नाते तोडणारा नसेल, तर तो जोडणारा असेल. कमीत कमी साधनांच्या वापरातूनही तो जगण्यातील दु:ख व कष्ट कमी करणारा असेल. हा पर्याय विज्ञानाचा खरा लाभदायी अनुभव देतो. याउलटच्या अन्य पर्यायांसमोर संघर्ष अपरिहार्य ठरतो. गर्भपरीक्षा आणि केंद्रीय जलनियोजन हे दोन्हीही नाकारणे यातूनच घडते.

रुईयामध्ये विज्ञानाबरोबरच विविध कलाही जोडल्या गेल्या असल्याने त्यातून निर्माण झालेल्या संवेदना या विज्ञानाचा बडेजाव करणाऱ्यांनी जनतेला दिलेल्या वेदनांवर थोडीशी का होईना, पाखर घालायला शिकवीत असाव्यात हे आताशा प्रकर्षांने जाणवते. त्याकाळी वेदनेचे हुंकार व्यक्त करणारे कवी ग्रेस भेटले, तसेच पुष्पाताई भावेंसह अनेक प्राध्यापक. समाजशास्त्र हेही ‘विज्ञान’ असते आणि कवितेतून प्रकटणारे कवीचे आर्त हेही वास्तवाचे भान बळकट करत असते. भौतिक विज्ञानाला वेसण घालत ते जगण्याचा आधार बनत असते. मानसशास्त्र हे जगण्याच्या भौतिकतेला आव्हान देत असते. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राचे धनी अनेकदा सामाजिक स्वप्नेच नव्हे, तर तत्त्व आणि तत्त्वज्ञानालाही झुगारताना दिसतात. घटनेसारख्या समाजनिर्मितीच्या भक्कम आधाराला आणि न्यायपालिका असो की जनसेवक-जनप्रतिनिधींच्या मंचांना, म्हणजेच लोकशाहीच्या प्रत्येक स्तंभाला झुगारताना वा पोखरताना आपण अशांना पाहतो. ‘अर्था’च्या माध्यमाने बाजाराच्या संरचनेतून सामाजिक, मानसिक आणि नैसर्गिक संतुलन राखले तर या आंतरविज्ञानातून खरा विकास साधला जाऊ शकतो. अन्यथा बाजारात उभे ठाकते आहेच- जगण्याचे प्रत्येक साधन, इतकेच नव्हे तर आपले जगणेही! आपले मीपणच काय, जगण्याचा अधिकारसुद्धा हिरावून घेत! माणूसकेंद्रित आणि निसर्गकेंद्रित हिंसा कशाकशाचा बळी घेते आहे पाहा! त्यामागे स्थानीय ते राष्ट्रीय माफिया आपापली गणिते आणि आकडेवारी मांडत रोजगाराची, कर्जमाफीची, दामदुप्पट भाव आणि अन्य आश्वासनांची आरोळी ठोकत आहेत.

विज्ञानाची नव्हे, तर विज्ञान, अर्थज्ञान, राजकीय तत्त्वज्ञान या साऱ्या सत्ताभिलाषींकडून बेमालूम वापरल्या जाणाऱ्या हत्यारांची धार आज कायम आहे. म्हणूनच आपण गांधी, विनोबा, जे. सी. कुमारप्पा, टॉलस्टॉय आणि टागोरांचे अहिंसक, निरंतर, न्यायप्रिय आणि सत्यवादी विज्ञान हे कलेशी जोडून नियोजनाचेच नव्हे, तर जीवनाचा आधार बनवले पाहिजे. हा पाठ कुठल्याही महाविद्यालयात नव्हे, तर तो प्रत्यक्षात जगणाऱ्या आणि जपणाऱ्या कष्टकरी बांधव-भगिनींकडून मला मिळत गेला. त्यामुळे विज्ञानाची विद्यार्थिनी म्हणून मिरवणे सोडाच, त्याबद्दल लाजिरवाणे न वाटता विज्ञान आणि कला या साऱ्या अनुभूतींना जोडून आपला मार्ग आखण्याची आस माझ्या आत खोलवर रुजली आहे, ती कायमची! या सगळ्यात शरीराची, मनाची, वेळेची, साधनांची तसेच पर्यायांची, मार्ग काढण्याची आणि स्वत:ची सफलता- असफलता जनांच्या नजरेतून पाहण्याची मानसिक ओढाताण ही होतच राहते.. आणि राहणार!

Story img Loader