मेधा पाटकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अभ्यासक्रम निवडताना दीर्घकालीन आयुष्याचा विचार करूनच निर्णय घ्यायचा असतो, हा सिद्धान्त कितीही आदर्श असला तरी बहुतेकांच्या आयुष्यात अनेक निर्णय हे अगदी अकस्मात नाहीत तरी योगायोगाने वा अनेक अनपेक्षित कारणांस्तव होतात, हेच खरे. मात्र त्यातही काही सूत्र बांधावे लागते. मेडिकलला जाण्याइतके मार्कस् मिळाले नाहीत, याचे कारण रुईया कॉलेजमध्ये केलेले अनेक उपद्व्याप. अगदी नाटकं, कवितांपासून ते आणीबाणीत ‘पत्र नव्हे मित्र’ असूनही दबाव येईपर्यंत महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘हवा कॉलेजची’चा कॉलम लिहिण्यापर्यंत! मात्र, त्यामुळेच समाजकार्याचा पुढील मार्ग हा त्यात उडी घेऊन अध्ययन आणि कार्य यांची सांगड घालण्याचे ठरवून टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडे वळवला. फिजिक्स, केमिस्ट्री, बायॉलॉजीतून निघून चक्क समाजशास्त्र ते राज्यशास्त्राचे सारे पैलू आत्मसात करणे, त्यातील अनेक तत्त्ववेत्ते ते कार्यकर्ते यांच्या तोंडओळखीपार जाण्यासाठी उत्सुकता तर होतीच; कारण पाठय़क्रमापलीकडे शाळेपासूनच सुरू असलेल्या सगळ्या कार्याचा तोच तर संदर्भ होता. भौतिकशास्त्रं ही सभोवतालच्या भौतिक, व्यावहारिक वास्तवतेत कुचकामी भासण्याइतपत दूरस्थ वा तटस्थ भासतात. निदान जोवर गांधींनी २३ कार्यामध्ये प्रावीण्य वा कुशलता मिळवली होती त्याप्रमाणे जीवनाच्या अनेकानेक कार्यकलापांमध्ये आपणच विज्ञानाच्या चौकटीत ‘जगण्याचे प्रयोग’ करत नाही, तोपर्यंत. सामाजिक विज्ञान मात्र रोजच्या प्रत्येक क्षणाच्या-कार्याच्या मार्गावर मैलाचे दगड उभे करत साथ देणारे.
यामुळेच की काय, पार्सन्स ते मार्क्स वाचताना, दलित आणि जातिनिर्मूलनसारखा विषय निवडताना, तसेच ‘आदिवासी पारंपरिक समाज आणि आर्थिक विकास’ यांसारख्या विषयाला हात घालताना बरीच मेहनत करावी लागणं हे स्वाभाविकच होतं. आज त्यावेळच्या मनात वा चर्चेत उठणाऱ्या सर्व प्रश्नांचे महत्त्व जाणवते. उदाहरणार्थ, अर्थशास्त्राच्या अभ्यासात समतेचा विचार, तर राज्यशास्त्रात ‘न्याय’ ही संकल्पना केंद्रभागी असली तरी या दोन्हीतलं नातं आपणच समजून घ्यावं लागतं. समतेतून न्याय मिळत नाही, तर मुळापाळातल्या, तळागाळातल्या, पिढय़ान्पिढय़ा एका प्रकारच्या विषमतेला तोंड देत असणाऱ्यांना ‘समान संधी’पुरता समतेचा विचार पटणं शक्य नसतं. असमान संधी- जी घटनेनंही ‘पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन’ म्हणून मान्य केलेली आहे, तीच आरक्षणप्राप्तीसारख्या साधनावर भर देते. अनेकदा त्यासाठीच झुंजताना मूळ लक्ष्य सुटून जातं. याबाबतचं मनातलं वादळ हे जातीवादाच्या विरोधात दलितांचं, बहुजनांचं सशक्तीकरण करताना जातिनिर्मूलनाच्या उद्देशाचा विसर पडू नये, ही तळमळ वाढवणारचं ठरतं. मी पीएच. डी.साठी ‘अनुसूचित जातींवर विकासाचे परिणाम’ हा विषय निवडताना जातीयतेचे आव्हान जाणले तेव्हा दलित, महादलित आणि बहुजन समाज या अनेक सीमांतर्गत जाती-जातींतील विषमता ही जटिल वास्तवता समोर आली. समाजशास्त्रज्ञ डॉ. सुमा चिटणीस आणि राज्यशास्त्रज्ञ डॉ. हेबसूर हे माझे गुरू. त्यांचं मार्गदर्शन अगदी वेगवेगळ्या पद्धतीचं. कधी परस्परविरोधीच ठरणारं. समाजशास्त्राच्या दृष्टीने सामाजिक न्याय-अन्यायाच्या चौकटीत दलितांची स्थिती अभ्यासणं आणि त्यावर जातीविरहित समाजनिर्मितीचं आव्हान स्वीकारणं महत्त्वाचं. राज्यशास्त्रातील ‘न्याय’ या छत्रीवजा संकल्पनेत मात्र समताच नव्हे, तर शासनप्रक्रियेत होणारा धोरणात्मक भेदभाव वा जातींचे निवडणुका जिंकवून देणारे गणित हे मुख्य विषय. अशा वेगवेगळया चष्म्यांतून दलितांचे नव्हे, तर दलितत्त्वाचे कंगोरे पाहताना मीही गोंधळून जात होते. डॉ. एम. एन. श्रीनिवास ते गेल ओम्वेटपर्यंत साऱ्या लेखकांना पचवून स्वत:चा विचार घडवताना, गांधी आणि आंबेडकरांच्या दलितांच्या इतर समाजाशी असलेल्या नात्याविषयीची- म्हणजेच त्यातील फरक दाखवणारी टिप्पणी ही एकतर्फी असून चालणार नाही, हे स्वत:ला बजावत राहायची मी! त्यामुळेच की काय, आपण स्वत: दलित कुटुंबात जन्मलेलो नाही याचे सतत जाणवणारे, कधी जाचणारेही भान हे कायम मनात बिंबले गेले. परवा दिल्लीत दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटन करतानाही मला ते प्रकट करावे लागले. आज आरक्षणाविषयीचा वाद पेटलेला असताना त्याची गरज आणि मर्यादा दोन्ही स्पष्टपणे मांडण्याची हिंमत मिळाली, ती तिथूनच. मात्र टक्केवारी नव्हे, तर मंडल आयोगाच्याही पुढे जाऊन दलितांच्या हक्कांना ‘संरक्षण’ हवे आहे, हे त्याच काळात जाणवलेल्या निष्कर्षांपैकी एक!
टाटा सामाजिक विज्ञान संस्था म्हणजेच ‘टीआयएसएस’मध्ये या साऱ्या विषयांवर वाचन, चर्चा करायला जो निवांत वेळ मिळाला, तो आजही आठवतो. जीव हळहळतो. आणि मग ‘दिल ढूंढता है फिर वही, फुरसत के चार दिन..’ गुणगुणत राहते. मात्र त्याही वेळी आणि आजही एकीकडे दलितांच्या वाटय़ास आलेला अस्मितेवरचा हल्ला आणि अस्तित्वही नाकारणारे आव्हान हे अवतीभवतीचे वास्तव असताना आपण मात्र त्याविषयीचा अभ्यास करत, वाचत वा लिहीत राहणे योग्य नाही, हे मनात येऊन मी बेचैन होत राहायचे. ‘आमचा विरोध ब्राह्मणांना नाही, ब्राह्मणवादाला आहे,’ हे बाबासाहेबांचे उदारतेचे बोल आठवून ती खंत वेगवेगळ्या प्रसंगी मनात उमटायची.
त्यातून अगदी सुरुवातीस विद्यार्थिदशेत असताना एकदा दिल्लीतील एका सेमिनारमध्ये मीही ‘हरिजन’ शब्द उच्चारला आणि त्याने विचलित (कदाचित मनात संतप्तही) झालेल्या एका दलित नेत्याने सुनावलेले खडे बोल मला ऐकावे लागले होते, हे मी कधीही विसरू शकणार नाही. मात्र, वास्तव इतके जटिल आणि मिश्र अनुभवांचे, की ‘टिस’ (tiss)मधील अभ्यासापलीकडचे अनुभवच तिथल्या वाचनाला सत्याची धार वा आधार देणारे वाटायचे. ‘टिस’मधून दिला जाणारा अनुभव हा फिल्ड वर्कच्या आठवडय़ातून दोन दिवसांचा. तो अपुरा तर वाटायचाच, परंतु तिथेही एकेक विश्व खुलून समोर आले की तिथल्या अन्यायालाच नव्हे, तर साध्या संस्था-सुधारणेच्या कार्यातही आपण पुरे पडत नसल्याबद्दल डाचत राहायचे. टिसमधल्या चतुर्थश्रेणीच्या कर्मचाऱ्यांसह नाते जोडत, फिल्ड वर्कच्या निवडक वेळेपलीकडे तिथले काम टिसमध्ये आणि घरीही आणून, ही डाचणी थोडी कमी व्हायची इतकेच.
टिसमधल्या प्रत्यक्ष कार्यानुभवाची सुरुवात ही संस्थांमधल्या प्लेसमेंटमधूनच होत असे. मला दोन संस्थांमधल्या दोनचार केसेसही बरेच काही शिकवून गेल्या, हेही खरेच. टिसमध्ये ‘व्यावसायिक समाजकार्या’चे प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणून येण्यापूर्वीच्या राजकीय आणि व्यापक सामाजिक विचारांच्या कुटुंबात वा शिबिरात मिळालेल्या ज्ञानापेक्षा हे संस्थांचे जग, त्याचे दर्शन नुसते वेगळेच नाही, तर धक्कादायक होते. मानखुर्दच्या चिल्ड्रेन्स होममधला शिवा हा माझा पहिला क्लायंट. (म्हणजे ‘अशील’! ‘गिऱ्हाईक’ नव्हे!) मला हे संबोधनच नव्हे तर सोशल वर्कर म्हणून आपल्या अशिलाशी नाते जोडणे, त्याच्या भूत आणि भविष्याचे सखोल संज्ञान घेणे, त्याच्यासोबत कितीही भावूक क्षण अनुभवले तरीही तटस्थ राहणे- यातील अनेक गोष्टी तात्त्विकच नव्हे, तर दांभिकही वाटायच्या. ‘केस वर्क’ म्हणजे एखाद्या समस्याग्रस्त व्यक्तीच्या, तिच्या आयुष्याला नव्हे, तरी निदान तत्काळच्या समस्येला हात घालण्याचे कार्य! व्यक्तीपातळीवरही ‘परिवर्तना’चेच कार्य एक प्रकारे चालू शकते, हा ठाम विचार समाजकार्याच्या व्यावसायिक व्याख्येच्या संदर्भात मांडला जायचा. ग्रेस मॅथ्यूंसारख्या आयुष्यच या ‘केस वर्क’ पद्धतीत आयुष्य झोकून देणाऱ्या, एक क्षणही वाया जाऊ नये म्हणून धडपडणाऱ्या, कॉरिडॉरमध्येही पळत पळत दुसरे टोक गाठणाऱ्या या पिकल्या केसांच्या बाई बरेच काही शिकवून गेल्या. एकेका ‘केस’चा अभ्यास म्हणजे व्यक्तीच्या अंतरंगात शिरून, तिला समजून घेत कधी त्या व्यक्तीला समाजाशी जोडणं, तर कधी अत्याचारी बा संबंधांपासून तोडण्याची प्रक्रिया. माझी पहिली केस होती ती शिवा गोसावीची. चिल्ड्रेन्स होममध्ये शिरले की शिवा धावत येऊन बिलगावा असं वाटायचं. तो मात्र माझी तिथे दर मंगळवारी पोहोचण्याची वेळ समजून उमजूनही दूर व्हरांडय़ातून न्याहाळत बसायचा. केस वर्कसाठी टेबल मांडून कौन्सेलिंगच्या पद्धतीने सोडाच, उंच भिंतींनी वेढलेल्या त्या बांधीव परिसरात शिवासह थोडं टेहळणंही काही महिन्यांनंतरच घडू शकलं. हा तरतरीत, स्वत:च्याच गुर्मीत राहणारा मुलगा घुमन्तू जातीतल्या कुटुंबातून पळून आलेला. त्याला ही संस्था कधीच आपलं घर न वाटता जेलप्रमाणेच सतत भासायची. त्याच्या कुटुंबीयांचा शोध संस्थेद्वारा चालू असल्याचं कळलं होतं. मला मात्र त्याच्या मनाचा आणि भविष्याचा शोध घेण्यासाठी या समाजघटकाच्या इतिहासावरील ग्रंथांबरोबरच संस्थेतल्या फाइलींची पाने अभ्यासून मार्ग काढावा लागत होता. शिवा जेव्हा बोलता झाला तेव्हा त्याच्या ‘गोसावी’ वृत्तीची, त्यांच्या भटक्या आयुष्याची खरी ओळख झाली. एकीकडे त्याला त्या बालगृहात घरगुती बनवण्याचं, तर दुसरीकडे मराठवाडय़ातील त्याच्या कुटुंबाचा शोध लागला तर त्यांच्याशी पुन्हा नातं आणि आयुष्य जोडून देण्याचं असं दुहेरी आव्हान मी स्वीकारलं होतं. काही महिन्यांच्या मानसशास्त्रीय प्रयोगांनंतर बरंच काही साधलं तरी त्या संस्थेतील वातावरण बदलल्याशिवाय शिवासारख्या एकेका मुलाची कहाणी, त्यांचं बालवयातच थिजून राहण्याचं वास्तव काही बदलणार नाही, हे ध्यानी आलं. बालसुधारगृहाचं कार्य हे तिथलं सामान व साहित्याचा गैरवापर, मुख्य संचालक आणि कर्मचारी यांच्यातले बिगडते/ बदलते संबंध यांकडे दुर्लक्ष करून आपण शिवा वा इतर मुलांची आयुष्य कसे घडवणार, या चिंतेने घेरत मला केस वर्कच्या मर्यादा जाणवायच्या. त्यावरून सुपरवायझरसह काहींशी वादही व्हायचा. तरीही शिवा हसता-खेळता झाल्याचे, आता आपल्या गावाविषयीही काही बोलू/ विचारू लागल्याचे माझे रिपोर्टस् मला मार्कस् देऊन गेले. त्या सुधारगृहातील भलेबुरे अनुभव मात्र खरे ‘गुण’ देऊन गेले. या अशा बालसुधारगृहामध्ये एक प्रकारे डांबलेल्या मुलांचं खरं वास्तव मात्र माझं तिथलं वर्ष संपताच तिथून पळून गेलेल्या शिवानेच उघडकीस आणलं. व्यक्तीपातळीवरचं कार्य आज एकेका शेतकऱ्याशी वा कार्यकर्त्यांशी नातं जोडत, आंदोलनाचे स्तंभ उभे करत पुढे नेण्याचं कसब या केस वर्कमधून मिळाल्याचं मान्यच करावं लागतं. मात्र मुंबईतील पारध्यांसह काम करताना त्यांच्यातल्या सगळ्या शिवांचं भवितव्य आपण आखणं तर सोडाच, जोखणंही शक्य होत नाही. म्हणूनच अशांचे संघटित शक्तीच्या जोरावर रोजी-रोटी, आवास अधिकारांसह पुनर्वसन हा मार्ग मला अधिक भावतो. फुटपाथ व प्लॅटफॉर्मवर दंगामस्ती वा ओझे वाहत जगणाऱ्या प्रत्येक मुलात मला शिवाच दिसतो.
दुसरी केस होती माणगावच्या बेबीची. ही अविवाहित माता. कुटुंबाने दूर केलेली. महिला प्रतीक्षागृहात घरी परतण्याची आस आणि विश्वास सोडून बसलेली. तिच्या समाजातील, शेतकरी कुटुंबातील आबाळ, मुलगी म्हणून धि:कार ते पुरुषाचा आधार म्हणून स्वीकार.. इथवरची सारी कहाणी तशी अनेकानेक स्त्रियांची. कष्टकरी कुटुंबांतील स्त्रियांना उंची महालांत कोंडलेल्या स्त्रीपेक्षा अधिक स्वातंत्र्य असले तरीही तिथेही घुसमट भोगणारी बेबी माझ्या वाटय़ाला आली अन् तिच्या भावांना तिच्यातील ‘माणूस’ आणि त्यांच्यातील ‘माणुसकी’ पटवून देण्याची प्रक्रिया वर्षभराच्या प्रयासाने पार पडली. बेबी घरी परतली; मात्र आपलं बाळ दत्तक संस्थेत सोडूनच! या यशापयशापलीकडे या महिलागृहातली अन्य अंदाधुंद आव्हानं विद्यार्थिदशेत टाळावी लागल्याची टोचणी घेऊनच फिल्ड वर्क संपलं.
‘टिस’मध्ये तरीही थिअरी आणि प्रॅक्टिस यांची जोडणी करत चार वर्षे गेली. दोन वर्षे समाजकार्याचं पदव्युत्तर शिक्षण आणि नंतर तिथेच नोकरी करत हाती घेतलेला पीएच.डी.चा अभ्यास. यादरम्यानचा विशेष अनुभव म्हणजे विद्यार्थ्यांना घेऊन गुजरातमधील मोर्वी धरणफुटीनंतरच्या तसेच आंध्र प्रदेशातील वादळी संकटावेळच्या मदतकार्याचा! नैसर्गिक मानल्या जाणाऱ्या, पर्यावरणाचं अस्तित्व जाणवून देणाऱ्या या संकटानं घेतलेले माणसांचे बळी समोर येता पंचमहाभूतांवरील आजच्या अतिक्रमणाची दखल तर घ्यावी लागतेच. मोर्वीचे धरण फुटल्या फुटल्या तेथून जवळच असलेल्या मिठापूरच्या टाटा प्लान्टमधील कर्मचारी, रामकृष्ण परमहंसांचे अनुयायी आणि आमचा ‘टिस’चा पंधरा-वीस जणांचा समूह तिथे पोहोचला. कुठे मृतदेहांच्या संस्कारशून्य विल्हेवाटीचे कार्य, तर कुठे मोर्वीच्या परशुराम पॉटरी या सिरेमिक्सच्या कारखानदारांचा निवारा घेऊन पूरग्रस्त नगरातील पाण्याचा एकेक नळ आणि पाइपलाइन सव्र्हे व जोडण्याचा पाठपुरावा पूर आणि दुष्काळ यांतला संबंध पटवून देणारे ठरले. आंध्रप्रदेशात आम्ही फादर अमल राज यांच्या तमिळ टीमसह राबलो. तिथेही काटय़ाकुटय़ांत केस अडकून, धड वेगळे होऊन व हात गेल्याच्या स्थितीतले शव जाळण्याचा अनुभव हादरवणाराच! तरीही कमनमोलू नावाच्या नागायलंका तालुक्यातल्या, विजयवाडा जिल्ह्यतील कष्टाळू महिला व युवकांशी खरं नातं जडलं ते शासनाकडून तिथे रोजगार खेचून आणण्याच्या प्रक्रियेत. मोठय़ा संकटानंतर नव्या-जुन्या कपडय़ांपासून ते पाण्याच्या पाऊचपर्यंत सामानांची भरमार करणाऱ्या धनदांडग्या संस्थांपेक्षा हे वेगळं कार्य मृत्यूंच्या घेऱ्यातही जिवंत भावबंध निर्माण करून गेलं. तिथून १५ दिवसांनंतर निघताना अश्रूंनी सारं वास्तव भिजवून गेलं. हे अनुभव नंतर कच्छच्या भूकंपानंतर आणि तमिळनाडूतील त्सुनामीच्या संकटानंतर तिथे पोहोचून दिवसरात्र राबत काढलेल्या १५ दिवसांत मार्गदर्शक ठरले.
व्यावसायिक समाजकार्य म्हणजे निव्वळ आर्थिक कमाई देणारे नव्हे, तर त्यात शास्त्र जसे, तसेच भावास्त्रही कामी येते, हेच या अनुभवांचे सार. डॉ. एम. एस. गोरे समाजकार्याच्या तत्त्वज्ञानावर टिसमध्ये अगदी सुरुवातीचे वर्ग घेत असत. त्यांच्या अनेक सिद्धान्तांपैकी ‘भावनिक हस्तक्षेपा’वरील (emotional involvement) भाष्याने मी सर्वात प्रभावित झाल्याचं आठवतं. त्याविना कुठल्याही क्षेत्रातलं, कुठल्याही पातळीवरचं समाजकार्य प्रभावी होऊच शकत नाही, या माझ्या ठाम समजुतीला आजवर तरी तडा गेलेला नाही. व्यक्तीपातळीवरच नव्हे, तर गाव वा वस्तीच्या सामुदायिक पातळीवरील कार्यातही आयडियालॉजी, राजकीय-सामाजिक तत्त्व आणि विचारप्रणालीइतकाच ऊर्जा, प्रेरणा आणि बांधिलकीचा भक्कम आधार म्हणजे त्या- त्या समाजघटकाशी जुळलेलं नातं. हे आजच्या समाजकार्याचाही व्यापार झाल्याच्या परिस्थितीत अधिकच बिंबवावं, असं सत्य. आमच्या तरुणाईच्या काळात अशा संधी मिळाल्या त्या कुटुंबाचाच या क्षेत्रात पाय रोवलेला असल्यामुळे. अन्यथा कुठे डॉ. विकास आणि प्रकाश आमटेंनी बाबांकडून मिळवलेली सोमनाथची छावणी, तर कुठे डॉ. अभय बंगांचे ‘निर्माण’ हे घरचं पाठबळ नसलेल्या अनेक युवकांना अनुभवांचा खजिना देऊन जातं. नर्मदा आंदोलन हेसुद्धा आपली सुट्टी (निदान एक महिना) देणारे विद्यार्थी आणि आपापलं शिक्षण वा कलाकौशल्यं घेऊन येणाऱ्या अन्य तरुणांना उपलब्ध असलेलं एक व्यासपीठ ठरलं. तरीही समाजकार्य हे ‘प्रोफेशनल कोर्स’ म्हणून घेणाऱ्या प्रत्येक महाविद्यालयात पोहोचताना आणि ‘टिस’मधले सारं आठवताना खटकते ती धरातळाच्या जनसंघटनाच नव्हेत, तर जिवंत आंदोलनांशीही एक पाठशाळा म्हणून जोडून घेण्यातली आपली कमतरता. आंदोलनांतही अनेक चढउतार, मनुष्यबळ म्हणून काही बाबतींतली त्रुटी, प्रशिक्षणासाठी कमी पडणारा वेळ, स्थानिक कार्यकर्त्यांची इंग्रजी न येण्याची मर्यादा.. हे सारे असूनही समाजकार्य हे या क्षेत्रात पाय रोवूनच होऊ शकतं. म्हणूनच विविध पातळ्यांवर वंचित समाजघटकांसह दिवस-रात्र काढण्याची, समाज ते शासनाच्या अनेकविध आघाडय़ांवर शोषितांसह उभं राहण्याचा प्रत्यक्ष अनुभव देण्याचं काम शैक्षणिक संस्थांकडूनच आयोजिलं जाणं आवश्यक! केवळ पुस्तकी नव्हे, केवळ व्यक्ती वा छोटय़ा समूहापुरतेच नव्हे, तर धडाडीने पुढे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या, दलितांच्या, अंगमेहनती मजुरांच्या, कारखान्यांतील श्रमिकांच्या, महिलांच्या अशा अनेकानेक आंदोलनांमध्ये समाजकार्याचे अनेक पाठ आणि पाठय़क्रम घडले, मापले आणि शिकवले जाणं, ही आज काळाची गरज आहे. यामुळे जनआंदोलनांनाही नवी युवा ऊर्जा मिळते. इतकंच नव्हे तर एकमेकांना नवनवी पूरक कौशल्यं, शोधकार्य ते प्रतिनिधित्व करण्यापर्यंतचा अनुभव आणि तंत्रज्ञान या साऱ्यांची देवाणघेवाण होते. हेच पुढे नेण्याने घडवू शकू आम्ही बांधिलकीसह परिवर्तनकारी समाजकार्यकर्त्यांची फौज!
medha.narmada@gmail.com