व्हाट्सॅपवर आलेले ज्योक वाचून खो-खो हसण्याचा जिवापाड प्रयत्न केला. मग तो सोडून दिला. आता आम्ही संतोषी मातेचे व्रत घेतलेले आहे. शिवाय दूरसंचार कंपन्यांचे गेल्या जन्माचे काही देणेही आमच्यावर आहे. त्यामुळे आले ते सर्व ज्योक रीतसर फॉरवर्ड केले.
पण काहीच वाटले नाही!
फेसबुकावरील मित्रवर्याचे स्टेटस वाचले. ते वाचले की आम्हांस नेहमी आमुच्या बौद्धिक क्षमतेची शंका येते. वाटते, की बाबा, आपल्या स्टेटसला का येत नाहीत असे शंभर- शंभर लाइक्स?
‘आज डब्यात भेंडीची भाजी होती’ किंवा ‘हवा किती छान पडलीय!’ यांसारख्या लोकांच्या स्टेटसला एकशे ऐंशी लाइक्स आणि पंचेचाळीस कॉमेन्टा मिळतात. आमच्या अशा विचारगर्भ वाक्यांना कधी अशी दाद मिळाली ना तर तुम्हांस सांगतो, सत्यनारायणच घालू आम्ही डीजे लावून!
पण फेसबुकवरही काही मौज आली नाही.
अशा वेळी कोणताही विद्वान मनुष्य काय करतो? तर एक ते शंभर, शंभर ते एक च्यानेले चाळतो.
तेथे कित्ती मज्जा! मराठी मालिका, वृत्तवाहिन्यांवरील बातम्या, कॉमेडी विथ कपिल (हे दोन वेगवेगळे कार्येक्रम आहेत!). फू बाई फू या मालिकेचा नुसता प्रोमो पाहूनसुद्धा आमुच्या हिची हसून हसून मुरकुंडी वळते! (अर्थात, कोणी पाय घसरून पडले तरी तिचे असेच होते. आता असते एकेकाची विनोदबुद्धी अफाट.. त्याला आपण काय करणार? असो.) झालेच तर तेथे साऊथचे ‘डब’ चित्रपट असतात. त्यातील एकेका प्रसंगावर तर मनुष्याचे समग्र आयुष्य करमून जावे!
पण आम्हांस काहीच वाटले नाही.
मग शेजारच्या लेलेंकडून पेपर आणले व तेसुद्धा वाचले.
सक्काळचे अग्रलेख वाचले की काळीज कसे अगदी नि:स्पृह, नि:पक्ष आणि विश्वासार्ह होते!  
पण आज तसेही झाले नाही.
कशाने बरे असे व्हावे?
असे काही निदान झाले नाही, की डॉक्टर मंडळी त्यास ‘व्हायरल अटॅक’ म्हणतात. तसे तर झाले नसेल आपणांस? आम्ही आमुचे लहान व थोर असे दोन्ही मेंदू शिणवून खूप विचार केला व अखेर हिला पुसले, ‘सखये, मज वेडय़ास करमतच नाहीये. सगळे काही रिते रिते वाटते. काय झाले असेल गं मला शोनुल्याला?’
कपाळाला (आमुच्या!) हात लावला- न लावला करून ती म्हणाली, ‘डोकं तर लागतंय गार.. अब की बार मोदी सरकार!’
ते ऐकले आणि आमुच्या मस्तकी चकाक्कन् सीएफएल ल्याम्पच पेटला!
गेले अठ्ठेचाळीस तास आम्ही ही घोषणाच ऐकली नव्हती. हीच काय, प्रचाराची एक जाहिरात पाहिली नव्हती. रिते रिते वाटणार नाही तर काय होणार?
दोन महिने तीन दिवस आम्ही निवडणुकीच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले होते. अखेर एक नागरिक म्हणून आपले काही राष्ट्रीय कर्तव्य असते की नाही? त्याला जागून एक सभा, एक भाषण, एक मुलाखत, एक रोड शो, एक जाहिरात सोडत नव्हतो आम्ही टीव्हीवरची. बुडालोच होतो म्हणा ना त्यात.
परवाची गोष्ट. गेल्या सतरा वर्षांत परवा कधी नव्हे ती हिने चपाती जाळली नाही. आता तिचे हे प्रगतीकडे पडलेले पहिले पाऊ ल. त्याचे कौतुक करायला नको? तिला म्हणालो, ‘हल्ली छान करतेस तू स्वैंपाक.. पवारसाहेबांच्या धोरणामुळे! ’
तर ही भडकलीच. म्हणाली, ‘जनता माफ नहीं करेगी!’
आता आली का पंचाईत?
पण खरी पंचाईत अजून वेगळीच होती. म्हणजे टीव्हीवर सासू-सुनेचे भांडण ऐकणे हा किती रम्य जीवनानुभव असतो. पण मधल्या काळात त्यात रसच वाटेनासा झाला होता. सगळेच पुचाट वाटत होते. वाटायचे, त्या आशालताबाईंनी उठावे आणि कचाकचा म्हणावे, ‘सूनबाई, काय अवदसा आठवली ही तुला? नाश्त्याला हे असे तेलकट वडे देतेस आम्हांस?’
‘मग काय तुम्हाला चिकन सूप पाठवून देऊ ?’
त्यावर आशालताबाईंनी भडकून म्हणावे, ‘गद्दार कुठची! थांब तुझे पाणीच तोडते आता!’
पण कसले काय? मालिकांच्या संवादलेखकांना कुठून असे वास्तववादी डायलॉग सुचायला!
पण आता ते संवादही विरले आणि त्या घोषणाही.
मतदान झाले आणि सगळी रयाच गेली वातावरणातली.
त्यावेळी आमचे यत्ता तिसरीतले कन्यारत्न म्हणायचे, ‘पप्पा, कार्टून लावा.. कशासाठी सांगतेय मी? माझ्या भविष्यासाठीच ना?’
तेव्हा तो विचार केला असता, तर आज असे रिते रिते वाटले नसते.
बरोबर ना? तुमचे काय ‘मत’?     

Story img Loader