अतुल देऊळगावकर – atul.deulgaonkar@gmail.com
‘तरुणपणी त्याने एकदा दर्यामध्ये लघवी केली,
आणि आपले उर्वरित आयुष्य
त्यामुळे दर्याची उंची किती वाढली
हे मोजण्यात खर्ची घातले..’
– विंदा करंदीकर
ग्रीक मिथककथेनुसार नार्ससिस हा अतिशय देखणा व राजिबडा राजपुत्र होता. त्याच्या जन्मानंतर ‘रूपाची त्याला जाणीव झाली नाही तर तो कीर्तिवंत व दीर्घायुषी होईल’ असं भविष्य वर्तवलं जातं. परंतु तो शिकारीला गेल्यावर एका तळ्यात त्याला स्वत:चं प्रतििबब दिसतं आणि तो त्याच्या प्रेमात पडतो. सर्व काही सोडून तो केवळ स्वत:ची प्रतिमाच न्याहाळत राहतो. त्यातच त्याचा मृत्यू होतो. ही दंतकथा रोमन चित्रकारांच्या चित्रांतून लोकप्रिय झाली. मनोविश्लेषणशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉइड यांनी ‘आत्मप्रेम’ या मनोविकाराला ‘नार्सििसझम’ अशी संज्ञा देऊन नार्ससिसला सार्वकालिकत्व बहाल केलं.
तत्त्वज्ञ, कलावंत व शास्त्रज्ञ हे ‘आत्मप्रेम हे व्यक्ती व समाज दोघांनाही घातक आहे’ असंच सांगत आले आहेत. त्यामुळे ‘आत्मप्रेम व्यक्त होणं हे गर आहे’ हा अलिखित संकेत पिढय़ान्पिढय़ा सांभाळून जपला गेला आणि तो जगभर सर्वमान्य होता. संभाषणात अथवा लेखनात आत्मस्तुती तर दूरच; प्रथमपुरुषी एकवचनी अनुभवकथनसुद्धा टाळलं जात असे. अतिशय आवश्यकता भासल्यास स्वत:चा उल्लेख करताना क्षमा मागण्याची प्रथा होती. तेव्हा आत्मप्रौढी मारणारी ‘बढाईखोरी’ ऐकल्यास ते खटकणाऱ्यांचं प्रमाण अधिक असे. आता मात्र लंबक थेट दुसऱ्या टोकाला जाऊन बसला आहे आणि सदासर्वकाळ ‘मी, मी आणि मी’चा सुळसुळाट सुरू झाला आहे. हा ‘मी’चा महापूर कायम टिकवून ठेवणाऱ्या माध्यमाला आज ‘समाजमाध्यम’ म्हटलं जातं. काही समाजशास्त्रज्ञ त्याला ‘समाजविघातक माध्यम (अँटी सोशल)’ म्हणतात. चलत्ध्वनी आणि समाजमाध्यमांमुळे स्वत:च्याच प्रतिमेच्या प्रेमात पडणाऱ्या नार्ससिसची मिथककथा ही घरोघरीची सत्यकथा झाली आहे. स्वमग्न व स्वप्रेमी व्यक्तींच्या कळपांकरिता ‘स्वप्रतिमा’ (सेल्फी) हेच विश्व आहे. मानवी अस्तित्वाला ‘स्वप्रतिमा घेतो म्हणून मी आहे’ व ‘इतरांना स्वप्रतिमा पाठवतो म्हणजे मी आहे’ असा अर्थ प्राप्त झाला आहे. दृश्यकला माध्यमांचे भाष्यकार व अनेक दिग्दर्शकांचे दिग्दर्शक प्रा. समर नखाते म्हणतात, ‘‘नार्ससिस स्वत:ची प्रतिमा पाहत बसला ती निदान वास्तव (रिअल इमेज) होती. स्वत:विषयीच्या प्रतिमा रंगवणं व त्यात रमणं, तशी स्वप्नं पाहणं, यात ती प्रतिमा काल्पनिक असते. याचा फायदा घेऊन जाहिरात क्षेत्रानं आपल्याला व्यापून टाकलं. मग पडद्यावरील प्रतिमांतून चित्रपटांनी स्वप्नांमधील आकर्षक प्रतिमा दाखविल्या आणि त्यात दर्शकाला रमवलं. पुढे संगणक व चलत्ध्वनी यांमुळे तर आपलं आयुष्य हे पडदामयच होऊन गेलं. आता ‘मी कसा आहे?’ हे प्रक्षेपित (प्रोजेक्ट) करण्याची, ‘दाखविण्या’ची केविलवाणी व हास्यास्पद धडपड म्हणजे स्वप्रतिमा! छायाचित्रातून कॅमेरामागील डोळा हा त्याच्या दृष्टीने काहीतरी दाखवीत असतो. स्वप्रतिमा घेणाऱ्या कॅमेऱ्यामागे डोळा कोणाचा असतो? बरं, इतकं आधुनिक तंत्रज्ञान असूनही एकही ‘स्वप्रतिमा’ (सेल्फी) ही उत्तम छायाचित्र न होता बेंगरुळ, बावळट व हास्यास्पदच असते. याचं कारण तंत्रज्ञान हे काही कलात्मक ‘दृष्टी’ देऊ शकत नाही. स्वप्रतिमा हाच मुख्य व्यवहार आणि आहार (सेल्फिव्होरस) झालेल्या असंख्य लोकांनी मेंदू नामक अवयवाचा अजिबात वापर करायचं सोडून दिलं आहे.’’
विंदा करंदीकर यांनी मोहरीएवढय़ा कामाचा गौरव करून मिरवणाऱ्या तरुणपणातील वृत्तीचं विरूपदर्शन १९८१ सालीच घडवलं होतं. आता तर विनाकारण आत्म-प्रदर्शन सुरू झालं आहे. कुठलीही क्षुल्लक घटना टिपून त्याची प्रतिमा काढावी.. मग ते पर्यटन असो वा मेळावा.. त्यात रमण्याऐवजी त्या घटनेची प्रतिमा काढून व ती समाजमाध्यमांवर पाठवून त्याला मिळणाऱ्या पसंतीचे अंगठे सतत मोजत राहणं हाच ‘उद्योग’ करणारे हल्ली जागोजागी दिसत आहेत. अमेरिकेतील ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेंटल हेल्थ अॅण्ड अॅडिक्शन’मधील एका शोधनिबंधात- ‘‘स्वप्रतिमा पाठवली नाही तर आमच्या गटापासून तुटण्याची धास्ती वाटते,’’अशी असुरक्षिततेची भावना अनेकांच्या मनात असल्याचं लक्षात आलं. आता या विकाराला तज्ज्ञांनी ‘स्वप्रतिमाग्रस्तता (सेल्फिटिस)’ अशी संज्ञा तयार केली असून, स्वप्रतिमाग्रस्त व्यसनी संख्येनं झपाटय़ानं वाढत आहेत. सहसा कोणालाच खटकत नाही, इतकं हे व्यसन सार्वत्रिक झालेलं आहे. सध्या वाडी-वस्तीपासून महानगरांपर्यंत, बालकांपासून वृद्धांपर्यंत चलत्ध्वनीशी चाळा हा अनेकांचा आवडता खेळ झाला आहे. बारशापासून अंत्यविधीपर्यंत कुठंही गेलं तरी क्षणाक्षणाला वाजत राहणारा चलत्ध्वनी पाहिल्याशिवाय बहुतेकांना चन पडत नाही, इतका तो सर्वाचा जीवलग मित्र झाला आहे. तर असंख्य लोकांकरिता तो शरीराचा अविभाज्य अवयवच बनला आहे.
अमेरिकेतील ‘प्यु फाऊंडेशन’ ही विना-नफा कार्य करणारी विश्वस्त संस्था सामाजिक विषयांवर संशोधन करते. त्यांनी २०१४ साली ‘चलत्ध्वनीचा सामाजिक परिणाम’ या विषयावर सखोल संशोधन केलं. ‘‘सामाजिक संवाद चालू असताना ८९ टक्के प्रौढ हे चलत्ध्वनी पाहत असतात. घरीसुद्धा एकत्र असल्यावर जेवताना, गप्पा चालू असताना पालक चलत्ध्वनीवरील संदेश पाहण्यास व त्यांना उत्तरं देण्यास अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे घरातला संवाद थांबला आहे असं ८२ टक्के लोकांना वाटतं. स्वत:च्या मुलांशीच संवाद कमी होणं हे भीषण आहे. बालकांच्या भावनिकतेवर आणि व्यक्तिमत्त्व विकासावर होणारे दुष्परिणाम पाहता हा आगीशी खेळ आहे,’’ असा त्यांचा निष्कर्ष आहे. (आता या गोष्टीला सहा वष्रे उलटल्यावर पुन्हा नव्याने सर्वेक्षण केल्यास काय आढळेल?)
२०१३ साली न्यूयॉर्कमधील मुख्याध्यापकांनी, ‘‘शाळांतून मुलांची मत्री अतिशय पातळ होत चालली आहे. त्यांना मित्रच नसतात. वर्गात व शाळेत ओळखीचे असतात. ते एकमेकांशी अंतर ठेवून वागतात,’’ असं निरीक्षण नोंदवलं होतं. त्यांनी अमेरिकेतील सामाजिक मानसशास्त्रज्ञ व शैक्षणिक सल्लागार डॉ. शेरी टर्केल यांची गाठ घेतली. (मुख्याध्यापकांची काटेकोर नजर व काळजी पाहा.) टर्केल यांनी अनेक भेटींतून या मुलांचं मन जाणून घेतलं. ‘‘ही मुलं क्रूर नाहीत. परंतु त्यांना संवादाची आवश्यकताच वाटत नाही. त्यांना इतरांची भावना समजून घेता येत नाही. त्यांच्यामध्ये समभावना (एम्पॅथी) नाहीशी होत आहे,’’ असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. चलत्ध्वनी आल्यामुळे संवादाचा दर्जा सुधारण्याऐवजी माणसांमधील संवादच संपुष्टात आला आहे, हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्या या विषयाच्या शोधात निघाल्या व त्यातून ‘रिक्लेिमग कॉन्व्हस्रेशन : द पॉवर ऑफ टॉक इन् डिजिटल एज’ हे अनन्यसाधारण महत्त्वाचं पुस्तक आकाराला आलं.
एका घरात वा एकाच कार्यालयात जवळ बसलेल्या दोन व्यक्ती एकमेकांशी बोलण्याऐवजी टंकलिखित संदेश पाठवतात. जवळचे नातेवाईक व आप्तदेखील संदेश का धाडत राहतात? टर्केल यांनी या मनोवृत्तीचं विश्लेषण केलं आहे. ‘‘संदेशामुळे दोन व्यक्तींत सुखावह अंतर राहतं. त्यामुळे इतर माणसांचा संपर्क माणसांना नकोसा झाला. इतकंच नाही तर थेट संवादापेक्षा टंकलिखित संदेश त्यांना सोपा व सुरक्षित वाटू लागला. दूरभाष्य करताना त्या क्षणी काही बोलावं लागतं. त्यात समोरचा सहभागी असल्यामुळे अनिश्चितता असते व स्वयंत्स्फूर्त बोलावं लागतं. हे टाळण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे.’’ हे संवादापासून पलायन करणारे तरुण एकमेकांशी संदेशवहनातून ‘संवाद’ साधतात. क्वचित समक्ष भेट झाली तर बोलणंदेखील होतं. पण काही वेळानंतर त्यांना प्रश्न पडतो, ‘आपण संभाषण तर बराच वेळ केलं, पण तो ‘संवाद’ होता का?’ संवादामधील आत्मीयता घटून वाढत चाललेल्या रूक्षतेची ही परिणती आहे.
वाढत्या व अमर्याद आत्मप्रेमामुळे ‘मी’ सोडून इतर कुणालाही व्यक्तीच्या आयुष्यात आता स्थान उरलेलं नाही. इतर कुणाची त्या व्यक्तीला गरज नाही. त्यामुळे कुटुंब व समाजाचा पायाच खिळखिळा होतो आहे. १९८० पर्यंत जगभर व्यक्ती व समाज, व्यक्तिवाद व समाजाभिमुखता यांवर वादविवाद झडत असत. १९८७ साली मार्गारेट थॅचर म्हणाल्या होत्या, ‘‘समाज अशी काही बाबच अस्तित्वात नाही. आहेत त्या केवळ व्यक्ती! स्त्री व पुरुष आणि त्यांची कुटुंबं. कुठलंही सरकार हे लोकांकडे पाहूनच कार्य करीत असतं. आणि लोकांनी आधी स्वत:कडे पाहणं आवश्यक आहे.’’ थॅचर यांच्या या विधानामुळे बराच गदारोळ उडाला होता. बाजारकेंद्री अर्थकारणाचं ते बिगूल मानलं गेलं. त्यानंतरच्या काळात बाजारपेठ व तंत्रज्ञान यांमुळे ही आत्मकेंद्रितता चढत्या क्रमाने वाढतच गेली आहे.
एकंदरीत अनेक कारणांनी माणसांमधील संवाद संपत चालला आहे. ‘पडिले वळण इंद्रिया सकळ ’ म्हटल्याप्रमाणे ही सवय एवढी अंगवळणी पडत आहे! वापर न होणारा भाग गळून पडतो तसा आपसातील संवाददेखील गळून पडत आहे. मानवी जीवन व संस्कृतीचा, कुटुंबांचा व समाजाचा, नातेसंबंधाचा गाभा असलेला संवादच आता लोकांना नकोसा झाला आहे.
विविध संस्कृतींस उदात्त व उन्नत करणारे तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, कलावंत व सुधारक यांनी आजवर विविध पद्धतींनी संवाद साधत समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांना स्वत:कडेही कमालीच्या तटस्थपणे व नम्रतेनं पाहता येत होतं. ते ‘स्व’च्या शोधात इतके आत आत गेले की ‘विश्वाचे आर्त’ प्रकटले. त्यांना ‘स्व’चा लोप घडविण्याची आस होती. त्यामुळे त्यांनी स्वत:ला इतकं सामान्य केलं की त्यांचा आत्मसंवाद हाच लोकसंवाद झाला. सभोवतालचं निरीक्षण करून त्यांचा निसर्गाशी संवाद सुरू असे. वनस्पती, पक्षी, प्राणी यांच्या जिवाची त्यांना कळकळ असे. ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाविषयी आणि निसर्गाच्या महतीविषयी सातत्याने संवाद साधत राहिले. ज्ञानेश्वरांनी ‘मत्र जीवांचे’ हाच आपण उद्देश ठेवावा, अशी विनवणी केली होती. तुकोबांना निर्मितीसाठी ‘ओल जिव्हाळ्याची’ महत्त्वाची वाटत होती. हेन्री डेव्हिड थोरो, जॉन रस्किन, जॉर्ज बर्नाड शॉ, राशेल कार्सन अशा अनेक विचारवंतांनी माणूस व निसर्ग या दोहोंना जपण्याचा सल्ला दिला होता. अनेक ज्ञानी लोकांनी ‘उत्तम पाहणे व ऐकणे हा ज्ञान मिळवण्याचा सोपा मार्ग आहे,’ हे सांगून ठेवलं आहे. ‘चातुर्य येण्यासाठी पंडित-मत्री, पर्यटन व सभेत संचार आवश्यक आहे,’ हे सुभाषित अनेक पिढय़ांनी मनापासून जपण्याचा प्रयत्न केला. या काळात वाद-विवाद होत होते, पण संवादास सूक्ष्मपणे श्रवण करून योग्य अर्थ ग्रहण करण्याची परंपरा चालू राहिली. विद्यार्थी कसा ऐकतो यावरून शिक्षक त्याची मती व गती ठरवत असत. १९८५ साली एका मुलाखतीत पं. कुमार गंधर्व म्हणाले होते, ‘‘हल्ली गायक स्वत:चं गायनच नीट ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांना स्वत:तील दोष समजत नाहीत. ध्वनी मोठय़ानं ऐकू यावा म्हणून ध्वनिक्षेपक आले, परंतु त्यामुळे ऐकण्याच्या दर्जात सुधारणा झाली नाही. सूक्ष्मपणे श्रवण कमी होत चाललंय.’’ केवळ तंत्रज्ञानामुळे गुणवत्तावाढ होऊ शकत नाही, हे सांगणारे ते द्रष्टे होते.
एकाग्रता व एकांतवास यातून आत्मपरीक्षण केलं तरच ‘स्व’ विकसित होत जातो. आता एका वेळी अनेक कामे करण्याचा (मल्टि-टास्क) अट्टहास केला जात आहे. अशा लक्ष विचलित करणाऱ्या काळात संभाषण हे तात्काळ व सुलभ व्हावं यासाठीच्या तंत्रज्ञानात प्रगती होत गेली आणि त्याच वेगाने संवाद कमी कमी होत जाण्याने समाजशास्त्रज्ञ चिंताग्रस्त झाले आहेत. हळूहळू माणसांना हद्दपार करून तंत्रज्ञानाची सोबत वाढत चालली आहे. पाळीव प्राण्याऐवजी यांत्रिक प्राणी, बालकांना खेळण्यासाठी यंत्र-सवंगडी, वृद्धांकरिता यांत्रिक सेवक, इतकंच नाही तर शय्यासोबत करण्यासाठीही यंत्रमानव उपलब्ध झाले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमधील प्रगतीमुळे ग्राहकांच्या पसंतीवरून त्यांच्या स्वभावाचा अंदाज घेत त्यानुसार प्रतिसाद देणाऱ्या यंत्रमानवांची मागणी वाढत आहे. इतकंच काय, यंत्रमानवाच्या रूपातून अनुरूप वर वा वधू तयार करून मिळत आहेत. (१९५९ साली कवी कैफी आझमी यांनी माणुसकीरहित कृत्रिमपणा पाहून तहानेल्या भुंग्याला ‘उड जा, उड जा प्यासे भंवरे, रस ना मिलेगा खारों में, कागज के फूल जहाँ खिलते है, बठ न उन गुलजारों में’असं सांगून टाकलं होतं. कागदी फुलं पाहून हे कवीमन हादरलं असेल तर यंत्राच्या सोबतीबद्दल त्यांनी काय म्हटलं असतं?)
टर्केल या उपकरण व माणूस यांच्यामधील संबंधांचा शोध सातत्यानं घेत आहेत. त्या म्हणतात, ‘‘यंत्रं कसलीही मागणी न करता विनाशर्त काम करतात. त्यांच्यापासून फसवणूक होत नाही. ते जवळीक न साधता मत्री असल्याचा आभास निर्माण करतात. त्यामुळे भावनिक गरजाही भागवल्या जातात. माणसांना यंत्राच्या मदतीने आभासी जगात रममाण होणं सुखावह वाटत असल्याने ते माणसांपेक्षा निर्जीव यंत्रांवर अवलंबून राहणं पसंत करीत आहेत. मानवी गरजा भागविण्याकरिता दाखल झालेल्या सामाजिक यंत्रमानवांमुळे आपण सामाजिक विनाशाच्या उंबरठय़ावर उभे आहोत.’’ एकंदरीत तंत्रज्ञानामुळे सुविधा वाढून मानवाला अनेक बाबींवर नियंत्रण मिळवता येईल असा भ्रम असतो; परंतु अनेक कारणांनी तंत्रज्ञानानेच आता माणसांचा ताबा घेतला आहे.
समाजमाध्यमं आणि आभासी वास्तव यांमुळे आपलं सांस्कृतिक आयुष्यच धोक्यात आलं आहे. आत्मप्रेम आणि आत्ममग्नता यामुळे शिक्षण, सहजीवन, कौटुंबिक आयुष्य अशा सर्व क्षेत्रांची हानी होत आहे. अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ पॅट मॅकडोनाल्ड यांनी ‘आधुनिक जगातील आत्मप्रेम’ या शोधनिबंधात ‘‘जगभरातील सर्व व्यक्तींचं वाढतं आत्मप्रेम हे पृथ्वीचा विनाश घडवत आहे,’’असं बजावलं आहे. आत्मप्रेमात मग्न असणारा समाज व व्यक्तींकडून निसर्गाची पूर्ण उपेक्षा होत आहे. आत्ममग्नतेपुढे बाकी सर्व बाबी गौण वाटत असल्याने त्यांना पक्षी व प्राणी संपून गेले तरी काही फरक पडत नाही. फक्त स्वत:शीच नातं असणाऱ्यांना निसर्गाशी संवाद साधता येणार नाही. आता आपण तुकोबांच्या अभंगाला ‘नको नको आता, कुणाशी संवाद, आपुलाचि नाद आपणासि’ असं विकृत रूप आणलं आहे. याची वेळीच जाणीव करून देणाऱ्या टर्केल- ‘‘अतीव जोडलेल्या (कनेक्टेड) जगातील माणसांचं एकमेकांपासून तुटणं (डिसकनेक्ट) रोखायचं असेल तर संभाषण हेच एकमेव औषध आहे,’’ असं म्हणतात. संवादाच्या कट्टर पुरस्कर्त्यां टर्केलबाई या तंत्रज्ञानाच्या विरोधात अजिबातच नाहीत. म्हणूनच त्या ‘संपर्कजाळ्यापासून काही काळ मुक्त राहून (निदान जेवताना, वाहन चालवताना) प्रत्यक्ष संभाषण पुनस्र्थापनेच्या चळवळीचा आग्रह’ धरीत आहेत.
करोनापर्वातील आजारपणाच्या छायेत जगावर सुतकी कळा आली होती. ग्रीष्माचा पारा ४५ अंश सेल्सियसच्या जवळपास, तर राजस्थानात तो ५० अंशाला ओलांडून गेला होता. हे तप्त वातावरण बदलण्याची किमया केवळ पावसात होती आणि तो वेळेच्या आधीच दाखल झाल्यानं शेतकरी ‘रोहिणीचा पेरा, मोत्याचा तुरा’ असं मानून पेरणीला लागले. बाकीचे ‘मृगाच्या आधी पेरा’ म्हणत तयारीत आहेत. कबीरांनी सर्व जनांना ‘उठो ग्यानी, खेत सवारो’ असं सांगून ‘अज्ञानाची जमीन खोदून वेळीच शुद्ध ज्ञानाचं बी रोवण्यासाठी बजावलं होतं. करोनाच्या कुलपातून बाहेर पडताना आपण माणूस असण्याचा अर्थ उमजून घेतला तर ‘नवीन पेरणी’ करता येईल. त्यातून आयुष्यातील ‘मानवी’ क्षणाची महती लक्षात येईल. मागील सत्तर दिवसांत थेट भेटींअभावी दूर-संभाषण वाढीस लागलं होतं. इथून पुढे प्रत्यक्ष संभाषण वाढत गेलं तर सुसंवादाचा दुर्मीळ आनंद प्राप्त होऊ शकेल. त्यातून पुढे गेलं तर ‘शब्देविण संवादाची’ वा ‘अब्द अब्द’ अवस्थेची सौंदर्यानुभूती मिळू शकेल. आपल्या पेरणीनुसारच पीक उगवणार आहे.