कौस्तुभ विकास आमटे
बाबा आणि साधनाताई आमटे यांनी १९४९ साली चंद्रपूर जिल्ह्यात ‘महारोगी सेवा समिती, वरोरा’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करून, मरणापेक्षा भयाण आयुष्य जगणाऱ्या कुष्ठपीडित बांधवांना न्याय्य, निरोगी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची संधी दिली. येत्या आठवड्यात पंचाहत्तर वर्षे पूर्ण करणाऱ्या या संस्थेविषयी… त्याचबरोबर समाज आणि सरकार यात दुवा म्हणून काम करणाऱ्या ज्या अनेक स्वयंसेवी संस्था स्वातंत्र्योत्तर काळात नावारूपाला आल्या, त्या आज त्यांनीच ठरवलेल्या उद्देशाप्रमाणे वाटचाल करीत आहेत का? नसतील तर त्यांना जाब कुणी विचारायचा, हा प्रश्न अधोरेखित करणारी दुसरी बाजू…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘करुणेचा कलाम’ या आपल्या काव्यसंग्रहातील एका कवितेत बाबा आमटे लिहितात-

संकटातले जहाज कुणाचेही असो

त्याला मदत करायची असते

हा समुद्रावरचा न्याय आहे

तो धरतीचा का होऊ नये?

सामाजिक क्षेत्रात कुठलेही प्रश्न हाताळण्याचे दोन दृष्टिकोन आढळून येतात – पहिला असतो ‘परंपरागत दृष्टिकोन’- ज्यात एक माणूस खड्ड्यात पडला आहे. दुसरा जमिनीवरचा माणूस त्याला भूतदयेपोटी वरून पाणी, अन्न, वस्त्र यांचा निरंतर पुरवठा करत जगवू पाहतो. अप्रत्यक्षपणे ‘कल्याण-व्यसनी’ ( Welfare- Addict) बनवतो. तर दुसरा असतो ‘अपारंपरिक दृष्टिकोन’- ज्यात जमिनीवरचा माणूस दोर टाकून खड्ड्यातल्या माणसाला बाहेर काढत समान प्रतलावर आणतो. भंगलेल्या मनाला ‘सर्जनशीलते’च्या प्रक्रियेत गुंतवून ‘अभंग’ ( Unbreakable) बनवतो. अशाच एका खड्ड्यात ‘महारोग’ वा ‘कुष्ठरोग’ झालेला अख्खा वर्गच समाजाने लादलेल्या सक्तीच्या विलगीकरणामुळे तीन हजार वर्षांपासून खितपत पडला होता. बाबा आमटे आणि गृहिणी-सखी-सचिव या तिन्ही भूमिका व्रतस्थपणे जगत त्यांना तहहयात साथ देणाऱ्या साधनाताई आमटे या उभयतांनी या वर्गाला समुद्रावरच्या न्यायाने मदत करून समपातळीवर आणले आणि कुष्ठपीडित बांधवांच्या आयुष्यात एक समतोल कायम झाला.

बाबा आणि साधनाताईंनी १९४९ साली महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यातील एका अतिग्रामीण अशा वरोडा तालुक्याच्या ठिकाणी ‘महारोगी सेवा समिती, वरोरा’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करून, मरणापेक्षा भयाण आयुष्य जगणाऱ्या कुष्ठपीडित बांधवांना न्याय्य, निरोगी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची संधी दिली. सर्जनशील मानवतेवर बाबांची असीम श्रद्धा होती. याच श्रद्धेच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट घासून पाहत महारोगी सेवा समितीचा प्रवास सुरू झाला. ‘कुष्ठरोगामुळे तुम्ही हाताची सात बोटे गमावली असली तरी शाबूत असलेली तीन उपयोगात आणा; पण गलितगात्र होऊन आत्मसन्मान गमावू नका,’’ अशी जबरदस्त अंत:प्रेरणा बाबांनी कुष्ठपीडितांच्या मनात जागवली. मग या कुष्ठमुक्त बांधवांनी स्वत:च्या वेदनांवर विजय मिळवलाच. अंध, अपंग, कर्णबधिर, अनाथ, परित्यक्ता, निराधार वृद्ध, बेरोजगार ग्रामीण युवा, अन्यायग्रस्त आदिवासी, अल्पभूधारक शेतकरी अशा इतर वंचित घटकांना सोबत घेत समर्थ वाटचाल केली; इतकेच नव्हे तर, जगाच्या नकाशावर ‘आनंदवन’ हे आपले हक्काचे गावच वसवले. विशेष म्हणजे, समाजाने नाकारलेल्या या साध्या माणसांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आणि सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर आरोग्य, शिक्षण, शेती, शेतीपूरक उद्याोग, लघुउद्याोग, रोजगारनिर्मिती, जलसंधारण, पर्यावरण, घरबांधणी इत्यादी क्षेत्रांत नानाविध प्रयोग करून अफाट आणि पायाभूत काम आनंदवनात उभे केले. आज आनंदवनच नव्हे तर श्रमिकांच्या संघर्षमय जीवनाची जाणीव इतरांना करून देत श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणारा चंद्रपूर जिल्ह्यातील श्रमतीर्थ-सोमनाथ प्रकल्प, गडचिरोली जिल्ह्यातल्या दंडकारण्यातील माडिया गोंड आदिवासींशी बंधुत्वाचे नाते जोडणारा लोक-बिरादरी प्रकल्प, हेमलकसा आणि महारोगी सेवा समितीचे इतर उपप्रकल्पही रचनात्मक कार्यात नवनवे मानदंड प्रस्थापित करत आहेत.

महारोगी सेवा समितीच्या या प्रकल्पांत कालौघात विविध सेवा विस्तारत गेल्या, त्या अशा-

१. कुष्ठरुग्ण, अंध, कर्णबधिर आणि अस्थिव्यंग बांधवांसाठी अद्यायावत रुग्णालय-भोजन-जीवनावश्यक सुविधा-निवासादी व्यवस्था, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि मासिक आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून सर्वसमावेशक पुनर्वसन.

२. कीटकनाशकमुक्त शेती, सेंद्रिय शेती, ‘सीड-बँके’च्या माध्यमातून पारंपरिक देशी धान्यबीज वाणांचे संकलन-संवर्धन-उत्पादन-जनजागृती-प्रसार, पारंपरिक देशी वृक्ष जातींचे संकलन-संवर्धन-उत्पादन-जनजागृती-प्रसार, फलोत्पादन, दुग्धशाळा, मत्स्यपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, रेशीम-मश्रूम उत्पादन.
३. बांधकाम, रंगकाम, कुंभारकाम, बांबूकाम, मेटल फॅब्रिकेशन, सुतारकाम, केनिंग काम, इलेक्ट्रिकल फिटिंग-प्लंबिंग व देखभाल-दुरुस्ती, हातमाग, सतरंजी, हस्तकला, चर्मकला, मुद्रण, इ. ४० उद्याोग व सेवांचा अंतर्भाव असणारे ग्रामीण तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र.

४. निवासी कुष्ठमुक्त व दिव्यांग बांधवांच्या मुला-मुलींसाठी प्रारंभी-हस्तक्षेप केंद्र, पूर्व प्राथमिक केंद्र, प्राथमिक व माध्यमिक शाळा.

५. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांसाठी अनिवासी शालेय शिक्षण, कृषी पदविका, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन कला, वाणिज्य, विज्ञान व कृषी पदवी आणि पदव्योत्तर शिक्षण.

६. अंध, अस्थिव्यंग, कर्णबधिर मुला-मुलींसाठी निवासी शाळा आणि व्यवसाय प्रशिक्षण केंद्र.

७. आदिम आदिवासी प्रजातींसाठी रुग्णालय व सर्वसमावेशक आरोग्यसेवा आणि निवासी शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण.

८. वन्यप्राण्यांचे अनाथालय.

९. प्रकल्प-बाह्य गरीब, गरजू रुग्णांसाठी मोफत बाह्यरुग्ण, आंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रिया-रोगनिदान शिबीर-महिला आरोग्य जनजागृती-रोगनिदान शिबिरे, बालआरोग्य सेवा.

१०. पर्यावरण संवर्धन उपक्रम, नैसर्गिक संसाधनांचे जतन, सामाजिक वनीकरण.

११. जलसंधारण व व्यवस्थापनातून जल-स्वयंपूर्णतेकडे वाटचाल.

१२. युवक-युवतींसाठी वार्षिक श्रमसंस्कार छावणी.

१३. प्रकल्प-बाह्य अल्पभूधारक शेतकरी, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी, अंध, अस्थिव्यंग आणि कर्णबधिर बांधवांना स्थळ-सापेक्ष व गरज-आधारित दृष्टिकोनातून शिक्षण-व्यावसायिक प्रशिक्षण, आर्थिक आणि वस्तूरूप सहकार्य, ग्रामपातळीवर जलसंसाधन संवर्धन व विकास, होतकरू समविचारी स्वयंसेवी संस्थांचे बळकटीकरण.

महारोगी सेवा समितीच्या लोकहितवादी सफरीला नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली! १४ रुपये, ६ कुष्ठपीडित बांधव, एक लंगडी गाय आणि दुर्दम्य इच्छाशक्ती एवढ्या मुद्दलावर सुरू झालेल्या या सफरीने साडेसात दशकांच्या कालखंडात मुख्यत्वे कुष्ठपीडित तसेच अंध, अपंग, कर्णबधिर, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ समाज घटक, अनाथ, परित्यक्ता, निराधार वृद्ध, बेरोजगार ग्रामीण युवा, अन्यायग्रस्त आदिवासी, अल्पभूधारक शेतकरी अशा ३३ लाख उपेक्षित बांधवांना आरोग्य सेवा, औपचारिक शिक्षण, विशेष शिक्षण, कौशल्य विकास प्रशिक्षण, मानसिक-सामाजिक-आर्थिक पुनर्वसन, अशा विविधांगी माध्यमांतून स्पर्शले आहे. महारोगी सेवा समितीच्या प्रकल्पांत निवासी कुष्ठमुक्त-इतर दिव्यांग बांधव, दिव्यांग-आदिवासी विद्यार्थी-प्रशिक्षणार्थी; तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्रामीण व आदिवासी अनिवासी विद्यार्थी-प्रशिक्षणार्थी, अभ्यागत-अतिथी इत्यादींची दैनंदिन संख्या सहा हजारांवर जाते! याखेरीज, संस्थेद्वारे वर्षभर आयोजित मोफत रोगनिदान व शल्यक्रिया शिबिरांचा लाभ महाराष्ट्र आणि सभोवतालच्या राज्यांतील सुमारे ५०,००० ते ७५,००० गरजू रुग्णांना होत असतो.

‘महारोगी सेवा समितीच्या पुढील २५ वर्षांच्या प्रवासाची दिशा काय असेल?’ हा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक आहे. तेव्हा मला सांगावंसं वाटतं की, सहृदयता हा कुठल्याही लोकहितवादी कार्याचा आत्मा असतो. तो कायम ठेवून कालानुरूप स्थळ-सापेक्ष व गरज-आधारित दृष्टिकोनातून कार्य करत राहणे हीच संस्थेच्या प्रवासाची आजवरची दिशा होती आणि पुढेही असेल. भविष्यातील संस्थेच्या प्रवासाच्या दिशेचे ढोबळ स्वरूप समजून घ्यायचे झाल्यास आधी थोडे करोनाकाळात डोकवावे लागेल. करोनाच्या दुसऱ्या लाटेत, २०२१ च्या मे महिन्यात संस्थेने चांद्यापासून बांद्यापर्यंत ‘मिशन-आनंद-सहयोग’ या मदत मोहिमेद्वारे गावकुसाबाहेर, पाड्यावर, वाडीवस्तीमध्ये, स्वयंसेवी संस्थांमध्ये निवासी ६५०० पेक्षा अधिक उपेक्षित बांधवांना जीवनावश्यक वस्तूंच्या संचांचे वाटप केले होते. त्याचबरोबर या घटकांचे सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणही केले होते. यात असे आढळून आले की, करोनासदृश महामारी, मंदी, महागाई वा तत्सम संकटे जेव्हा ओढवतात; तेव्हा त्यांची भीषणता कुष्ठग्रस्त, दिव्यांग, एचआयव्हीबाधित, आदिम आदिवासी, शेतमजूर आणि हातावर पोट असलेल्या एकूणच आर्थिकदृष्ट्या दुर्बळ श्रमिक वर्गाच्या परिप्रेक्ष्यात आपल्याला वाटते त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक असते. त्यामुळे हे पक्के झाले की, संस्था या व अशा घटकांच्या सर्वांगीण उत्थानासाठी कायम मार्गस्थ असेल.

२००६ साली बाबांनी अचानक एका संध्याकाळी त्यांचे एक स्वप्न मला बोलून दाखवले होते. ते होते- आनंदवनाला ‘आरोग्याची राजधानी’ म्हणून प्रस्थापित करण्याचे. मी त्याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणाले, ‘‘हे बघ, मी माझे स्वप्न सांगितले. ते प्रत्यक्षात आणायचे की नाही, आणायचे असेल तर कसे आणायचे, त्याचे स्वरूप काय असावे वगैरे तुझे तू बघ. मला परत याबद्दल विचारू नको!’’ मग काय, चर्चाच खुंटली! नंतर मी विचार केला, ‘आरोग्यसेवा’ हा महारोगी सेवा समितीच्या कार्याचा गाभा आहे; तेव्हा असाध्य रोगांनी ग्रस्त असलेल्या दुर्लक्षित, पीडित बांधवांपर्यंत स्वास्थ्यसेवेच्या माध्यमातून संस्थेने संख्यात्मक आणि गुणात्मकरीत्या पोहचावे हे बाबांना अभिप्रेत असणार. भौगोलिकदृष्ट्या भारताच्या केंद्रस्थानी असलेल्या आनंदवनाने सायकलच्या चाकाप्रमाणे ‘Hub to Spoke’ पद्धतीने कार्यरत राहावे. देशात जेथे आरोग्यसेवेची गरज आहे तेथे Hub म्हणजे केंद्रस्थानी असलेले आनंदवन Spoke द्वारे पोहोचेल, आणि इतर राज्यांत विखुरलेले व्याधीग्रस्त बांधव Spoke द्वारे Hub म्हणजे आनंदवनाकडे येतील,’’ असे काहीसे हे स्वप्न असावे. हे स्वप्न अर्थातच अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. परंतु डॉ. अनिल अवचट म्हणत, ‘‘एखादे गैरकृत्य करायचे असेल तरच माणसाने भीती बाळगावी. काही चांगले करायचे योजले असेल तर ते बेधडक आचरणात आणावे. यात ना गमावण्यासारखे काही असते ना कुठली स्पर्धा. शिवाय, अमर्याद संधी उपलब्ध असतात!’’ माझे वडील आणि संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे नेहमी म्हणतात, ‘‘स्वप्न पाहायला टॅक्स लागत नाही! स्वप्ने पाहायची तर मोठी पाहा आणि उगाच काथ्याकूट करत बसण्यापेक्षा त्या स्वप्नांना मूर्त रूप देण्यासाठी प्रयत्नशील व्हा.’’ तेव्हा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आनंदवनाला आरोग्यसेवेबरोबरच शिक्षणाची, कौशल्य विकास प्रशिक्षणाची आणि पर्यावरण संवर्धनाची राजधानी म्हणून प्रस्थापित करण्यासाठीही कंबर कसली आहे!

मित्रहो, ‘कुष्ठरोग संपला’ असे काही मंडळी अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलत असतात. वास्तवात, कुष्ठरोग संपला नसून ८०च्या दशकात उपलब्ध झालेल्या ‘बहुविध उपचार पद्धती’च्या साहाय्याने कुष्ठरोगामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक विकृतींचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. महारोगाचे निर्मूलन हा संस्थेचा आणि सरकारचा व्यापक उद्देश आहेच. परंतु आजही

साधारण दोन दिवसांआड एक कुष्ठपीडित व्यक्ती संस्थेत उपचार वा पुनर्वसनाच्या गरजेने दाखल होत असते. नुकतेच एका ‘तथाकथित’ उच्च जातीतील, उच्चशिक्षित सधन कुटुंबातील एक ‘कुष्ठमुक्त’ ज्येष्ठ नागरिक आनंदवनात पुनर्वसनासाठी भरती झाले. अशा वेळी विलक्षण चीड यासाठी येते की, कुष्ठमुक्त झालेल्या व्यक्तीला कुटुंबाने का स्वीकारू नये? यांनी बहिष्काराचे डंख घेतच जगावे का? मग ‘कुष्ठरोग संपला’ हे आपण कुठल्या आधारे म्हणतो? आणि गेल्या ७५ वर्षांत अशी जी ११ लक्ष कुष्ठपीडित माणसे महारोगी सेवा समितीच्या संपर्कात आली, याला निरोगी समाजव्यवस्थेचे लक्षण म्हणायचे का? अखेर काय, दु:खाला कूळ, वंश, जात-पात, धर्म, पंथ असे काहीही नसते. बाबा तळमळून म्हणत, ‘‘शरीराचा कुष्ठरोग पूर्ण बरा होतो. मात्र समाजाला लागलेली ही ‘मनाच्या महारोगाची कीड’ नष्ट होण्याचा दिवस दृष्टिपथात नाही.’’ या मनाच्या महारोगाचे निर्दालन करणारे, पीडितांना त्यांचे न्याय्य अधिकार मिळवून देणारे अगणित शत्रुघ्न निर्माण होवोत हेच आमचे मनोरथ.

बाबा आणि साधनाताईंनी आयुष्यभर सामाजिक न्यायाचा कंदील हाती घेऊन असंख्य अंधारे कोपरे धुंडाळले आणि तेथे खितपत पडलेल्यांचा हात हातात घेऊन त्यांना प्रकाशाची वाट दाखवली. त्यांनी सोपवलेला हा कंदील हाती घेऊन डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे, डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे आणि त्यांच्या पूर्णवेळ सहकारी कार्यकर्त्यांच्या पिढीने महारोगी सेवा समितीची लोकहितवादी सफर नवनव्या अंधाऱ्या, आडवळणी वाटा चोखंदळत तशीच सुरू ठेवली. आज आमच्यासमवेत, या कार्यकर्त्यांच्या तिसऱ्या पिढीतील आमची समवयस्क मित्रमंडळी, तसेच गेल्या दहा वर्षांत संस्थेत दाखल झालेल्या ध्येयवादी तरुण कार्यकर्त्यांची फौज कार्यरत आहे. या सफरीत आजवर लक्षावधी सुजन तन, मन, धन आणि सद्भावनेच्या रूपाने ‘पांथस्थ’ म्हणून सामील झाले. आपणही, आपला परिवार आणि मित्रमंडळींसोबत ‘आनंदवन’, ‘श्रमतीर्थ-सोमनाथ’ आणि ‘लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा’ येथे भेट देऊन आपले नाव नोंदवू शकता आणि आमचे ‘सह-पांथस्थ’ होऊ शकता! या लोकहितवादी सफरीत आपले सहर्ष स्वागत…

kaustubh.amte@maharogisewasamiti.org

(लेखक महारोगी सेवा समिती, वरोरा येथे पूर्णवेळ कार्यकर्ता आहेत.)