||अभिजीत ताम्हणे
माणसांमध्ये दिसणाऱ्या भावनोद्रेकाची कारणं व्यक्तिगत नसून सामाजिक आहेत, हे दानिश सिद्दीकीनं ओळखल्याखेरीज त्याच्या छायाचित्रांतली चेहरे न दिसूनही विषय स्पष्ट होण्याची खासियत खुलली नसती. हे उद्रेक टिपण्याची दानिशची पद्धत निराळी होती..

‘अफगाण नॅशनल आर्मी’ या अधिकृत सैन्यदलासह छायाचित्रकार म्हणून गेलेला दानिश सिद्दीकी, १६ जुलै रोजी कंदाहारमध्ये तालिबानी अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत मारला गेला. त्याची कारकीर्द २०१० पासूनची, म्हणजे उणीपुरी ११ वर्ष. तरीही दानिशबद्दल गेल्या काही दिवसांत बरंच लिहिलं गेलंय, याचं एक कारण म्हणजे या ११ वर्षांतला प्रत्येक क्षण त्यानं कारणी लावला. ‘इतिहास टिपतोय’ ही स्वत:च्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर दिलेली ओळख त्यानं जपली. त्यासाठी मिळेल ती संधी घेतली- ‘आयसिस’च्या कब्जातून कसंबसं परत मिळवलेलं इराकमधलं मोसुल, रोहिंग्या निर्वासितांनी भळभळून वाहाणारी बांगलादेश-म्यानमारची सीमा, किम जाँग उनच्या हुकूमशाहीखालचा उत्तर कोरिया, अफगाणिस्तान.. कुठंही तो गेला. तितकंच महत्त्वाचं हेही की, ‘रूटीन’ वाटणारं कामही त्यानं चोख केलं- म्हणजे मुंबईत दहीहंडी, गुढीपाडवा स्वागतयात्रा, होळी वगैरे टिपलंच आणि काहीच हाताशी नसलं तर इथल्या समुद्रकिनाऱ्याशी लोकांचं असलेलं नातं टिपलं.

अथक काम करणारे नेमका क्षण टिपणारे छायाचित्रकार, छायापत्रकार बरेच पाहिलेत आपण.. रघुबीर सिंग, रघु राय, मुकेश पारपियानी.. कितीतरी नावं. त्यांच्या पंक्तीत दानिशला बसवण्याची कारणं त्यानं टिपलेल्या फोटोंमध्ये दिसू लागतात. बखोट धरून पाण्याबाहेर खेचल्या जाणाऱ्या रोिहग्या छोकऱ्याचे डोळे, सैन्याच्या जीपकडे पाहणाऱ्या अफगाण नागरिकांचे डोळे, ‘९ नोव्हेंबर २०१६’ या तारखेला भयचकित झालेले एका शेअर-दलालाचे डोळे.. या नजरांनी त्याची वाट रुंद केली होतीच; पण पाठमोरे, झाकलेले, स्पष्ट न दिसणारे चेहरे टिपण्याची त्याची तऱ्हा आणखी न्यारी. ‘लोकांचं खासगीपण जपलं पाहिजे’ हा त्याचा या फोटोंमागला सिद्धान्त आणखी महत्त्वाचा. असे अनेक फोटो त्याच्या ‘दानिशपिक्स’ (स्पेलिंगमध्ये ‘एक्स’) या इन्स्टाग्राम खात्यावर किंवा ‘दानिशसिद्दीकी.नेट’ (स्पेलिंगात ‘क्यूयूआय’) या संकेतस्थळावर पाहाता येतील. २०१३ पासूनचे त्याचे फोटो नीट पाहिल्यास लक्षात येतं की, हा माणूसपणावर प्रेम करणारा होता- मानवी भावनांचा उद्रेक जणू खेचून घ्यायचा त्याच्या कॅमेऱ्याला. या भावना व्यक्तिगत किंवा एकाच व्यक्तीच्या नसून सामाजिक आहेत, हे दानिशनं ज्या क्षणी ओळखलं असेल, त्या क्षणापासून तो बदलला असेल- मुक्त झाला असेल! चेहरे आणि डोळ्यातले भावच दिसले पाहिजेत असं काही नसतं- उलट ‘सब्जेक्ट’चा खासगीपणा जपणंही आपल्याला जमू शकतं, हे कळलं असेल त्याला.

या सामाजिक भावनोद्रेकाचं एक रूप हिंसेचं, दुसरं शांततामय आंदोलनाचं, तिसरं जगण्यासाठी खायला मिळवण्याच्या असहाय धडपडीचं, चौथं हिंसेतही मुलाबाळांचे लाड करू पाहणाऱ्या किंवा अन्य प्रकारे ‘नॉर्मल’ जगू पाहणाऱ्या वेडय़ा आशेचं.. आणखीही आहेत रूपं- उत्तराखंडमधल्या पुरातली माणसं, हुकूमशाहीत ‘नेहमीसारखं’ जगणारी माणसं..

इथं निवडलेली छायाचित्रं ही उद्रेक निवल्यानंतरच्याही खुणा त्यानं कशा टिपल्या, हे दाखवणारी आहेत. त्यापैकी मिकी आणि मिनी माऊस हे मोसुल शहरातल्या बालरुग्णालयाच्या भिंतीवर होते पण ‘चेहऱ्याचं चित्र हराम’ मानणाऱ्या इस्लामी अतिरेक्यांनी लहानग्यांच्या लाडक्या कार्टूनांवरही अत्याचार केलेत. उत्तराखंडच्या देवप्रयागजवळ भाविकांनी एका गुहेत पूजाअर्चा सुरूच ठेवलीय पुरातही. त्या रोहिंग्या महिलेला बहुतेक खरंच वाटत नाहिये, आपण दुसऱ्या भूमीवर पोहोचलोत.. आणि अफगाणिस्तानात २०१२ साली अमेरिकी शांतिफौजेचा सैनिक ‘पोझिशन घेऊन’ सज्जबिज्ज असताना मिसरूडही न फुटलेला एक अफगाण पोरगा आपलं नेहमीचं काम करतोय. जगणं पुढे जातच असतं म्हणा.. पण छायापत्रकार म्हणून काही निराळं करू पाहणारा दानिश जगायला हवा होता.. आपला घडता इतिहास त्यानं टिपायला हवा होता.

abhijeet.tamhane@expressindia.com

Story img Loader