प्राची मोकाशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संगीताचे बाबा घरी आले तेव्हा ते अगदी शांत होते. संगीताने बाबांना पाणी आणून दिलं. आई गॅसवर जेवण गरम करायला ठेवून त्यांच्याशी बोलायला आली.

‘‘आजचा दिवस माझ्या पोलिसी आयुष्यात कधी येईल असं वाटलं नव्हतं.’’ बाबा त्यांची बॅटन आणि कॅप टेबलावर ठेवत म्हणाले. संगीताचे बाबा मुंबई पोलिसात कॉन्स्टेबल होते. आज बंदोबस्ताची डय़ुटी लागली शिवाजी पार्कला, नेमकी लताच्या अंतिम प्रवासाच्या ठिकाणी. लता आज दिसली खरी, पण तिचा सूर शांत झाला होता. तिला असं पाहून गलबलून आलं, पण वर्दीमध्ये भावनांना जागा नाही.’’ बाबा गहिवरून म्हणाले. संगीताचे बाबा लता मंगेशकरांचे फॅन. लहानपणापासूनच त्यांना लताच्या गाण्यांचं प्रचंड वेड. त्यांच्याकडे लताच्या असंख्य गाण्यांचा खजिना होता. आपसूकच दहा-बारा वर्षांच्या संगीतालाही लताची बरीचशी नवी-जुनी गाणी तोंडपाठ होती आणि त्या गाण्यांबद्दल बरीच माहितीही होती.

‘‘आज सकाळी लता गेल्याचं समजलं आणि विचित्रच वाटलं एकदम. कुणीतरी जवळचं माणूस गेल्यासारखं!’’ आई बेचैन होत म्हणाली.

एवढय़ात बाबांचं लक्ष रेडिओवर सुरू असलेल्या ‘इक था बचपन, छोटासा, नन्हासा बचपन..’ या गाण्याकडे गेलं. रेडिओच्या सगळय़ा स्टेशनवर आज लताचीच गाणी होती.

‘‘आपल्या बाबांपासून दुरावलेली छोटी नीना, मोठी झाल्यावर तिच्या बाबांची आठवण काढून हे गाणं म्हणते. वडील आणि मुलीचं काय सुरेख नातं दाखवलंय या सिनेमात! तुझ्या आईचं फेव्हरेट गाणं!’’ पाणी पीत बाबा संगीताला म्हणाले.

‘‘अनेक फेव्हरेट गाण्यांपैकी एक!’’ आईने दुरुस्ती केली, ‘‘एरवी लताच्या कुठल्या एका गाण्यावर गाण्यातल्या तज्ज्ञांनाच काय, कदाचित खुद्द लतालाही सांगता येणार नाही की तिचं ‘बेस्ट’ गाणं कोणतं.. बरं, आवरून घेताय? जेवू या..’’

‘‘हो, चला! ‘जन पळभर म्हणतील हाय, हाय’.. कामं थांबवून चालणार नाही!’’ म्हणत बाबा आवरायला गेले. आई स्वयंपाकघरात गेली. संगीताने रेडिओचा आवाज किंचित मोठा केला.

बाबा आवरून येईपर्यंत रेडिओवर गाणं सुरू होतं.. ‘धीरेसे आजा री अखियन में, निंदिया आजा री आजा..’

‘‘बाबा, तुम्ही ही अंगाई मला झोपवताना म्हणायचात!’’ संगीता तिथेच ताटं पुसत बसली होती.

‘‘आणि ‘आजा री आ, निंदिया तू आ’.. हे गाणं मी गायला लागलो की दोन मिनिटांत तू गुडुप्प व्हायचीस.’’

‘‘आज मात्र लताच्या फॅन्सना झोप लागणं कठीण!’’ आई जेवण वाढता-वाढता म्हणाली.

‘‘आई, तू मला पाठीवर बसवून ‘चल मेरे घोडे टिक, टिक, टिक..’ म्हणत घरभर फिरवायचीस! अल्बममध्ये फोटो आहे आपल्या दोघींचा.’’

‘‘ते गाणं तर माझ्या लहानपणी तुझे आजोबाही मला पाठीवर बसवून म्हणायचे.’’ बाबा म्हणाले.

‘‘ओसरीवर बसून आपण ‘अटकन, बटकन, दही चटोकन राजा गये दिल्ली’  म्हणायचो. त्याशिवाय तू जेवायची नाहीस! आणि ते, ‘दोस्ती’ मधलं, ‘गुडीया हमसे रुठी रहोगी’ कितीदा म्हटलंय तुझ्यासाठी!’’ ‘‘आणि मग मी म्हणायचे ‘तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है, ओ मां..’, ना?’’ संगीताने घास घेत विचारलं. आईने होकारार्थी मान डोलावली. इतक्यात बातम्या लागल्या म्हणून संगीताने उठून रेडिओचं स्टेशन बदललं. तिथे गाणं सुरू होतं ‘मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळीयांसी आला..’ ‘‘संगीता, हे गाणं तुझ्या आजीचं आवडतं. एकदम छान म्हणते ती! किती घरगुती कार्यक्रमांमध्ये तिने गायलं असेल! कदाचित लतापेक्षा तिनेच ते जास्तवेळा गायलं असेल.’’ बाबांनी आठवण सांगितली. ‘‘ही तर संत ज्ञानेश्वरांची रचना! कित्येकदा त्यांचं पसायदान आम्ही शाळेत समूहगान स्वरूपात म्हणतो. शाळेत ‘वृक्षारोपण’ मोहीम राबवतात तेव्हा हमखास ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे..’ हा संत तुकारामांचा अभंग म्हटला जातो.’’ संगीता म्हणाली. ‘‘हे अभंग सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले ते लतामुळे. गंमत म्हणजे, ‘संत ज्ञानेश्वर’ सिनेमातलं ‘ज्योत से ज्योत जगाते चलो’ हे गाणं लहान ज्ञानेश्वराच्या मुखातून लताच गाते.’’ बाबा हलकं हसत म्हणाले.

‘‘कवी बींचं ‘चाफा बोलेना, चाफा चालेना’ आठवतंय? आमच्या गाण्याच्या बाई आम्हाला गाण्याच्या तासाला शिकवायच्या. ‘आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे..’ हे गाणं तर माझ्या आजीने माझ्या आईला शिकवलं, आईने मला आणि मी संगीताला शिकवलंय.’’ आईलाही तिच्या बालपणीच्या गोष्टी आठवल्या. ‘‘या सगळय़ा खरं तर कविता आहेत, ज्यांना नंतर चाली लावल्या गेल्या. कुसुमाग्रजांची ‘जीर्ण पाचोळा पडे तो उदास’ ही कविता मी शाळेच्या एका गायन स्पर्धेत गायली होती.’’ बाबांनी ती थोडी गुणगुणली. ‘‘आणि लताची समरगीतं? ‘वंदेमातरम्’ गाताना जेव्हा लता असं आवेशाने ‘सप्तकोटी कंठ कलकल निनाद कराले’ म्हणते तेव्हा कसलं भारी वाटतं! स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ‘जयोऽस्तुते’ किंवा ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ ऐकताना तर अंगावर काटाच येतो. ‘हे हिंदूू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा’ लागल्याखेरीज शिवजयंती पारच पडत नाही.’’ संगीता अभिमानाने म्हणाली.

‘‘जितक्या कणखरपणे लताने समरगीतं म्हटली, तितक्याच हळुवारपणे तिने मीराबाईंच्या ‘चाला वाही देस’, ‘पायोजी मैने, राम रतन धन पायो’सारख्या रचना गायल्या! पावसाळय़ात तिचं ‘बरसे बुन्दिया सावन की’ हे गाणं तुझी आई न चुकता ऐकणारच!’’ बाबांना पटापट लताची गाणी आठवत होती.. जेवणं झाली. रेडिओवर ‘मावळत्या दिनकरा’ हे भावगीत लागलं. ‘‘आजच्या मावळत्या सूर्याबरोबर, ‘लता’ नावाच्या सूर्याचा अस्त झाला. पन्नास-साठ वर्षांचं सुरांचं पर्व संपलं.’’ आई खेदाने म्हणाली. ‘‘असं का म्हणायचं? लता आपल्यातच आहे! तिच्या गाण्यांतून आपण तिला रोज ऐकणार आहोत.’’ बाबा म्हणाले. ‘‘अगदी बरोबर, बाबा!’’ संगीता म्हणाली, ‘‘बालकवींच्या कवितेतून तीच तर म्हणते ‘माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे.. अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे.. माझे गाणे..’’

mokashiprachi@gmail.Com