सुभाष खोत यांना गणितातील जागतिक बहुमानाचा समजला जाणारा ‘रोल्फ नेवालिन्ना’ हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. कोल्हापूरपासून सुरू झालेला सुभाष खोत यांचा प्रवास आता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला आहे. त्यांचं वाचन चौफेर असून त्यांना इतिहास, अर्थशास्त्र, कामगारविषयक कायदे, युरोपियन रेनेसॉंमधील कला, जागतिक घडामोडी या सर्वात तितकाच रस आहे.
१२ ऑगस्टला वर्तमानपत्र पाहिल्याबरोबर एक आनंदाश्चर्याचा उद्गार उमटला, ‘हा कुठला नवा तारा गणित व कम्प्युटर क्षेत्रात उगवला बरे?’ मग इंटरनेटवरून माहिती मिळाली, की हा तारा वास्तविक २००२ सालीच क्षितिजावर आला आहे. त्याचे तेज आधी त्याच्या- म्हणजे कम्प्युटरच्या क्षेत्रातील लोकांना समजले आणि मग इतरांना. कारण प्रिन्स्टन विद्यापीठात संशोधन करणाऱ्या सुभाष खोत यांचा क्रांती घडवणारा शोधनिबंध २००२ साली प्रसिद्ध झाला. त्यांचे गाइड प्रा. आरोरा यांच्यासकट इतरांनाही तो फार महत्त्वाचा असेल असं सुरुवातीला वाटलं नाही; पण त्याचा अभ्यास चालू झाल्यावर त्याचं महत्त्व समजू लागलं. मग २००५ साली दोन लाख डॉलरची ‘मायक्रोसॉफ्ट’ची स्कॉलरशिप, २०१० साली National Science Foundation चे सन्माननीय वॉटरमन पारितोषिक हे सुभाष यांच्याकडे चालून आले. आता Rolf Nevanlinna च्या नावाचे सुप्रसिद्ध व सुवर्णपदकासहित येणारे पारितोषिक त्यांना देण्यात आले आहे आणि सर्वदूर या मराठी तरुणाची कीर्ती गेली आहे.
आजचा महाराष्ट्र आणि वैचारिकता
टोकावर उभं असलेलं मराठी गाणं!
स्वैर.. मराठी सिनेमा अन् अभिरुचीही!
टांग मारून गेलेली वाचनाभिरुची!
द्रष्टेपणा.. सैद्धांतिक गणितज्ञांचा!
या तरुणाची पाश्र्वभूमी प्रथम पाहू. १० जून १९७८ मध्ये इचलकरंजी या कोल्हापूरजवळच्या लहानशा शहरात सुभाषचा जन्म झाला. हे शहर हातमागावर तयार होणाऱ्या कापडासाठी प्रसिद्ध आहे. सुभाषचे आई-वडील डॉक्टर होते. त्याचे वडील नाक-कान-घशाचे डॉक्टर, तर आई जनरल प्रॅक्टिस करणारी. त्यामुळे साहजिकच या मोठय़ा मुलाने डॉक्टर व्हावे अशीच त्यांची अपेक्षा असणार. मुलगा तर पहिल्यापासूनच विलक्षण हुशार. त्यामुळे ते त्याला सहजशक्यही व्हावं. पण सुभाषचा ओढा शुद्ध विज्ञानाकडे होता. केमिस्ट्री-फिजिक्सचा अभ्यास करता करता त्याच्या लक्षात आलं , या सगळ्याच विषयांच्या मुळाशी गणिती विचार आहे. मग त्याने आईला सांगून टाकले की, तो गणिताचा अभ्यास करणार आहे. १९९५ साली आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत संपूर्ण भारतात सुभाष पहिला आला. लक्षात घ्या की, इचलकरंजीत मुंबई-पुण्यात असतात त्या प्रकारचे कोचिंग क्लासेस नव्हते. तो मुंबईच्या आयआयटी संस्थेत दाखल झाला. त्याच वर्षी त्याला पितृनिधनाचा धक्का बसला. तिथे त्याने कम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली व प्रिन्स्टन विद्यापीठात संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतला. प्राध्यापक अरोरा हे त्या क्षेत्रातले मान्यवर प्राध्यापक त्याचे गाइड होते. पीएच. डी.ची पूर्वतयारी करण्यासाठी जो अभ्यासक्रम करण्यासाठी एक ते दोन वष्रे इतरांना लागतात, तो त्याने अवघ्या तीन महिन्यांत पुरा केला. सुटीसाठी हा संशोधक विद्यार्थी घरी आला होता. त्यावेळी २००१ मध्ये एका संध्याकाळी घरीच कम्प्युटर प्रोग्रािमगच्या प्रश्नांचा विचार करत असताना सुभाषला त्याच्या नव्या संशोधनाची मूळ कल्पना सुचली. त्याने ती झोपण्यापूर्वी कागदावर लिहून काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी तो उत्साहाने आईला सांगू लागला की, त्याला किती सुंदर कल्पना सुचली आहे. आईला एवढंच समजलं, की हा एरवी अबोल असणारा मुलगा एवढा उत्तेजित झालाय, तेव्हा काहीतरी चांगलीच कल्पना असणार.
खोत यांच्या कामाबद्दल मला थोडंफार समजलं ते असं : २००२ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या शोधनिबंधात युनिक गेम कन्जेक्चर Unique Game Conjecture = UGC) हे मांडले आहे. हा तर्क (conjecture) सत्य मानल्यास कम्प्युटर सायन्समधील काही अत्यंत अवघड प्रश्नांची उकल करणे किती कठीण आहे, ती काठिण्य पातळी मोजता येते. शिवाय कम्प्युटरच्या साहाय्याने शोधताना जास्तीत जास्त जवळची (approximate) अशी उकल कोणती ते समजते. १९७१ साली कम्प्युटर शास्त्रज्ञांच्या समोर असलेल्या प्रश्नांचे दोन भाग करण्यात आले होते. ढ या भागात कम्प्युटरवर नाति प्रचंड वेळात (polynomial time) अचूक सोडवता येणारे प्रश्न, तर ठढ या भागात अशा वेळात कम्प्युटरला सोडवता न येणारे, तरी दुसऱ्या कोणी दिलेली उकल बरोबर आहे का हे कम्प्युटर तपासू शकतो असे प्रश्न. हे दोनही संच वेगवेगळे आहेत व ठढ या भागात काही प्रश्न असे आहेत, जे कम्प्युटरला बहुधा नाति प्रचंड वेळात सोडवता येणार नाहीत. ते प्रश्न कम्प्युटरवर अचूकपणे सोडवणे तर दुरापास्त आहेच, शिवाय त्यांची चांगली जवळपासची उत्तरेदेखील फार कठीण आहेत. १९९४ मध्ये हे स्टाड (Johanh Hastad) या स्वीडिश कम्प्युटर शास्त्रज्ञाने या प्रश्नावर उत्तम काम करून गोडेल पारितोषिक मिळवले होते. त्याचे काम खोत यांनी बरेच पुढे नेले असे मानले जाते. त्यावर आधारित असे बरेच काम अनेक शास्त्रज्ञ करत आहेत. असफ नोर या इझरेली शास्त्रज्ञाच्या मते प्रश्न सोडवणारे हुशार शास्त्रज्ञ अनेक असतात, पण खोत यांच्या कामाने अनेकांना वेगळा विचार करायला शिकवले. आज वॅउ हा एक तर्क आहे. गणितात असे काही मूलगामी तर्क प्रमेयांपेक्षा देखील महत्त्वाचे झाले आहेत. ते सत्य किंवा असत्य आहेत हे सिद्ध करणे अनेक वर्षांत जमलेले नाही. असा तर्क सत्य आहे असे सिद्ध करता आले किंवा असत्य आहे असे दाखवता आले, तरी ते फार महत्त्वाचे काम ठरते.
सुभाष खोत न्यूयॉर्क युनिव्हर्सटिीच्या कूरांट इन्स्टिटय़ूटमध्ये काम करतात, तर त्यांच्या पत्नी गायत्री रत्नपारखी न्यूयॉर्कमधील फेडरल रिझव्‍‌र्ह बँकेत काम करतात. त्यांना नीव नावाचा तीनेक वर्षांचा मुलगा आहे. खोलवर जाऊन विश्लेषणात्मक (analytic) विचार करण्याची सुभाष यांची सवय रोजच्या जीवनात कधी कधी उपयोगी ठरते, तर कधी कधी वैताग आणते, असे गायत्री यांचे म्हणणे आहे. एखाद्या जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत जाण्यासाठी सुभाष नेहमी सर्वात लहान लांबीचा मार्ग शोधतात, तर दुसरा अधिक निसर्गरम्य मार्ग जास्त बरा आहे हे गायत्रींना त्यांना पटवावे लागते. सुभाष प्रवासाला जाताना कुठल्या अडचणी येऊ शकतात याचा पूर्ण विचार करून सगळी औषधे वगरे जवळ बाळगतात, त्यामुळे लहान मूल बरोबर नेतानाही काही त्रास होत नाही. संभाव्य अडचणींचा आधीच विचार करण्याची ही सवय त्यांच्या संशोधनाला पूरक ठरते. ताíकक विसंगती त्यांना अस्वस्थ करते. खरेदीला जाताना एखादी वस्तू मोठय़ा प्रमाणावर घेतली, तर थोडी स्वस्त पडते हे सर्वमान्य तत्त्व असताना ३३ सेन्टना एक बिस्कीट अशी किंमत असली तरी, तीन बिस्किटांची पुडी एक डॉलरला विकली जाते, हे त्यांना पटत नाही. चांगली value for money हवी असेल, तर चार-पाच दुकानं धुंडाळायला हवीत. मग शॉिपगला जाण्याचेच ते टाळतात. लहानग्या नीवच्या बाललीला ते एन्जॉय करतात. नीवमुळे त्यांच्या कामाच्या वेळात शिस्त आलीय असे सुभाष म्हणतात. सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच याच वेळात म्हणजे नीव बालवाडीत असताना ते आता काम करतात. पूर्वी संध्याकाळच्या फावल्या वेळातदेखील करत, पण आता नाही. सुभाष यांचं वाचन चौफेर असून त्यांना इतिहास, अर्थशास्त्र, कामगारविषयक कायदे, युरोपियन रनेसांसमधील कला, जागतिक घडामोडी या सर्वात रस आहे. रोज सात-आठ वर्तमानपत्रे ते वाचतात.
इचलकरंजीमध्ये त्यांच्या आईव्यतिरिक्त सुभाषना त्यांचे शाळेचे हेडमास्तर गोगटे हे आदरणीय आहेत. ते स्वत: सुभाषला फारसं शिकवलं नाही असं म्हणतात. पण बुद्धिमान विद्यार्थ्यांला तयार उत्तरे पाठ करायला द्यायची नसतात. त्याला पाठीवर हात ठेवून उत्तर शोधायला प्रयत्न करण्यास प्रोत्साहन द्यावं आणि ते शोधल्यावर आनंदाने शाबासकी. गोगटे यांनी ते केलं. सुभाषना ते वडील किंवा आजोबा यांच्या जागी आहेत. गुरू-शिष्य यांची ही जोडी हृद्य आहे. गोगटे म्हणतात की, सुभाष अत्यंत हुशार होता. त्याने स्वत:चा अभ्यास सांभाळून इतर विद्यार्थाना विज्ञान, गणित, संस्कृत, इंग्रजी, मराठी सगळ्या विषयांत मदत केली. स्वत: उत्तरे शोधत अभ्यास करण्याची सवय सुभाषना उपकारक ठरली. कधी कधी एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास महिने लागतात, पण या पद्धतीचा संशोधनाच्या वाटेवर फायदा होतो.
हा मराठी तारा अधिकाधिक तेजाने तळपू दे, ही मन:पूर्वक शुभेच्छा!     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा