11‘कॉंग्रॅच्युलेशन, छान एम्ब्रियो तयार झालाय. आता याचे नीताच्या गर्भाशयात रोपण केले की शी विल बी प्रेग्नंट! ’ असे मी जेव्हा नीता आणि अनिकेत यांना सांगितले तेव्हा त्यांच्याकडून मला अपेक्षित असलेली कुठलीही आनंदाची प्रतिक्रिया आली नाही. उलट मोठय़ा पेचात सापडल्याचे भावच त्यांच्या चेहऱ्यावर उमटले.
आय. व्ही. एफ.च्या पहिल्या दोन सायकल्स अयशस्वी झाल्यानंतर जेव्हा तिसऱ्या सायकलमध्ये गर्भधारणा यशस्वी होण्याची शक्यता निर्माण झाली; तेव्हा साहजिकच त्यांना खूप आनंद होईल अशी माझी अपेक्षा होती. पण ‘अरे बापरे! हा मोठाच प्रश्न उभा राहिला.’ या अनिकेतच्या उद्गाराने मला बुचकळ्यात टाकले.
‘का? तुम्हाला आनंद नाही झाला?’ मी त्यांना विचारले.
‘आनंद झाला डॉक्टर! पण झालं असं की आमच्या कंपनीचे न्यू यॉर्कच्या आय.बी.एन.शी काही टायअप्स झाले आहेत. त्यानुसार मला पुढच्या महिन्यात यू.एस.ला पाठविण्याचे मॅनेजमेंटने ठरविले आहे. अ‍ॅण्ड इट्स अ लाइफ टाइम ऑपॉच्र्युनिटी फॉर मी,’ नीता म्हणाली.
‘पण भारतातच सेटल व्हायचा निर्णय तुम्ही मागेच घेतला होता ना?’ मी विचारले.
‘यू.एस.मध्ये सेटल व्हायचा काही विचार नाही. पण ही संधी सोडली तर माझ्यासारखी मूर्ख मीच ठरेन. दोनच वर्षांचा प्रश्न आहे, पण भारतात परत आल्यावर माय करिअर विल बी फ्लश विद सक्सेस. शिवाय प्रेग्नन्सीच्या कारणाने मी जर नकार दिला तर मॅनेजमेंटवर वाईट इम्प्रेशन पडेल आणि माझ्या करिअरला कायमची खीळ बसेल,  दे मे इवन फायर मी.’ नीता उत्तरली.
‘तुमच्या वैयक्तिक निर्णयात मी ढवळाढवळ करू शकत नाही. पण हा एम्ब्रियो जर आपण इम्प्लांट केला नाही तर नंतर पुन्हा प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता खूप कमी आहे. एक डॉक्टर या नात्याने या गोष्टीची कल्पना तुम्हाला देणे हे मी माझे कर्तव्य समजतो.’ मी दोघांना निर्वाणीचा इशारा दिला.
‘डॉक्टर, आम्हाला बाळ हवंय हो! असं नाही का करता येणार? हा एम्ब्रियो तसाच ठेवून नीता न्यू यॉर्कवरून परत आल्यावर तो तिच्या गर्भाशयात इम्प्लांट करायचा?’ अनिकेतने विचारले.
‘हो, तसे तंत्रज्ञान आहे. त्याला एम्ब्रियो फ्रीझिंग असे म्हणतात. टेस्ट टय़ूब बेबी ट्रीटमेंटच्या वेळेस जेव्हा एकापेक्षा अधिक भ्रूण तयार होतात तेव्हा त्यापैकी एकाचे रोपण स्त्रीच्या गर्भाशयात करून उरलेले भ्रूण गोठविले जातात. गरज पडल्यास ते पुढच्या वेळेस स्त्रीच्या गर्भाशयात सोडता येतात. किंवा काही जोडपी असे भ्रूण दुसऱ्या जोडप्यांना डोनेटही करतात. पण त्यात काही धोके आहेत. हे तंत्रज्ञान कधी कधी अपयशीही ठरू शकते.’ मी कल्पना दिली.
‘आम्ही तयार आहोत डॉक्टर. शिवाय दुसरा पर्यायही नाही.’ नीता उत्तरली.

त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी नीता भारतात परतली. आता मात्र दोघांनाही नव्या पाहुण्याची उत्कंठा लागून राहिली होती. फ्रीझ केलेला एम्ब्रियो नीताच्या गर्भाशयात इम्प्लांट करण्यात आला. मला त्यात व्यंग निर्माण होण्याची भीती होती. सुदैवाने सर्व टेस्ट्स पॉझिटिव्ह आल्या. गर्भाच्या वाढीवर सोनोग्राफीद्वारे माझे बारीक लक्ष होते. माझा प्रयोग यशस्वी झाला होता. सर्व काही व्यवस्थित होते. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. डिलेवरीची तारीख जवळ येऊ  लागली. एके दिवशी अचानक अनिकेतचा मला फोन आला. त्या दोघांना मला र्अजट भेटायचे होते. गर्भाचीच काही समस्या निर्माण झाली असावी असे मला वाटले. मी त्यांना अपॉइंटमेंट दिली.
‘डॉक्टर, आपल्याला ही डिलेवरी पुढे नाही का ढकलता येणार?’ माझ्यासमोर बसल्या बसल्या अनिकेत म्हणाला.
‘अरे, ही बाळाची डिलेवरी आहे  निर्जीव मालाची नाही.’ मी जरा रागानेच म्हटले.
‘सॉरी डॉक्टर, पण आम्हालाही बाळाची ओढ आहेच ना! प्रॉब्लेमच तसा उभा राहिला आहे. रिसेशनमुळे नुकताच माझा जॉब गेलाय. बदललेल्या कामगार कायद्यांमुळे नीताला प्रेग्नन्सी लिव्हमध्ये कुठलाही पगार मिळणार नाहीये. तेव्हा वी कान्ट अफोर्ड अरायवल ऑफ न्यू मेंबर इन अवर फॅमिली.’ अनिकेतने समस्या सांगितली.
‘हे बघ अनिकेत, दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०६० पर्यंत असे करता येत नसे. पण तुमच्या सुदैवाने असा शोध नुकताच लागला आहे. गर्भ जिवंत ठेवून त्याची वाढ थांबवून डिलेवरी पुढे ढकलण्यासाठी एक इंजेक्शन मिळते. हे इंजेक्शन दर महिन्याला शिरेद्वारे घ्यावे लागते.’ मी पर्याय सांगितला. दिवसेंदिवस कुटुंबसंस्था उद्ध्वस्थ होत चालली आहे. एकमेकांना मदत करणे, नातीगोती सांभाळणे या सगळ्याला मागच्या शतकातच ओहोटी लागली होती. आता तर या गोष्टी पूर्णपणे नामशेष झाल्या आहेत. त्यामुळे प्रसूतीसारख्या घटनाही आयुष्यात खूपच ताणतणाव वाढवतात. आमच्या आयुष्यातील नेहमीच्या घटनाही बाजारपेठेच्या नियामांनीच नियंत्रित होऊ  लागल्या आहेत. म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे! लोकांच्या गरजा लक्षात घेऊन असे संशोधन होऊ  लागले आहे.
नीताने हा इंजेक्शनचा पर्याय स्वीकारला. अवघडलेल्या स्थितीत नीता ऑफिसला जाऊ लागली. अनिकेतला नवी नोकरी मिळालीच नाही. पुढे त्याने स्वत:चा बिझनेस सुरू केला. व्यवसायात स्थिरस्थावर होईपर्यंत दोन वर्षे निघून गेली. दोन वर्षांनंतर त्यांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. एव्हाना नीताची चाळिशी उलटून गेली होती. या वयातील बाळंतपण, त्यातही पहिली खेप, खूपच धोकादायक असते. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा पूर्ण वापर करून तिचे सिझेरियन करण्यात आले. बाळ- बाळंतीण यातून सुखरूप बाहेर पडल्याने सर्वानीच सुटकेचा नि:श्वास टाकला.

kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
ambulance
गर्भवती महिलेचा थोडक्यात वाचला जीव! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, थरारक Video कॅमेऱ्यात कैद
Prime Minister Narendra Modis announcement to give guaranteed price of 6 thousand for soybeans
सोयाबीनला सहा हजारांचा हमीभाव देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
Mom delivers baby by herself while riding in the car to the hospital Shocking video
चमत्कारावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; कारमध्ये महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या अन् पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही

त्यानंतर तीन महिन्यांनी मी स्वित्र्झलडला सहलीला गेलो. तिथे अनपेक्षितपणे अनिकेत आणि नीता मला एका रिसोर्टमध्ये भेटले. दोघेही सुटीची मजा घेत होते. पण त्यांच्यासोबत त्यांचे बाळ दिसत नव्हते.
‘अरेच्चा! तुम्ही इथे कसे? आणि बाळ कुठे आहे?’ मी विचारले.
‘काही नाही डॉक्टर. गेली काही वर्षे खूपच धावपळीची होती. त्यानंतर नीताची डिलेवरी! बाळानेही सुरुवातीला खूप त्रास दिला. रात्र रात्र झोपत नसे. दोन-अडीच वर्षांच्या प्रेग्नन्सीने नीताची पाठही खूप दुखायची. बाळाला बाहेरचं दूध लवकरच सुरू करण्याचा आम्ही डिसिजन घेतला. पण त्यानेही बाळाला सुरुवातीला खूप जुलाब झाले. या सगळ्याचा खूप स्ट्रेस आला होता. म्हणून म्हटलं, लेट्स टेक अ ब्रेक.’ अनिकेत सांगत होता.
‘मग बाळाला काय पाळणाघरात ठेवले?’ माझा प्रश्न.
‘नाही, स्टँटिक बॉक्समध्ये ठेवले.’ अनिकेत उत्तरला.
‘स्टँटिक बॉक्स?’ मी आश्चर्याने विचारले.
‘हुं, नुकताच शोध लागलाय त्याचा. इंडियात अजून मिळतही नाही. खास यू.एस.मधून मागविला हा बॉक्स आम्ही़ ’ अनिकेत सांगू लागला.
‘‘मी समजलो नाही. स्टँटिक बॉक्स हा शब्द प्रथमच ऐकतो आहे मी.’ मी म्हणालो.
‘तुम्हाला माहीत आहेच, हल्लीचं आयुष्य कसं डिमांडिंग आहे ते. आणि मूल वाढवणं काही कमी हेक्टिक काम नाही. त्यामुळे संशोधकांनी हा बॉक्स तयार केला आहे. या बॉक्समध्ये मूल घातलं कीते फ्रीझ होतं. त्याचा श्वासोच्छ्वास, हृदय सुरू राहते, पण ते हालचाल करीत नाही. या काळात ते अतिशय कमी ऊर्जा वापरते. त्यामुळे त्याला अन्नाचीही गरज नसते. या काळात त्याचे वयसुद्धा स्थिर राहते. एक प्रकारच्या सुप्तावस्थेत जाते ते. दरम्यान पालक आपापली  महत्त्वाची कामे करून घेऊ  शकतात. बॉक्समधून बाहेर काढतात. त्याची स्मृती आणि हालचाली पूर्ववत होतात. हिवाळ्यात अन्न मिळत नाही तेव्हा बर्फाळ प्रदेशातील प्राणी आणि गोठलेल्या तळ्यातील बेडूक हेच तंत्र वापरतात.  आमच्यासारख्या बिझी पालकांसाठी एक वरदानच आहे हा बॉक्स. या बॉक्समध्ये काही तासांपासून काही वर्षांपर्यंत कितीही वेळ आपण बाळ ठेवू शकतो.’ अनिकेतने सांगितले.

त्यानंतर वर्षांमागून वर्षे गेली. मी माझ्या वयाची नव्वदी केव्हाच ओलांडली आहे. वाढत्या वैद्यकीय प्रगतीमुळे आयुष्यमान वाढले. साहजिकच प्रदीर्घ कंटाळवाणे म्हातारपण नशिबी आले. एकदा संध्याकाळच्या वेळेस पेन्शनर्स पार्कमध्ये गेलेलो असता एक सत्तरीचे जोडपे एका दोन -अडीच वर्षांच्या लहान मुलाला खेळवत होते.
‘‘अरे वा ! नातू वाटतं?’’ मी सहज गप्पा माराव्यात म्हणून म्हणालो. आताशा एकमेकांशी प्रत्यक्ष बोलणे ही गोष्टच नामशेष झाली आहे असे वाटत होते. शेजारीपाजारी सोडा, पण नवरा-बायको, बाप-मुलगा हेदेखील एकमेकांना व्हर्चुअल जगातच भेटत. त्यामुळे बाळाला खेळविणारे आजी-आजोबा पाहून मला जरा अप्रूपच वाटले.
‘डॉक्टर तुम्ही! ओळखलं नाही का आम्हाला?’ त्यातल्या स्त्रीने विचारले.
‘वयोमानाप्रमाणे स्मृती जरा क्षीण झाली आहे खरी! नाही ओळखू येत चेहरे लवकर.’ मी ओळखण्याचा निष्फळ प्रयत्न करीत म्हणालो. जुने पेशंट असे अवचित भेटतात आणि पंचाईत होते.
‘अहो, मी अनिकेत आणि ही नीता. तुम्हीही कसे ओळखणार म्हणा! पंचवीस वर्षे केव्हाच उलटून गेली असतील भेटून.’
खरेच की! पांढरे केस आणि जीर्ण चेहऱ्यातून मला हळूहळू ओळख पटू लागली .
‘कमाल आहे! त्या वेळेस इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट घेणारे तुम्ही असे नातवाला खेळाविताना बघून खरेच आनंद वाटला.’ मी समाधानाने म्हणालो.
‘नाही डॉक्टर, हा नातू नाही आमचा. हा तोच मुलगा आहे. तुमच्या ट्रीटमेंटने झालेला. विश्वजित.’ नेहा म्हणाली. मी बुचकळ्यात पडलो.
‘पण तो तर आता सत्तावीस-अठ्ठावीस वर्षांचा असेल नं?’ मी विचारले.
यावर दोघेही काही क्षण गप्प झाले. मग अनिकेत अपराधी चेहऱ्याने सांगू लागला. ‘ती आमची एक चूकच झाली. तुम्हाला तर माहीत आहे. त्या काळात आम्ही प्रचंड बिझी होतो. माझा व्यवसाय नुकताच जोर पकडू लागला होता आणि नेहा करिअरच्या सर्वोच्च शिखरावर होती. सारख्या मीटिंग्स, कॉन्फरन्सेस, क्लायंट्सशी चर्चा, भेटीगाठी सतत चालू असायच्या. शिवाय कामाचाही प्रचंड स्ट्रेस असायचा. तेव्हा नुकताच मार्केटमध्ये लाँच झालेल्या  स्टँटिक बॉक्सचा आम्हाला खूपच आधार वाटू लागला. डेड लाइन चार दिवसांवर आलीय? टाका बाळाला बॉक्समध्ये. मीटिंगमध्ये महत्त्वाचं प्रेझेन्टेशन द्यायचे आहे, टाका बाळाला बॉक्समध्ये. चार दिवस बिझनेस टूरवर जायचं आहे? टाका बॉक्समध्ये. सुरुवातीला दोन-चार दिवसांचा असलेला स्टँटिक बॉक्समध्ये बाळाला टाकण्याचा कालावधी नंतर नंतर वाढू लागला. आजारपण, धंद्यात नुकसान, जॉब बदलणे, आलेले नैराश्य या कारणांनी विश्वजित महिनोन्महिने बॉक्समध्ये राहू लागला. त्याची शी-शू काढणे, आजारपणात रात्र रात्र जागणे, त्याचे मूड्स सांभाळणे या सगळ्यांसाठी त्या काळात आमच्याकडे वेळच नव्हता. कधी जागेची कमतरता, कधी आर्थिक अस्थिरता यामुळे आपण त्याला दर्जेदार सोयीसुविधा देण्यात कुठे कमी पडू नये असे वाटायचे. मध्यंतरी काही वर्षे सतत युद्धाचे वातावरण होते. त्याचा दुष्परिणाम विश्वजीतवर होऊ  नये असे वाटायचे. त्यामुळे त्याला त्या काळात पूर्ण वेळ स्टँटिक बॉक्समध्येच ठेवले होते. कधी कधी आपण आपल्या जबाबदारीतून पळ काढतोय असं वाटायचं, पण हे सगळे आपण विश्वजीतच्या भल्यासाठीच करतोय या विचाराने अपराधी भाव कमी व्हायचा. आपण मुलांना या जगात जन्माला घालतो, पण आपली मुले आनंदाने वाढू शकतील असं जग कुठे आपण त्यांना देऊ  शकतो? आज ना उद्या परिस्थिती बदलेल, आपण आपल्या मुलाला अधिक चांगल्या जगात वाढवू असं वाटायचं. पण त्याचा परिणाम उलटाच झाला. आज आम्ही दोघांनी साठी ओलांडली. मात्र, आमचे बाळ अजून अडीच वर्षांचेच आहे. बाकी परिस्थिती जैसे थे आहे. काल ज्या समस्या आमच्या पुढे होत्या त्या आजही आहेत, हे आमच्या जेव्हा लक्षात आले तेव्हा आम्ही स्टँटिक बॉक्स फोडूनच टाकला. जग तर आपण बदलू शकत नाही मग आपणच बदलायचं, आपल्या मुलांना अधिक चांगल्या काळात वाढविण्याऐवजी आहे त्या परिस्थितीत समाधान शोधायला आम्हीही शिकत आहोत आणि त्यालाही शिकविणार आहोत.’
या सगळ्याशी अनभिज्ञ एकटाच स्वत:च्या विश्वात मश्गूल होऊन खेळणाऱ्या विश्वजीतकडे पाहून माझे डोळे भरून आले. तो आता स्टँटिक बॉक्समध्ये नाही.  मात्र खेळात मग्न झाल्याने काळ जणू त्याच्यासाठी स्तब्ध झाला आहे. त्याला काळजी फक्त या क्षणाची आहे. पण हा हळूहळू मोठा होईल. स्पर्धेचं युग त्याच्यावरही आपला अंमल चढवेल. तोही या उंदरांच्या शर्यतीत अथक धावू लागेल. मग त्याला आपल्या अति वृद्धपण पुढारलेल्या विज्ञानाने आयुष्यमान वाढलेल्या आई-वडिलांची अडचण होऊ  लागेल. विश्वजीत मोठा होऊन आपल्या आई-वडिलांना वारंवार  स्टँटिक बॉक्समध्ये टाकतो आहे आणि हळूहळू त्यांना स्टँटिक बॉक्समधून कधीच न काढण्याचा निर्णय त्याने घेतला आहे, असे चित्र मला स्पष्ट दिसू लागले.
amitshinde112@gmail.com