संकटांचे काळे ढग क्षितिजावर जमा होतात. अंधार पसरतो. आजूबाजूला आणि मनातही! या अंधारात पावले अडखळू लागतात, दिशांचे भान राहत नाही, घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात आणि हळूहळू पाऊल उचलण्याचेही धैर्य उरत नाही. आलेले वादळ जाताना आपल्यासोबत काय काय घेऊन जाणार (आजपर्यंत मिळवलेलं यश, नाव, पसा, आरोग्य, स्थर्य, कुटुंब, मत्री, प्रेम) याचा हिशेब मांडत मन अस्थिर होतं. आपला महाभारताच्या युद्धातील अर्जुन होतो आणि पुढे उभ्या राहिलेल्या संकटांना कसे समोर जावे असा प्रश्न पडतो. असा आपला अर्जुन होणे कुणालाच चुकत नाही. भीती, चिंता आणि भावनांच्या रोज नव्या वादळात ‘जगावं कसं?’ हा प्रश्न असतोच. सुखाच्या प्रसंगी नाही, पण संकटांच्या आणि दु:खाच्या प्रसंगी मन याचे उत्तर शोधत फिरते. अशा प्रसंगी केवळ चांगल्या विचारांचे तत्त्वज्ञानही नुसते पोकळ शब्द वाटतात. पण अशाच वेळी गरज असते एखाद्या व्यावहारिक विचारसरणीची- जी आपल्याला जागे करेल आणि योग्य तो मार्ग आपल्याला दाखवू शकेल. व्यावहारिक म्हणून नावाजले गेलेले आणि जीवनाच्या कठीण काळात उपयोगी पडणारे असेच एक तत्त्वज्ञान म्हणजे.. स्टोइसिझम (Stoicism)!
इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकात झेनो नावाचा एक व्यापारी त्याचे जहाज बुडाल्यानंतर अथेन्समध्ये आला. अथेन्समध्ये त्याने त्या काळातल्या तत्त्वज्ञानांचा अभ्यास सुरू केला आणि थोडय़ाच काळात स्वत:ची एक विचारसरणी विकसित केली. लोकांना रोजच्या आयुष्यात उपयोगी पडेल असे हे तत्त्वज्ञान होते. या नवीन तत्त्वज्ञानावर खुली चर्चा त्या शहराच्या मध्य वस्तीतल्या एका रंगवलेल्या पोर्चमध्ये (Stoa Poikile) होत असे. यावरूनच त्या तत्त्वज्ञानाला ‘स्टोइसिझम’ असे नाव पडले. आणि त्याच्या अनुयायांना ‘स्टोइक्स’ (Stoics) असे म्हणण्यात येऊ लागले. पण आज जी काही स्टोइसिझमबद्दल माहिती उपलब्ध आहे ती मुख्यत्वेकरून मार्कस ऑरेलिअस, एपिक्टेटस आणि सेनेका यांनी वेगवेगळ्या काळांत केलेल्या लिखाणातून. ऑरेलिअस हा बलाढय़ अशा रोमन साम्राज्याचा राजा होता. सेनेका हा निरोच्या (रोम जळत असताना संगीत वाजवणारा तोच तो!) दरबारातील त्याचा शिक्षक, सल्लागार आणि एक नाटककारही होता. तर एपिक्टेटस हा एक गुलामीतून वर आलेला तत्त्ववेत्ता होता. एका साम्राज्याच्या राजापासून ते एका गुलामापर्यंत सगळ्यांनाच उपयोगी वाटणाऱ्या अशा या तत्त्वज्ञानात नेमके आहे तरी काय?
आयुष्य अवघड आहे, खडतर आहे, संकटांनी, दु:खांनी भरलेले आहे याचा स्वीकार ‘स्टोइसिझम’ करते. या सर्वाना हाताळायचं कसं हे आपल्याला सांगते. काही वेळा अगदी नकारात्मक वाटेल एवढी यातील काही तत्त्वे व्यावहारिक आहेत. पण म्हणूनच आपल्या आजूबाजूच्या जगाला समजावून घेत, त्याच्याशी जुळवून घेत स्वत:चं आणि समाजाचं भलं करण्याचा उद्देश ठेवत ही विचारसरणी खूप व्यावहारिक असे शहाणपण देऊ पाहते. तेदेखील माणूस म्हणून आपला विकास साधत! अर्थात आपल्याला सगळीच तत्त्वे इथे पाहता येणार नसली तरी काही महत्त्वाची तत्त्वे आपल्याला या विचारसरणीची ओळख करून देऊ शकतील.
स्टोइसिझमनुसार, कोणत्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत आणि कोणत्या नाहीत, हे समजणे खूप महत्त्वाचे आहे. आपले विचार, कृती, निर्णय या अंतर्गत गोष्टींवरच आपले नियंत्रण असते. तर आपले शरीर, आरोग्य, संपत्ती, प्रतिष्ठा, नोकरी, दुसऱ्याचं आपल्याबद्दल असणारे मत या आणि इतर सगळ्याच बा गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असतात. स्टोइसिझम म्हणते : आपले सारे लक्ष आणि ऊर्जा ही ज्यावर आपले नियंत्रण आहे त्यावर केंद्रित करावी. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यावर विचार करण्यात आणि त्याबाबतीत चिंता, भीती, सुख, आनंद अशा भावना ठेवण्यात काहीच अर्थ नाही. कारण या गोष्टी आज आहेत, तर उद्या नाहीत. यातला अजून एक मुद्दा म्हणजे आपल्याला आनंद किंवा दु:ख हे आपल्या बाबतीत घडलेल्या घटनांमुळे न होता आपण त्याचा जो अर्थ काढतो, त्यांच्याकडे ज्या दृष्टिकोनातून बघतो त्यामुळे होते. आज याचाच उपयोग आधुनिक मानसोपचार पद्धतीत केला जातो. आपण आधी बघितल्याप्रमाणे, अल्बर्ट एलिस यांची फएइळ ही मानसोपचार पद्धती याच विचारांपासून प्रेरणा घेऊन विकसित करण्यात आली आहे; ज्याचा उपयोग आपल्याला अविवेकी भावना, विचार यांचे विश्लेषण करून त्याद्वारे आपला दृष्टिकोन बदलण्यात होतो.
वाईट काळ आणि संकटांना स्वत:वरचं नियंत्रण न सोडता कसं सामोरं जावं, हे स्टोइसिझम सांगतं. पण हे करणार कसं? एक म्हणजे वाईट गोष्टी कधी न कधी घडणारच आहेत हे समजून नियोजन केले पाहिजे. आपण नेहमी सकारात्मक विचार करा असं ऐकतो आणि बऱ्याचदा या सकारात्मक विचारांचा आणि आजूबाजूच्या बिघडत जाणाऱ्या परिस्थितीचा मेळ बसत नाही आणि ही ओढूनताणून आणलेली सकारात्मकता आपला ताण अजूनच वाढवते. स्टोइसिझम म्हणते.. वाईटात वाईट काय होईल याचा विचार करा आणि त्या परिस्थितीतून निभावून नेण्याचे नियोजन करा. वाईट काळासाठी तयार राहण्यासाठी स्टोइसिझम अजून एक उपाय सुचवते : दरवर्षी काही काळ तुम्ही भौतिक सोयीसुविधा दूर ठेवून जगण्याचा प्रयत्न करा. श्रीमंत असलेला सेनेका वर्षांतले काही दिवस एखाद्या गरीब माणसासारखा राहून बघायचा. स्टोइक्सच्या मते, यामुळे शरीराला तर प्रतिकूलतेची सवय राहतेच, पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनाला पटते, की आपला आनंद, समाधान हे बा भौतिक गोष्टींवर अवलंबून नसते आणि जगण्यासाठी आपल्याला खूपच कमी गोष्टींची आवश्यकता असते. तसेच ज्या संकटांना आपण घाबरतो, ती तेवढी पण वाईट नसतात याचाही अनुभव येतो.
सुखांना आणि दु:खांना संतुलितपणे आणि समर्थपणे कसे तोंड द्यावे हे स्टोइसिझम शिकवू पाहते. पण केवळ विचार माहिती असून उपयोगाचे नाही, तर ते आचरणातही आणले पाहिजेत- याला स्टोइसिझम विशेष महत्त्व देते. त्यामुळेच अनेक महान व्यक्तींना- ज्यात जॉर्ज वॉशिंग्टनपासून ते नेल्सन मंडेलांपर्यंत अनेक नेत्यांना, विचारवंतांना- स्टोइसिझमपासून प्रेरणा मिळाली आहे. स्टोइक्सला चपखल बसेल असा एक शब्द आपल्या भारतीय संस्कृतीतही आहे- सुख आणि दु:खांना सहजपणे, स्थिर बुद्धीने आणि संतुलित भावनेने सामोरा जाणारा असा.. स्थितप्रज्ञ! गीतेमध्ये अशा स्थितप्रज्ञाची लक्षणेही सांगितली आहेत. शेवटी काय, तर आपला अर्जुन झालेला असताना त्या परिस्थितीत योग्य रस्ता दाखवणारे विचार, भावना आणि कृती यांचा ‘योग’ जुळून येणे म्हणजेच त्या कृष्णाची भेट होणे! नाही का?
parag2211@gmail.com