भारतात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांची आणि त्या अनुषंगाने स्त्रियांच्या स्थितीची इतकी चर्चा सुरू असताना ज्यांच्या पुस्तकांचे वाचन/ पुनर्वाचन आवश्यक ठरावे, अशा दिशादर्शक साहित्यिकांपैकी एक महाश्वेतादेवी आहेत. त्यांच्या १५ कथांचा मूळ बंगालीतून वीणा आलासे यांनी केलेला अनुवाद ‘कथा पंचदशी’ या नावाने मराठीत आला त्याला जवळपास वर्ष लोटले तरी या पुस्तकाची नीट दखल  घेतली गेलेली नाही. वास्तविक या पुस्तकातील अनेक कथा याआधी (बंगाली वा काही कथा इंग्रजीत) गाजलेल्या आहेत. ‘कुंती’ ही कर्णाच्या आईने एका निषाद (पारधी) स्त्रीशी केलेल्या संवादातून उलगडत जाणारी कथा. त्यावर नाटक बेतले गेले. ‘द्रौपदी’ ही कथा नक्षलवाद्यांमध्ये स्त्रीचे स्थान काय, यावर प्रकाश टाकणारी आहे. आणि मुख्य म्हणजे त्या चळवळीला अपयश येत असतानाही, स्त्रीचा निर्धार हा कधीच यश वा अपयश यांवर अवलंबून नसतो, असा विचार देणारी आहे. नक्षलवाद महाश्वेतादेवींनी जवळून पाहिला आहे. पण त्या कधीही कुठल्या एका विचारधारेच्या आहारी गेल्या नाहीत. प्राचीन भारतीय संस्कृती, या संस्कृतीचे ग्रामीण आणि आदिवासी पीळ, स्त्रीची मानसिक शक्ती आणि पुढे शहरीकरणासोबत हरवत गेलेली आत्मजाणीव.. या साऱ्यांकडे आज कसे पाहायचे याची दिशा महाश्वेतादेवींचे समग्र साहित्य देते. ही साहित्यिक ताकद दाखवून देणाऱ्या कथा या संग्रहात असल्यामुळेच तो प्रातिनिधिक झाला आहे.
महाभारताचा स्त्रीप्रणीत अन्वयार्थ लावण्याचे श्रेय महाश्वेतादेवींना निर्विवादपणे अनेक ज्येष्ठ समीक्षकांनी दिलेले आहेच. त्यापैकी ‘कुंती’- खेरीज  ‘पंचकन्या’ ही कथादेखील ‘कथा पंचदशी’त आहे. ‘आम्ही मूल हे मूल म्हणूनच वाढवतो, त्याला औरस-अनौरस समजत नाही,’ असे सांगणारी निषादी कुंतीला उत्तरायुष्यात भेटते तेव्हा सांस्कृतिक बंधने स्त्रीला कशी जाचक ठरतात याचे दर्शन कुंतीच्या रूपाने घडते. ‘पंचकन्या’ या कथेतील पाचही बहिणींच्या पतींना लग्नाच्या पहिल्याच रात्री कुरुक्षेत्रावर जावे लागले आणि त्यांना वीरगती मिळाली. दुसरीकडे अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिला पती मारला गेला असता सती जाण्यापासून रोखले जाते. कारण ती आई होणार आहे. जगण्याची इच्छाच नसलेल्या उत्तरेला सख्या मिळाव्यात यासाठी या पंचकन्यांना द्रौपदी बोलावते, अशी कथा महाश्वेतादेवी सांगतात. मात्र, कथेच्या अखेरीस पंचकन्या निघून जातात, कारण त्यांना आता पुनर्विवाह करून आई व्हायचे आहे! मातृत्वाशी निगडित नीतिकल्पनांवर वाचकांना विचार करावयास लावणाऱ्या या दोन कथा आहेत.
नक्षलवादी ‘द्रौपदी’ची कथा तीन भागांत आहे. अगदी अखेरीस तिच्याकडून तिच्या साथीदारांच्या ठावठिकाण्यांची माहिती मिळवण्याचा उपाय म्हणून तिच्यावर सामूहिक बलात्काराची उपाययोजना सुरक्षा यंत्रणा करतात. हा अस्वस्थ करणारा भाग अतिशय संयत शब्दांत महाश्वेतादेवींनी हाताळला आहे. द्रौपदीचा संबंध विचारधारेशी अजिबात नाही. ती कुठल्यातरी पोथीनिष्ठेसाठी लढत नसून स्वत:साठी लढते आहे. अशी स्वत्वाची लढाई कुठल्याही स्त्रीने कुठेही लढली, तरी तिच्या शरीरापेक्षा तिचे मन अधिक खंबीर असते, असा सकारात्मक संस्कार घडवूनच ही कथा संपते.
अन्य कथांपैकी ‘कविपत्नी’ ही कथा पतिसेवेत मग्न असणाऱ्या एका स्त्रीला आजच्या आधुनिक ताणतणावांपासून कवी पतीचे रक्षण करता आल्याचे समाधान कसे लाभले, याचा किस्साच जणू सांगते. पण एरवी महाश्वेतादेवींच्या कथा अशा एक-दोन प्रसंगांमध्ये आटोपणाऱ्या नसतात. एखाद्या गावात घडणारी कथा सांगताना हे गाव कसे वसले इथपासूनचे सारे तपशील वाचकाला देत ही लेखिका लघुकादंबरीइतका मोठा पट कथेत मांडू शकते! असा विस्तार-सारांशाचा गोफ ‘राँग नंबर’ ही कथा एका वृद्ध वडिलांच्या भासांमधून विणते आणि आजचे कोलकाता शहर कसे असह्य़ वाटते आहे, ही जाणीवही पेरून ठेवते. ‘तलाक’ ही कथा एका प्रेमळ जोडप्यामध्ये उतारवयात आलेले ताणतणाव आणि त्यावर मात करण्यासाठी समाजापासून पळून जाण्याचा त्यांनी पत्करलेला मार्ग यांचे चित्रण करते.
हताश व्हावे असे बरेच प्रसंग आजच्या जगण्यात आहेत. महाश्वेतादेवींची काही पात्रेदेखील या हताशेने ग्रासलेली आहेत. पण त्यांच्या एकंदर कथांतून जे भान वाचकापर्यंत पोहोचते, ते मात्र ‘जगायलाच हवे आणि तेही आपापले बळ एकवटून जगायला हवे,’ असे संघर्षशील, विजिगीषु भान आहे.
‘कथा पंचदशी’- महाश्वेतादेवी (अनु. वीणा आलासे), पद्मगंधा प्रकाशन, पुणे, पृष्ठे- ३२०, मूल्य- २५० रुपये.