स्वानंद किरकिरे
कॉफी हाऊस आमचा जीव की प्राण होतं. तेव्हा एसटीडी, पीसीओचा काळ होता. अन् सगळयांच्या घरी सहसा फोन नसायचे. एनएसडीतून मित्रांशी बोलावंसं वाटलं की गुमान कॉफी हाऊसच्या नंबरवर फोन करायचो तिथे कुठला ना कुठला मित्र पडीक असायचाच. गप्पा व्हायच्या, पण तेवढंच नाही तर आणखी खूप काही होतं कॉफी हाऊसमध्ये.
मी एनएसडीच्या दुसऱ्या वर्षांला असताना एके दिवशी दुपारी मला माझा आत्तेभाऊ समीर चिंचवडकरचा फोन आला. तो त्या काळी एका ‘एफएम’ रेडिओमध्ये काम करत असे. फोनवर त्याचा आवाज जरासा कापत होता, तो म्हणाला, ‘‘तुझे पता लगा क्या?..’’ घरापासून दूर असताना कुणा नातेवाईकाचा असा फोन येणं अन् ‘‘तुला कळलं का?’’ असं विचारलं की हृदयाचा ठोका चुकतो. डोळयासमोर हजार प्रश्न कॅलिडोस्कोपसारखे येऊ लागतात. आता हा कुणाच्या जाण्याची बातमी देणार? अशा भीतीनं धडधड होऊ लागली.
मी म्हटलं, ‘‘कोण?’’ तो म्हणाला, ‘‘कॉफी हाऊस.’’
हेही वाचा :आवाज वाढव डीजे तुला..
‘‘आपल्या कॉफी हाऊसची इमारत तोडणार आहेत. तिथं एखादं नवं शॉपिंग मॉल बांधलं जाणार आहे, सगळं तू केलेल्या नाटकासारखं होतंय.’’ अन् मला एकदम आठवलं की त्याच वर्षी मी इन्दौरमध्ये एक नाटक लिहून बसवलं होतं. अन् त्याचा विषयही असाच होता. चार विविध क्षेत्रांतले म्हातारे वर्षांनुवर्ष एक कॉफी हाऊसमध्ये एकत्र बसायचे अन् एके दिवशी त्यांना कळतं की, कॉफी हाऊसच्या मालकाचा मुलगा आता ती वास्तू विकायला निघालाय. कारण त्याला तिथे या कॉफी हाऊसच्या बदलत्या काळाबरोबर चालणाऱ्या पिझ्झा, बर्गरचं शॉप काढायचं आहे; अन् ते सगळे म्हातारे तिथे शेवटची कॉफी प्यायला जमलेत. आठवणी अन् स्वप्नं यांच्या उंबरठयावर उभी असलेली ही माणसं जेव्हा एकत्र येतात; तेव्हा त्यांच्यामध्ये कायकाय घडतं, कुठले कुठले वाद होतात, असं ते एक नाटक होतं- ते आता प्रत्यक्षात घडलं होतं. आमचं लाडकं कॉफी हाऊस आता तुटणार होतं.. कायमचं!
मला एकदम पु. ल. देशपांडे यांची एक ओळ आठवली- ‘ज्या दिवशी मुंबईची शेवटची ट्राम गेली, त्या दिवशी मला माझी आजी गेल्याचं दु:ख झालं होतं.’ समीरच्या तोंडून कॉफी हाऊस तोडलं जातंय हे ऐकणं खूपच अनपेक्षित अन् त्रास देणारं होतं. कॉफी हाऊस आमचा जीव की प्राण होतं. तेव्हा एसटीडी, पीसीओचा काळ होता. सगळयांच्या घरी सहसा फोन नसायचे. एनएसडीतून मित्रांशी बोलावंसं वाटलं की गुमान कॉफी हाऊसच्या नंबरवर फोन करायचो. तिथं कुठला ना कुठला मित्र पडीक असायचाच. गप्पा व्हायच्या. पण तेवढंच नाही तर
आणखी खूप काही होतं कॉफी हाऊसमध्ये..
समीर म्हणाला, ‘‘हॅलो .. तू रेडिओसाठी तुझी प्रतिक्रिया देऊ शकशील का?’’ मला भानावर यायला दोन सेकंदं लागली. मी त्याला म्हटलं, ‘‘मला पाच मिनिटं दे.. मी जरा ही न्यूज डायजेस्ट करतो अन् मग प्रतिक्रिया देतो.’’ तसाच तडक जाऊन एनएसडीच्या प्रांगणात गवतावर बसलो. विचार करू लागलो.. ‘इंडियन कॉफी हाऊस’.. त्या काळी इन्दौरमध्ये साऊथ इंडियन पदार्थ आणि अस्सल फिल्टर कॉफी मिळणारं एकमेव स्थान. मी कॉफी हाऊसमध्ये प्रथम कधी गेलो हे मला अंधूक अंधूक आठवतं. बहुतेक बाबांबरोबर कधीतरी गरम गरम इडली खायला गेलो असेन. तिथले ते तुरा असलेला फेटा घालणारे पांढऱ्या शुभ्र पोशाखातले रुबाबदार वेटर्स, त्यांच्या कमरेवर लाल किंवा हिरवे मोठमोठे पट्टे, पांढरे कॅनव्हासचे स्वच्छ जोडे. हातात सुंदर पितळी ट्रे, पांढरे शुभ्र सनमाईकाचे टेबल्स अन् पांढऱ्याच खुर्च्या.. िभतीवर एका देखण्या दाढीवाल्याचा चेहरा असलेले व त्या खाली ‘अ फाइन टाइप अॅकन्ड अ फाइन कॉफी बोथ आर इंडियन’ किंवा एका भरतनाटयम् करणाऱ्या नायिकेच्या फोटोखाली ‘अ फाइन डान्स अ फाइन कॉफी बोथ आर इंडियन’ असं लिहिलेलं. सुंदर फ्रेम केलेली प्रेसलर्स.
खाली जमिनीवर घातलेली सुटसुटीत मॅट एका इंग्रजकालीन टुमदार बंगलावजा वास्तूत असणारे हे इंडियन कॉफी हाऊस इन्दौरात त्या काळी सगळयात ‘क्लासी रेस्टॉरन्ट’ होतं, असं म्हणायला हरकत नाही. मी हिन्दी लेखक मोहन राकेश यांच्या बऱ्याचशा लेखनात दिल्लीच्या कॉफी हाऊसबद्दल वाचलं होतं.
कलकत्त्याच्या कॉफी हाऊसचाही लेखनातून इथं तिथं उल्लेख सापडायचा. नंतर कळलं की इन्दौरचं कॉफी हाऊस त्याच चेनचा एक भाग होता. लोकांचा असा गैरसमज आहे की, या खाण्यापिण्याच्या हॉटेलच्या चेन्स भारतात जागतिकीकरणानंतर आल्या. पण कॉफी हाऊसनं बऱ्याच वर्षांपूर्वी ती परंपरा सुरू केली होती अन् देशभरात खूप यशस्वीरीत्या ते विविध ठिकाणी ही सेवा देत. कॉफी हाऊसची संकल्पना १९५७ -५८ साली केरळच्या कम्युनिस्ट पार्टीचे नेते ए. के. गोपालन यांना सुचली. १९४० साली ब्रिटिश सरकारने कॉफी लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कॉफी बोर्डस् स्थापन केले होते, पण १९५६- ८७ पर्यंत सगळे बोर्डस् तोटयात गेले आणि म्हणून अचानक हे सगळे बोर्डस् अचानक बंद करण्यात आले. तिथल्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी एक को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करून हा प्रकल्प पुन्हा राबवण्याचा सल्ला दिला.
ए. के. गोपालन भारताचे पहिले विरोधी पक्षनेतादेखील होते. त्यांनी भारतात अशा प्रकारे १३ विविध को-ऑपरेटिव्ह सोसायटया सुरू केल्या. त्यातल्या जबलपूरच्या कॉफी बोर्डाची ही एक शाखा इन्दौरमध्येदेखील साधारण ६० – ६२ च्या काळात उघडली. कॉफी हाऊसचं मॅनेजमेंट ही एक उल्लेखनीय बाब आहे. या रेस्टॉरंटमध्ये एकाच पातळीवर लोक नेमले जात. अगदी खालच्या स्तरावर हेल्पर म्हणून- म्हणजे भांडी विसळणे- अन् तेच लोक प्रमोट होत होत ज्युनियर वेटर, वेटर, कुक अन् सीनियर वेटर अन् मग मॅनेजर, जनरल मॅनेजर यांसारख्या पदांवर पोहोचतात. प्रत्येक मॅनेजरला अगदी सगळया स्तरावर काय समस्या असू शकतात याची पूर्ण कल्पना असते आणि सगळयांबद्दल एक आपुलकीही! याशिवाय खालच्या कामगारांना लवकरात लवकर मेहनत घेऊन मॅनेजरच्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणासुद्धा आपसूकच मिळालेली असते. ही कॉफी हाऊसेस केरळचे लोकच चालवत, त्यामुळे मध्य प्रदेश असो वा दिल्ली- सगळीकडे केरळ संस्कृती जपणारी ही काही सुंदर बेटेसुद्धा निर्माण झाली होती. कॉलेजच्या काळात मग आम्ही पुन्हा कॉफी हाऊसमध्ये जाऊ लागलो. जाऊ लागलो काय, जवळजवळ तिथेच राहू लागलो. इन्दौरचं कॉफी हाऊस इन्दौरच्या कोर्टाच्या खूप जवळ होतं म्हणून तिथे बरेचसे काळे कोटवाले वकीलच असायचे. प्रेस क्लब अगदीच शेजारी असल्यामुळे पत्रकार, फोटोग्राफर वगैरे मंडळी, नाटकवाले येऊन बसत. जवळच आर्ट्स कॉलेज असल्यामुळे काही चित्रशिक्षक व विद्यार्थी येत असत. एक ग्रुप मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्हज् असायचा. काही निवृत्त मंडळी एक छान फिल्टर कॉफी घेऊन सकाळची वर्तमानपत्रं वाचायला येत असत. कॉफी हाऊसमध्ये छोटी-मोठी सगळी वर्तमानपत्रं येत. काही कम्युनिस्ट नेते येत. काही साहित्यिक, काँग्रेसवाले अन् शाखा संपवून आरएसएसवालेही.. कॉफी हाऊस सगळयांसाठी चौदा – पंधरा तास उघडं असायचं. मुळात एक रुपया वीस पैशांची कॉफी घेतली की कितीही वेळ बसा, कोणी विचारायला यायचं नाही. सिगरेटच्या धुराआडून रंगलेल्या राजकीय चर्चा, वादविवाद, संवाद, भांडणं.. सगळं सगळं सतत सुरू असायचं. वकील लोक आपल्या क्लायंट्सना घेऊन येत अन् खटल्याबाबत चर्चा करीत.
हेही वाचा :आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : दृष्टिकोनातला बदलकार..
सगळे लोक एकमेकांना ओळखत. अशा या बुद्धिजीवी लोकांच्या कॉफी हाऊसमध्ये हळूहळू आम्ही विद्यार्थी मंडळीही जाऊन बसू लागलो. आधी आम्ही कमीच होतो, पण हळूहळू वाढता वाढता आमची संख्या तीस-चाळीसपर्यंत गेली. कॉलेजच्या आधी कॉफी हाऊसमध्ये बसा, कॉलेज झाल्यावर कॉफी हाऊसमध्ये बसा, लोकांची चर्चा ऐका, त्यात सामील व्हा.. काही दिवसांनी आम्ही कॉफी हाऊसच्या दालनात हाफपिच क्रिकेटसुद्धा खेळायला लागलो, अन् त्या दिवशी ऑफ असलेले आमचे मल्याळी मित्रसुद्धा आमच्याबरोबर खेळायचे. आम्ही सगळेजण एकत्र जमलो की कॉफी हाऊसच्या चार खोल्यांपैकी एक खोली आम्हा मुलांनीच तुडुंब भरायची. मुलांचं शिक्षण संपे, पण नोकऱ्या नव्हत्या, खूप खूप कुंठित असलेली युवा ऊर्जा दिशाहीन होऊन एखाद्या तुफानासारखी वेगवेगळया दिशांना सरकत होती. कॉफी हाऊसनं या तुफानाला घर दिलं, मुलं तिथे बसून नोकऱ्यांचे अर्ज, अनेक मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्याससुद्धा तिथेच बसून करत. असं म्हणायला काही हरकत नाही की, माझं लिखाणही कॉफी हाऊसमध्येच सुरू झालं.
माझं पहिलं नाटक करण्याची योजनादेखील कॉफी हाऊसच्या टेबलावर आखली गेली. त्या नाटकाचं पहिलं पोस्टरसुद्धा कॉफी हाऊसच्या दारावरच लावलं गेलं. तसं कॉफी हाऊसमध्ये बाहेरच्या नोटिसा, जाहिराती लावायची परवानगी कुणालाच नव्हती, अगदी राजकीय पक्षांच्या मोठ-मोठया नेत्यांनासुद्धा! पण आम्हा मुलांचं पहिलं नाटक होतं म्हणून तिथल्या मॅनेजरनं प्रेमानं आम्हाला ‘हो’ म्हटलं होतं; अन् येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला ते आपल्या तोडक्यामोडक्या हिंदीमध्ये नाटकाविषयी सांगतदेखील असत- ‘‘हमारे कॉफी हाऊस के लडके का नाटक है, जरूर आना.’’ आयुष्याची जवळजवळ ५-६ वर्ष मी कॉफी हाऊसमध्ये घालवली असतील. तिथे मी बऱ्याच वेटर्सना मॅनेजर बनतानासुद्धा पाहिलं आहे. सगळयांशी अगदी जिव्हाळयाची मैत्री झाली होती. नोकरीसाठी आपल्या नातेवाईकांपासून, आपल्या संस्कृती अन् भाषेपासून लांब येऊन राहणारी ही माणसं अगदी कॉफी हाऊस बंद झाली की एकटी असायची. कुणी त्यांच्याशी बोलायला नसायचं, पण आमच्या पोरांनी त्यांच्याशी घट्ट मैत्री केली होती. आमच्या घरच्या लग्न समारंभांना किंवा दुसऱ्या कुठल्या कार्यक्रमाला कॉफी हाऊसच्या लोकांना आवर्जून बोलावलं जायचं अन् ओणमच्या रात्री कॉफी हाऊस बंद करून तिथल्या कर्मचाऱ्यांकरता केलेल्या ‘सद्या’ या केळयाच्या पानावर वाढलेल्या केरळ थाळीच्या मेजवानीसाठी आम्हा वीस-तीस मुलांना एकत्र आमंत्रण असायचं अन् आम्ही निर्लज्जासारखं जायचोसुद्धा हक्कानं अन् सांबार-भात अन् अवियलसारख्या पदार्थावर तर भरभरून ताव मारायचो.
कॉफी हाऊसच्या अख्ख्या इतिहासात अन् त्यांच्या संस्थापकांच्या स्वप्नातसुद्धा कधी आलं नसेल की इन्दौरच्या कॉफी हाऊसमध्ये पोरांची उधारी सुरू होईल. मुलांची खाती मेन्टेन होऊ लागली. ‘अंकल ये कॉफी पेंडिंग’ अशा आरोळया ऐकू यायला लागल्या. तिथल्या मॅनेजर्सनासुद्धा आम्ही ‘अंकल’ म्हणत असू. खूप उधारी वाढली तरी सहसा टोकत नसत. अन् कधी कधी आतल्या आत त्यांना मिळणाऱ्या टिपमधून वळतेसुद्धा करत. त्यांची टिप घ्यायची एक विशेष पद्धत होती. एक अॅटल्युमिनियमची पेटी असायची. त्यात सगळी टिप एकत्र व्हायची अन् महिन्याअखेर वरपासून खालपर्यंत सगळयांसाठी समान वाटणी केली जायची. कॉफी हाऊसमध्ये आमचे मित्र आपल्या गर्लफ्रेन्डस्ना घेऊन यायचे. त्यांना स्पेशल फॅमिली रूममध्ये जागा दिली जायची. जर का कधी तिथे मुलीचे भाऊ वगैरे मुलीच्या शोधात आलेच, तर वेटर मंडळी स्वयंपाकघरातील गुप्त रस्त्याने पळून जायला त्यांना मदतसुद्धा करायचे. कॉफी हाऊसमध्ये मी एमएफ हुसैन यांना अनवाणी स्केचिंग करताना पाहिलंय. मेधा पाटकरांना काही गहन चर्चा करताना बघितलंय. अगदी लहान वयातले उस्ताद राशिद खानही पराग छापेकर या माझ्या मित्राच्या मागे वा एकटे स्कूटरवर बसून कॉफी हाऊसमध्ये येत होते तेही मला आठवतंय. पराग सतार वाजवायचा. राशीद खान यांचं टेबलावर ठेका धरून गुणगुणणं आजही माझ्या कानात घुमतंय.. कॉफी हाऊसमध्ये मी झोपलोसुद्धा आहे. किती किती आठवणी एका क्षणात येऊन गेल्या..
हेही वाचा :भाषागौरव कशाचा?
परत फोन वाजला. दुसऱ्या बाजूला पुन्हा समीर – ‘‘तू प्रतिक्रिया देतोस नं?’’
मी म्हणालो, ‘‘तू आधी सांग अंकल लोक, वेटर्स वगैरे कसे आहेत?’’
तो म्हणाला, ‘‘दु:खी आहेत, पण त्यांना दुसऱ्या ठिकाणी जागा मिळाली आहे आणि त्यांनी तिथे नव्यानं सुरुवात करण्याची पूर्ण तयारी केली आहे.’’
मी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. म्हटलं, ‘‘नफ्याच्या मागे धावणाच्या काळात कॉफी हाऊसनं एक को- ऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून आपला व्यवसाय आजतागायत यशस्वीरीत्या चालवला आहे. आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं हित संपूर्णरीत्या टिकवलं आहे. याचा अर्थ असा की, सोशलिझम पूर्ण वाईट आहे असं नाही.’’ मग माझा मीच विचार केला की हे खूप बोअरिंग वाटतंय. मग एवढंच म्हटलं, ‘‘समीर, कॉफी हाऊस जाणं म्हणजे..’’
मला खरंच आठवत नाही मी काय म्हटलं, पण आजही इन्दौरला गेलो की कॉफी हाऊसला जातो. सगळं तसंच आहे. तिथली चव, पदार्थ, माणसं.. फक्त पदार्थामध्ये छोले-भटुरे, पिझ्झा, बिर्याणी यांसारखे पदार्थ जोडले गेलेत.
पण राहिलंय काय तर.. ती छोटी छोटी बिलं.. ते बिल ठेवून टेबलावर आणलेला प्लास्टिकचा चिमुकला हिरवा
ट्रे.. आणि ती सगळयांचं हित बघणारी टिपची पेटी..
swanandkirkire04@gmail.com