पाऊस जो चांगलाच याड काढत होता. मधूनच इतक्या जोरानं कोसळायचा की पडवीवरच्या पत्र्यांचा फुटून-तुटून चुराडा होईल असं वाटायचं. मी मुकाट घरात बसलो होतो. तडतड आवाज ऐकून डोकं दुखायला लागलं होतं. थोडा वेळ शांत व्हायचं नि भसकन वाऱ्याचा झोत खिडकी-दरवाजातून आत घुसायचा. त्यामागे परत झड सुरू व्हायची. बाहेर पावसाळी धुकट, तर घराच्या आत पूर्ण काळोख. गारगार झालेलं. पाऊस जरा उघडला असं वाटलं, म्हणून मी छत्री घेऊन बाहेर पडलो. पण नायच. पावसाचं कोसळणं काय थांबलं नव्हतं. हळूहळू चालत होतो.
आमचं गाव डोंगरावर असल्यामुळे एका वाकणाच्या इथून दूरवरचा प्रदेश दिसतो. तिथे पोचेपर्यंत एक मोठाली झड येऊन गेली. ती गेल्यावर नैऋत्येकडे तिच्यामागून आणखी एक ढगांची भिंत दिसली. ते अथांग आभाळ त्यात असलेले असंख्य मोठाले ढग, त्यातून टपकणारी असंख्याहून असंख्य ही अशी जाडी शितडी (‘थेंब’ हा प्रमाणशब्द माझ्या कोकणाच्या पावसाला सहन होत नाय हां. वापरायची चूक करू नका, चेचायचा धरून.) हे असं जे एका भव्य पातळीवर चाललेलं आहे, नि त्या गोष्टीचे आपण घटक आहोत याची त्या दृश्याने जाणीव करून दिली. जरा वेळच शांत वाटलं. भव्यतेवर केलेलं प्रेम निववतं, असं म्हणतात. पण मला तर ढगांच्या लाटांवर स्वार होऊन अथांग आभाळाच्याही वर भरारतोय असं कायतरी वाटायला लागलं. मी त्या पावसाच्या धुकट पडद्याकडे गांगरल्यासारखा बघत राहिलो. काहीच सुधरत नव्हतं. त्याचं कोसळणं अनुभवताना मन प्रचंड सैरभैर झालं होतं. तसंही एरवी पाऊस नसला तरी मन सरबरलेलं असतंच. तर जाऊ देस. आत्ता असं वाटत होतं की, पावसाचे ते काळेकुट्ट ढग माझ्या मनात, डोक्यातही घुसून बसले आहेत. ज्यावर फारसा कधी विचारही केला नव्हता, भविष्यात बघू असं म्हणून मनातून जाळून नष्ट केलेल्या अत्यंत क्षुल्लक गोष्टी त्याचवेळी पाणी पिऊन गवतासारख्या पुन्हा रुजून वर येतायेत. डोकं घूम होऊन गेलं.
आणखी वाचा-विखंड भारत, अखंड लोक
तर या अशा दृश्यजाणिवा हळूहळू नेहमीच्या होऊन जातात. हा असा पाऊस मग तीन-चार महिने अख्ख्या कोकणाचा जो चांगलाच याड काढतो. मिरुगाच्या वेळी ह्यची भयंकर ओढ असते. वातावरण इतकं कोंदलेलं असतं, अंगाची इतकी किचकिच होत असते की, कधी एकदा अख्खं आभाळ गळतंय असं वाटत असतं. तिकडे पावसाळ्यापूर्वीची तयारी जोरात असते. एकदा मी काकूकडं लाकूडफाटा भरत होतो. अगोटीचे दिवस होते. दुपारपर्यंत स्वच्छ निळं आकाश होतं. मग अचानक आभूट आलं, बघता बघता गळायलाही लागला. मी बोल्लो, मरतोय जो… आत्ताच कसा नेमका आला. काकूनं लगेच मला टोकलं, अरं बावा, त्याचंच दिवस हायेत. शिव्या द्यायच्या नाय पावसाला. गेला निघून त परत मुस्का दाखवायचा नाय. मग पिकवशील काय न खाशील काय, भुरीमाती?
तेव्हा पाऊस येतो तो समृद्धी घेऊनच. मिरुग येऊन गेलाय. मोसमी वारे ढगांना नैऋत्येकडून ढकलत आणतायेत. नवं जीवनचक्र सुरू होणाराय. अशा वेळी पेऱ्यांची जोरात तयारी असते. अजून काही जणांचा लाकूडफाटा भरायचा असतो. आंबाफणसाची साटा उन्हं बघून वाळवून घ्यायची असतात. शेवट शेवटचे कोकम, काजू, आमचूर, मिरच्या नि मासेही वाळवत ठेवले असतात. एक डोळा कामांवर तर एक आभाळाकडे. ‘पाऊस भरपूर लागू दे’ म्हणून गाऱ्हाणी घातली जातात. पावसावरची गाणी गातात. (म्हणजे कधी काळी जुनी माणसं गायची. आता ती त्यांच्यासंगं मातीत गेलीत.) ‘धान्य पिकू देस’, म्हणून राखणदाराला कोंबड्याचा निवद द्यायचा असतो. मग त्याच रात्री मटण-वड्यांचा बेत असतो. असं सगळं तळकोकणातल्या कुठल्याही गावातलं वातावरण. एकदा भातलावण्या आटोपल्या की, माणसं सुस्तावतात. आषाढात तर गप घरी बसतात. सावनात सगळंच दृश्य पार बदलून हिरवं हिरवं गारगार चिंबून ओथंबलेलं असतं. शेतीबरोबरच असंख्य रानभाज्याही मायेनं खाऊ घालणं, हेही पावसाचं महत्त्वाचं काम. भारंगी, टाकळा, कुर्डू-कौला नि इतर असंख्य भाज्यांना थोड्याशा पावसानंपण ढिऱ्या फुटतात. मग ती खुटून त्याची भाजी बनवतात. त्यानंतर उशिराने तवशी, चिबडं पिकतात. शेती आणि रान यांचं अनोखं मिश्रण कोकणाच्या पावसाळी जीवनात असतं.
आणखी वाचा-तवायफनामा एक गाथा
सध्या पावसाचा सूर आणि नूरच बदललाय. तो सुखावण्याऐवजी घाबरवायला लागलाय. तो पूर्वीसारखा रोमँटिक राहिला नाही, असं लोक बोलतात. चार दिवस असा काही याड काढतो की, शहरांच्या तर नद्याच होतात. मग रोमँटिकचं लोन्चा नाय का होणार? आधी आठवडा-आठवडाभर लागणारा पाऊस, आता आषाढातही काही दिवस गायब होतो. हे सगळं चुकीच्या विकास-कल्पनांच्या मागे लागून माणसांचाच सूर बदलल्यामुळेच झालंय ना. नावं मात्र पावसाला ठेवायची. मग शहरातल्यांना पावसाचा रोमँटिकपणा बघायला शहराच्या बाहेर पडावाच लागतो. असो. तिकडे गावातल्या माणसांची गणितं चालू होतात. लावणीच्या टायमात चार बाया-बाप्ये एकत्र आल्या की त्यांच्या गप्पांमध्ये हे नक्षत्र लागू देस, ते लागू देस. हे नको लागायला, असं येतंच. प्रत्येक नक्षत्रावर एक तरी म्हण लागू आहे. ‘लागतील उतरा, त खाईल कुत्रा.’ म्हणजे जेव्हा भात पसवतं तेव्हा ऊन पायजे. तेव्हा पाऊस लागला तर वाट लागली. हादग्यात पाऊस लागला तरच पानी गरमीपर्यंत टिकंल. नायतर शिमग्याच्या आधीच पाण्याची बोंब होईल. माणसाच्या मनात सारखी भीती. जास्त पाऊस लागला नि बांध फुटला, पाणी चोंढ्यातनं निघून गेलं, तर पीक सुकून जाईल. झाडं कोसळली तर? एखादं झाड दूर कुठे रानात पडलं तर चालतंय. घरावर किंवा विजेच्या लाइनीवर नको पडायला. तसं झालं तर लाइट जातील. मग काय करायचा? घर मोडलं तर परत उभारायचं कसं? कुठून पैसं आणायचं? हे सगळे ‘फुगलेले’ पावसाळी प्रश्न माणसाच्या मनात येऊन त्याला नको करतात. त्याच वेळी उन्हाळ्याच्या साचलेल्या डबक्यातून जीवनाच्या ताज्या प्रवाहात त्याला पुढेही ढकलत असतात.
आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : जातवास्तवाचा शोध…
मिरुगातल्या त्या पावसाची ओढ, जर तो दिवाळीपर्यंत लांबला तर शिव्याशापात बदलते. सराईत भात कापायची घाई नि इकडे पाऊस लागतायच. मग तीच काकू बडबडते, ‘‘पावसा रं, बा जो, किती याड काढशील. वायसा थांब रं बावा. सोन्यासारखा दाना आलाय हातात, त तरी कापू देशील काय नाय? बा झो, थांब तुझ्या आयशीलाच बोलवाताय तुला दांडकायला, म्हंजे मंग पलशील.’’ हे ऐकून मी खुदूखुदू हसतो. मला मजा येते माणसापावसाचं हे नातं बघून. तो कोन्च्या बापाचं ऐकत नाय. फार तर आयशीचं ऐकत असावा. कारण त्याची आदिमाय त्याच्या कानात काहीतरी सांगते नि मग अचानक ढग फिरतात, आकाश मोकळं होतं.
आता हा पाऊस जगभर भटकायला मोकळा होतो. कोकणात जेव्हा त्याला मान्सून वारे ढकतील तेव्हाच परतणार. मी पण तेव्हाच नैऋत्येच्या दिशेनं तोंड वळवून त्याला परत बघणार असतो.
(‘बयो’, ‘भरकटेश्वर’, ‘झुरांगलिंग’ या गाजलेल्या कादंबऱ्या ‘दोन चाकं आणि मी’ पुस्तकाला राज्य पुरस्कार. नुकतीच ‘सातमायकथा’ ही कादंबरी प्रकाशित.)
hrishpalande@gmail.com