आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय असणारे लेखक फार थोडे असतात. चिं. वि. जोशी हे त्यापकी एक. जीवनातील वास्तवाचे कल्पक विनोदी पद्धतीने चित्रण करून अतिशय उच्च दर्जाचा विनोद त्यांनी मराठी साहित्याला दिला. चिंविंना सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतराचे, बदलांचे आणि लघुकथा, लघुनिबंध या वाङ्मयप्रकाराच्या आकृतिबंधाचे सजग भान होते. त्यांचे वाङ्मय आजही ताजे, टवटवीत वाटते. मराठी कथासाहित्याच्या वाटचालीत त्यांचे योगदान मोठे आहे. म्हणूनच भालचंद्र नेमाडे यांच्यासारखे अभ्यासक त्यांना महत्त्वाचे कादंबरीकार मानतात. चिमणरावांच्या रूपाने मराठी साहित्याला पहिला अँटी हिरो देण्याचे श्रेय ते चिंिवना देतात. अशा चिंिवच्या साहित्यिक योगदानाची चर्चा करणारे आणि त्यांच्या सहृदय आठवणी जागवणारे ‘चिं.वि. – साहित्यातले अन् आठवणीतले’ हे त्यांची नात संध्या बोडस-काणे यांना संकलित केलेले पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झालेले आहे. या पुस्तकाच्या काही मर्यादा ध्यानात घेऊनही चिंिवची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी त्याचे योगदान मोठे आहे.
संध्या बोडस-काणे यांनी या पुस्तकाची मांडणी वैशिष्टय़पूर्ण केलेली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अलक्षित पलूही सर्वासमोर आणण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न खूप महत्त्वाचा आहे. चिंवि हे बडोदे कॉलेजमध्ये पालीचे अध्यापक आणि जवळपास तीस वष्रे  बडोदे संस्थानचे राजदफ्तरदार होते. या पदांवर असताना त्यांना केलेली पालीची सेवा वाचकांना फारशी माहीत नाही. प्रस्तुत पुस्तकात याची चर्चा करणारे स्वतंत्र लेख नसले तरी या कामाचा करून दिलेला परिचय महत्त्वाचा आहे.
 मराठीतील अनेक महत्त्वाचे लेखक, समीक्षकांचे चिंिवचे साहित्यातील योगदान सांगणारे आणि त्यांच्या विनोदाचे स्वरूप स्पष्ट करणारे लेख या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. चित्रपट, दूरदर्शनवरील चिमणराव आता नव्या पिढीला माहीत नाहीत. त्यादृष्टीने त्यांची ओळख करून देणारे तीन लेख आणि जवळच्या मित्र-आप्तांनी त्यांची वेगळ्या पद्धतीने करून दिलेल्या ओळखी हे या पुस्तकाचे खास वैशिष्टय़ आहे. शेवटी जोडलेल्या तीन परिशिष्टांनी त्यांचे साहित्यातील योगदान अधिक गडदपणे ठसवले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर पन्नास वर्षांनी प्रसिद्ध झालेले हे पुस्तक अनेक दृष्टीने महत्त्वाचे आहे.
हसू येत असताना ते निष्कारण दाबून टाकणे हा एक फाजील शिष्टपणा आहे आणि दुसऱ्याच्या भावना दुखविणारे हास्य दाबून टाकणे हा शिष्टाचार आहे; असे सांगणारे चिंवि सामान्य व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील तितक्याच सामान्य गोष्टींतून हास्यनिर्मिती करतात. जीवनातील अशा जागा शोधण्यासाठी एक दृष्टी असावी लागते ती त्यांच्याजवळ होती. समाजाचे आणि मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विसंगतींवर बोट ठेवून ते आपली विनोदनिर्मिती साधतात. त्यांच्या या विनोदाच्या अनेक परी चिकित्सकदृष्टीने हेरून अभ्यासकांनी केलेली चिकित्सा विनादाची तात्त्विक बाजू समजून घेण्यासाठीही महत्त्वाची आहे.
चिंिवच्या निवडक लेखनाचे संकलन असलेल्या ‘हास्यचिंतामणी’ या ग्रंथाला त्यांनीच दीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. ही प्रस्तावना या पुस्तकात समाविष्ठ करण्यात आली आहे. विनोदाची तत्त्वचर्चा म्हणून ही प्रस्तावना महत्त्वाची आहे. या प्रस्तावनेपूर्वी न. चिं. केळकर यांनी केलेली विनोदाची चर्चा वगळता या विषयावर मराठीमध्ये कोणी विशेष लिहिलेले नव्हते. त्यामुळे या प्रस्तावनेला विशेष महत्त्व आहे. चिंवि या प्रस्तावनेत विनोदाचे स्वरूप समजून सांगताना विनोदविषयक काही प्रश्न उपस्थित करतात, तर काही अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे देऊ पाहतात. ही प्रस्तावना हास्याचे जीवनातील मर्मस्थान कळण्यास साहाय्य ठरावी इतकी मौलिक आहे.
या पुस्तकाचा दुसरा भाग ‘साहित्यातील चिंवि’ असा आहे. मराठी साहित्यामध्ये त्यांचे स्थान काय याचा शोध घेणारा हा विभाग मराठीतील दिग्गज लेखक-समीक्षकांनी लिहिलेला आहे. बडोदे संस्थानातील महत्त्वाचे व्यक्तित्व म्हणून साहित्यिक चिंिवचा परिचय करून देणारा वि. पा. दांडेकरांचा लेख या विभागाच्या प्रारंभीच आहे. गंगाधर गाडगीळ चिंिवकडे महत्त्वाचे कथाकार म्हणून पाहतात. ते ‘चिमणरावाचे आत्मवृत्त’ या लेखात अस्सल विनोदी लेखनाची वैशिष्टय़े आणि चिंिवचे लेखन अशी एक तुलना सादर करतात. कलाकृतीचे साहित्यमूल्ये कायम ठेवून विनोदनिर्मिती करणारे चिंवि दाखवतानाच ते त्यांच्या लेखनातील काही ठिकाणी येणाऱ्या अनावश्यक कोटय़ांची परखडपणे चर्चा करून चिंिवच्या विनोदाच्या काही मर्यादा अधोरेखित करतात. गाडगीळांप्रमाणेच विजय तेंडुलकरांनीही चिंिवच्या वाङ्मयीन वाटचालीच्या तीन अवस्था कल्पून त्यांचा विनोद बाल, तरुण आणि पौढ या अवस्थेतून जातो हे स्पष्टवक्तेपणाने सांगीतले आहे.
चिंिवचा पाली भाषेचा व्यासंग मराठी वाचकांसाठी अपरिचित आहे. त्यादृष्टीने ना. ग. जोशी यांनी लिहिलेला लेख विशेष उल्लेखनीय आहे. बडोदेतील त्यांच्या आठवणी, स्वभावातील मिश्किलपणा आणि उणीवांची दखल घेत त्यांच्या पाली भाषेतील योगदानाची करून दिलेली ओळख महत्त्वपूर्ण आहे. पुढील तिसऱ्या विभागातील संध्या काणे यांच्या चिंिवची ओळख करून देणाऱ्या दीर्घ लेखाला हा लेख पुरक आहे. विद्याधर पुंडलिक आणि अंजली सोमण चिंिवच्या लेखनातील चढउतार नोंदवतानाच त्यांच्या लेखनाचे सच्चेपण सांगतात. त्यांनी विनोद करताना जे टाळले आहे त्यामध्येच त्यांच्या विनोदाचे बलस्थान दडले आहे; पर्यायाने त्यांचा विनोद लोकप्रिय होण्यालाही तेच कारण घडले आहे असे मत त्या नोंदवतात.
चिंिवचा चिमणराव हा सर्वपरिचित आणि विशेष लोकप्रिय आहे. त्यामुळे चिमणराव हे पात्र नसलेल्या त्यांच्या पुस्तकांमधील विनोद मागे पडला आहे. अशा पुस्तकांची चर्चा करणारा शांता शेळके यांचा लेखही विशेष उल्लेखनीय आहे. रावणमहाराजांच्या काळातील वर्तमानपत्र अशी कल्पना करून त्याला साजेशे ‘लंकावैभव’ हे चिंिवनी दिलेले नाव आणि त्यातील सर्वकाळ आनंद देणाऱ्या अस्सल विनोदाची ओळख शांता शेळके यांनी करून दिली आहे.
डॉ. गो. मा. पवार यांचा चिंिवच्या लेखनाचा आणि वाङ्मयीन योगदानाचा परिपूर्ण आढावा घेणारा एक महत्त्वाचा असा दीर्घ लेख हे या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. एक विनोदी लेखक म्हणून चिंिवकडे पाहताना त्यांच्या लेखनाची गुणवैशिष्टय़े, त्यांच्या विनोदाची जातकुळी, विविधांगी लेखन समरसतेने करणारा चिंिवचा मन:िपड, त्यांची निखळदृष्टी, त्यांच्या लेखनातून येणारे मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनातील नानाविध कंगोरे, ते टिपण्याचे त्यांचे सामथ्र्य अशा अनेक अंगानी पवार यांनी चिंिवच्या समग्र लेखनाची केलेली चर्चा हे या पुस्तकाचे वैशिष्टय़ ठरावे.
या पुस्तकाला आदरांजली लिहिणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर हे त्यापकी एक. महाराष्ट्रापासून दूर बनारससारख्या अमराठी शहरात राहात असताना या भूमीशी जोडून ठेवणारे चिंिवचे लेखन आपल्या बालपणी किती महत्त्वाचे ठरले हे या पुस्तकाच्या प्रारंभीच नारळीकर यांनी सांगीतले आहे. मंगला गोडबोले यांचा ‘चिं.वि. आणि आम्ही’ हा लेख महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख देणारा आहे. स्वतच्या कौटुंबिक आयुष्यात थोडे दुखी असणारे चिंवि मराठीतील सर्वश्रेष्ठ विनोद निर्मितीचे जनक ठरले आहेत. हे त्यांना कसे साधले हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे असे मुकुंद टाकसाळे आपल्या लेखात लिहिले आहे; तर दूरदर्शनवरील लोकप्रिय चिमणरावांची निर्मितीप्रक्रिया आणि जडणघडण सांगणारे विजया धुमाळ आणि दिलीप प्रभावळकर यांचे दोन लेखही चिंिवचे श्रेष्ठत्व पटवणारे आहेत. गालातल्या गालात खसखस पिकवणाऱ्या चिंिवच्या लेखनात दृक-श्राव्य माध्यमांच्या दृष्टीने अनेक जमेच्या बाजू कशा आहेत हे प्रस्तुत लेख वाचल्यानंतर आपल्याला कळते.  ज्ञानेश्वर नाडकर्णी चििवच्या पुस्तकांना रेखाचित्रे काढणाऱ्या सी. ग. जोशींच्या योगदानाची दखल घेतात.
या पुस्तकातील शेवटचा भाग ‘आमच्या आठवणीतले दादा’ असा आहे. अतिशय नम्रतेने आणि भावनिक ओलाव्याने कुटुंबियांनी त्यांच्याविषयी जे भरभरून लिहिले आहे ते मुळातून वाचावे इतके महत्त्वाचे झाले आहे. संध्या काणे यांनी लिहिलेला दीर्घ लेख एका लेखकाचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी उपकारक ठरणारा आहे. वास्तविक चिंविच्या विनोदी लेखनाची जेवढी चर्चा या पुस्तकात येते; तेवढी दखल या अंगाची घेतली गेली आहे असे म्हणता येत नाही. तथापि केलेला प्रयत्न स्तुत्य म्हणावा असाच आहे. एकूणच चिंविंच्या लेखनाचे सारे पलू या पुस्तकातून सर्वासमोर आणण्यात आणि विनोदी लेखनचच्रेत मौलिक अशी भर या पुस्तकाने घातली आहे. नव्या पिढीला चिंिवच्या साहित्याकडे वळवणारे आणि जुन्या पिढीला चिंवि नव्याने वाचनाची नवी ऊर्मी देणारे हे पुस्तक स्वागतार्ह आहे.
‘चिं. वि. साहित्यातले अन् आठवणीतले’ – संकलन – संध्या बोडस-काणे, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, पृष्ठे -३१९, मूल्य – ३०० रुपये.         

Story img Loader