‘एक कृती, एक शब्द,
एकच निमिष चुकतं-हुकतं
उभ्या जन्माच्या चुकामुकीला
तेवढं एक निमित्त पुरतं..’
कवितेची वाटचाल नुकतीच सुरू झाली तेव्हा सलामीलाच ही ओळ कवीच्या लेखणीतून कागदावर अवतीर्ण झाली होती. आज उण्यापुऱ्या चाळीस वर्षांनंतर एक मजेदार गोष्ट अगदी अकल्पितपणे जाणवली. या ओळीतले बहुतेक सगळे शब्द पुढच्या या चार दशकांच्या प्रवासात कवीच्या कवितांतून, गीतांतून अनेक वेळा प्रकट झालेले दिसतील. प्रत्येक- वेळी वेगळ्या संदर्भातून, वेगळय़ा अंदाजातून, वेगळी मुद्रा आणि वेगळे मनोभावही घेऊन. पण या ओळीतला एक शब्द मात्र त्या कवितेत आपसूक उमटला आणि नंतर जणू कवीच्या शब्दविश्वातून अंतर्धानच पावला. तो शब्द म्हणजे ‘निमिष’..
‘निमिष’ म्हणजे नक्की काय, कुणास ठाऊक. म्हणजे तो एक कालमापनवाचक शब्द आहे, हा माझा केवळ ढोबळ परिचय. युग, तप, वर्ष, मास, दिवस, तास, क्षण आणि निमिष.. याचा अर्थ एक ‘निमिष’ म्हणजे क्षणाचाही जणू एक कण किंवा कणांश. आपल्या पापणीची उघडझाप होते, तितकाच आणि तेवढाच. अशा अनेक कणांच्या समन्वयातून क्षण घडत असणार. आणि त्या क्षणांच्या मालिकेतून पुढचं सगळं अवाढव्य रामायण. (आणि महाभारतही!) पण या अवघ्या विराट इतिहासाचं मूळ केवळ ते एक ‘निमिष’.. म्हणजे पापणीची एक छोटी उघडझाप.
हे लिहिताना एकदम जाणवलं.. आपण ‘अनिमिष दृष्टी’ असा शब्दप्रयोग करतो तोसुद्धा यामुळे तर नसेल? असो. (अगर ‘नसो’देखील!) एखादा गहन, गंभीर प्रबंध लिहिताना त्यातील छोटा-मोठा उल्लेख, विधान हे सर्वागांनी आणि सर्व मार्गानी तपासून घ्यावं लागतं. पण कविता-सखीसारखं सहजसंवादात्मक लेखन करताना एक वेगळं पथ्य मी कटाक्षानं पाळतो. मनात येणारे विचारतरंग आणि त्यांचा ओघ हा अशा सावध तपासण्यांसाठी खंडित होऊ द्यायचा नाही. आपलं ज्ञान-अज्ञान, समज-अपसमज, विश्वास आणि संभ्रम या सर्वासकट व्यक्त होत राहायचं. त्या- त्या क्षणी आपण जसे आहोत तसं आणि तसंच दिसायचं.
तर ‘निमिष’ हा शब्द पुन्हा माझ्या काव्यविश्वात बराच काळ डोकावला नाही, असं विधान मी केलं खरं; पण पोटात एक धाकधूक आहेच, की कुणीतरी साक्षेपी वाचक एखादा सज्जड पुरावा दाखवून माझ्या तंगडय़ा माझ्याच गळय़ात अडकवेल. दूर कशाला, मलाच माझ्या ‘पक्ष्यांचे ठसे’ या संग्रहातली एक कविता आठवतेय. ‘ऐन या सुखात का मन उदास जाहले?’ त्यातील एका अंतऱ्यात हा शब्द चुटपुटती भेट देऊन गेला आहे.
कुंचल्यात चित्र-भास
रंग रंग श्वास श्वास
निमिषातच रेखांचे भाग्य होय आंधळे.
पण आजदेखील मूळ नियम सिद्ध करणारा एक अपवाद असाच मला तो वाटतो. कारण इथे हा शब्द खरोखरच निमित्तमात्र आला आहे. त्या काव्यविधानाचा तो कर्ताकरविता नाही. एखाद्या नाटकात महानायकाची भूमिका केलेल्या अभिनेत्याने दुसरीकडे केवळ छोटय़ा, दुय्यम व्यक्तिरेखेत काही क्षणांपुरतं दर्शन देऊन जावं, त्याप्रमाणं. पण तुलनेनं अलीकडच्या काळातील एका कवितेत तो अग्रस्थानी दिमाखात उपस्थित झालेला भेटेल. इतकंच नाही, तर तोच त्या कवितेला प्रवाहित करत नेणारा त्या कवितेचा नायक आहे. ती सगळी कविता एका अनोख्या निमिषाची कहाणी सांगते. आणि अगदी व्यावहारिक अर्थानं बोलायचं म्हटलं तरी त्या कवितेचा जन्मच एका साध्यासुध्या निमिषातूनच उगवलेला आहे. ती सगळी हकीकत थोडक्यात, पण तरीही सविस्तर सांगावी लागेल.
गायक रवींद्र साठे आणि संगीतकार आनंद मोडक हे सत्तरच्या दशकापासून आपल्या कलाजीवनाची वाटचाल करू लागलेलं एक कलाकारद्वय. माझीही कलाकार म्हणून वाटचाल तेव्हाच सुरू झाली होती आणि ती त्यांच्या समांतरच चालली होती. त्यामुळे आम्ही तिघे जसे घट्ट मित्र, तसेच सर्वार्थानं सांगातीही. तर त्यांची संकल्पना अशी होती की, या वाटचालीत वेळोवेळी निर्मिलेल्या त्या दोघांच्या भावगीतांचा एक अल्बम करायचा. त्यांची आखणी करताना एक गमतीदार गोष्ट त्या दोघांच्या प्रथमच ध्यानात आली. या इतक्या प्रदीर्घ काळात संगीतकार आनंद मोडक आणि कवी सुधीर मोघे, गायक रवींद्र साठे आणि संगीतकार आनंद मोडक, संगीतकार सुधीर मोघे आणि गायक रवींद्र साठे हे योग अनेक वेळा आले आणि त्यामुळे आम्ही अखंड एकत्र आहोत असं आम्ही मानत होतो. पण प्रत्यक्षात गायक रवींद्र साठे, संगीतकार आनंद मोडक आणि कवी सुधीर मोघे यांचं एकही खासगी भावगीत एवढय़ा प्रदीर्घ काळात प्रकट झालं नव्हतं. त्यामुळे साहजिकच त्यांच्या त्या संकल्पित अल्बममध्ये मी कवी म्हणून येणं स्वाभाविकपणे अशक्य होतं. पण दोन्ही मित्रांना हे बरं वाटेना, म्हणून ते एक मागणी घेऊन माझ्याकडे आले. त्यांच्या या अल्बमसाठी मी एक नवं, टवटवीत ताजं काव्य लिहावं. शक्य असेल तर आनंदच्या एखाद्या चालीवर लिहून द्यावं. एरवी चुटकीसरशी होणारी ही घटना होती. पण त्यावेळची माझी मानसिकता वेगळी होती आणि तिला निश्चित अशी वैचारिक बैठक होती. म्हणून मी या मित्रांना म्हणालो, ‘इतक्या वर्षांत जे सहजपणे घडलं नाही ते आता ठरवून अट्टहासाने घडवायला नको. या अल्बममध्ये मी कवी म्हणून नाही, इतकंच होईल. पण मी एरवी तुमच्याबरोबर आहेच ना!’
त्या दोघांनाही माझं म्हणणं पूर्णपणे पोचलं. त्यामुळे पटलंही. पण त्यावरची त्यांची प्रतिक्रिया मात्र मला अनपेक्षित होती. शिवाय ती काही क्षणांत, फार विचार न करता आणि दोघांकडूनही जणू एकदमच व्यक्त झाली- ‘तुझं म्हणणं मान्य आहे. पण आम्ही थांबतो. तू तुझ्या तब्येतीनं केव्हाही लिही. त्यानंतर आपण हा अल्बम पूर्ण करू. आम्हाला कसलीही घाई नाही. आम्हाला या प्रोजेक्टमध्ये तू हवासच.’ खोलवर आत कुठेतरी झणाणलं. पण पुन्हा सामसूम.
असाच खूप काळ आत एक बोचणी होती. पण काही घडत नव्हतं. आतही.. बाहेरही. एके दिवशी भल्या सकाळी आनंदचा फोन आला.. ‘विशेष काही नाही. तुला फक्त आपल्या कामाचा स्टेटस सांगतोय. सगळे ट्रेक्स झाले आहेत. उद्या त्यामध्ये व्हायब्रो आणि गिटार पीसेस करायला मुंबईहून वादक येताहेत. तुला काही धूसर सुचलं असेल तर ठीक. नाहीतर आपण त्यांना पुन्हाही बोलावून घेऊ. नो प्रॉब्लेम.’  संगीतकार म्हणून स्वत:लाही ‘अच्छा.. पाहू या’ असं काहीतरी बोलून मी फोन बंद केला. आनंदचा तो फोन ‘गुगली’ नक्कीच नव्हता. खूप प्रांजळ आणि खरा होता. पण त्याचबरोबर तो मला अगदी आतून नीट ओळखत असल्याचीही ती पावती होती. साहजिकच त्यानंतर काही क्षणांतच मी फोन फिरवला आणि विचारलं, ‘तुझ्याजवळ कागद-पेन आहे?’ यावर आनंदची हर्षभरित ‘क्या बात है!’ प्रतिक्रिया. आणि मग काही क्षणांत माझ्या मनात धूसर तरळणारी कविता टेलिफोनमधूनच आनंद मोडकच्या हस्ताक्षरात कागदावर साकार झाली. अर्थात असं होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती.
तात्पर्य, मी कवी म्हणून अखेर त्या अल्बममध्ये उपस्थित झालोच. नंतर कधीतरी जाणवलं की, मधल्या फोनवरच्या संवादातील त्या मूक निमिषाचाच तो आविष्कार होता. मौज म्हणजे त्या कवितेतही अशा निमिषाच्या जादूचीच कहाणी सामावली होती. आणि ते निमिषही जणू कुठल्यातरी पूर्वजन्मातून यावं तसं धुक्यात बुडालेल्या पूर्वायुष्यातून अचानक उगवून आलं होतं. समुद्राच्या खोल तळातून अकल्पितपणे उसळून आलेल्या आणि तळहातावर दिमाखात विसावलेल्या तेजाळ, टपोऱ्या रत्नासारखं. त्या कवितेची पहिलीच ओळ पुरेशी बोलकी आहे.
‘त्या एका निमिषात..
सर्वागातून जणू उसळली रस-गंधांची लाट
त्या एका निमिषात
दिवेलागणीची ‘ती’ वेळा
माजघरातील ‘तो’ झोपाळा
झोपाळय़ावर झुलणारी ‘तू’  
ठसलीस खोल मनात
श्रावण हिरवा आद्र्र कोवळा
तुझ्याभोवती लपेटलेला
हरित कांकणांचा गजबजता घट्ट पकडला हात
मऊ मुलायम लालस ओळी
ती भाषा मी प्रथम वाचली
एक अनोखी नवखी ओळख वीज भरे गात्रांत
उलटून गेली वर्षे अगणित
अल्प उरे श्वासांचे संचित
सुखमय क्षण ते कसे परतले अवचित पाठोपाठ
त्या एका निमिषात..’  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा