समताधिष्ठित समाजनिर्मिती हा लोकशाही समाजवादी विचारांच्या संघटना व कार्यकर्त्यांच्या चळवळीचा मूळ उद्देश असतो. समाजातील संख्येने अधिक असलेल्या सर्वहारा वर्गाला संघटित करून त्यांना सामाजिक, राजकीय व सांस्कृ़तिकदृष्टय़ा सक्षम करण्याचं आव्हान स्वीकारणाऱ्या आणि त्यासाठी प्रसंगी प्रखर संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळीच एकेकाळी महाराष्ट्रात होती. त्यातील एक म्हणजे नाशिकचे ज्येष्ठ समाजवादी कार्यकत्रे शांताराम चव्हाण. नाशिक शहर व परिसरातील हातगाडीवाले, चहाच्या टपरीवाले, रॉकेल, फळविक्रेते तसेच भंगार वेचणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कष्टकऱ्यांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी तब्बल ३० वष्रे एकहाती संघर्ष करणाऱ्या चव्हाण यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं ‘हरवलेल्या  वाटेवरचा प्रवासी’ हे आत्मचरित्रपर पुस्तक वाचताना त्यांच्या लढाऊ बाण्याचं पानोपानी दर्शन होतं.
हे आत्मचरित्र शोषितांच्या चळवळीचा लेखाजोखा आहे. गेल्या तीन दशकांत नाशिकसारख्या महाकाय नगरात सामाजिक, राजकीय आणि श्रमिक कामगारांच्या क्षेत्रात आणि त्यांच्या कौटुंबिक जीवनात ज्या घडामोडी झाल्या, त्यांचा अत्यंत स्पष्ट परंतु काहीसा धावता प्रवास या पुस्तकाच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहचत आहे. लौकिक अर्थाने आत्मचरित्र लिखाणाचे काही दंडक असतीलही, पण चव्हाणांच्या आत्मचरित्राला ते लागू पडत नाहीत. कारण ही केवळ एका व्यक्तीच्या नव्हे तर एका समाजाच्या बंडखोरीची कहाणी आहे.
या आत्मचरित्राताला चव्हाण यांनी केवळ दीड पानाची भूमिका लिहिली आहे. त्यात त्यांनी तीन-चार महत्त्वाचे मुद्दे चच्रेसाठी आणि आत्मचिंतनासाठी ठेवले आहेत. त्यातील पहिला मुद्दा –  जागतिकीकरण, उदारीकरण व मुक्त अर्थव्यवस्थेमुळे अत्यंत दाहक स्वरूपात होत असलेली स्थित्यंतरं. ती अचंबित करणारी असून असंघटित क्षेत्रातील कष्टकऱ्यांसाठी तर जगण्याची लढाई अत्यंत बिकट करणारी आहेत. जागतिकीकरणामुळे आपल्या देशात फार मोठय़ा प्रमाणात आíथक सुबत्ता आणि रोजगार आल्याची आकडेवारी रोजच्या रोज प्रसिद्ध होत असली तरी ही सुबत्ता समाजातील कोणत्या वर्गात नांदते आहे? आणि रोजगार नेमका कुणाला मिळाला आहे?
दुसरा मुद्दा, ज्यांच्याकडे कोणतीही शिक्षणाची पंरपरा नाही असा फार मोठा वर्ग – जो शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत आहे. ज्यांच्याकडे शैक्षणिक पंरपरा होती, त्यांनी शिक्षण व विकसित तंत्र अंगीकृत करून या क्षेत्रातील नवीन-नवीन रोजगार पटकावले आहेत. देश-परदेशात त्यांचेच वर्चस्व निर्माण झाले असून, त्याच शहरी मध्यमवर्गाकडे अमाप पसा आला आणि या वर्गाचे चंगळवादी, ऐषोआरामी, कॉर्पोरेट विश्व निर्माण झालं आहे. गरीब-श्रीमंतामधली दरी ज्या वेगाने खोल होत चालली आहे, त्या बिघाडाची चर्चा आणि दुरुस्ती कधी आणि कुणी करायची?
तिसरा मुद्दा – ज्या समाजवादी चळवळीने शोषणमुक्त समाज-निर्मितीसाठी लढण्याची वैचारिक ताकद दिली, ती चळवळच आता अस्तंगत पावत असताना या शोषित, दुर्लक्षित वर्गाचं काय?  
जनता पक्ष स्थापन होण्यापूर्वी आणि त्याचं विसर्जन झाल्यानंतरही शांताराम चव्हाणांसारखे हजारो कार्यकत्रे लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, समता, न्याय, बंधुता या घटनादत्त उद्दिष्टांशी इतक्या घट्ट जोडले गेले होते की, ती त्यांची जीवनप्रणालीच झाली होती. समाजातील धनदांडग्यांकडून आणि दमन यंत्रणांकडून होणाऱ्या अन्याय-अत्याचारांविरुद्ध जाब विचारण्याचं बळच जणू चव्हाणांसारख्या कार्यकर्त्यांला या विचारप्रणालीने दिलं होतं. त्या पुरोगामी विचारांनी शांताराम चव्हाण इतके भारवले होते की, आपल्या ३० वर्षांच्या राजकीय, सामाजिक वाटचालीत त्यांना कराव्या लागलेल्या प्रत्येक संघर्षांत, अनेक कठीण प्रसंगात आणि आलेल्या प्रत्येक संधीत त्यांनी राष्ट्र सेवा दल आणि अन्य पुरोगामी चळवळीमुळे जी धर्मनिरपेक्ष, विज्ञाननिष्ठ आणि समता, न्याय, बंधुतेची बांधीलकी स्वीकारली होती, त्याचे दाखले या आत्मचरित्रात जागोजागी मिळतात.
चव्हाण शोषणमुक्त समाज-निर्मितीसाठी अगोदर समाजातील दुर्लक्षित घटकांचे किमान नैसर्गिक हक्क अबाधित राहायला हवेत, असा आग्रह धरतात. शेवटच्या माणसाचं मूळ दुख दूर झालं पाहिजे, अशी भूमिका घेऊन काम करणं कधीच सोपं नसतं, याची प्रचीती त्यांचं हे पुस्तक वाचताना येते.
नाशिक शहरातील शेकडो फेरीवाल्यांना सोबत घेऊन त्यांच्या हक्कांसाठी, न्यायासाठी चव्हाण यांनी कधी ‘जेवायला वाढा’ अशी घोषणा देत हजारोंचा मोर्चा काढला तर कधी घेराव, कधी धरणं तर कधी उपोषण केलं, पण कधी कायदा हातात घेतला नाही किंवा कधी िहसक प्रकार करून शहरातील निरापराध्यांना वेठीस धरलं नाही. चव्हाणांच्या या पुस्तकामुळे केवळ नाशिकच्याच नव्हे तर संपूर्ण राज्यातील फेरीवाल्यांना पोटाच्या लढाईसाठी कसा रोजच्या रोज जीवनसंघर्ष करावा लागतो हे समजतं. मला वाटतं, चव्हाणांच्या चळवळीचं हे फार मोठं यश आहे!
उपाशी माणसाला अंग झटकण्याशिवाय पर्याय नसतो, तो खूप मागतो, बोलतो आणि दारिद्य््राामुळे घायकुतीलाही येतो. मग तो प्रचलित व्यवस्थेवर चिडतो, िहसकतेची भाषा बोलू लागतो, हे चळवळीचं नेतृत्व करणाऱ्याला चांगल्या प्रकारे माहीत असतं. तथापि, दमन यंत्रणेकडून जेव्हा वारंवार अशा नाकारलेल्या माणसांचं जगणंच खुडून टाकण्याचा पवित्रा घेतला गेला, तेव्हा संताप अनावर होऊनही चव्हाणांनी अनेक प्रसंगात स्वतला सावरलं आहे.
समाजपरिवर्तनाचा प्रवाहच आज बद्ध झाला आहे. पुरोगामी व क्रांतिवादी शक्तीच आज ठिकठिकाणी एकमेकांना शत्रू मानून एकमेकांविरुद्ध दंड धोपटत आहेत, पराभूत होत आहेत. परिणामी, समाज प्रवाहाची गतीच खुंटली आहे. तात्त्विक गोंधळ आणि सैद्धांतिक अपसमज यांच्या बेडय़ा घालून पुरोगामी प्रवाहांनी स्वतंत्र वाटचाल आरंभिली असल्यामुळे इथल्या समाज सुधारकांना हवं असलेलं इहवादी व विज्ञानवादी नवप्रबोधन मिळेनासं झालं आहे. अशा अत्यंत अवघड परिस्थितीत शांताराम चव्हाण यांच्या या आत्मचरित्राचं महत्त्व विशेष अधोरेखित होतं.
अन्यायाविरुद्ध पेटून उठणारं हे व्यक्तिमत्त्व प्रखर तर खरंच, पण वास्तवात हा विष्णुदास मेणाहून मऊ असल्याचेही दाखले यात मिळतात. त्यातून चव्हाणांच्या वैयक्तिक जीवनातील अनेक अपरिचित पलू या पुस्तकातून समोर येतात.
मृत्यू हे चिरंतन सत्य आहे. मात्र ते सत्य पचवण्याची वेदना अत्यंत क्लेशदायक असते. त्यात तो मृत्यू आपल्या प्रिय व्यक्तीचा असेल तर उर्वरित सारं आयुष्यच तो उन्मळून टाकतो.  पत्नी शकुंतला वहिनींच्या अकाली मृत्यूचं दुख चव्हाणांनी अत्यंत मोजक्या परंतु तेवढय़ाच हृदयद्रावक शब्दांत मांडलं आहे. चव्हाणांच्या सर्व संघर्षांत शकुंतला वहिनी त्यांच्या पाठीशी असायच्या. भाऊंचा अत्यंत कष्टप्रद संसार तर त्यांनी केलाच, पण तिन्ही मुली आणि मुलगा यांना वाढवताना त्यांनी अनेक दिव्यं सोसली. वहिनींबद्दलचा हा अखेरचा भाग काहीसा हेलावून टाकणारा आहे.
‘हरवलेल्या वाटेवरचा प्रवासी’ हे शीर्षक काहीसं नकारात्मक वाटत असलं तरी चव्हाण यांनी केलेला संघर्ष प्रेरणादायी आहे. तो नैराश्यवादी नसून एक प्रकारे यशाचा इतिहास आहे, असंच म्हणावं लागेल.
..अशा या झपाटलेल्या कार्यकर्त्यांचं हे आत्मचरित्र प्रत्येक संवदेनशील माणसानं वाचलंच पाहिजे. कार्यकर्त्यांना हे आत्मचरित्र संघर्षांची, लढण्याची प्रेरणा देईल. चळवळीत केवळ कार्यकर्ता म्हणून काम करणं वेगळं आणि नेतृत्व करत चळवळ पुढे रेटणं वेगळं, याची साक्ष यातून पटायला मदत होते. असंघटित क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या आणि ‘नाशिकचे बाबा आढाव’ म्हटल्या जाणाऱ्या शांताराम चव्हाण यांचं हे आत्मचरित्र प्रत्येकाला भावेल, असं आहे.
‘हरवलेल्या वाटेवरचा प्रवासी’ – शांताराम चव्हाण,
परममित्र पब्लिकेशन, ठाणे,
पृष्ठे – २५८ , मूल्य – २५० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा