साईनाथ उस्कईकर
गोव्यातून एफटीआयआयमध्ये शिकण्यासाठी स्थलांतरित झालेल्या तरुण दिग्दर्शकाची ही गोष्ट. शहराच्या दृश्यप्रतिमांमधून त्याने काय घेतले, स्वत:ला कसे घडविले आणि पहिल्या डॉक्युमेण्ट्रीच्या निर्मितीमध्ये ते कसे उतरले, या तपशिलांसह…
मी अभियांत्रिकीचा विद्यार्थी असलो तरी त्यात ‘करिअर’ करायचे नाही हे कधीतरी मनात पक्के झालेले. म्हणजे गोव्यातील माझी कौटुंबिक पार्श्वभूमी कलाकेंद्री असल्याचा दाखला मला देता येईल. तरीही शाळकरी जीवनापर्यंत मी पूर्णपणे अभ्यासू आणि ‘मार्कार्थी’ विद्यार्थी होतो. माझ्या आईच्या कुटुंबाकडून माझ्यात कलेचा काहीअंशी वारसा आला. गोव्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या शांतादुर्गा मंदिराजवळ ‘कालत’ ज्याला ‘काला’ असेही संबोधले जाते, तो नाटकाचा कलाप्रकार सादर करण्याचा मान गेल्या शतकभरापासून वंशपरंपरेने माझ्या आजोळच्या घराकडे आलेला. याशिवाय माझा मामा थिएटर अकादमीच्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थी. परिणामी नाटक, रंगभूमी, अभिनय आदी सर्व बाबी मी लहानपणापासून न कळताही पाहत आलेलो. त्या काळात शिक्षकांच्या बोलण्या-चालण्याची नक्कल हुबेहूब करीत होतो, तरी शाळकरी वयापर्यंत माझी अभ्यासावर अगाध श्रद्धा शिल्लक होती.
पुढे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर अचानक मी पथनाट्य लिहायला सुरुवात केली. विषय- गोवा आणि देशातील राजकारण, हे मला त्यावेळी भावलेले आणि आकलन झालेल्या जगावरचे. याच काळात मित्रांच्या ‘सिनेडाऊनलोड वाटप केंद्रां’वरून देशोदेशीचे चित्रपट पाहताना ‘डेड पोएट सोसायटी’ या लोकप्रिय चित्रपटाने माझ्या मनावर ‘कला’ जाणिवांबाबत गांभीर्याने ठसा उमटवला. त्यामुळे पदवीनंतर ‘इन्स्ट्रुमेण्टल इंजिनीअरिंग’ या क्षेत्रात नोकरीची शक्यता निर्माण झालेली असताना मी ‘म्युझियम ऑफ गोवा’ या आर्ट गॅलरीमध्ये दोन वर्षे उमेदवारी केली. सुबोध केरकर हे तिथले कलाकार माझे कलेतील पहिले गुरू म्हणावे लागतील. वैद्याकीय शिक्षण पूर्ण करूनही ते त्यांचा पूर्णवेळ कलेसाठी देत होते. या आर्ट गॅलरीमध्ये माझी चित्रकलेशी, चित्रकलेतल्या बारकाव्यांशी ओळख झाली. एस. एच. रझा, एफ. एन. सुझा यांच्यासारख्या कलाकारांची माहिती मिळाली. खरे तर ‘व्हिडीओ एडिटिंग’ येत असल्याचे सांगून मी तेथे शिरकाव करून घेतला होता, पण प्रत्यक्षात माझा व्हिडीओ एडिटिंगशी, कॅमेराशी तेथेच काम सुरू केल्यावर पहिल्यांदा परिचय झाला. या काळात कधीतरी मी ‘टिस’च्या (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स) ‘साचा’ (द लूम) डॉक्युमेण्ट्रीच्या प्रेमात पडलो.
अंजली माँटेरो आणि के. पी. जयशंकर यांची ती मुंबईवरील डॉक्युमेण्ट्री. सुधीर पटवर्धन यांची चित्रे आणि नारायण सुर्वे यांच्या कविता, निवेदन यांचा वापर करून तयार केलेली ही फिल्म पाहिल्यानंतर मी इतका प्रभावित झालो की, त्या आवेगात ‘टिस’मध्ये शिकण्यासाठी अर्ज भरला. तिथे निवडला गेलो. त्याचबरोबर ‘एफटीआयआय’ला देखील मला प्रवेश मिळाला. (हे दोन कोर्स एकाचवेळी करण्यातील तांत्रिक अडचणींमुळे टिसमधील एकच टर्म मला पूर्ण करता आली.) करोनामुळे ‘एफटीआयआय’मधील अभ्यासक्रम लांबण्याच्या काळात मी पहिली शॉर्टफिल्म बनविली ती तेव्हा उपलब्ध असलेल्या त्रोटक संसाधनांच्या आधारे.
आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कॅमेरा अँगल आणि जंपकट्स पलीकडले…
माझ्याजवळ कॅमेरा नव्हता, पण लग्नाची शूटिंग करणारा कॅमेरामन-फोटोग्राफर माझा मित्र होता. त्याला तयार करून आणि ललितकला केंद्रातील माझ्या मित्र-मैत्रिणींना अभिनयासाठी उभे करून ‘वाघ्रो’ ही माझी कोकणी शॉर्टफिल्म तयार झाली. कॅमेरामन मित्राचे लग्नाच्या चित्रीकरणाचे वेळापत्रक जुळवून (संध्याकाळी हळद, सकाळी लग्न) आमचे फिल्मचे शूटिंग चाले. सगळ्या मित्रांच्या सहकार्यामुळे पाच हजार रुपयांहून कमी बजेटमध्ये ‘वाघ्रो’ तयार झाली. जातीच्या फेऱ्यात अडकलेल्या दोन प्रेमिकांची ही गोष्ट त्यावर्षी विविध राष्ट्रीय महोत्सवांमध्ये वाखाणली गेली. पुढे काही आंतरराष्ट्रीय महोत्सवांमधील चर्चांमधून ती प्रख्यात ‘कान’ महोत्सवात पोहोचली. पहिल्याच कामाला मिळालेला इतका मोठा प्रतिसाद मला या माध्यमाबद्दल आणखी सजग बनविण्यास कारणीभूत ठरला.
‘एफटीआयआय’मध्ये शिकायला आलो तेव्हा गोव्यातून पहिल्यांदा मी कुठेतरी दुसरीकडे स्थलांतरित झालो होतो. इथली संस्कृती, वातावरण, माणसे आणि इथल्या वास्तूंशी माझे नव्याने नाते बनू पाहत होते. यापूर्वी पुण्यात लहानपणी कधीतरी पर्यटक म्हणून आल्याच्या, शनिवारवाडा आणि काही जागा पाहिल्याच्या पुसट आठवणी होत्या. पण प्रत्यक्षात शिकण्याच्या निमित्ताने ‘एफटीआयआय’मध्ये आल्यानंतर इथल्या अजब दृश्यप्रतिमा माझ्या डोळ्यांसमोर घर बनवत राहिल्या. पहाटे तीन-चार वाजतादेखील मिळणारे पोहे, उत्साहाने भारलेली चर्चिल तरुणाई, स्वप्नांची पोतडी सोबत घेऊन बोलणारे आजूबाजूचे विद्यार्थी अशी संस्कृती मला गोव्यात कधीच पाहायला मिळाली नव्हती. फिल्मशिक्षणाच्या दरम्यान माझ्याकडून भरपूर चित्रपट आणि डॉक्युमेण्ट्रीचा फडशा पाडला गेला. पण काहींनी मला सिनेनिर्मितीच्या कलेची अगदी नव्याने ओळख करून दिली. त्यातली पहिली पायल कपाडिया यांची ‘ए नाईट ऑफ नोईंग नथिंग’ (२०२१) ही डॉक्युमेण्ट्री. दृश्य-ध्वनी- संवेदनांचा इतका तरल वापर झालेली फिल्म यापूर्वी मी पाहिली नव्हती. ‘ऑल वी इमॅजिन अॅज ए लाईट’ या वर्षी गाजत असलेल्या चित्रपटामुळे पायल यांना सारे जग ओळखत आहे. मात्र सामाजिक वास्तव, वैयक्तिक तपशील यांना सिनेमॅटिक मुलामा देऊन तयार झालेली ‘ए नाईट ऑफ नोईंग नथिंग’ पाहिल्यानंतर भारावलेल्या अवस्थेत ई-मेलआयडी शोधून पायल यांच्याशी संवाद साधला. त्यांना माझी ‘वाघ्रो’ फिल्म पाहायला पाठविली. पुढे आमची चांगली मैत्री झाली.
दुसरी भावलेली डॉक्युमेण्ट्री पंकज ऋषीकुमार यांची ‘द बेअर’. मद्याधीन झालेल्या पित्याला व्यसनातून मुक्त होण्यासाठी याचना करणाऱ्या मुलीची ही कहाणी. त्यातले रखरखीत वास्तव, गोष्टी आहेत तशा, बिलकूल सजावट न करता दाखविण्याचा अट्टहास हा पाहणाऱ्याला थक्क करणारा. याशिवाय दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची ‘थ्री ऑफ अस’ ही अंगावर प्रत्यक्षात काटा आणणारी डॉक्युफिल्म पाहिल्यानंतर या माध्यमात किती खोलवर काम होऊ शकते, याचा धडा मला मिळाला.
विधू विनोद चोप्रा यांच्या आत्मचरित्रात त्यांनी एक नोंद केली आहे की, ‘मी सिनेमा बनवतो, तेव्हा त्याची इमारत, त्याचा आराखडा हा मुख्यधारेचा पाया रचून करतो. मात्र पटकथा लिहिताना मी त्यातली सरधोपट रचना बदलून टाकतो.’ कल्पना ही मुख्यधारेशी निगडित ठेवून तुमचे तुम्हाला काय देता येते, तुमचा विचार आणि तुमचे कलेत काय उतरते ते महत्त्वाचे. माझ्या डोक्यात फिल्म बनवताना हे कायम पक्के असते. मी गोव्यातून आलेला. माझी भाषा, माझ्या सांस्कृतिक परिघातून मला जगण्याचे जे आकलन आले, त्यातून माझा दृष्टिकोन तयार झाला. त्यामुळे मेनस्ट्रिम किंवा कलात्मक कोणताही चित्रपट बनविताना त्यातून आलेलेच मी देऊ शकणार. काही महिन्यांपूर्वी मी एक दहा मिनिटांची रशियन फिल्म बनविली. रशियामध्ये जाऊन तिथल्या कलाकारांना, अभिनेत्यांना घेऊन सिनेमा बनविण्याचा एक प्रकल्प आला होता. ‘फूटप्रिंट ऑफ द रोड’ (रस्त्याचे ठसे) या नावाची ती फिल्म पुढल्या वर्षी महोत्सवांतून पाहायला मिळेल. मला रशियन येत नव्हते. कलाकारांना इंग्रजी समजत नव्हते. मात्र दुभाष्यांच्या मदतीने आणि नंतर काही भाषिक तपशिलांच्या अभ्यासातून ही फिल्म पूर्णत्वाला गेली.
आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: शोधण्यातील मजा…
‘गॉठो’ ही माझी पहिली डॉक्युफिल्म (नॉनफिक्शन) मी ‘एफटीआयआय’च्या प्रकल्पासाठी केली. ‘गॉठो’चा अर्थ मराठीत गोठा. जनावरांचे आश्रयस्थान. आमच्या गोव्यातील घराशेजारी गाई-गुरे होती. लहानपणी या गाई-गुरांच्या निवासाची व्यवस्था असलेल्या ‘गॉठो’त इतर नातेवाईकांसह माझा बऱ्याचदा वावर असे. ही संकल्पना फिल्मच्या नावामध्ये उतरली, ती घर सोडून शिकण्याच्या निमित्ताने मी पहिल्यांदा स्थलांतरित झाल्यानंतर. पुण्यात हॉस्टेलमधले जगणे अनुभवल्यानंतर. माझी ऐंशी वर्षांची आजी सुनिला- तिला आम्ही फोन घेऊन दिला होता. जो वापरणे तिला अवघड असल्याने पूर्वी कधी तिचा फोन येत नसे. पण गोवा सोडल्यानंतर तिचा फोन जवळजवळ रोजच येऊ लागला. सुरुवातीला आमच्या सामान्य गप्पा चालत. मग तिचे काळजीचे प्रश्न, दूरच्या प्रदेशात राहिलेल्या नातवाच्या भविष्याची चिंता… असे सगळे येऊ लागले. काही काळानंतर मला फोनमधील आमच्या संवादाचे रेकॉर्डिंग करावे, असे वाटायला लागले. तीन तासांहून अधिक संवादातील काही तुकडे आणि पुण्यातील आश्रयस्थानात माझ्या मनावर गोंदल्या गेलेल्या दृश्यप्रतिमा यांचे एकत्रिकरण म्हणजे ‘गॉठो’.
एक आजी तिच्या नातवाला ‘लग्न करण्याच्या वयात आता फिल्म बनवण्याचे कसले शिक्षण घेतोयस?’ असे प्रश्न विचारताना दिसते. करोनाकाळानंतरच्या अशाश्वत भविष्याने भरलेल्या जगात आम्ही सिनेमा बनविण्याचे शिकत होतो. स्वत:ला घडविण्यासाठी धडपडत होतो. पुणे शहरात, त्याच्या आसपासच्या परिसरात मला माझ्या गोव्याच्या भूमीशी जोडणारे अनेक दृश्यघटक दिसत होते. ते मी कॅमेरात टिपत होतो. सगळे नातेवाईक, माझ्या आसपासचे परिचित ‘तुम्ही काय करताय?’ हे सतत विचारत होते. मी माणूस म्हणून सिनेमा बनविण्याचे शिक्षण घेताना काय करतोय, अशा अनेक प्रश्नांनी पछाडलो होतो. उत्तर होते ती माझी फिल्म. माझ्यासारख्या अनेक कलाकार होऊ इच्छिणाऱ्यांना आश्रयस्थान दिलेल्या अनेकांनी त्यांची उत्तरेही अशीच शोधली होती. पुण्याजवळच्या माळशिरस येथे काही भाग चित्रित केला, काही बंद पडलेल्या एकलपडदा सिनेमागृहांचे दर्शन होत होते. त्यांना मी फिल्मच्या दृश्यचौकटीत बसविले. ल्युमिए बंधूंनी पहिला चित्रपट बनवून चालत्या ‘रेल्वे’चे चित्रिकरण करून प्रेक्षकांना अचंबित केले होते. मला शिवाजीनगर स्थानकात शिरणाऱ्या रेल्वेचे कॅमेराच्या भिन्न नजरेतून चित्रिकरण करायचे होते. आजी-नातवाच्या संवादात या दृश्यमालिकांची जोडणी करून मला माझ्या वकुबाला पणाला लावता आले. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याला घडविणारे एक आश्रयस्थान असते. सिनेमा हे माझे ‘गॉठो’ आहे. आश्रयस्थान आहे.
एफटीआयआयच्या शिक्षण काळातील चाल कोंकणी फिल्म्सनंतर मी गोव्यात गेल्यानंतर ‘गुंतता हृदय हे’ नावाची मराठी शॉर्ट फिल्म केली. माझे प्राध्यापक मिलिंद दामले यांनी त्याचे लेखन केले आहे. सध्या जाहिराती, फिल्म, प्रकल्प संशोधक म्हणून मुंबईतील मोठ्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करीत असलो, तरी लवकरच माझ्या स्वतंत्र फिचर फिल्मची तयारी सुरू होणार आहे. त्याबाबत प्रचंड आशावादी आहे.
sainathuskaikar@gmail.com
(समाप्त)