डॉ. राजेंद्र डोळके
निखळ बुद्धिप्रामाण्यवादाच्या भूमिकेवरून निरनिराळय़ा शास्त्रांचा अभ्यास व संशोधन करणारे नागपुरातील ऋषितुल्य विद्वान केशव लक्ष्मण उपाख्य भाऊजी दप्तरी यांची येत्या मंगळवारी (२२ नोव्हेंबर) जयंती, त्यानिमित्ताने..
ज्ञानप्राप्ती आणि सत्यशोध ही मानवी संस्कृतीची दोन अत्युच्च परिमाणे ठरली आहेत. ज्ञान आणि सत्य या अंतिम मूल्यांना जाणून घेण्याकरिता मानवाची अखंड धडपड चालू असते; आणि ज्या मन:शक्तीद्वारा आपल्याला ज्ञानप्राप्ती आणि सत्यसाधन होते ती मन:शक्ती म्हणजे बुद्धी होय. या मन:शक्तीद्वारे आपल्याला सत्यासत्याचा किंवा योग्यायोग्यतेचा विवेक करता येतो. बुद्धी या शब्दाची व्युत्पत्ती ‘बुध’ (म्हणजे जाणणे) या धातूपासून आहे. बुद्धी म्हणजेच जाणणे किंवा जाणण्याचे (एकमेव) साधन. मनुष्याचे जे आचरण होत असते ते त्याला एखादे तत्त्व पटल्यानंतर. हे तत्त्व पटवून देणारे किंवा निवडानिवड करणारे जे अदृश्य इंद्रिय त्याला लाभले असते, ते म्हणजे बुद्धी.
आपल्या बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून पटते ते आणि तेच सत्य. किंवा योग्य म्हणून स्वीकारणे म्हणजेच बुद्धिवाद स्वीकारणे; आणि जे सत्य किंवा योग्य म्हणून आपल्याला पटले नसते त्याचा स्वीकार न करणे, मग ते कोण्या धर्मग्रंथाने अथवा प्रेषिताने सांगितलेले का होईना, अशा रीतीने वागणे म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी असणे.
अशा निखळ बुद्धिप्रामाण्यवादाच्या भूमिकेवरून निरनिराळय़ा शास्त्रांचा अभ्यास व संशोधन करणारे केशव लक्ष्मण उपाख्य भाऊजी दप्तरी (२२ नोव्हेंबर १८८०-१९ फेब्रुवारी १९५६) हे नागपुरात ऋषितुल्य व अव्वल दर्जाचे विद्वान होऊन गेले. त्यांना ‘विद्वद्रत्न’ ही पदवी देऊन जनतेने मानाचा मुजरा केला होता. अत्यंत तीक्ष्ण आणि धारदार बुद्धी त्यांना लाभली होती. त्यांच्या ‘भारतीय युद्धकालनिर्णय’ या प्रदीर्घ निबंधातील प्रगाढ विद्वत्ता आणि बुद्धिवैभव पाहून लोकमान्य टिळकही चकित झाले होते.
दप्तरी प्रखर बुद्धिवादी होते. बुद्धिप्रामाण्य हेच त्यांच्या जीवनाचे व विचार करण्याचे प्रमुख अधिष्ठान होते. त्यांचा बुद्धिवाद हा त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या भारतीय अथवा पाश्चात्त्य बुद्धिवाद्यांच्या अभ्यासातून तयार झालेला नव्हता, तर त्यांच्या मनाची घडणच लहानपणापासून तशी झाली होती. बुद्धीस ते सर्वश्रेष्ठ मानत. बुद्धी हेच ज्ञानाचे एकमेव साधन आहे. म्हणून तात्त्विक आणि व्यावहारिक प्रश्नांचा निर्णय करताना ते बुद्धी हाच एकमेव निकष मानत. मनुष्यबुद्धीला अगम्य असणाऱ्या अनेक गोष्टी सृष्टीत असतात आणि मानवी बुद्धी त्याचे उत्तर देऊ शकत नाही, म्हणून श्रद्धेने त्यावर विश्वास ठेवावा असे मानणारा एक फार मोठा श्रद्धावान पक्षही या जगात आहे. दप्तरींना हे अजिबात मान्य नाही. बुद्धीला अग्रा अशा गोष्टींवर विश्वास (श्रद्धा) ठेवणे, ही गोष्टच अशक्य आहे. बुद्धीला अग्रा असा हा विषय काळा आहे अशी श्रद्धा ठेवावी किंवा गोरा आहे अशी श्रद्धा ठेवावी? बुद्धी दुर्बल आहे हा सिद्धांतच मुळी खोटा आहे. बुद्धी केव्हा केव्हा चुकते, हे खरे आहे. पण ही चुकीही बुद्धीच- चुकणाऱ्यांची किंवा इतरांची बुद्धीच शोधून काढते आणि स्वत:ची चुकी स्वत:च्या किंवा इतरांच्या बुद्धीच्या साहाय्याने समजून येते. याप्रमाणे बुद्धी आणि बुद्धिप्रामाण्य याबद्दलचे दप्तरींचे अत्यंत स्पष्ट आणि खणखणीत विचार आहेत.
अशा प्रकारे निखळ बुद्धिवादी भूमिकेवरून आणि बुद्धिप्रामाण्याच्या र्सवकष निष्ठेतून त्यांनी धर्मशास्त्र, वैद्यक, प्राचीन भारतीय इतिहास, ज्योतिर्गणित, समाजशास्त्र, महाभारत, रामायण इत्यादी विषयांच्या बुडाशी भिडून आपले स्वतंत्र शोध लावले आहेत. त्यांचे ‘करणकल्पकता’, ‘धर्मरहस्य’,‘ धर्मविवादस्वरूप’, ‘जैमिन्यर्थदीपिका’, ‘व्यासार्थदीपिका’, ‘तात्त्विक मीमांसापद्धती’,‘ औपनिषदक जीवनसौख्य’, ‘उपनिषदर्थव्याख्या’, ‘पंचांगचंद्रिका’, ‘भारतीय ज्योति:शास्त्र निरीक्षण’, ‘ चिकित्सा परीक्षण’, ‘महाभारत युद्धकालनिर्णय’ वगैरे ग्रंथ म्हणजे त्यांच्या अचाट बुद्धिमत्तेची मूर्त स्मारकेच होत. यापैकी स्थलाभावी येथे धर्म आणि उपनिषदे या फक्त दोन विषयांवरच्या त्यांच्या अभिनव अभ्यासाचा परिचय करून देतो.
धर्मासंबंधी अनेक प्रश्नांनी दप्तरींना अस्वस्थ केले. त्या अस्वस्थतेतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरिता त्यांनी धर्मग्रंथाचे अवलोकन करून स्वत:चे तत्त्वज्ञान निर्माण केले. धर्मग्रंथांचा अभ्यास करण्याचे एक नवीनच पद्धतीशास्त्र (Methodology) दप्तरींनी तयार केले. आतापर्यंत धर्मग्रंथांचा अभ्यास त्यातील शब्द प्रमाण मानूनच झाला होता आणि शब्दाचे अनेक अर्थ होत असल्यामुळे अनेक परस्परविरोधी मते धर्मग्रंथांतून निर्माण झालेली आढळतात. दप्तरींनी धर्मग्रंथांचा अभ्यास करण्याकरिता त्यातील ‘शब्द’ प्रमाण न मानता ‘बुद्धी’ हेच प्रमाण मानले. धर्मशास्त्र – जे आज ग्रंथप्रधान आहे – ते बुद्धिप्रधान बनविले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. यालाच तात्त्विक अथवा ऐतिहासिक मीमांसापद्धती असे म्हणतात.
दप्तरींनी आपली धर्मविषयक तत्त्वे सांगितली आहेत ती अशी – ‘वसिष्ठसंहिता’ या फार पुरातन ग्रंथातील ‘अथात: पुरुषनि:श्रेयसाय धर्मजिज्ञासा’ या वचनातील ‘नि:श्रेयस’ म्हणजे अतिशय उच्चतर सुख प्राप्त करून घेण्याकरिताच धर्माचे प्रयोजन आहे. सुख म्हणजे वासनेचा अभाव. हे उच्चतर सुख प्राप्त करून घेण्याकरिताच मनुष्य आयुष्यभर झटत असतो. हे उच्चतर सुख मनुष्याला इहलोकीच मिळणारे असावे, परलोकी नव्हे. परलोक बुद्धिगम्य नसल्यामुळे दप्तरींनी तो नाकारला आहे. कारण सुख मनुष्याला तो ‘मनुष्य’ असेपर्यंत म्हणजे जिवंत असेपर्यंतच मिळू शकते. मनुष्य इहलोकातच जन्मतो, वावरतो आणि संपतो. परलोक पाहिलाच कुणी? धर्म हा परिवर्तनीय आहे आणि कालानुसार त्याच्यात परिवर्तन आवश्यक आहे. निरनिराळय़ा काळी निरनिराळय़ा स्मृती आढळून येतात, याचा अर्थ धर्मात परिवर्तन होत गेले, असाच होतो. धर्म सांगणारे त्या त्या काळचे विद्वान पुरुष असले तरी विद्वानांच्याही हातून काही चुका संभवतातच. शिवाय त्या विद्वानांनी त्यांच्या काळची परिस्थिती लक्षात घेऊन धर्म सांगितले. नवीन परिस्थितीत ते धर्म दु:खकारक होत असेल तर त्यात बदल करणे अपरिहार्य आहे, तेव्हाच ‘सुखस्य मूलं धर्म:’ हे जे धर्माचे उद्दिष्ट आहे, ते साध्य होईल असे दप्तरी म्हणतात.
असाच बुद्धिनिष्ठ अर्थ त्यांनी ‘उपनिषदां’चा लावला आहे. त्यांच्या ग्रंथाचे नावच मुळी ‘उपनिषदांचा वस्तुनिष्ठ आणि बुद्धिप्रत्यक अर्थ’ असा आहे.
उपनिषदांवर शंकराचार्यादी पूर्वाचार्याची भाष्ये फार प्रसिद्ध आहेत; परंतु त्यांची भूमिका व उपनिषदांचा अर्थ लावण्याची रीती ही मुळातच चुकलेली आहे, असे दप्तरींचे स्पष्ट मत होते. शंकराचार्यादी उपनिषदांवर लिहिलेले भाष्य चूक असून समाजास हानीकारक आहे असे त्यांना वाटे. त्यामुळे उपनिषदांचा खरा, बुद्धिप्रामाण्यवादी व विवेकवादी इहनिष्ठ अर्थ लोकांना कळावा यासाठी त्यांनी सात वर्षे अत्यंत परिश्रम करून उपनिषदांवर आपले स्वतंत्र भाष्य लिहिले. पूर्वाचार्याप्रमाणे जगाच्या उत्पत्ती-स्थिती-लयाला कारणीभूत होणारे ब्रह्म हा उपनिषदांचा विषय भाऊजींनीही मानला होता; परंतु पूर्वाचार्याप्रमाणे बह्म हे परलोकनिष्ठ आहे असे न मानता, ते इहलोकातील आनंदप्राप्तीला साधनीभूत होणारे आहे, असे त्यांनी मानले. भाऊजींनी जीवाला ब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ ठरविले आहे. भाऊजींच्या मते ब्रह्म हे ज्येष्ठ आहे, पण श्रेष्ठ नाही. कारण ब्रह्म हे मुळात निद्रेतील जीवासारखे अव्याकृत किंवा अनाविष्कृत असून जीवाच्या आधाराशिवाय त्याचा आविष्कारच होत नाही. ‘जीवो ब्रह्मैव फुल्लितम्’ म्हणजे जीव हे ब्रह्माचे विकसन अथवा आविष्कार आहे. आनंद प्राप्त करून घेणारा हा सर्वश्रेष्ठ जीव, मनुष्य हाच असल्यामुळे, मनुष्य हाच विश्वात सर्वश्रेष्ठ ठरतो. ब्रह्मापासून जीव निर्माण झाला, हे दप्तरींना मान्य आहे, पण शंकराचार्याप्रमाणे ते जीव हा ब्रह्माचा विवर्त होय, असे मानत नसून ब्रह्माचा विकास होय, असे मानतात. कोळसा व हिरा यातील वस्तू एकच, पण कोळशाचा विकास होऊनच हिरा बनतो. त्याप्रमाणे ब्रह्म आणि जीव यातील वस्तू एकच आणि ब्रह्माचा विकास होऊन जीव बनला. याप्रमाणे शंकराचार्याचा विवर्तवाद चुकीचा ठरवून त्यांनी आपला विकासवाद कथन केला आहे. त्या जीवरूपी हिऱ्याला घासून व पैलू पाडून अधिक तेजस्वी कसे करावे, हाच उपनिषदकांपुढील प्रश्न आहे, असे ते म्हणतात.
याप्रमाणे अतिशय बुद्धिवादी पद्धतीचा व सर्वस्वी स्वतंत्र असा उपनिषदांचा अर्थ दप्तरींनी केला आहे. या ग्रंथावरून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, ‘‘भारतीय मनुष्यास आधुनिक जीवनसंग्रामात आवश्यक असलेली मौलिक दृष्टी, वेदांच्या आधारे देणारा यासारखा दुसरा प्रबंध नाही. हा प्रबंध भारतीय विचारेतिहासात अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे.’’ हा ग्रंथ वाचून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन इतके प्रभावित झाले होते, की त्यांनी आपल्या नागपूरभेटीत दप्तरींची भेट हा प्रमुख कार्यक्रम ठरवला होता. एवढेच नव्हे तर स्वत: दप्तरींच्या महालातील राहत्या घरी जाऊन त्यांच्याशी शास्त्रावर चर्चा केली होती.
बुद्धी हीच केंद्रस्थानी ठेवून भाऊजींनी इतर अनेक विषयांवर मूलगामी आणि महत्त्वाचे लेखन केले आहे. विस्तारभयास्तव येथे त्याचा साधा उल्लेखही करता येत नाही. महाराष्ट्रातील दोन प्रख्यात विद्वानांनी त्यांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार या ठिकाणी देऊन लेखाचा समारोप करतो.
विख्यात साहित्यिक श्री. कृ. कोल्हटकर भाऊजींचा नेहमी ‘सॉक्रेटिससारखा तपस्वी खरा ज्ञानी पुरुष’ असा उल्लेख करीत. ते म्हणत, ‘‘मी महाराष्ट्रात खरे ज्ञानी पुरुष फक्त दोनच पाहिले. एक केशवराव दप्तरी आणि दुसरे वामनराव जोशी.’’ तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘‘.. नागपूरच्या दप्तरींनी आपल्या ‘धर्मरहस्य’ वगैरे ग्रंथांत वेद, उपनिषदे, गीता यातील तत्त्वज्ञानाचा विचार अगदी स्वतंत्र बुद्धीने केला आहे. पूर्वपरंपरा आणि पूर्वसंस्कार हे सगळे बाजूला सारून, स्वतंत्र दृष्टीने आपल्या धर्माची आणि तत्त्वज्ञानाची चिकित्सा करणारा तेवढा एकच विद्वान मला महाराष्ट्रात दिसतो. बाकीचे सगळे जुन्या चाकोरीतून रखडताहेत.’’
rajendradolke@gmail.com