रघुनंदन गोखले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुद्धिबळ ही तर्कशास्त्राचे विज्ञान समजावून सांगणारी एक कला आहे. किंवा सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर बुद्धिबळ हे एक विज्ञान आहे, तर्कशास्त्र आहे आणि त्याचबरोबर एक कलाही आहे. बुद्धिबळ जगज्जेत्यांचे बुद्धिमान भागफळ  हे  नेहमीच १८० हून जास्त राहिले आहे. हंगेरी या देशातील पोलगार दाम्पत्याने आपल्या मुलींना बुद्धिबळात असामान्य प्रावीण्य मिळविता यावे यासाठी काही खास प्रयोग राबविले. त्याच्या सूत्राविषयी आजच्या लेखातून चर्चा..

सर्वसामान्य लोकांना हंगेरी या देशातील फक्त दोन नावे माहिती असतात- क्यूबवाला एर्नो रुबिक आणि बुद्धिबळातील पोलगार भगिनी. यापूर्वी आपण सुसान पोलगारविषयी माहिती करून घेतली आहेच; आणि सतत २५ वर्षे बुद्धिबळ जगतावर राज्य करणारी बुद्धिबळसम्राज्ञी ज्युडिथ पोलगारविषयीही भविष्यात माहिती करून घेणार आहोत. आता वळू या पोलगार कुटुंबीयांच्या प्रयोगाविषयी  ज्याचे सूत्र होते- ‘मुलांची अलौकिक बुद्धिमत्ता जन्मजात नसते. ती तुम्हीच विकसित करा!’

बुद्धिबळच का? याचं उत्तर वाचकांना मिळेल ते पुढील एका वाक्यावरून- बुद्धिबळ ही तर्कशास्त्राचे विज्ञान समजावून सांगणारी एक कला आहे. किंवा सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर बुद्धिबळ हे एक विज्ञान आहे, तर्कशास्त्र आहे आणि त्याचबरोबर एक कलाही आहे. बुद्धिबळ जगज्जेत्यांचे बुद्धिमान भागफळ ( क . द.) हे  नेहमीच १८० हून जास्त राहिले आहे. रेमंड कीन या ब्रिटिश ग्रॅण्डमास्टरनं तर स्कॉटलंड यार्डला एका मोठय़ा गुन्ह्यच्या शोधासाठी मदत केली होती.

आज आपण बुद्धिबळ हा खेळ बाजूला ठेवून प्रज्ञावंत कसे तयार करता येतात याच्या लाझलो आणि क्लारा पोलगार यांच्या प्रयोगाविषयी माहिती घेऊ. लाझलो म्हणतो की, त्याने हा प्रयोग मुलींना बुद्धिबळ शिकवून त्यांना जगज्जेते बनवण्यासाठी केला; परंतु लोकांना  बुद्धिबळाच्या माध्यमातून इतर विषयांतही प्रगती करता येईल. तो पुढे म्हणतो, ‘‘मोठय़ा संख्येनं अलौकिक बुद्धिमत्ता सुरुवातीलाच गमावल्या जातात, कारण त्यांना स्वत:लाच माहिती नसते की ते किती प्रतिभावंत आहेत. याला पालक आणि समाज दोघेही जबाबदार आहेत. साधा विचार करा- ‘तू गप्प बस!’ किंवा ‘तुला काय कळतंय!’ किंवा ‘तू कशाला त्यांची बरोबरी करतोस’ अशा वाक्यांनी मुलांचं किती नुकसान होत असेल! ’’

लाझलो पोलगार स्वत: शिक्षण- मानसशास्त्रज्ञ आणि पत्नी क्लारा भाषा विषयाची शिक्षिका! त्यांचं म्हणणं असं होतं की, शाळांचा अभ्यासक्रम हा सर्वसामान्य मुलांसाठी बनवलेला असतो आणि मंदबुद्धी आणि तल्लख बुद्धीची मुलं एकत्र शिकताना दोघांचाही फायदा होत नाही. अनेक विषय तर भविष्यात त्यांना उपयोगी न पडणारे असतात. बरेच शिक्षकही त्या विद्यार्थ्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेला न्याय देऊ शकत नाहीत. खूपदा तल्लख बुद्धिमत्तेच्या मुलांची सामान्य वकुबाची मुले कुचेष्टा करून त्यांचा मानसिक छळ करतात. बॉबी फिशरनं तर ‘‘त्यांच्याकडे मला शिकवण्यासारखं काही नाही,’’ असं म्हणून लहानपणीच शाळेला सोडचिठ्ठी दिली होती.

आपल्या मुलीला वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षांपासून पद्धतशीर तयार करणाऱ्या लाझलोनं सक्तीच्या शिक्षणाच्या सहा महिने आधीच सरकारकडे परवानगी मागितली की, आमच्या मुलीला शाळेत न येण्याची परवानगी द्या. लाझलोनं जर्मन शैक्षणिक मासिकात आलेला ‘हुशारी म्हणजे शाळेत दु:ख’ या आशयाचा लेख जोडला. अनेक महिन्यांच्या पत्रव्यवहारानंतर सरकारी अधिकाऱ्यांना पटवून देण्यात पोलगार कुटुंबाला यश मिळालं. शाळेत फक्त परीक्षेपुरतं जाण्याची सूट सुसानला मिळाली.

सुसान आईकडून ५-६ भाषा शिकली. शाळेतले कंटाळवाणे विषय तिला थोडक्यात शिकवण्यात येत असत. उरलेला वेळ सुसानला लाझलो बुद्धिबळ शिकवत असे, पण मनोरंजक पद्धतीनं! अधूनमधून वडील तिच्याशी हरत असल्यामुळे तिला कधी कंटाळा आला नाही. तिची स्मरणशक्ती वाढावी म्हणून बुद्धिबळाच्या कूटप्रश्नांचा वापर त्यांनी केला. त्याचं फळ त्यांना दिसत होतं. दहाव्या वर्षांपर्यंत सुसान भाषातज्ज्ञ झाली. शाळेत कितीही कठीण परीक्षा असली तरी आनंदी वातावरणात शिकल्यामुळे सुसानला काहीही कठीण जात नसे. तिच्या सर्वंकष वाढीत काहीही कमतरता राहू नये म्हणून स्वत: लाझलो रात्री उशिरापर्यंत विविध नोकऱ्या करत असे. सुसानची आई क्लारा घरचे काम, विविध भाषा आणि शालेय विषय यातच लक्ष घालत असे.

पोलगार यांच्या प्रयोगाचे निष्कर्ष-

१) बुद्धिबळ शिकण्यास लवकर सुरुवात करा- मुलांना वयाच्या चौथ्या वर्षांपासून बुद्धिबळाविषयी शिकवण देण्यास सुरुवात करावी. त्यामुळे त्यांना त्यांची कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. अर्थात याचा फायदा त्यांना अन्य क्षेत्रात (उदाहरणार्थ- अभ्यासात) होतो; परंतु वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून जर त्यांचं भाषा शिक्षण सुरू केलं आणि त्यांना ज्या क्षेत्रात तज्ज्ञ बनवायचं असेल तर त्याचं शिक्षण सहाव्या वर्षांपासून सुरू केलं तर त्यांना जरूर फायदा होईल.

२) विविध भाषा शिकवा- वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून (नाही तर चौथ्या वर्षांपासून तरी) विविध भाषा शिकवाव्यात. त्यामुळे त्यांचा व्यक्तिगत विकास होतो. पोलगार दाम्पत्यानं आपल्या तीनही मुलींना रशियन बालमंदिरात घातलं होतं. त्यामुळे त्या वर्षभरात मातृभाषा हंगेरियन आणि रशियन या दोन्ही भाषा अस्खलित बोलू लागल्या. मुख्य म्हणजे अनेक भाषा शिकूनही लहान मुलांची त्यांच्या व्याकरणात गफलत होत नाही असं पोलगार यांच्या लक्षात आलं.

३) हळूहळू कूटप्रश्न कठीण करा- मुलांना देण्यात येणारं काम (बुद्धिबळाचा विचार केला तर कूटप्रश्न) त्यांच्या वयानुसार कठीण करण्यात यावं. अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ डोमन यांच्या मते, जसं आपल्या शरीरातील स्नायू सततच्या व्यायामामुळे मजबूत होतात, तसंच आपल्या मेंदूचंही असतं.

४) मुलांना खेळू द्या – मुख्य मुद्दा आहे की, या मुलांना त्यांच्या वयाच्या मुलांसारखं खेळू द्यावं की खेळापासून दूर ठेवावं. त्यामुळे त्यांचं बालपण कोमेजून तर जाणार नाही ना? लाझलो पोलगार यांच्या मते, त्या मुलांना असे काही खेळ द्यावे, की त्यामुळे ती खूश राहतील आणि त्यांचा मानसिक आणि शारीरिक विकासही होईल. अखेर त्यांना ज्यामध्ये आनंद वाटतो त्याच कलानं आपण घेतलं तर त्यांना रस वाटेल आणि वेळ फुकट जाणार नाही. पोलगार भगिनी लहानपणापासून विविध भाषा, बुद्धिबळ आणि टेबल टेनिसमध्ये पारंगत होत्या. 

५) संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकास – पोलगार दाम्पत्यानं शिक्षणशास्त्र आणि बालमानसशास्त्राचा भरपूर अभ्यास केला होता. वयाच्या ८ व्या वर्षांपर्यंत बालकाचा मेंदू जे शिकतो ते पुढल्या आयुष्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्या मुलांना त्या वयात भरपूर काम दिलं तर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर परिणाम तर होणार नाही का? असं त्यांना विचारलं असता लाझलो म्हणाला की, जरी या विषयावर पुरेसं संशोधन झालं नसलं तरी माझ्या मुलींकडे बघा. त्या सुखाचं जीवन जगत आहेत.

६) कामाच्या ओझ्याला उगाच घाबरू नका- आपल्या लाडात वाढलेल्या मुलांना इतकं काम शक्य होईल का? असं आपल्याला वाटणं साहजिक आहे. यावर लाझलोनं एक उदाहरण दिलं आहे ड्रेस्डेन (जर्मनी) येथे झालेल्या बुद्धिबळ मॅरेथॉनचं. १९८५ साली झालेल्या या स्पर्धेचे नियम होते फार कडक आणि माणसाच्या मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीची परीक्षा पाहणारे! सर्व स्पर्धकांना २४ तास सतत खेळून जलदगतीनं १०० डाव खेळायचं होतं. फक्त २०-२० मिनिटांचे तीन विश्रांतीकाळ त्यांना देण्यात येणार होते. १५ वर्षांची सुसान, ९ वर्षांची सोफिया आणि ८ वर्षांची चिमुकली ज्युडिथ यांची नावं या स्पर्धेत बघून सर्वाना धक्का बसला. पैसे वाचवण्यासाठी पोलगार पतिपत्नी आपल्या मुलींना १६ तासांचा रेल्वे प्रवास करून ड्रेस्डेनला स्पर्धेच्या दिवशी सकाळी पोहोचले.

स्पर्धा सुरू झाली आणि संपली त्या वेळी निकालांनी सगळे चकित झाले. २४ तासांनंतर १०० डाव पूर्ण करून सुसाननं पहिला क्रमांक पटकावला होता- तोदेखील सरासरी २५-३० वर्षे वयाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्ध्यामध्ये. तिनं ९१.५ गुण मिळवले आणि दुसऱ्या क्रमांकाला मिळाले होते ८०! मुख्य म्हणजे तिनं पहिल्या ५० डावांत जितके गुण मिळवले होते जवळजवळ तितकेच गुण तिनं अखेरच्या ५० डावांत मिळवले होते. त्याहून आश्चर्य म्हणजे ज्युडिथनं मिळवलेले ६८.५ आणि सोफियाचे ६६! ज्युडिथने तर अखेरच्या ५० डावांत आधीच्या ५० डावांपेक्षा जास्त गुण मिळवले होते. २४ तासांत त्यांचे सतत फोटो काढले गेले आणि त्या सगळय़ा फोटोत तीनही बहिणी कायम ताज्यातवान्या दिसत होत्या. पोलगार भगिनींनी पुढच्या वर्षी पुन्हा एकदा भाग घेतला आणि ड्रेस्डेन मॅरेथॉनमध्ये सुसान पहिली आली आणि तिच्या छोटय़ा बहिणींनी कमालीचा खेळ केला- आणि तोही न थकता!

लाझलो म्हणतो की, यावरून हेच सिद्ध होतं की, लहान वयातही तुमची सर्वंकष क्षमता भरपूर असते!  

७) मुलांना आनंदी ठेवा- लाझलो आणि क्लारा या पोलगार दाम्पत्यानं आपल्या मुलींना गुलामाप्रमाणे वागवलं आणि त्यांना अमानुष वागणूक दिली, असा त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यावर त्या दाम्पत्यानं सांगितलं की, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही आनंदी असता त्याच वेळी तुमच्याकडून चांगले निकाल लागू शकतात. जर माझ्या मुली पहिल्यापासून आनंदी नसत्या तर त्या असा जगविख्यात खेळ करूच शकल्या नसत्या आणि १८ वर्षांच्या झाल्यावर खेळ (आणि आम्हाला) सोडून गेल्या असत्या. याचा अर्थ या प्रयोगात त्यांचा मनापासून सहभाग होता.

यावरून एक निष्कर्ष काढता येतो. लहान वयात मुलांना डोक्याचं काम द्या. नुसतं सुडोकू अथवा कोडी घातली तर मुलं लवकरच कंटाळून जातील. त्यापेक्षा त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीनं बुद्धिबळ शिकवा. त्यांना स्पर्धेत भाग घेऊ द्या. एकदा त्यांना आवड लागली की त्यांची बुद्धिमत्ता पूर्ण विकसित होईल.

आता काही पालकांना असं वाटण्याचा संभव आहे की, आमची मुलं १० वर्षांची (किंवा त्याहून मोठी) झाली. आता त्यांचं मानसिक विकासाचं वय गेलं तर नाही ना? पण घाबरू नका. माणसाचा मेंदू लवचीक असतो. कोणत्याही वेळी आपण कोणतीही गोष्ट शिकू शकतो; परंतु शुभस्य शीघ्रम हेच खरं!

मुलांनी परिस्थितीनुरूप योग्य निर्णय घेणं, मानसिकदृष्टय़ा कणखर बनणं, त्यांना तीक्ष्ण स्मरणशक्ती आणि अमर्याद कल्पनाशक्ती मिळणं यापेक्षा आपल्याला आणखी काय हवं? योग्य प्रकारे शिकवलं गेलं तर बुद्धिबळ मुलांना यातच परिपूर्ण करतं.

gokhale.chess@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of the genius polgar sisters zws