राहुल गांधी यांना ‘पप्पू’ बनवण्याचा डाव पद्धतशीरपणे रचण्यात आला. इतकेच नव्हे तर मानसिक तोल ढळल्याच्या, व्यसनीपणाच्या अफवा पसरविल्या गेल्या. चहुबाजूंनी टीका संपत नसताना त्यांचा प्रवास धीरोदात्त नेत्यापर्यंत कसा होऊ शकला? त्यांच्या मानसिक कणखरपणाचे गमक काय असावे?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी संसदेमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘प्यार की झप्पी’ दिली होती. या कृतीची इतकी कुचेष्टा केली गेली की, पुढील पाच वर्षांनंतर हाच नेता भाजपविरोधी राजकारणाचा आधारस्तंभ बनेल याची कल्पनादेखील कोणी केली नसेल. सत्तेच्या दरबारी राजकारणामध्ये एखाद्याला समूळ नष्ट केले जाऊ शकते. राहुल गांधींनाही ‘पप्पू’ बनवण्याचा डाव पद्धतशीरपणे रचला गेला. त्यासाठी पक्ष संघटनेची, समाजमाध्यमांची, प्रसारमाध्यमांची संपूर्ण यंत्रणा वापरली गेली. हे कारस्थान यशस्वी होऊ लागले, असा भासही निर्माण केला गेला. चहूबाजूंनी सातत्याने हल्लाबोल होत असताना, प्रचंड मानसिक खच्चीकरण केले जात असताना राजकीय नेते म्हणून राहुल गांधींचा टिकाव कसा लागला, असा विचार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणाही सुज्ञाच्या मनात येऊ शकतो.
हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: विनम्रतेची शाळा…
संघविचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या एका अभ्यासकाने तीन-चार वर्षांपूर्वी एका खासगी चर्चेमध्ये, ‘राहुल गांधींना मीच पप्पू बनवले’ अशी मखलाशी केली होती. तीही अशा पद्धतीने की ‘पप्पू’ हा शब्द कोणी पहिल्यांदा उच्चारला याची जणू स्पर्धा लागली असावी. पण दीड वर्षांपासून या स्पर्धकांनी एक-एक पाऊल मागे घ्यायला सुरुवात केली असे दिसले. सप्टेंबर २०२२ मध्ये राहुल गांधींनी ‘भारत जोडो’ यात्रा काढली. तिचीही खिल्ली उडवण्यात आली होती. पण या यात्रेला जनसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून मात्र काहींना धडकी भरली. मग कारस्थान्यांनी राहुल गांधींना ‘पप्पू’ म्हणणे बंद केले! ‘भारत जोडो’ यात्रेनंतर राहुल गांधी राजकीयदृष्ट्या परिपक्व होताना दिसले. राहुल गांधींचे बदललेले बाह्यरूप अनेकांनी पाहिले, पण फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेण्याची उभारी राहुल गांधींसारख्या राजकीय नेत्यांना कुठून मिळते? वयाची ऐंशी पार केलेल्या शरद पवारांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ची शकले झाली, तरीही राज्यभर फिरून नवे सोबती जोडून, नव्या कार्यकर्त्यांना उभारी देऊन लोकसभा निवडणुकीत यश मिळवणे कसे शक्य होते?
राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मानसिक कणखरपणा हा समान धागा दिसतो. मानसिक कणखरतेचा विचार केला तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्येही आहे. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर जागतिक बहिष्कार घातला गेला होता, पण पंतप्रधान झाल्यावर जगाने आपली दारे त्यांच्यासाठी उघडी केली. टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकून राहण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती एवढेच मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये साम्य. बाकी दोघांच्या जगण्याची धाटणीच वेगळी आहे. एक देश-एक भाषा, एक धर्म-एक संस्कृती, एक पक्ष आणि एकल नेतृत्वाचा बिनबोभाटपणे आग्रह धरला जात असताना ‘आयडिया ऑफ इंडिया’ अर्थात ‘भारतीयत्वाच्या संकल्पने’चे म्हणजेच देशातील विविधतेचे महत्त्व अगदी निवडणुकांच्या प्रचारात मांडायला वेगळे धाडस लागत असावे.
हेही वाचा : गावात राहावे कोण्या बळे?
बालपणात आजीची क्रूर हत्या झाली, कोवळ्या वयात वडिलांचा छिन्नविच्छिन्न झालेला देह पाहिला. दोघेही पंतप्रधान होते. आईलाही पंतप्रधान होण्याची संधी होती. पूर्वानुभवांमुळे राहुल गांधींनी सोनिया गांधींना पंतप्रधान होऊ दिले नाही. आईच्या जिवाची अधिक काळजी असेल. तारुण्यात येत असताना हिंसाचारात कुटुंबातील सदस्य गमावलेले पाहिले असतील तर राहुल गांधींची मानसिक जडणघडण इतरांपेक्षा निश्चितच वेगळी झाली असेल. जगाचा फारसा अनुभवही नसताना आयुष्याला वेगळे वळण देणाऱ्या घटना घडल्या असतील तर सुडाची भावना विकसित होऊ शकते. किंवा मानसिक खच्चीकरणातून आयुष्य उद्ध्वस्तही होऊ शकते. या दोन्ही गोष्टी राहुल गांधींमध्ये दिसल्या नाहीत. पण या घटनांचा विरोधकांनी गैरवापर करून राहुल गांधींना मानसिक असंतुलित ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. व्यसनीपणाच्या अफवा पसरवल्या गेल्या. त्यांची विक्षिप्त, निर्बुद्ध ‘युवराज’ अशीच प्रतिमा निर्माण केली गेली.
गांधी घराण्यातील सदस्य असलेले राहुल हे मोदींच्या भाजपचे राजकीय हत्यार ठरले. राजकीय आयुष्याच्या पूर्वार्धात राहुल गांधींमधली अपरिपक्वता दिसली. मनमोहन सिंग सरकारचा अध्यादेश फाडून टाकण्यामागचा त्यांचा हेतू कदाचित उदात्त असेलही, पण त्यांच्या त्या कृतीमुळे काँग्रेसचे राजकीय नुकसान झाले. दीडशे वर्षे जुना अवाढव्य पक्ष चालवण्याची मोठी जबाबदारी राहुल गांधींना सुरुवातीला पेलवली नाही हे मान्य करावे लागेल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. राज्या-राज्यांतील विधानसभा निवडणुकीतही लोकांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाला नाकारले. पक्षाला तरुण बनवण्याचा प्रयोग फसला. पक्षातील ज्येष्ठांनी त्यांच्याविरोधात बंड केले. अमेठीचा बालेकिल्लाही गेला. देशाचे नेतृत्व १८-१८ तास काम करत असल्याचा बोलबाला होत होता. राहुल गांधींना ‘अपघाताने राजकारणात आलेले’ ठरवले गेले. सातत्याने परदेशात सुट्टीचा आनंद लुटणारे राजकारणातील पर्यटक अशी हेटाळणी केली गेली. पक्षात स्वत:चे नेतृत्व सिद्ध करता आले नाही, निवडणुकीच्या राजकारणात यश मिळाले नाही. अशा राजकीय नेत्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. राहुल गांधींबाबतही तेच झाले. मग त्यांचा प्रवास धीरोदात्त नेत्यापर्यंत कसा होऊ शकला?
हेही वाचा : विरूप अवस्थांतरणाची गोष्ट
२०१९ मधील पराभवानंतर राहुल गांधींनी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन एकप्रकारे राजकीय आयुष्याचा तळ गाठला होता. इथून राहुल गांधींनी यशापयशाच्या पलीकडे जाऊन देशाच्या राजकारणाची दिशा बदलण्याकडे वाटचाल केली असे म्हणता येईल. त्याची प्रचीती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आली, पण त्याआधी ‘भारत जोडो’ यात्रेने राहुल गांधींना मानसिक बळ मिळाल्याचे पाहायला मिळाले. संपूर्ण यात्रेमध्ये सर्वसामान्य लोक राहुल गांधींना भेटत होते, तरुण मुली-महिला, म्हातारे-कोतारे कुठलीही भीडभाड न बाळगता राहुल गांधींना भावाला, मुलाला भेटावे तसे भेटताना, वागवताना दिसले. पुरुष म्हणून राहुल गांधींबद्दल या महिलांना असुरक्षितता वाटली नाही. उलट त्यांनी आपली वैयक्तिक गाऱ्हाणी सांगितली. आपलेपणाच्या भावनेने मन हलके केले. राहुल गांधींची ही पदयात्रा होती. या देशात पदयात्रा करणाऱ्या अनेक नेत्यांनी राजकारणात बदल घडवून आणला आहे. राहुल गांधींनी स्वत:मध्येही बदल घडवला असावा. आत्तापर्यंत ते जनसामान्यांना भेटले नव्हते. त्यांच्या समस्या, व्यथा याची तीव्रता समजली नव्हती. पण यात्रेनंतर शेतकऱ्यांचे प्रश्न, दलित-महिलांचे प्रश्न, जातीच्या राजकारणाचा तिढा, महागाई-बेरोजगारी अशा असंख्य दैनंदिन समस्यांना सामोरे जाणारे लोक भेटत गेले, त्यातून समज वाढत गेली. ‘भारत जोडो’ यात्रेनंतरची राहुल गांधींची राजकीय वाटचाल परिपक्व होत गेल्याचे दिसले. ते संवेदनशील राजकारणी असल्याची प्रतिमा निर्माण होऊ लागली. हरियाणात त्यांना भेटलेल्या एका लहानशा गावातील महिलांनी अजून दिल्ली बघितली नाही, असे सांगितल्यानंतर ‘भारत जोडो’ यात्रा संपल्यावर राहुल गांधींनी त्यांना दिल्लीवारी घडवली. स्वत:च्या घरात बोलवून त्यांच्यासोबत राहुल, प्रियांका आणि सोनिया गांधींनी सहभोजन केले. हा राजकीय प्रचार असल्याची टीका कोणी करेलही. पण आयुष्याच्या सुरुवातीलाच टोकाची हिंसा बघितलेले हे भाऊ-बहीण कुठलीही भीडभाड न बाळगता लोकांमध्ये जातात, त्यांच्याशी थेट संवाद साधतात, ही बाब सुडाने पेटलेल्या आजच्या राजकीय वातावरण महत्त्वाची ठरते.
हेही वाचा : गरम होतेय…
‘पप्पू म्हणा किंवा आणखी काही, मला काही फरक पडत नाही. मी लोकांसाठी काम करत राहीन,’ असे राहुल गांधी लोकसभेत म्हणाले होते. विरोधकांनी आपल्याला दिलेल्या हीन वागणुकीची तमा न बाळगता टीकेला खुल्या मनाने सामोरे जाण्याचा उमदेपणा राहुल गांधींकडे आहे, असे दिसते. हेच कदाचित त्यांच्या मानसिक कणखरपणाचे गमक असावे. देशात ध्रुवीकरणाचे राजकारण केले जात असताना, कोणी कोणते कपडे घालावेत- कोणते घालू नयेत, काय खावे- काय खाऊ नये, कोणी कोणाशी लग्न करावे, कोणाशी करू नये या मुद्द्यांवर हिंसा घडवली जात असताना ‘नफरत की बाजार में मोहोब्बत की दुकान’ उघडायला आलो आहे, असे म्हणणे सरधोपट ठरत नाही, त्याची प्रचीती लोकसभा निवडणुकीच्या निकालातून आली आहे.
mahesh.sarlashkar@expressindia.com