आमच्या ‘देशभक्त सहकारी गृहरचना संस्था मर्यादित’च्या शेजारीच ‘विश्वशांती कॉलनी’ आहे. पण ती मर्यादित नाही; अमर्यादित आहे. या दोन्ही वसाहतींतील चुरस पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे व लोकांच्या करमणुकीचा विषय आहे. लोकांना काय, ते कशालाही हसतात.
विश्वशांती कॉलनीत सदनिका मिळते तीही विशिष्ट लोकांना. सोपे नाही ते. कुटुंबातील किमान एक व्यक्ती डावरी असेल तरच तिथे घर मिळते. परवा तिथल्या एका कुटुंबाला घर सोडण्याची वेळ आली. कारण त्यांच्यातील एकमेव डावरी बाई तिचा डावा हात अपघातात गमावून बसली. शेवटी तिच्या बहिणीनी स्वत:चा उजवा हात कापण्याचे मान्य केले तेव्हा घर वाचले!
त्यांची दुसरी अट म्हणजे कोणतीही गोष्ट आंतरराष्ट्रीय किंवा किमान राष्ट्रीय पातळीवर नेता आली पाहिजे. आता परवाच पलीकडच्या गल्लीत चिखलात खेळणारे एक कुत्रे गाडीखाली मेले. गाडीवाला पळून गेला. पण विश्वशांतीमधील एकाने पाहिले की गाडी परदेशी बनावटीची होती. लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी मल्टिनॅशनल कंपन्यांच्या विरोधात मोर्चा काढला. देशी कुत्री मारणाऱ्या परदेशी गाडय़ा नको म्हणाले. तेवढय़ात ते चिखलात खेळणारे कुत्रे पामेरियन असून विश्वशांतीवाल्यांचेच होते हे उघडकीला आले. पण ते डगमगले नाहीत.
त्यांनी हळूच चिखलाच्या विरोधात युती- आपलं.. आघाडी उघडली. मुळात कुत्र्याला चिखल लागल्यामुळे कुत्रा कुठला आणि रस्ता कुठला, हे ओळखू येईनासे झाले व अपघात घडला, हा मुद्दा पुढे आला. त्यात त्यांचे पामेरियन विसरले गेले. त्यावरून वाद वळला तो पाण्याचा फॉम्र्युला काय असला पाहिजे, यावर. वातावरणात अठ्ठय़ाहत्तर टक्के नायट्रोजन असून तो पाण्यात का नाही? पाण्यात हायड्रोजन का? असा प्रश्न त्यांनी एवढय़ा जोरात विचारला, की स्वर्गात आइनस्टाईन व इकडे पत्रकारही बावचळले. जर पाण्यात नायट्रोजन असता तर चिखलाचा रंग वेगळा होऊन कुत्रे वाचले असते, असे म्हणणे पडले व तसा त्यांनी विश्वशांती कॉलनीत ठराव पास केला. नायट्रोजन असलेले पाणी- म्हणजे एच टू ओ ऐवजी एन टू ओ उत्पन्न करावे म्हणून त्यांनी आग्रह धरला असून, त्यात कमळ उगवणार नाही, हा दुसरा फायदा त्यांच्या लक्षात आला आहे.
अर्थातच आमच्या देशभक्त संस्थेने त्याला कडाडून विरोध केला आणि नसत्या प्रयोगशाळा उभारण्यापेक्षा मंदिरे बांधली तर वरुणराजा नित्यनेमाने पाऊस पाडेल, हे ठामपणे सांगितले. मंदिरे बांधायची तयारीही झाली. पण बांधकामाला पाणी मिळेना म्हणून ती पूर्ण झाली नाहीत, हे वेगळे. शिवाय ‘आधीपासून असणाऱ्या मंदिरांचे काय? त्यांचा का नाही उपयोग झाला?’ हे उगीचच जनता उकरून काढू लागली.
आमची अशी हमरीतुमरी चालू असताना तो गाडीचालक आला, त्याने माफी मागितली व प्रायश्चित्त म्हणून टक्कल करून बौद्ध धर्म स्वीकारण्याची तयारी दाखवली. पण त्यावेळी वाद नायट्रोजनपर्यंत पोचला होता. आंतरराष्ट्रीय बनला होता. त्याच्या बडबडीकडे कोणाचे लक्ष गेले नाही. आम्हीही आमचा मुद्दा नेपाळपर्यंत नेला. आम्हाला अजून नीटसे आंतरराष्ट्रीय होता येत नाही; पण जमेल कधीतरी. लोक काय, कशालाही हसतात.
ऑक्सिजन, हायड्रोजन व नायट्रोजन या जनांवरून विश्वशांतीवाले परत ‘गाडी’ या मुद्दय़ावर आले. त्यांनी आपल्याकडे चारचाकी गाडय़ा लेफ्ट हॅंड ड्राइव्हवाल्या असाव्यात म्हणून ठराव मांडला. अगदी डावीकडे चालकचक्र ठेवणे शक्य नसल्यास किमान मध्यभागी तरी असावे अशी उपसूचनाही त्यात आहे. त्यांनी सरकारविरोधात गाडीमोर्चा काढला. पण तो गाडय़ांचा मोर्चा रस्त्याने जात असता त्यांच्या लक्षात आले की गाडी जरी राइट हॅंड ड्राइव्ह असली तरी रस्त्याच्या डाव्या बाजूनेच जात आहे. हा मुद्दा उजवा ठरल्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतले.
भगवा किंवा त्या छटेचा रंग त्यांचा विशेष नावडता. त्यामुळे ते कोणीही संत्रं खात नाहीत. ‘क’ जीवनसत्त्वाची गरज ते हिरवे आवळे खाऊन भागवतात. अर्थात संत्री नागपूरची म्हणून तुम्ही खात नाही, असे टोमणे आम्ही त्यांना मारतो! त्यावर- पिवळ्या संत्र्यांची पाने हिरवीच असतात, हा प्रतिटोमणा ते मारतात. आणि प्रत्येक हिरवी वस्तू नंतर पिवळी/भगवी होतेच, अशी आम्ही कुरघोडी करतो! म्हणून आता ते प्रत्येक समारंभाला ‘पिकून गळायला आलेल्या पानाचा देठ हिरवा असतो’ असे काहीसे गाणे लावतात. जे अगदी अशास्त्रीय आहे, असे आमचे म्हणणे आहे. आता त्यांनी एक संशोधन केले आहे की, खुद्द महाराजांचा झेंडा हा भगवी पताका नसून लाल बावटा होता. रायगडाच्या उन्हापावसात फिक्का पडून तो भगवा झाला! आम्हीही आमचा एक संघ बसवला आहे- प्रतिसंशोधन करण्यास. पाहू या.
प्रत्येक जुन्या गोष्टीला विरोध हे एक तत्त्व ते फार कसोशीने पाळतात. पण त्याबाबतीत त्यांचे विचार पक्के नाहीत असे आतल्या गोटातून कळते. फार पूर्वी जुन्या वस्तू, जुनी माणसे असे काहीही जुने त्यांना चालत नसे. पण कुंभमेळ्यात जुन्या- म्हणजे म्हाताऱ्या माणसांना सोडून धार्मिक माणसे पळ काढतात हे पाहिल्यानंतर केवळ धार्मिकांना विरोध म्हणून ते म्हाताऱ्या माणसांशी चांगले वागू लागले. किती हा कारस्थानीपणा! इतके, की त्यांचा पंतप्रधान किंवा पक्षश्रेष्ठी किमान ऐंशी वर्षांचा तरी असावा लागतो, किंवा अशा देशातून यावा लागतो- ज्याची संस्कृती प्राचीन आहे!
अजून एक जुनी वस्तू त्यांना चालते, ती म्हणजे मद्य. कारण ते जेवढे जुने, तेवढे चांगले. अशावेळी त्या मद्याभोवतीच्या बाटल्या अत्यंत नव्याकोऱ्या वापरून ते परत आपला बाणा दाखवतात. पण हे अपवाद. आता ते जून महिन्याचे नाव बदला म्हणून युनोवर मोर्चा काढणार असल्याचे ऐकतो. त्यांचे हे न डगमगणे, शत्रू असून आपल्याला आवडते बुवा.
अशा या न डगमगणाऱ्या विश्वशांतीला १६ मे २०१४ रोजी भूकंपाचा मोठा धक्का बसला. धक्क्य़ाचे केंद्र गुजरात की दिल्ली, ते स्पष्ट झाले नाही. पण मुंबईतील बाकी कुठलीच कॉलनी हलली नाही.. ही तेवढी हलली! हा खूप विशिष्ट प्रकारचा भूकंप आहे असे तज्ज्ञांचे मत पडले. त्या दिवसापासून दर सोळा तारखेला ते शोकसभा भरवतात. शेजारच्या प्रेसिडेंट हॉटेल या गुत्त्यामध्ये भरमसाट पितात व दु:ख विसरतात. महिन्यात सोळा तारीख असू नये व एकूणच सोळा हा आकडाच असू नये यासाठी गणितशास्त्रात कोणते बदल करता येतील, याबद्दल ते आता संशोधन करीत आहेत. शास्त्र, साहित्य, कला या कशातही सोळा असू नये यासाठी ‘सोळावापसी’ सुरू करता येईल का, हे ते तपासत आहेत. ‘सोळाव्वी तारीख धोक्याची गं’ हा आल्बम लवकरच ते प्रसिद्ध करीत आहेत.
तर, दर सोळा तारखेचा त्यांचा मद्यप्राशनाचा कार्यक्रम खूपच वाढला. ‘एकच प्याला’चा सीक्वल ‘अनेक प्याले’ अर्थात ‘अनेक जण प्याले’ असा होऊन त्या सुधाकरांचे तळीराम होऊ लागले. तळीराम ही उपमा त्यांना आवडणार नाही. कारण त्यात राम आहे. म्हणून ‘तळीरहीम’ किंवा ‘तळीअली’ म्हणू या. शेवटी भावना महत्त्वाची! घरादाराचे वाटोळे होऊ लागले. अख्खी विश्वशांती कॉलनी प्रेसिडेंट बारकडे गहाण पडेल अशी शक्यता निर्माण झाली. अखेर घरचे सोनेनाणे निघाले तेव्हा त्यांना शुद्ध आली. एक दिवस ते सर्वजण आपापले चांदी-सोन्याचे बिल्ले, पदके वगैरे प्रेसिडेंट बारमध्ये उधारफेडीसाठी घेऊन निघाले. ही शेकडो माणसे अशी कुठे निघाली आहेत सोने-चांदी घेऊन, याची कुणा बातमीदाराला उत्सुकता वाटली व ‘विश्वशांतीसाठी मिळालेली पदके प्रेसिडेंटला- म्हणजे राष्ट्रपतींना परत’ अशी बातमी झळकली! तो प्रकार तात्काळ उचलला गेला व देशभर तशी चळवळ सुरू झाली. आता विश्वाची शांती कुणाला नकोय? तिला विरोध असूच शकत नाही ना! पण ती कॉलनी होती, हे लपले ते लपलेच. आणि विश्वशांती राखण्यासाठी कोण किती पुरस्कार परत करतो, अशी अहमहमिका सुरू झाली. खरे तर ‘अहमहमिका’ या शब्दाचा नेमका अर्थ माहीत नाही; पण इथे तो वापरल्यास लेखास जडत्व येईल (जडत्व?.. काहीतरी चुकतंय!) असे वाटते.
असो. त्याच लाटेत आमची मुलेही उत्साहाने आन्तरवर्गीय लगोरी उत्तेजनार्थ तिसरे हा कप देऊ इच्छित होती. त्यांना वाटले, कुठल्यातरी अनाथाश्रमासाठी वर्गणी गोळा होत आहे. जेव्हा त्यांना कळले, की दारूचे कर्ज फेडायला ते निघाले आहेत, तेव्हा ती वेळीच सावध झाली आणि आपली भविष्यातील सोय म्हणून घरातल्या त्या चांदीच्या पेल्यांकडे पाहू लागली.
पण एकूणच आपल्या पराजयाचे जयात रूपांतर झालेले पाहून विश्वशांतीकर हरखून गेले. ही किक् पूर्वीच्या किक्पेक्षा मोठी होती. अनेक मोठी मोठी माणसे त्यांच्या बाजूने बोलू लागली व आपापल्या घराची चांदी ‘विश्वशांती टिकलीच पाहिजे’ या चळवळीसाठी राष्ट्रपतींना दान करू लागली. आता थेट राष्ट्रपतींनी आपल्या उधारीमध्ये लक्ष घातलेले पाहून तो प्रेसिडेंट बारवाला भांबावला व त्याने जप्ती थांबवली. चित्रपटतारेही अहमहमिकेने (आता तरी बरोबर आहे?) या मुद्दय़ात उतरले. शांती, सहनशक्ती, संवेदना किंवा ३’ी१ंल्लूी याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी प्रसंगी फेयरनेस क्रीमची जाहिरात केली आणि समाजाला लागलेली दृष्ट काढून टाकली! काही कुजकट प्रतिगामी म्हणतात की, हे अन्फेयर, असहिष्णू नाही का? तर न डगमगता विश्वशांतीवाले उत्तर देतात, ‘आम्हाला जुनी वर्णव्यवस्था नको. नव्या युगाची नवी वर्णव्यवस्था घडवायची आहे. एससी/ एसटी, बीसी, ओबीसी आणि ओपन हे नवे चार वर्ण आम्ही प्रस्थापित केले आहेत. आता क्रीम वापरून सर्वानाच गोरे सवर्ण करावयाचे आहे!’ खरेच, असे न डगमगणे जमले पाहिजे गडय़ांनो!
विचार केला तर आपल्यालाही पटेल ते. जर काळा-गोरा हा भेद न राहता सगळेच गोरे झाले तर समानता येईल. सवर्ण-अवर्ण दरी मिटवणे- जे गाडगेबाबा, गांधी, आंबेडकर कोणालाच जमले नाही ते फेयरनेस क्रीम करून दाखवेल असे वाटते. समाज तेज:पुंज होईल. जे करणे भल्या भल्या आध्यात्मिक गुरूंना जमले नव्हते. शिवाय विश्वशांतीवाले म्हणाले, ‘गोऱ्या माणसांची संख्या वाढली तर अतिनील- म्हणजे अल्ट्रा व्हायोलेट किरणे त्यांना थडकून परावर्तीत होऊन ग्लोबल वॉर्मिगसुद्धा नष्ट होईल! अजून किती उपकार करायचे त्या ताऱ्यांनी नि त्यांच्या क्रीमनी?’ अर्थात टाकीचे घाव आणि देवपण यांचे नाते आहेच. आणि आपल्या देदीप्यमान देशात हीरोंची मंदिरे बांधण्याची प्रथा आहेच. त्या देवपणाआधीचे हे टाकीचे घाव समजायचे. शिवाय टाकीचे घाव घालवणारे क्रीमही लवकरच शोधून तोही दोष ते घालवतील, हे नक्की!
अजून काही कुजकट लोकांनी असेही टोमणे मारले की, तुमची चांदी अशी परत देण्यापेक्षा ती विकून दोन शेतकरी वाचवले असतेत तर? आता मला ते काय उत्तर देतात ते पाहतोय मी; कारण पुढे-मागे हाच निकष आमच्या उत्सवांतील उधळपट्टी, पंचतारांकित मंदिरे व त्यांचे खजिने यांना लावला तर..? पाहू या, काय उत्तर येते.. मग आम्हीही ते वापरू.
परेश मोकाशी – lokrang@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा